टीटीएमएम 

मृणालीनि वनारसे
गुरुवार, 7 जून 2018

मजारामाच्या गोष्टी
 

‘तोडणार आहेस का तू मला, की नाही तोडणारेस?’ 

मिथिला एका भडक केशरी रंगाच्या फुलापुढं उभी होती. हातात कात्री घेऊन ती तंद्री लागल्यासारखी त्या फुलाकडं बघत होती.. ‘तोडणार आहे तोडणार आहे..’ घाईघाईने तंद्री मोडत ती म्हणाली. 

‘झटपट कर मग. मला हे तुझं असं माझ्याकडं बघणं अगदी कंटाळवाणं आणि कीवीष्ट वाटतंय..’ 

‘किविष्ट असं काही नसतं..’ ‘गर्विष्ठ असतं?’ केशरी फूल अधिकच ताठ होत म्हणालं.  ‘अं... हो...’ त्या ताठ फुलाचा तोरा बघून मिथिला जरा टरकलीच. ‘गर्व करणारा तो गर्विष्ठ आणि कीव करणारा तो?’ ‘असं नसतं..’ मिथिला पुन्हा निग्रहानं म्हणाली. ‘ठीक आहे. तू म्हणशील तसं...काप..’ केशरी फूल बेपर्वाईनं म्हणालं. ‘काप काय काप?’ मिथिला डोळे मोठे करून म्हणाली. ‘बरं नको कापूस..’ ‘कापूस? कापसाचं झाड होतं आमच्या बागेत माझ्या लहानपणी. खरंखुरं मोठं झाड, म्हणजे आतासारखं लहान लहान झुडूप नाही बरं का! शेतात रांगांमधे शिस्तीनं उभं असतं तसलं. छान मोठं झाड..’ 

‘तुला लहानपणी मोठं दिसलेलं झाड तू केवढी होतीस त्यावर ठरणार.. तुझ्याकडं बघून तू काही लहानपणी माझ्या एवढीही उंच नसशील असं वाटतं..’ ‘तुला काय माहीत?’ ‘कापूस... लावून गेला तुझा बापूस... त्यापेक्षा लावला असता हापूस..’ ‘तू फारच आगाऊगिरी करतो आहेस..’ 

‘कापूस, बापूस आणि हापूस यातून यमक तयार झालं तर तू चेहरा हसरा केला पाहिजेस. खरंतर माझं कौतुक करायला पाहिजेस. नाहीतरी एक वेडावाकडा वाढलेला कापूस याचा काय उपयोग? ओळीनं आणि शिस्तीनं असतील तरच उपयोगाचे कापूस... सगळीकडे हापूस... मात्र एकच बापूस!’ ‘इथं कौतुक करायला नाही तुला तोडायला आले आहे..’ मिथिला धमकावणीच्या सुरात म्हणाली. खरंतर तिला हे स्पष्ट दिसत होतं, की आपल्याला ते जमत नाहीये.. आणि हे त्या केशरी फुलाला नीट कळलंय.  ‘प्रीसाईजली. तोड. आटप लवकर..’  ‘तू कोण मला सांगणार? मुळात तू बोलल्यामुळंच असं झालंय..’ ‘कसं?’ 

‘कापता येत नाहीये..’ 

‘बोलणे आणि कापणे या दोन क्रियांचा एकमेकांशी काय संबंध? न्हावी तुमच्याशी बोलत तुमचे केस कापत नाही काय?’  ‘पण तो तुम्हाला नाही कापत...’  ‘अच्छा म्हणून तू उदास आहेस का? की तू मला कापणार आहेस?’  ‘काहीशी... हो... म्हणजे कससंच वाटतंय... मला जर माहीत असतं की मला असं काही करावं लागणार आहे एक सुंदर फूल तोडावं लागणार आहे..तर तर मी अजिबात पर्यावरणासाठी काही करायच्या फंदात पडले नसते..’ ‘एक एक एक मिनीट.... तू कुणासाठी काय करणार आहेस?’ 

‘सांगतेच तुला... मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी असं म्हणतात..’ मिथिला मोठ्या न्यायी स्वरात म्हणाली.. ‘तुला पर्यावरणासाठी तोडणार आहे.’ ‘रिअली? मला काहीही कळलं नाही. तू मला मगाच्चाच भयंकर शब्द परत सांगून काय नवीन केलंस?’ ‘अरे तुला माहीत नाही? पर्यावरणासाठी म्हणजे निसर्गासाठी... परिसर.. नेचर... एनव्हायर्नमेंट... पर्यावरण यू नो?’ आपण पर्यावरणाचं काही सांगतो आहोत ही कल्पना मिथिलाला गंमतशीर वाटली. पण सगळी गंमतच चालली होती हे खरं.. ‘नाऊ आय नो. वंडरफुल आय से. डू इट..’ केशरी फूल अधिक जोरानं म्हणालं. ‘तुला मघाशी काय वाटत होतं? मी तुला का तोडतीये?’ मिथिलाला तिच्या जबाबदारीच्या जाणिवेची जराही उपेक्षा होऊ नये असं वाटून गेलं. ‘कशाहीसाठी.. घरी घेऊन जाण्यासाठी. कितीतरी बावळट लोक फुलं तोडतात. घरी घेऊन जाईपर्यंत ती कोमेजून जातात असं त्यांना नेहमीच नंतर कळतं..’ 

‘नाही नाही... मी तसं काही करणार नव्हते. मला तर तुमच्याकडं बघायला आवडतं. पपा आम्हाला या सीझनमध्ये नेहमी फुलं बघायला घेऊन जातात. गाडीनं जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनं चित्रातल्यासारखी केशरी फुलं.. वाऱ्यानं तुमच्या अशा केशरी लाटा तयार होतात ते बघायला मला फार आवडतं..’ 

‘अय्या कित्ती क्‍यूट!’ केशरी फूल कमरेत वाकून म्हणालं, ‘प्रॉब्लेम काय आहे?’ 

‘प्रॉब्लेम असा आहे, की यू आर बॅड फ्लॉवर्स..’ ‘कट मी! तोड मला..’ ‘ऐकून तरी घे. तुला का घाई आहे मरायची?’ ‘आमच्यात मरण्याचा फारसा इश्‍यू करत नाहीत.. नैनं छिन्नन्ति शस्त्राणि.. नैनं दहति पावकः।’ 

‘बापरे... तुला हे कसं येतंय? हे आमचं आहे. आय मीन माणसांचं.’ ‘तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही एवढे ‘फस’ का करता?’ ‘म्हणायला सगळं सोपं असतं. मरणं काय सोपं असतं का?’ 

केशरी फूल तिच्या कात्रीकडं बघून म्हणालं, ‘माहीत नाही गं. तू सांग ना मला. आमच्यात रोज मरतात. आजचं फूल आज मरतं. रोज मरे त्याची कोण चर्चा करे. त्यामुळं मला काही माहीत नाहीय...’ ‘पण... फूल मेलं... तरी झाड मरत नाही ना..’ मिथिला तिच्या सामान्य ज्ञानाचा सढळपणं वापर करत होती. ‘ते बरोबर आहे.’ 

‘पण झाड तरी कुठं दिसतं वर्षभर? ते ही दोन - तीन महिनेच असतं ना...’ ‘बरोबर आहे...’ ‘पण आम्हाला त्याचाही प्रॉब्लेम आहे...’ ‘बरोबर आहे...’ ‘चूप... एकदम चूप... काय बरोबर आहे?’ मिथिला करवादली. ‘बरोबर आहे... तुम्हाला प्रॉब्लेम आहे..’ ‘पण काय प्रॉब्लेम आहे?’  ‘ते तुम्हाला माहिती. काप..’ ‘नाही मी कापणार. आधी ऐक. हे बघ मी तुला तू मरण्यापूर्वी कापणार आहे कारण तू तुझ्या पुढच्या पिढीची तयारी करून ठेवू नयेस. बिया येण्यापूर्वी तुला कापलं म्हणजे बिया येणार नाहीत.’ 

‘शेवटच्या वाक्‍यात रिपिटेशन आहे..’ ‘बरोबर आहे.’   ‘तुला काहीच म्हणायचं नाहीये का?’ 

‘काप..’ ‘ओह. कमॉन. विचार मला की बिया का यायला नको आहेत...?’ ‘चालेल सांग..’ 

‘कारण तू इथं नवखा आहेस. तू... तुम्ही सगळे परदेशातून इकडं आलात.. पसरलात... आणि आता तुम्ही इतक्‍या संख्येनं आहात की इथल्या छोट्या छोट्या झुडपांना, गवतांनासुद्धा तुम्ही डोकं वर काढू देत नाही.’ ‘हे अगदी माणसासारखं आहे..’ ‘काय?’  ‘तू इथला नाहीयेस. दुसरीकडून आलायस असंबिसं? मला माहितीये...’  मिथिला ओशाळली.. ‘पण ते खरं नाहीये. माणसांनी एकमेकांना असं करणं चूक आहे..’  ‘बरोबर आहे..’ 

‘काय बरोबर आहे?’ ‘हे बरोबर आहे की असं करणं चूक आहे..’ ‘का?’ ‘तू मला विचारते आहेस?’ ‘म्हणजे मी असं विचारते आहे की तुला हे का बरोबर वाटतंय की हे चुकीचं आहे...’ ‘खूपच गोंधळ आहे. पण मी प्रयत्न करतो. मला हे बरोबर वाटतंय कारण हे चूक आहे हे तुला बरोबर वाटतंय.. आणि तुला जे बरोबर वाटतंय..’ 

‘हे चूक आहे... आपण तेच तेच बोलतोय..’ मिथिलानं त्याचं बोलणं तोडत म्हटलं. 

‘म्हणून म्हणतो काप.. आटप लवकर..’ 

‘नाही पूर्ण ऐकून घे. आपण जोवर दुसऱ्याच्या अस्तित्वावर गदा आणत नाही तोवर ठीक आहे...’ ‘काही कळलं नाही...’ ‘म्हणजे असं.. की माणसं असं करतात... करू शकतात.’ 

‘तुम्ही त्यांनाही कापून टाकता?’ ‘वेडाबिडा आहेस का? आम्ही त्यांना परत जा म्हणून सांगतो.’ ‘वा छान. आनंदी आनंद गडे... माणसं गेली सगळीकडे...’ ‘ऐक, तू इथं यायच्या आधी इथं काही वेगळी फुलं येत होती. तू इथं आल्यावर ती गेली. हे त्यांच्यासाठी चांगलं झालं का?’ ‘न्यायमूर्ती, मला त्यांच्या वतीनं काही सांगता येणार नाही. सगळ्यांचं सगळं मला कळत नाही.’ ‘ठीक आहे. आम्हाला असं वाटतं की फुलांनी असं करणं आमच्यासाठीही चांगलं नाही. आमची अन्नसाखळी, आमचा परिसर, आमचा निसर्ग... सगळं काही धोक्‍यात येतंय तुमच्यामुळं..’ इथं मिथिलानं उरलं सुरलं सामान्य ज्ञान घडाघडा बोलून टाकून श्‍वास घेतला. ‘चालेल. काप..’ ‘तुला एकट्याला नाही, तुम्हा सगळ्यांना. तुझ्या भावंडांनासुद्धा कापणार आहे मी. माझ्याकडं तशी जबाबदारी दिलीये. या चौकोनापुरती..’ ‘वंडरफुल. नेहमी आपल्या चौकोनाकडंच फक्त बघावं. पण मग झाड का नाही उपटत?’ 

‘अं.... तसं नाही करणारे. कारण आमची आयडिया अशी आहे, की फुलच तोडलं की बिया तयार होणार नाहीत, पसरणार नाहीत, पुढची झाडं बनणार नाहीत.. आणि आताचं झाड काय याच सीझनला मरून जाईल. आहे की नाही... दे टाळी!’ केशरी फूल मिथिलाकडं एकटक बघत राहिलं. मिथिला वरमली. म्हणाली, ‘नाही म्हणजे आय ॲम सॉरी... मी असं बोलायला नको होतं... आमचा हेतू...’ केशरी फूल मोठ्यानं हसलं. तो आवाज मिथिलाला कसातरीच वाटला. हसणं कसंबसं आवरत फूल म्हणालं, 

‘असा चतुर बेत आहे का तुमचा? हुशार आहात की.. जरूर होऊ दे तुमच्या मनासारखं. आता मी तुला एक प्रश्‍न विचारतो. आपला खेळ. एकदा तू विचारायस, एकदा मी..’ ‘विचार..’ उदारपणे मिथिला म्हणाली. मरणाऱ्याची इच्छा! ‘तू इथं आलीस कशी?’ ‘म्हणजे?’ न कळून मिथिलानं विचारलं. ‘म्हणजे तुला चालत यायला किती वेळ लागला?’ ‘चालत? आर यू क्रेझी? मी गाडीनं आली आहे... माझ्या बाबाची एसयूव्ही आहे.. तिच्यातूनच आलो आहोत आम्ही...’ मिथिला नुसतं ‘गाडीनं आलो’ असं कधीच म्हटली नसती. ‘एसयूव्ही आहे’ असं म्हणायला तिला फार आवडायचं. तशी ती काही गाडीचा तोरा दाखवणारी मुलगी नव्हती. पण ‘एसयूव्ही आहे’ असं म्हणायची एक वेगळी गंमत होती. 

‘ओहो.. एसयूव्ही गाडी... उडते का ही गाडी?’ 

‘नाही काही..’ केशरी फूल अडाणी आहे.. मिथिलाला वाटलं ‘रस्त्यावर चालते..’ 
‘कशी? वारा आला की?’ ‘नाही रे. पेट्रोल घातलं की...’ केशरी दुधखुळ्या फुलाकडं बघत मिथिला म्हणाली. आता तिला खरंच त्याची कीव वाटत होती.  ‘ओह... टू मच..’ ‘एह.. आम्ही तर दीड तासात इकडं पोचलोसुद्धा..’  ‘दीड तास? बापरे केवढा उशीर..?’  ‘आम्ही सगळ्यात पहिले आलोय..’ मिथिला जरा कावलीच. तिच्या बाबांच्या एसयूव्हीचा तिला अभिमान होता. 

‘तरीपण उशीरच.. आम्हीच पहिले येणार..’ 
‘तुम्ही पहिले येणार? कसे? कुठे? तू तर जागचा हलतसुद्धा नाहीस?’ उत्तरादखल केशरी फुलानं वाऱ्यावर थोडं नृत्य केलं. मिथिला त्याच्या आविर्भावाकडं बघतच राहिली.. ‘आपल्या स्पर्धेत आम्हीच पहिले येणार. तू आम्हाला कापायला येणार आणि आम्ही पुढं पळणार...’ 

‘ॲ! कसं काय.. तू वेडा आहेस का?’ 

‘आम्ही पहिले येणार कारण तुमच्यापेक्षा आम्हाला खूप वेळ आहे. आम्हाला गाडी नाही, रस्ता नाही, पेट्रोल नाही.. आणि हे सगळं असताना दीड तास प्रवासही करायचा नाही.. आम्ही पुढंच थांबणार..’ मिथिला चेहरा प्रश्‍नार्थक करून आ वासून ऐकत राहिली.. ‘छोट्या छोट्या बिया पसरणार. रुजणार.. आम्ही डोकं वर काढणार... केशरी लाटा पसरणार...’ फूल आनंदानं म्हणालं. ‘आम्हाला इथं डांबर ओतता येईल... आम्हाला सगळीकडं डांबर ओतता येईल.. मग कुणीच नाही उगवणार... आम्ही जिंकू...’  ‘चालेल..’ केशरी फुलानं एकदम पवित्रा बदलला हे मिथिलाला आवडलं नाही. 

‘नाही चालणार...’ ‘तू वेडी आहेस..’ ‘आम्ही काय करू?’ ‘काही करू नका... ट्राय दॅट..’ ‘पण तुम्हाला कंट्रोल कसं करू?’ ‘अम्‌... तुम्हाला कंट्रोल कसं करू?’ ‘नक्कल करू नकोस..’ ‘नाही, मी नक्कल नाही केली. खरंच विचारून बघितलं. म्हणजे आम्ही काही कधी अशा फंदात नाही पडत, कंट्रोल करायच्या वगैरे. त्यामुळं मी काही तुला याविषयी सल्ला नाही देऊ शकणार..’ ‘तुम्हाला कंट्रोल नाही केलं तर तुम्ही पसरणार नाही? इतर घरच्या झाडाझुडपांना त्रास देणार नाही?’ ‘तू तेरा देख..’ 

‘काय?’ ‘टीटीएमएम..’ 

‘तुझं तू माझं मी? असं म्हणालास तू? तू फार गर्विष्ठ फूल आहेस..’ ‘आम्हाला हाच मंत्र माहीत आहे आणि आम्ही तुमच्या खूप खूप आधीपासून या जगात आलो आहोत.’ ‘तू स्वार्थी आहेस..’ ‘काप..’ ‘नाही.. मी तुझं नाव सांगणार आहे.. माझ्या बाबाला तुझ्याकडं घेऊन येणार आहे. मग बोल त्याच्याशी..’ मिथिला आता रडवेली होत म्हणाली. केशरी फुलाला हसू आवरेना. रडू ओठात ठेवत मिथिला पळाली आणि तिच्या बाबाला घेऊन परत आली. समोर अनेक केशरी पिवळी फुलं फुलली होती. त्यात मिथिलाचं बोलणारं फूल.. ते काही तिला वेगळं दिसेना.. तिनं सगळ्या फुलांशी बोलून पाहिलं. ‘कापूस.. बापूस..’ ती मोठ्यानं म्हणाली. खुणेचे शब्दच जसे काही उच्चारत होती. तिच्या बाबाला मजा वाटली. त्यानं मिथिलाला थोपटलं. ‘कापायचं ना तुला?’ तो तिला म्हणाला. ‘मग काप ना!’  ‘मला.. मला.. नाही कापायचं.. मला घरी जायचंय.. आत्ता,’ मिथिला रडवेली होत म्हणाली.  ‘ओके.. नो प्रॉब्लेम. चल जाऊ या..’ मिथिलाचं काहीतरी बिनसलंय हे बाबानं जाणलं. दोघं माघारी वळले.  ‘टीटीएमएम..’ तिला कुठुनसा आवाज आला...  ‘टीटीएमएम..’ फुलाला शोधत कुठंतरी बघत मिथिलाही म्हणाली. झुळुक आली. फुलं लवली. वाऱ्यावर केशरी लाटा तयार झाल्या. एसयूव्हीतून घरी जाणाऱ्या मिथिलाला वाकुल्या दाखवू लागल्या...

संबंधित बातम्या