कृष्णायस (भाग २) 

मृणालिनी वनारसे
गुरुवार, 24 मे 2018

मनावनातल्या गोष्टी
 

कृष्णायस? 
हा शब्द कुणीच ऐकला नव्हता. कशाविषयी बोलणं चालू आहे? 
ऐकणाऱ्यांची उत्कंठा वाढली. 
‘सुसर्तु, तुम्ही ही वस्तू जाणता? तुम्ही काय शब्द वापरला? अयस म्हणालात? हे तांबं तर नाही सुसर्तु,’ महाराज म्हणाले. 

‘याला कृष्णायस म्हणून ओळखलं जातं, महाराज. लोहखंड! मघाशी मी पश्‍चिमेकडील शस्त्रास्त्रांचं जे वर्णन करत होतो ते हेच आहे महाराज. दगडासारखं दिसणारं, पण दगडाहून कठीण, अयसाहून, म्हणजे ताम्रायसाहून कितीतरी ताकदवान असं वेगळंच द्रव्य आहे. कृष्णायस याचं नाव. याचा रंग कृष्ण आहे ना, म्हणून कृष्णायस. यापासून बनविलेल्या तलवारीविषयी, मुष्टीविषयी, तीराग्रांविषयी खूप ऐकलं आहे आम्ही.’ 

‘पण हे तुझ्या हाती कसं लागलं हिरू?’ महाराजांनी आश्‍चर्यचकित होऊन हिरूला विचारलं. 
हिरूनं वारुळापासून ते घरच्या चुलाण्यापर्यंतची सगळी कथा जमेल तशी सांगितली. आपण आणलेली वस्तू यथातथा नाहीये याचा त्याला मनातून कोण आनंद झाला होता. 

‘कृष्णायस? हिरूला कृष्णायस बनवायला जमलं आहे,’ महाराजांच्या चेहऱ्यावर कौतुक झळकत होतं. हीच ती घडी. याचीच तर हिरूनं स्वप्नं रंगविली होती. त्याचा होरा खरा ठरला. हिरू कृतकृत्य झाला. बाकी त्याला हवंच होतं काय? सुसर्तु हातात ते तीराग्र घेऊन चाचपणी करत होता. आपलं काम झालं असं समजून हिरू जायला निघणार तेवढ्यात महाराजांनी त्याला विचारलं, ‘आमच्यासाठी अजून असे कृष्णायस तयार करशील हिरू? सांग तुला त्यासाठी काय हवं?’ 
हिरूचा त्याच्या कानांवर विश्‍वास बसेना. एवढी मोठी जबाबदारी महाराज माझ्यावर सोपवताहेत? 

‘हे कसं घडलं मला ठाऊक नाही महाराज. आमची जाखमाता आमच्यावर प्रसन्न आहे. तिच्या कृपेनंच हे वारुळात मला सापडलं. यापेक्षा जास्त मी काही जाणत नाही महाराज,’ हिरू नम्रपणे म्हणाला. 

‘महाराज, कृष्णायस आपल्या हाती आलं तर आपणही एक बलाढ्य शक्ती व्हाल, याविषयी माझ्या मनात शंका नाही. अन्य कुणाच्याही हाती लागण्याआधी हे आपल्या हाती आलं आहे, याला फक्त योगायोग समजू नये. साम्राज्य मजबूत करण्यासाठी हे कृष्णायस तुम्हाला मदत करेल असं मला खात्रीनं वाटतं. मग खुशाल रणशिंग फुंका. अष्टदिशा आपल्या ताब्यात आणा. मगधाचं बलशाली साम्राज्य होऊ द्या,’ सुसर्तु बोलत होता. ऐकणाऱ्यांच्या मनात स्वप्नं पेरत होता. जणू याच कामासाठी तो आज इथं आला होता. महाराजांच्या मनात काय होतं हे त्यानं अचूक ओळखलं होतं. ते शब्दांत गुंफून त्यानं फक्त साऱ्यांच्या समोर ठेवलं.  

‘हे तीराग्र आपण स्वीकारू नये महाराज!’ राजपुरोहितांचा आवाज ऐकून हिरू थबकला. राजपुरोहित असं का म्हणत असतील? आपलं काही चुकलं का? हिरू गोंधळला. 

ते पुढे म्हणाले, ‘आम्ही याबद्दल आधीच आपणास सूचना देत आहोत, की भविष्यातील अनर्थकारी घटना टाळण्यासाठी पुरोहितकर्म केलं गेलं पाहिजे. विपरीत काही झाल्यास आम्ही सांगितलं नाही असं व्हावयास नको.’ 

यावर महाराजांचा नाईलाज झाला. तीराग्र हाती खेळवत काही एक विचार करून ते म्हणाले, ‘सर्वांच्या हितासाठी, संरक्षणासाठी, भरभराटीसाठी हे कृष्णायस अधिकाधिक उत्पन्न व्हावं यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जावेत. त्यासाठी योग्य ते यजन याजन व्हावे आणि मगच हे कर्म संपन्न व्हावे असा आदेश मी देत आहे. हिरू हे नवीन द्रव्य मिळविण्यासाठी मदत करेल, यासाठी राजभांडारातून त्याच्या खर्चाची सर्व तरतूद करण्यात यावी.’ एवढं बोलून महाराज आतील कक्षाच्या दिशेनं चालू लागले. आजच्या दिवसाचं कामकाज संपलं होतं. हिरू प्रचंड गोंधळलेल्या स्थितीत उभा होता. त्यानं कशाची कल्पना केली होती आणि काय झालं होतं! त्याला उमज पडेना. कृष्णायस मिळवायचं म्हणजे काय? ते शिकारीच्या मागे वारूळापर्यंत जाणं, काडीकचरा भरून पेटवून देणं ते सगळं परत करायचं आहे? असं केलं तर अजून कृष्णायस मिळेल? किती मिळेल? किती मिळालं की राज्याला पुरेल? हिरूला काहीच समजेना. इकडं तिकडं डोळे भिरभिरत तो उभा असताना सुसर्तु त्याच्या जवळ आला, खांद्यावर हात ठेवून किंचित हसून म्हणाला, ‘तुला हे काळं अयस कुठं मिळालं, दाखवशील?’ 

पुढच्या सगळ्या गोष्टी फार भराभर झाल्या. राजाचं एक पथक सुसर्तुसह हिरूबरोबर रानाच्या दिशेनं मार्गस्थ झालं. हिरूनं ती वारुळाची जागा आणि आजूबाजूचा परिसर मंडळींना फिरून दाखवला. तिथली चमकणारी माती हातात उचलून सुसर्तु आनंदानं म्हणाला, ‘कृष्णायस!’ पुढचे अनेक दिवस रानात राजाच्या पथकाचा तळ पडला. चमकणाऱ्या मातीचं क्षेत्र निश्‍चित करण्यात आलं. तीच तर कृष्णायस मिळवून देणार होती. मग ते उपसण्यासाठी रान खोदायला सुरवात झाली. दगडी हत्यारं, शिंगं, लाकडात दगड खोचून तयार केलेली हत्यारं... जे होतं ते वापरून रान स्वच्छ करण्यास सुरवात झाली. नीरू, हिरूचा मुलगा हे सगळं काम डोळ्यानं बघत होता, टिपून घेत होता. एवढासा मुलगा मदत करतो याचं सैनिकांनाही कौतुक वाटे. ते मग त्याच्या हातावर एखादा तांब्याचा मणी किंवा असंच काही बक्षीस ठेवत. नीरूला हे काम भारीच आवडलं होतं. आता सगळी सिद्धता झाली होती. एक दिवस पुरोहितांना पाचारण करण्यात आलं. 

प्रत्यक्ष भट्टी पेटण्यापूर्वी होमाला सुरवात झाली. त्याचाच एवढा धूर झाला. रानातले प्राणी भयभीत झाले. यज्ञासाठी हरणांचा बळी चढला. 
यज्ञ तृप्त झाला. 
मग भट्टी पेटली. 
ती आग अस्मानाला भिडलेली पाहून हिरू आपल्या पत्नीला म्हणाला, ‘आता या रानात काही शिल्लक राहणार नाही. आपल्याला इथून हलायला हवं.’ 

पत्नी त्याच्याकडं बघू लागली. राजपथकाचा उपद्रव तिलाही नको झाला होता. 
अधून मधून त्यांचं अन्नही तिला रांधावं लागे. रोज लागणारं सरपणसुद्धा आता लांबून आणावं लागत होतं. कोलाहलानं जीव उठला होता. राजानं तर आदेश देऊन भांडारातून हिरूच्या कुटुंबासाठी काय लागेल ते देण्याची तयारी दाखवली होती. पण गोष्टी तेवढ्या सोप्या थोड्याच होत्या? काम सुरू झाल्यास हिरू जसा विसरलाच गेला होता.. आणि खरंतर, आपण जिथं राहतो ते रान नाहीसं झालं तर इथं राहण्यात तरी काय अर्थ होता? पण इथून जायचं तरी कुठं? 

त्याच रात्री हिरू वस्तीतल्या सर्वांशी बोलला. सगळे मिळून वीस - पंचवीस जणांची वस्ती. त्या सगळ्यांनाच आता तिथून निघून जाणं मान्य होतं. रात्रीत तयारी झाली आणि दुसऱ्या दिवशी एक जथा मगधातलं ते अरण्य सोडून निघाला, याचा कुणाला पत्ताही लागला नाही. लागला असता तरी हे असून नसलेलं अटवीजन गेल्यानं कुणाला फरक पडणार होता? नीरूनं मात्र जाताना त्याचं एक खास गाठोडं तयार केलं होतं. वडिलांनी राहिलेल्या लोह खंडातून बनवलेल्या लहान सहान वस्तू, एक धारदार विळा, एक छिन्नी, एक तीराग्र असं बरोबर बांधून घेतलं होतं. 

नर्मदा ओलांडून पलीकडं गेल्यास फारशी वस्ती नाही, भरपूर रान आणि कुणाचा त्रास नाही असं सर्वांच्याच कानावर होतं. पण तिथं पोचायला किती महिने लागतील? किती वर्षं? किती दिवस झाले होते मगध सोडून? हिरू आता क्षीण झाला होता. त्यादिवशी कृष्णायस त्याला नसतंच मिळालं तर? असं तो वारंवार बोलत राहिला. इतक्‍या दिवसांनंतरही त्या दिवशीचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर येत होता. त्यांच्या कानावर बातम्या येत, की मगधात कृष्णायस मोठ्या प्रमाणावर मिळवणं सुरू झालं आहे. लोह खंड वापरून अशा तलवारी तयार केल्या आहेत, की शत्रूला धडकीच भरेल! असे भाले बनवले आहेत, की असे कधी ना ऐकले होते ना बघितले होते.  

कृष्णायस मिळविण्याची आता चढाओढ सुरू झाली होती. हिरू हे सगळं बघत होता. अवंती जनपद सोडेपर्यंत हिरू जगला नाही. नर्मदेपलीकडचं स्वप्नातलं रान दिसायच्या आतच त्यानं देह ठेवला. आता नीरूला मातेलाही सांभाळायचं होतं आणि स्वतःलाही! त्यानं हिरूचं नर्मदा पार करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्‍चय केला. आता नर्मदा पार करण्याची आस जथ्यातल्या सर्वांनाच लागली होती. 

एक दिवस नीरू एक घोडा घेऊन वस्तीवर आला. या उमद्या चपळ जनावराविषयी सर्वांनी खूप ऐकलं होतं. पण आपल्याकडं घोडा असेल अशी कधी कल्पनाही केली नव्हती. नीरूकडं घोडा आला कसा? कुणाला काहीच कळेना. नीरूनं राजाचं जनावर तर नाही चोरलं? नीरूवर प्रश्‍नांचा भडिमार झाला. नीरूनं सगळ्यांना शांत करत सांगितलं, ‘हा घोडा मी बदल्यात आणला आहे.’ बदल्यात? कशाच्या बदल्यात? कुणाला काही समजेना. नीरू पुढं बोलू लागला, ‘माझ्या बापानं बनविलेल्या लोह खंडाच्या वस्तू मी जपून ठेवल्या होत्या. त्याच देऊन हा घोडा आणला आहे आणि अजून अशा वस्तू बनवून देऊ शकलो, तर अजूनही घोडे मिळतील. पार बाल्हिक प्रदेशातून आणलेले घोडे आहेत. आपल्याला त्यांची पैदास करता आली तर मग आपलं कितीतरी काम सोपं होईल. याच्या पाठीवर बसून हिंडता येईल, ओझी वाहता येतील.’ नीरूच्या डोळ्यात चमक आली होती. 

कितीतरी वर्षं त्यानं काही गोष्टींचा विचार मनात केला होता, ते आज प्रकट करण्याची वेळ आली होती. 

‘पण कृष्णायस आपल्यापाशी नाही आणि त्या एका गोष्टीसाठी तर आपल्याला आपलं रान सोडून यावं लागलं ना!’ जथ्यातल्या वृद्ध माणसानं शंका विचारली. 

‘नर्मदेपार या द्रव्याविषयी कोणी ऐकलेलं नाही. पूर्वीची चूक आपल्याला करायची नाही काका. कृष्णायस कसं निर्माण करायचं, हे आपण जाणतो. आपल्याला फक्त एक असा अनाघ्रात प्रदेश हवा आहे जिथं आपल्याला हे बनविण्याची सामग्री मिळेल. आता आपण फक्त तयार वस्तू देऊन त्याच्या बदल्यात आपल्याला लागतात त्या गोष्टी मिळवायच्या आहेत. ते कसं बनवलं, कुठं बनवलं हे सगळं सांगण्याची आपल्याला काय आवश्‍यकता?’ 

नव्या पिढीची नवी हुशारी! नीरूच्या रुपात जथ्याला एक नवा नेताच लाभला होता. अथक शोधाशोध करून, अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर राजपिप्पलापाशी नर्मदा ओलांडण्याचा रस्ता त्यांना मिळाला. दक्षिणापथात जथ्याचं पहिलं पाऊल पडलं तोवर जथ्यातली माणसं आणखीन कमी झाली होती. 

नवा प्रदेश, मातीचा नवा सुगंध. शालाची संपून सागवानाची जंगलं सुरू झाली होती. अनंत प्रकारच्या वृक्षसंपदेनं भूभाग नटला होता. नीरूला नवा भूभाग बघून अत्यंत समाधान वाटलं. उत्तम पाऊस, बारमाही पाण्याच्या नद्या, भरपूर मासे आणि शिकार! आता त्याला शोधायचे होते कृष्णायस मिळू शकतील असे साठे. 

वैनगंगा नदीच्या खोऱ्यात त्याचा शोध संपला. इथलं जंगल भीतीदायक खरं, पण थोड्या प्रयत्नानं इथं राहणं सोपं करता येणार होतं. मुबलक लोहखंड, मुबलक इंधन. या जंगलात आसरा घेऊन नीरू आता लोह खंड बनविणार होता आणि लांबच्या नगरीत, जनपदात जाऊन वस्तूंची देवाण घेवाण करणार होता.. झालंही तसंच. 

या नव्या कारागिरीला उठाव मिळायला वेळ लागला नाही. नीरूकडं आता दहा घोडे आले होते. वडिलांनी कृष्णायस कसं निर्माण केलं होतं, त्यावर गरम असताना घण कसे घातले होते.. नीरू विसरला नव्हता. नीरू आणि जथ्याचं आता हेच भांडवल होतं. जंगलात वस्तू बनवायच्या आणि घोड्यांवर बसून लांब जाऊन त्या विकायच्या. शेतकरी त्यानं बनविलेल्या विळ्या, कोयत्यांवर, छिन्नी, कुऱ्हाडीवर खूष होते. त्यांचं काम त्यानं किती पटपट होत होतं! बदल्यात नीरूला दाणागोटा मिळे, कधी कापडचोपड मिळे.  

सगळं चांगलं चालू असतानाच एक नकोशी घटना घडली. ही जथ्यातली मंडळी कृष्णायस बनवितात तरी कुठं आणि कसं हे बघायला राजाचा एक अधिकारी फिरत फिरत त्यांच्या रानातल्या जागी येऊन पोचला. तिथं पेटविलेली भट्टी, गोळा केलेली सामग्री बघून त्यानं विचारलं, ‘आमच्या राजाची परवानगी घेतली? सारं काही विधिवत केलं का? नसेल तर तुम्हाला हे सगळं इथं चालू ठेवता येणार नाही. ही राजाची संपत्ती आहे.’ 

हे गुर्मीतलं बोलणं ऐकून नीरूच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. ही तर त्याचीच पुनरावृत्ती. ती तो कशी होऊ देणार होता? त्याला रातोरात सोडायला लागलेली वस्ती आठवली. तो अनेक वर्षांचा कष्टाचा प्रवास आठवला. हिरूची आठवण आली! 

त्यादिवशी राजाचा अधिकारी तिथून परत आलाच नाही. त्याचं काय झालं इतिहासाला माहीत नाही. 

गोष्ट तीन हजार वर्षांपूर्वी सुरू झाली आहे.. गोष्ट आपलीच आहे...

संबंधित बातम्या