पापा, पकु आणि मोकु 

मृणालिनी वनारसे
शुक्रवार, 15 जून 2018

मनावनातल्या गोष्टी
 

आमच्या शहरगावात एक टेकडी आहे. तिथे फिरायला येणारी माणसे आणि फिरवायला आणलेली कुत्री यांची नेहमी वर्दळ असते. ही कुत्री या टेकडीवरील बिन-पाळीव प्राण्यापक्ष्यांना त्रास देतात अशी सबब सांगून काही पाळीव कुत्रीद्वेष्टया मंडळींनी वनखात्याकडे तक्रार करवून असा नियम करवून घेतला, की येथे पाळीव प्राण्यांना आणण्यास बंदी आहे. पाळीव (प्राण्यांच्या) पालकांना यामुळे मोठे आश्‍चर्य वाटले. फिरवायला आणायचे नाही तर मग नुसते फिरण्यात काय हशील आहे? पाळीव कुत्री बरोबर आणायची नाहीत तर मग, ‘आता चल हं. नाहीतर मी तुला सोडून जाणार. बघ मी चाललो. चला चला चला...’ असे प्रेमपूर्ण संभाषण कुणाबरोबर करता येणार? हे संभाषण इतरेजनांच्या कानावर पडून त्यांचे मोठे मनोरंजन होते आणि एकूण सर्वांचाच वेळ मजेत जातो ही नागरिकांची फुकट मनोरंजनाची सोय वनखात्याने लक्षात घ्यायला हवी असा आग्रह पाळीव पालकांनी (‘पापा’) धरला. 

आमच्या गावात एरवी फुकट काय मिळते? जे मिळते आहे ते बंद पाडण्यात काय मर्दुमकी आहे? असे आमचेही म्हणणे होते. पण वनखाते हे केवळ वन्यजीवांकडे लक्ष द्यायला बनविले असल्याने (आणि कुत्रे हे एके काळी वन्य असल्याचे सगळे विसरल्याने) त्यांनी अर्थातच या मागणीकडे दुर्लक्ष केले. 

वनखात्याचे एकूण धोरण दुर्लक्ष करणे असे असल्याने काही काळाने त्यांनी आपले घोडे दामटून कुत्री आणणाऱ्या (!) ‘पापां’कडेही दुर्लक्ष करायला सुरवात केली. याने नियम केला असेही झाले आणि कुत्री आणता येत नाहीत असेही झाले नाही. वनखात्याने केवळ आपल्या माहिती फलकात एक बदल केला तो असा, की पाळीव प्राणी आणल्यास शिक्षा, असे लिहिलेले खोडून त्याठिकाणी ‘पाळीव प्राणी आणल्याचे सापडल्यास शिक्षा’ असे करून घेतले. आता वनक्षेत्र आणि वन संरक्षक यांचे गुणोत्तर नेहमीच विषम असल्याचे सर्वांस ठाऊक असल्याने न सापडल्याबद्दल वनसंरक्षकास बोलण्याचे काम नाही हे ही त्यांस ठाऊक होते. क्वचित बोलाफुलाला ‘पापा’ आणि वनसंरक्षक यांची एकत्र गाठ पडल्यास वनसंरक्षकाची चहाबिडीची सोय होई. यापेक्षा जास्त सांगण्यासारखे काही नाही. 

तर अशा प्रकारे पाळीव श्‍वान आपल्या आजूबाजूला इतक्‍या संख्येने असताना आपल्याला त्यांच्याशी दोस्ती करून घ्यावी लागणार याची खूणगाठ मी मनाशी बांधली. अलीकडेच मी असे ऐकले होते, की एका माणसाने जंगलात काही काळ वास्तव्य करून हत्तींची भाषा शिकून घेतली. आता एक हत्तीण त्याची जीवश्‍चकंठश्‍च मैत्रीण आहे आणि ते दोघे एकमेकांशी तासन्‌तास हत्तीभाषेत बोलू शकतात. ते खरेच बोलतात का हे कळण्यासाठी किमान आणखी एकास तरी ती भाषा येणे आवश्‍यक आहे असे विद्वत्मत पडले आणि ती गोष्ट तिथेच विरून गेली. मला मात्र असली शहानिशा करणाऱ्या विद्वानांचा रागच आला. दोघेजण एकमेकांशी बोलत असताना तिसऱ्याने त्यात नाक खुपसण्याचे काय कारण आहे? त्याला समजत असेल तर समजते म्हणावे. पण इतका सीधा मामला आमच्या पुण्यनगरीत अवघडच आहे. 

एका संध्याकाळी टेकडीवर फिरायला गेलेलो असताना असेच काही विचार माझ्या मनात चालू होते. तोच एक संभाषण माझ्या कानावर पडले. 

‘मित्रा, तू आमच्यात ज्येष्ठ आहेस. माणसांचे जग तू आमच्यापेक्षा कितीतरी जास्त पहिले आहेस. तू मला एका प्रश्‍नाचे उत्तर सांगशील का?’ 

हा प्रश्‍न ऐकून मी चमकून इकडे तिकडे बघितले. माझ्या शेजारी एक पन्नास-साठ वर्षांची युवती एका पाळीव कुत्र्याला बरोबर घेऊन चालत होती. मला कुत्र्यांचे प्रकार ऐकून माहीत आहेत पण शुभ्र-मळकट आणि झिपरा (आणि सुवासिक!) पोमेरीयन सोडला तर समोर आलेला कुत्रा नेमका कोणता हे मला कधीही सांगता येणार नाही. तेव्हा मी कुत्र्याचे वर्णन करण्याच्या फंदात पडणार नाही. तो कुत्रा होता आणि माणूस किंवा ससा नव्हता हे मला नक्की सांगता येईल.. आणि पुढील गोष्टीसाठी तेवढे पुरेसे आहे. (विद्वान काय म्हणतात याचा विचार न करण्याची बंडखोरी मी नेहमीच करत आलेला आहे) तर मी चमकून इकडे तिकडे बघितले, तेव्हा ही युवती आणि तिचा कुत्रा याखेरीज केवळ आणखी एक सुटा कुत्रा आमच्या आसपास होता असे मला दिसले. या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नव्हता आणि तो विना-मालकाचा असावा असा अंदाज मी केला. 

सूर्यास्ताच्या पुष्कळ अलीकडची वेळ होती. यावेळी टेकडीवर फारशी वर्दळ नसते. सर्व बिझी माणसे त्यांच्या वेळेप्रमाणेच टेकडीवर येतात, सूर्याच्या वेळेप्रमाणे फारसे कोणी येत नाहीत. जे येतात ते फारसे बिझी नसतात हे लगेच कळून येते. अशाच एका बिझी-लेस बाईच्या आगेमागे मी चालत होतो. म्हणजे हा योगायोग होता! गैरसमज नसावा. कॅलिडोस्कोपमधील काचा जशा मोजक्‍याच असल्या, तरी त्यांची संगती दरवेळी नवी दिसते तसे टेकडीवर येणारी बहुतेक माणसे तीच असली तरी दर वेळी तुम्ही कुणाच्या आगेमागे चालाल किंवा तुमच्या आगेमागे कोण चालेल याचा नेम नसतो. आता ही युवती तर तिचे कर्णयंत्र लावून सुरांचा आस्वाद घेत चालत होती हे स्पष्टच होते. एका हाताने कुत्र्याला तो कुठे रेंगाळत असल्यास ओढावे आणि आपल्या बरोबर ठेवावे एवढेच ती करत होती. ती त्याच्याशी गप्पा मारत नव्हती... ‘बघ बघ बघ... मी चालले हां पुढे. मी तुला शोडून जानाल मग..’ वगैरे बोलत नव्हती याने मला आनंदच होता. मग मला जो आवाज आला तो नेमका कुठून? 

मला तत्काळ दिसून आले की माझ्या समोर चालत असलेले दोन श्‍वानच एकमेकांशी बोलत आहेत. लहानपणी ज्यांनी इसापनीती अथवा पंचतंत्र वाचले असेल त्यांना ‘अस्वल बोलले’, ‘कोल्हा म्हणाला’ अशा भाषेची सवय असते. मोठेपणी आपण त्या सर्व उपयुक्त गोष्टी विसरून जातो हे आपले दुर्दैव. मलासुद्धा इतक्‍या सहजगत्या कुत्रा म्हणाला... हे समजेल असे मला वाटले नव्हते. पण ‘नुसता शरीराने वाढलो आहे’ अशी माझी अवहेलना घरी कायम होत असल्याने मी असे सांगू शकतो की मनाने मी ‘मुंगी म्हणाली!, ‘कबूतर म्हणाले’च्या फार जवळ असलो पाहिजे. याशिवाय मला कुत्रा काय म्हणाला हे इतक्‍या लगेच कळते ना! 

मी हत्तींची भाषा जाणण्याची गोष्ट आठवीत होतो. आपल्याला हत्ती तर नाही, गेला बाजार कुत्र्यांची भाषा समजते आहे हे काही कमी नाही. मी विचार करीत होतो. यात कुत्र्यांना कमी लेखणे ही भावना नाही बरे का! आसपास जे आहेत त्यांची भाषा आपल्याला यायला हवी एवढाच मुद्दा आहे. उगाच आफ्रिकेतल्या जंगलातल्या कुडू हरणाची भाषा मला येते असे असण्यात काय हशील आहे! तर कुत्र्यांची भाषा मला समजत होती याने आनंदून मी अधिक लक्ष देऊन त्यांचा संवाद ऐकू लागलो. जे ऐकू आले त्याने माझे शहाणपण पुष्कळच वाढले. यासाठीच जे ऐकले ते मी इतरांस आता सांगत आहे. ज्यांचा विश्‍वास नसेल त्यांनी पुन्हा इसापनीतीची पुस्तके वाचावीत. मग ही गोष्ट वाचली नाही तरी चालेल! उरलेल्यांसाठी - आता पुढे ऐका. 

तर पट्टाधारी कुत्र्याने (‘पकु’) दुसऱ्या मोकळ्या कुत्र्याची (‘मोकु’) खूपच खुशामत चालवली आहे असे मला दिसले. तो म्हणाला, ‘मला ठाऊक आहे तू किती मोठा आहेस. तू मालकाबरोबर राहण्याचा अनुभवही घेतला आहेस आणि एकट्याने राहण्याचासुद्धा! माझ्या मालकिणीने जर मला असे कुठे सोडून दिले तर तुझी गोष्ट आठवून मी डगमगून जाणार नाही. तू भेटशील म्हणून मला इथे यायला आवडते. माझ्या मनात असलेले कितीतरी प्रश्‍न मला तुला विचारायचे असतात. आजही मी एक प्रश्‍न मनात घेऊन आहे. तू कृपाळूपणे मला त्याचा खुलासा करशील का?’ 

उत्तरादाखल ‘मोकु’ने खर्जातील काही गुरगुर केली. ही वैश्‍विक भाषा असून याचा संमतिदर्शक अर्थ तर कोणीही सांगू शकेल. पट्टामुक्त श्‍वान म्हणाले, ‘विचार तुला काय विचारायचे ते. आता तुझ्यासारख्यांना मदत करणे हेच तर माझे काम आहे. आपल्याला एकमेकांच्या सोबतीने थोडावेळ का होईना चालता येते आहे हे काय कमी आहे? इथल्या मोकाट मित्रांना ते स्वतंत्र आहेत हेच माहीत नाही. त्यामुळे कुत्रे भरून नेणाऱ्या गाडीपासून लांब पळत सुटणे आणि दिवसभर हमरस्त्यावर अधाशीपणाने अन्नाच्या मागे धावणे हेच आपले जीवन त्यांनी मानले आहे. भूक भागली तर सावलीला पडून राहण्याचे ती विसरली आहेत. रोज कुणीतरी गाडीखाली येऊन मरते हे बघून मला अगदी दुःख होते. तुला ठरल्यावेळी अन्न मिळते आहे आणि तरीही तू उद्याचा विचार करतोस याने मला तुझे कौतुक वाटते. बोल तुला काय विचारायचे आहे?’ 
(क्रमशः)

संबंधित बातम्या