काडी पैलवानांची कामगिरी

मकरंद केतकर
शुक्रवार, 29 मे 2020

मैत्री भोवतालाशी
घरबसल्या खूप काही करण्यासारखं असतं. नुसत्या निरीक्षणामधून तुम्ही स्वतःची करमणूक करू शकता... कशी? तुमच्या घरामधल्या, बागेमधल्या जीवसृष्टीच्या निरीक्षणातून! ते कसं करायचं...? तेच तर या सदरामधून जाणून घ्यायचं आहे.

लॉकडाउनमध्ये घरबसल्या काय करू? असा प्रश्‍न पडत असेल तर पंचेंद्रियांना कामाला लावण्याशिवाय पर्याय नाही. पंचेंद्रियं म्हणजे कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ही ज्ञानेंद्रियं. चौकस बुद्धीला खाद्य अधिक मिळतं आणि ती अधिक सशक्त होते. परवा संध्याकाळी पुण्यात अचानक जोरदार पाऊस झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वादळवाऱ्यानं कोसळलेलं बुलबुलचं एक घरटं मिळालं आणि त्याबरोबर एका नव्या कुतूहलाचं शमन करण्याची संधीही मिळाली. खोप्यामधी खोपा सुगरणीचा सर्वश्रेष्ठ असला, तरी लहानसहान पक्षी आपापल्या गरजेनुसार विणत असलेल्या घरट्यांमध्येही सौंदर्य असतं. फक्त त्याचा पॅटर्न समजून घ्यायला हवा. शहराच्या प्रगतीत बलिदान देणाऱ्या शहराच्या परिघावरच्या छोट्याछोट्या खेड्यांनी आपलं रूपडं बदललं आणि मग त्याबरोबर खेड्यात माणसांच्या आश्रयानं राहणाऱ्या पक्ष्यांच्या अधिवासातही बदल झाला. जे पक्षी नव्या उंच इमारतींशी जुळवून घेऊ शकले नाहीत, त्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली आणि जुळवून घेणाऱ्या पक्ष्यांनी आपली प्रजा वाढवायला सुरुवात केली. बुलबुल अगदी घरात शिरून घरटं करण्याचीही धिटाई दाखवतात आणि त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे ते आपलं घरटं आणि पिल्लं यांची सुरक्षा राखण्यात चिमणीपेक्षा जास्त आक्रमक असतात. त्यामुळं साहजिकच त्यांची संख्या अधिक वाढते. माझ्या एका मैत्रिणीच्या घरात पंख्याच्या वरच्या कॅपमध्ये बुलबुलनं घरटं केलं होतं. पिल्लं जन्माला आल्यावर तर ते त्या घरातल्यांना टोची मारण्यापर्यंत आक्रमक व्हायचे. पाहुण्या कुटुंबाला इजा होऊ नये म्हणून त्या सगळ्यांनी पंखा काही दिवस तर बंद ठेवलाच पण पिल्लांच्या वाढीचा आनंद घेण्यासाठी पक्ष्यांची चिडचीडही सहन केली. असो. तर आपल्या आसपास सहज दिसणारे हे पक्षी फास्ट ब्रीडर्स आहेत. म्हणजे जेमतेम तीन चार दिवसांत घरटं पूर्ण करून पुढच्या २५-२६ दिवसांत पिल्लं आपल्या पंखावर स्वार होऊन निघून जातात. पक्षी राहण्यासाठी घरटं तयार करतात ही अजून एक कवीकल्पना. पक्षी फक्त पिल्लं वाढवण्यासाठीच घरटं करतात. अन्यथा ते पानांच्या आड फांदीवर विश्रांती घेतात.

तर मी काय सांगत होतो... मला एक पडलेलं घरटं मिळालं आणि माझ्यातलं कुतूहल जागृत झालं. म्हटलं चला यातल्या काड्या मोजून बघू. घरटं पूर्ण होतं की अपूर्ण ते निश्‍चित कळलं नाही, पण माझा अंदाज आहे की ते पूर्ण होतं. कारण त्याच्यात बाजूनं कापूस आणि मऊ पांढरी पिसं गुंफली होती. काड्या एकात एक अडकवल्या होत्याच पण या अ‍ॅडिशनल मटेरियलच्या धाग्यांमुळे घरट्याला रिएन्फोर्समेंट मिळाली होती. घरट्याच्या बाहेरच्या काड्या साधारण तीन ते चार इंच लांबीच्या आणि चिंचेच्या पानाच्या असतात त्या जाडीच्या होत्या. जसजसं मी घरटं उसवत गेलो तसतशा काड्या बारीक बारीक होत गेल्या आणि सगळ्यात आतल्या परिघात मधल्या काड्या तर अगदी केसांसारख्या लवचिक आणि पातळ होत्या. आतपासून बाहेरपर्यंत असलेल्या मोठ्या लांबीच्या काड्यांमध्ये असलेल्या गॅप्स भरायला एक इंच किंवा त्यापेक्षा कमी लांबीचे तुकडे खोचले होते. घरट्यासाठी कुठलंही कृत्रिम साहित्य वापरलेलं नव्हतं. हे विशेष नमूद का करतोय, कारण कावळे घरट्यासाठी प्लॅस्टिकचे धागे वापरताना आढळले आहेत. घरटं जिथं पडलं होतं तिथून सगळ्यात जवळची फांदी सहा फुटांच्या वर होती पण तिथं घरटं अडकून राहू शकेल इतकी योग्य जागा नव्हती. त्यामुळं ते अजून उंचावर असावं असा अंदाज आहे.

तर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे.. घरट्यासाठी लहानमोठ्या मिळून, कमीअधिक, चारशे काड्या वापरलेल्या होत्या. तीन-चार दिवसांत नर आणि मादीनं केलेली ही एकत्रित मेहनत होती.

माणसांच्या जगात, उगाचच उचापती करणाऱ्या उपद्व्यापांना आपण ‘काड्या करणं’ म्हणतो. पण चारशे काड्या मोजल्यावर मला वाटतं, या काडी पैलवानांच्या दुनियेत उलट अर्थानं, कामसू वृत्तीसाठी ही म्हण वापरत असावेत. काय काड्या करतोय. व्वा!

संबंधित बातम्या