पापा, पकु आणि मोकु (भाग २)

मृणालिनी वनारसे
गुरुवार, 28 जून 2018

मनावनातल्या गोष्टी
 

आमच्या शहरगावात एक टेकडी आहे. तिथे फिरायला येणारी माणसे आणि फिरवायला आणलेली कुत्री यांची नेहमी वर्दळ असते. एका संध्याकाळी टेकडीवर फिरायला गेलेलो असताना पाळीव पालकासोबत (पापा) असलेला पट्टाधारी कुत्रा (पकु) आणि टेकडीवरील भटका मोकळा कुत्रा (मोकु) यांच्यातील एक संभाषण माझ्या कानावर पडले हे मी तुम्हाला सांगितलेच. कुत्र्यांची भाषा मला समजत होती याने आनंदून मी अधिक लक्ष देऊन त्यांचा संवाद ऐकू लागलो. जे ऐकू आले त्याने माझे शहाणपण पुष्कळच वाढले. यासाठीच जे ऐकले ते मी इतरांस आता सांगत आहे. पकु मोकुला काही विचारत होता. काय ते पुढे ऐका... 

‘दादा, गेले अनेक दिवस माझ्या आजूबाजूला चालू असलेली चर्चा मी ऐकतो आहे आणि आता मला त्याचा अगदी वीट आला आहे.. का की मला त्याचा अर्थ कळत नाही. ‘सिस्टिम बदलली पाहिजे’ हे वाक्‍य मी जिथे जाईन तिथे ऐकतो आहे. मी अगदी कान टवकारून ऐकण्याचा प्रयत्न केला. पण सिस्टिम बदलली पाहिजे म्हणजे काय हे काही मला कळले नाही. आमच्या घरी या विषयावर हिरिरीने चर्चा झडतात.. आणि मला अगदी कसनुसे होते. शेवटी मी हा प्रश्‍न तुला विचारायचा असे ठरवले. तू इतका अनुभवी आहेस, की तुला सिस्टिम बदलली पाहिजे म्हणजे काय हे नक्कीच माहीत असेल. तेव्हा तू ते मला सांगून माझी तळमळ आणि मळमळ शांत कर बघू..’ 

हा संवाद ऐकून मी चपापलो.. आणि ज्येष्ठ श्‍वान काय उत्तर देते हे नीट कान टवकारून... म्हणजे कान देऊन ऐकू लागलो. 

‘मित्रा, तुला हा प्रश्‍न पडला यात नवल नाही. या टेकडीनेदेखील ‘सिस्टिम बदलली पाहिजे’ हे वाक्‍य तिच्या इतिहासात अनंत वेळा ऐकले आहे. मलाही तुझ्यासारखाच या संभाषणाचा वीट येऊन मी या प्रकरणाचा छडा लावायचा असे ठरवले.. आणि मला जे ज्ञात झाले ते गुह्य ज्ञान आता मी तुला सांगतो. या प्रश्‍नाचे उत्तर कोणी विचारले तरच द्यायचे असा निश्‍चय मी केला होता आणि उत्तर मिळाल्यावर तू ही तेच कर.. का असे विचारशील तर मी सारे काही फक्त सुरक्षित आणि आनंदी जगण्यासाठीच करतो तेव्हा वेगळे उत्तर देण्याची गरज नाही.’ 

इथे पकुने संमतीदर्शक गुर्र केले. गुह्य ज्ञानास प्राप्त करून घेण्यासाठी तो अगदी आतुर झाला होता. 

‘हे तापमोचक, शांतीदेयक ज्ञान आता ऐक. तू कधी दहीहंडी नावाचा उत्सव पाहिला आहेस काय?’ 

‘दहीहंडी? नाव काढू नकोस त्या उत्सवाचे. खरे म्हणजे कोणत्याही उत्सवाचे. कुत्र्याची अगदी शेळी होऊन जाते त्या आवाजी कार्यक्रमांनी. फटाके, गाणी आणि आरडाओरडा. त्याची आठवण काढून मला का दचकावतोस?’ 

‘घाबरू नकोस. मी फक्त उदाहरण देत होतो. असे उत्सव आले, की लपून बसण्याची माझी टेकडीवर गुहा आहे. तुला काही ती सोय नाही. हे मला माहीत आहे. तुझी मालकीण तुझे लाड करत असेलच. पण त्या क्षणिक सुखाविषयी मी आत्ता बोलत नाही.’ 

(इथे मी चमकून मालकिणीकडे पाहिले. ती निष्ठेने चालत होती आणि वजन कमी होत असल्याच्या आनंदात तल्लीन होती.) 

‘..तर दहीहंडीचा उल्लेख मी अशासाठी केला की यावेळी एक कसरत चालते ती तू बघितली आहेस का?’ 

‘होय होय. एकदाच मी तो जीवघेणा प्रकार पहिला आहे. उंच टांगलेला एक हंडा होता आणि माणसे मनोरा रचून त्या हंड्यापर्यंत जाण्याचा प्रयास करत होती. हंड्यात काय आहे अशी चौकशी केली असता ‘दही’ हे उत्तर मिळाल्याने मला काही कळेच ना. खरेच का त्या दह्यासाठी माणसे एकमेकांच्या डोक्‍यावर उभी होती?’ 

‘बरोबर. यालाच सिस्टिम असे नाव आहे. उंचावर असलेल्या मडक्‍यातले दही काढण्यासाठी रचलेला मनोरा.’ 

पकुने कुईकुई आवाज काढले. त्याला मजा वाटत असावी. मोकु पुढे म्हणाला, ‘एवढ्यावर सिस्टिम म्हणजे काय ते संपत नाही. या मनोऱ्यात खालपासून वरपर्यंत जाताना माणसांची संख्या कमी होते आणि शेवटी एकच माणूस हंड्यापर्यंत जातो हेदेखील तू पाहिले असशील.’ 

‘हो तर खाली उभ्या असलेल्या माणसांच्या खांद्यांवर केवढा तो भार. ओठ घट्ट आवळून तो भार सहन करणाऱ्या लोकांची मला दया आली.’ - पकु. 

‘करेक्‍ट. इथे एखादा दमला, पिचला, त्याला दुखापत झाली तर काय होते माहितीये? मनोरा रचण्याचे थांबत नाही. उलट या माणसाला अलगद बाजूला केले जाते आणि त्याची जागा दुसरा कोणी घेतो.’ - मोकु. 

‘बरोबर. असा माणूस मी पाहिला आहे. खांदा निखळला म्हणून नंतर त्याला पन्नास हजार रुपये तिथेच डिक्‍लेर झाले होते.’ - पकु. 

‘माणसाबरोबर राहून राहून तुझी दृष्टी गढुळली आहे. मित्रा, एकतर डिक्‍लेर करणे म्हणजे देणे नाही... आणि दिले तरी पैसे आणि खांदा यांची अदलाबदल कशी काय होऊ शकते? पण सिस्टिममध्ये असे होते.’ 

पकु अंतर्मुख झाला. मोकु पुढे म्हणाला, ‘जो माणूस इतरांच्या अंगाखांद्यावरून वर जातो त्याचे

काम सोपे असे तुला वाटत असेल. पण तसे अजिबात नाही. आपल्यावरच्या जबाबदारीने तो माणूस आधीच पिचलेला असतो. त्याने जराजरी उशीर लावला तरी खालच्या सर्व मंडळींचे शिव्याशाप त्याला ऐकायचे असतात. तो पडला तर सगळ्यात उंचावरून पडणार असतो. शरीराच्या वजनाने नाही मित्रा, तो तर भीतीच्या वजनाने पिचलेला असतो.’ 

‘पण तरीही वर त्याला जायचेच असते. वर जायच्या कल्पनेने त्याचे बाहू फुरफुरत असतात. डोळे धुंद दिसत असतात..’ पकुचे निरीक्षण चांगलेच होते. 

‘शाबास. मग आता मला सांग. उंचावरच्या मडक्‍यात टांगलेले एवढेसे दही मिळवण्यासाठी, शरीराचे

मनोरे रचणारी, खांद्याच्या बदल्यात पैसे घेणारी माणसे मनोरा बदलला पाहिजे असे म्हणू लागली तर त्याचा अर्थ काय होतो?’ 

‘दुसरा मनोरा रचला पाहिजे. कदाचित उभा नाही आडवा. पण मनोरा रचला पाहिजे.’ 

‘बरोबर. तुझ्या नेमके लक्षात आले आहे. मनोरा रचला पाहिजे हे सूत्र. कशासाठी ते विचारायचे नाही. प्रत्यक्षात काय होते माहितीये? आधीच्या मनोऱ्याच्या श्रमाने कुचंबलेली माणसे तिथल्या तिथेच थोडी हालचाल करता येते आहे का हे बघत आपल्याला बदली गडी  मिळण्याची वाट बघत आणि खांदा निखळणार नाही अशी आशा करत तशीच उभी राहतात. फक्त असे करताना ‘सिस्टिम बदलली पाहिजे’ असे म्हटले म्हणजे त्यांचा वेळ बरा जातो एवढेच. आले लक्षात?’ 

‘दादा, हे असे आहे होय सिस्टीमचे? मला तर मोठे भय वाटते. हा मनोरा कोसळला तर आपणही त्याच्या खाली चेंगरू,’ पकु स्व-काळजीने म्हणाला. 

‘होय रे होय. यासाठी बघणाऱ्या माणसांना ‘थोडे लांब उभे राहा’ असे पोलिस जिवाचे रान करून सांगत असतात. पण त्यांचे कोणी ऐकत नाही. हे ही तू पहिले असशील. आपल्याला गंमत पाहायचीच असेल, तर आपण इतक्‍या अंतरावर उभे राहावे की दह्याचे चार थेंब उडाले तर टिपता येतील पण मनोरा कोसळून आपण चेंबणार नाही. आले लक्षात?’ 

‘आले. पण दादा एक विचारू? हे सर्व ज्ञान तुम्हाला किती अंतरावरून झाले?’ पकुच्या प्रश्‍नाने मोकु गंभीर झाला. 

‘तुझा प्रश्‍न मोठा बाका आहे मित्रा. त्याचे उत्तर मी देणार नाही. सगळीच कहाणी सांगून बसलो तर तू माझ्याकडे पुन्हा कशासाठी येशील?’ एवढे बोलून मोकु शेजारच्या रानात पळून गेला. पकुलाही तो गेला त्याच दिशेने जायचे होते. पण मालकिणीच्या हाती त्याचा पट्टा होता. ‘जिच्या हाती गळ्याची दोरी ती पकु ते कशी उद्धारी?’ असे विचार माझ्या मनात येऊ लागले. 

पाळीव मालकिणीने कर्णयंत्र काढले. पकुकडे बघत ती म्हणाली, 

‘आता आपन इथे जला वेल बशायचं हं. दमलाश ना तू!’ 

हा तर माझा दूर जाण्याचा क्‍यू! 

श्‍वानभाषा मला येऊ लागली याचा आनंद मानावा, की कसे हा विचार मी अजून करतो आहे. विद्वत्मत काहीही असो. 

(वाचकहो, मनावनातील गोष्टी या सदरातील ही शेवटची गोष्ट...) 

समाप्त

संबंधित बातम्या