आरोग्याचा गोडवा वाढवणारा आंबा

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 10 मे 2021

आरोग्य संपदा

आंबा पिकतो, रस गळतो
कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो

बालगीताच्या या शब्दांनी केलेली आंब्याची जादू आपल्या मनावर राज्य करत असते. तुमचे आवडते फळ कुठले? विचारल्यास मराठी माणसाचे तरी उत्तर ‘आंबा’ हेच असते. फळांच्या या राजाचा मधुर स्वाद, त्याची गोड चव, त्याच्या सुगंधाची दरवळ अनोखी असते. पिकलेल्या रसदार आंब्यात आणि त्यापूर्वीच्या त्याच्या कच्च्या कैरीच्या स्वरूपात पोषक अन्नघटकांची रेलचेल असते. साहजिकच आरोग्याच्या दृष्टीनेदेखील आंबा एकमेवाद्वितीय ठरतो.

आं बा हे पाकिस्तान आणि फिलिपिन्स या देशांचे राष्ट्रीय फळ आहे. तर आंबा हा बांगलादेशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे. जगभरातील एकूण आंबा उत्पादनाच्या अर्धे उत्पादन भारतात होते. मात्र भारतीयांना आंबा इतका प्रिय आहे की या उत्पादनाच्या ९० टक्के आंबा भारतात फस्त होतो आणि केवळ दहा टक्के निर्यात होतो. जगभरात बाराही महिने आंब्याचे पीक घेतले जाते. त्यामुळे जागतिक स्तरावरदेखील आंबा हे सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ आहे.
आंब्यांच्या हापूस, पायरी, केसर, लंगडा, तोतापुरी, बैगनपल्ली, दसेरी अशा वेगवेगळ्या जाती उपलब्ध आहेत. हापूसमध्येदेखील देवगड, रत्नागिरी, कर्नाटक, आंध्र हापूस अशा उपजाती आहेत. बहारदार आंब्यात आढळणाऱ्या सर्वसाधारण अन्नघटकांकडे नजर टाकली, तर तो आरोग्याला किती पोषक आणि उपयुक्त आहे हे ध्यानात येते. 
आरोग्यविषयक लाभ
आरोग्याच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे बदाम, अक्रोड अशा सुक्यामेव्यापेक्षा आणि साजूक तुपापेक्षा आंबा अधिक पौष्टिक ठरतो.
आंब्यात नैसर्गिकरीत्या भरपूर तंतूमय घटक असतात. या वनस्पतिजन्य तंतूंमध्ये प्रीबायोटिक गुणधर्म असतात. त्याचबरोबर जीवनसत्वे, खनिजे, पॉलिफीनॉलिक फ्लेविनॉइड तत्त्वे असलेले अॅण्टिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीराचा अनेक आजारांपासून बचाव होतो. एका मान्यताप्राप्त संशोधनानुसार आंब्याच्या या गुणधर्मामुळे गुदाशय, स्तन आणि प्रोस्टेट यांच्या कर्करोगापासून बचाव होतो. तसेच रक्ताच्या कर्करोगालाही दूर ठेवता येते.
आंब्यामध्ये जीवनसत्त्व ‘अ’, अल्फा आणि बीटा कॅरोटिन तसेच बीटा क्रिप्टोझॅन्थिन मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते, त्वचा मृदू आणि तजेलदार राहते. त्याचप्रमाणे तोंडाच्या आणि आतड्यांच्या आंतरिक आवरणाचे आरोग्य सुधारते. आंब्याच्या नित्य सेवनाने फुफ्फुसाच्या आणि तोंडाच्या कर्करोगापासून संरक्षण होते, असेही मानले जाते.

 •      आंब्यात असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब आणि हृदयाचे स्पंदन सुधारते आणि हृदयविकाराला आळा बसतो.
 •      आंब्यातील ‘क’ जीवनसत्त्वामुळे साथीच्या आजारांबाबतची प्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी-खोकल्यासह श्वसनाच्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते. 
 •      ‘क’ जीवनसत्त्वामुळे चयापचय क्रियेत निर्माण होणारी शरीरातील दूषित द्रव्ये उत्सर्जित होण्यास मदत होते.
 •      ‘क’ जीवनसत्त्वामुळे हाडे बळकट होतात. लहान मुलांच्या आणि किशोरवयीन वर्गाच्या मुलामुलींच्या हाडांची योग्यरीतीने वाढ होते. 
 •      आंब्यातील ‘बी-६’ जीवनसत्त्वाच्या उत्तम उपलब्धतेमुळे मेंदूतील ‘जीएबीए’ या संप्रेरकद्रव्याची निर्मिती होऊन बौद्धिक शक्ती प्रखर होते.
 •      ‘बी-६’मुळे रक्तातील होमोसिस्टीन या द्रव्याच्या पातळीत घट होते. होमोसिस्टीनची पातळी वाढल्यास त्याचा हृदयाच्या आणि मेंदूतल्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन हृदयविकाराचा झटका किंवा अर्धांगवायू होण्याची शक्यता असते. फळांचा राजामुळे ही शक्यता दुरावते.
 •      आंबा खाऊन शरीराला मिळणाऱ्या तांब्यासारख्या खनिजाचा वापर रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये होतो. त्याचप्रमाणे चयापचय क्रियेत आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या पाचकरसांच्या निर्मितीसाठीसुध्दा तांबे उपयुक्त ठरते.
 •      आंब्याच्या सालीत विशेष वनस्पतीजन्य पदार्थ असतात. यांना फायटोन्यूट्रिअंट म्हणतात. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अनेक अॅण्टिऑक्सिडंटसुध्दा आढळतात.

आंबा आणि मधुमेह
 आंब्याच्या गोडव्यामुळे मधुमेहींनी आंबा खाऊ नये म्हणून उपदेश केला जातो. मात्र ‘अमेरिकन डायबेटिस असोसिएशन’ आणि ‘मेयो क्लिनिक’मधील मधुमेह तज्ज्ञांच्या मते, आंब्याचा ग्लायसेमिक लोड खूप कमी असतो, त्यामुळे त्यातून रक्तातील साखर जास्त वाढत नाही. शिवाय त्यात शरीरासाठी पोषक असलेल्या ऑण्टिआक्सिडंट आणि फायबरमुळे मधुमेहींच्या रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण वाढते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहींनी अजिबात आंबा खाऊ नये असे म्हणणे रास्त ठरणार नाही. उलट मर्यादित स्वरूपात खाल्ल्यास आंबा हे मधुमेहींसाठी उत्तम गुणकारी फळ आहे. 

आंब्यातून भरपूर प्रमाणात मिळणारी फ्रुक्टोज साखर आणि दर १०० ग्रॅममधून मिळणारी ७० कॅलरीज एवढी ऊर्जा यामुळे मधुमेहींनी आंबा खावा, पण फक्त दोन-फोडी दिवसाला. मात्र त्यानंतरच्या जेवणात अर्धी पोळी कमी खावी. जर आख्खा आंबा खाल्ला तर एक पोळी कमी खावी. कारण एका चपातीत साधारणतः ११० कॅलरीज असतात. जिभेवर नियंत्रण न ठेवता जास्त आंबे खाल्ले तर मधुमेहींच्या रक्तातील साखर वाढते आणि मधुमेह नसलेल्या व्यक्तींचे वजन अतिरिक्त वाढत जाते.

खबरदारी
मेंदूत किंवा शरीरातील रक्तवाहिन्यात रक्ताची गाठ निर्माण झाल्यास, ती विरघळविण्यासाठी रुग्णांना वॉरफॅरीन नावाचे औषध दिले जाते. आंब्यात ‘अ’ जीवनसत्त्व अधिक असल्यामुळे या औषधाची कार्यक्षमता जास्त होते. त्यामुळे रक्त जास्तीच पातळ होऊन रुग्णाला रक्तस्राव होऊ शकतो. या कारणाने वॉरफॅरीन घेत असलेल्या रुग्णांनी आंबा खाऊ नये.

कैरीमधून किंवा न पिकलेल्या आंब्यामधून एक तीव्र द्रवपदार्थ पाझरतो. कैरीचा ‘चीक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पदार्थाचे अनेकांना वावडे असते. या व्यक्तींना चिकाची रीअॅक्शन येऊन तोंड, ओठ, ओठांच्या कडा, जीभ या भागांवर खाज सुटणारे फोड येतात. क्वचित प्रसंगी थोडे गंभीर परिणाम होऊन ओठ सुजणे, तोंडात जखमा होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उलट्या, मळमळ, जुलाब होऊ  शकतात. या व्यक्तींनी कच्चे आंबे, कैऱ्या खाऊ नयेत. अशा रुग्णांना काजूचे कच्चे फळ खाल्ल्यासही असाच त्रास होण्याची शक्यता असते.

कच्ची कैरी कापून त्याला तिखट-मीठ लावून किंवा तशीच खाल्ली जाते. कैरीचे लोणचे ही मराठी माणसांची खास आवड आहे. मात्र हे पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्यास घशात खवखव होऊन खोकला येण्याचा त्रास अनेकांना होतो. लोणच्यात असलेले मिठाचे प्रमाण पाहता, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी ते खाऊ नये. 
आंब्याचे पिकणे- 

नैसर्गिक आणि कृत्रिम    
आंबे पिकण्याआधी ते कैरीच्या स्वरूपात असताना त्यामध्ये आम्ल असते. पिकल्यानंतर आंबे गोड लागतात. फळातील बी परिपक्व झाले की त्या झाडामध्ये नैसर्गिक एथिलीन तयार होते आणि ते झाडाच्या अंतर्गत रसवाहिन्यांमध्ये पसरते. हे एथिलीन फळामध्ये पोचले, की फळाच्या पेशींना सूचना जाते. त्यामुळे आंब्याच्या गरातील स्टार्चचे रूपांतर साखरेत होते. काही काळाने या साखरेचे विघटन होऊन, सालीतील रंगद्रव्ये बदलतात आणि फळ पूर्ण पिकते. अशा नैसर्गिकप्रकारे आंबा पिकताना आंब्याचा रंग बदलून तो हिरव्याचा पिवळा, शेंदरी किंवा लालसर होतो. हवामानातील आर्द्रता आणि तापमान यावर पिकण्याची नैसर्गिक क्रिया अवलंबून असते. आंब्याला अढी घातली की ते पिकतात. आजच्या अर्थाधिष्ठित जगात रसमधुर आंब्यांची लोकप्रियता पैशांमध्ये वटविण्यासाठी काहीवेळा आंबे नैसर्गिकरीत्या पिकू देण्याऐवजी कृत्रिमरीत्या पिकवले जातात. आंबे कृत्रिमरीत्या पिकवून फेब्रुवारीपासूनच ‘आंब्यांचे बाजारात आगमन’ अशा बातम्या दरवर्षी नित्यनेमाने पाहायला आणि ऐकायला मिळतात. आंबे पिकवण्याच्या कृत्रिम पद्धतीत कॅल्शियम कार्बाईड वापरून पिकविणे, आंब्यातील सालीवर सुदान रेड, मेथॅनॉल यलो लेड क्रोमेट अशा कृत्रिम रंगांचा किंवा काही तीव्र  रासायनिक पदार्थांचा फवारा मारून ते पिवळे बनवून पिकल्याचा भास आणणे अशा पद्धती वापरल्या जातात. पारंपरिक पद्धतीत कच्चे आंबे गवताची आढी घालून ४-५ दिवस ठेवून पिकवले जातात. मात्र या कृत्रिम पद्धतीत ते काही तासात पिकल्याचा भास निर्माण होतो.

दुष्परिणाम

 •      कॅल्शियम कार्बाइडने पिकविलेल्या आंब्यात आर्सेनिक आणि फॉस्फरसचे अंश राहतात. याचा परिणाम मेंदूवर होऊन डोक्यात जडपणा येणे, स्पर्शज्ञान आणि इतर संवेदनांमध्ये दोष निर्माण होऊ शकतो. 
 •      आंबा पिकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक फवाऱ्यामध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक (कार्सिनोजेनिक) असतात. त्यामुळे शरीरातील विविध अवयवांना कर्करोग होऊ शकतो.
 •      कृत्रिमरीत्या पिकविलेला आंबा नियमितपणे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये या रसायनांमुळे मूत्रपिंडे, यकृत यांच्यात दोष निर्माण होऊन या महत्त्वाच्या अवयवांची कार्यक्षमता कमी होते. कॅल्शियम कार्बाइडने फळे पिकविण्याचे काम करणाऱ्या मजूर वर्गात चक्कर येणे, मूड बदलणे, गोंधळल्यासारखे होणे, स्मृती कमी होणे असे असंख्य आजार आढळून आले आहेत. 
 •      गर्भवती स्त्रियांच्या सेवनात असा आंबा येऊन कॅल्शियम कार्बाईड पचनसंस्थेद्वारे गर्भाशयात जाऊन बाळामध्ये जन्मजात विकृती निर्माण होऊ शकतात.
 •  या रसायनांमुळे असे आंबे खाल्ल्याने उलटी, जुलाब, सतत मळमळणे, चक्कर येणे असे त्रास वरचेवर होऊ लागतात.

आंब्याचे पदार्थ
आंब्याची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याचे अनेक पदार्थ बनवून बाराही महिने उपलब्ध केले जातायत. आंबा बर्फी, आंबावडी, आंब्याचे श्रीखंड, आंबा आइस्क्रीम, कैरीचे पन्हे असे अनेक पदार्थ सर्वांच्या आवडीचे असतात. मात्र बाजारातल्या या पदार्थांच्या बाबतीत काहीवेळा भेसळीच्या अनेक घटना आढळतात. त्यामुळे शासकीय अन्न आणि औषध प्रशासनाकडून मान्यता असलेले पदार्थच वापरावेत. 

आंब्याच्या स्वादाची कृत्रिम शीतपेये बाजारात मिळतात. त्यात अनेकदा आंब्याचा मागमूसदेखील नसतो. त्यामुळे त्यातून नैसर्गिक आंब्यांयोगे मिळणाऱ्या आरोग्याच्या लाभांपेक्षा त्या पेयातील अतिरिक्त साखर आणि कृत्रिम रासायनिक घटकांचा दुष्परिणाम होण्याची शक्यताच जास्त असते. प्रक्रियायुक्त आंब्यांच्या फोडी आणि काही पदार्थ आजकाल अनेक खाद्यविक्रेत्यांकडे आणि मॉलमध्ये आढळतात. केवळ आंब्यांची आवड असल्यामुळे ते घेतले जातात. यातही जिभेचे चोचले भागविणे एवढेच मर्यादित उद्दिष्ट ठेवावे, कारण त्यातून नैसर्गिक आंब्यांचे शारीरिक फायदे फारसे होऊ शकत नाहीत.

आंब्यातील अन्नघटक

आंब्याच्या १०० ग्रॅम गरामध्ये आढळणाऱ्या अन्नघटकांचे विश्‍लेषण

आहारतत्व    पोषणमूल्य    दैनंदिन शारीरिक आवश्यकतेपैकी टक्के
ऊर्जा     ७० किलोकॅलरीज    ३.५ टक्के
पिष्टमय पदार्थ    १७ ग्रॅम    १३ टक्के
प्रथिने    ०.५ ग्रॅम    १ टक्का
स्निग्ध पदार्थ    ०.२७ ग्रॅम    १ टक्का
कोलेस्टेरॉल    ०    ०
फायबर    १.८ ग्रॅम    ४.८ टक्के
जीवनसत्वे    
अ    ७६५ इंटरनॅशनल युनिट्स    २५.५ टक्के
फोलेट्स    १४ मायक्रोग्रॅम    ३.५ टक्के
नायसिन    ०.५८४ मिलिग्रॅम    ३.५ टक्के
पॅन्टोथेनिक अॅसिड    ०.१६० मिलिग्रॅम    १ टक्का
पायरीडॉक्सिन (बी-६)    ०.१३४ मिलिग्रॅम    १० टक्के
रायबोफ्लेविन    ०.०५७ मिलिग्रॅम    ४ टक्के
थायमिन    ०.०५८ मिलिग्रॅम    ५ टक्के
क     २७.७ मिलिग्रॅम    ४६ टक्के
इ    १.१२ मिलिग्रॅम    ७.५ टक्के
के    ४.२ मायक्रोग्रॅम    ३.५ टक्के
क्षारतत्वे
पोटॅशियम    १५६ मिलिग्रॅम    ३ टक्के
सोडियम    २ मिलिग्रॅम    ०.०१
खनिजे
कॅल्शियम    १० मिलिग्रॅम    १ टक्के
तांबे    ०.११० मिलिग्रॅम    १२ टक्के
लोह    ०.१३ मिलिग्रॅम    १.५ टक्के
मॅग्नेशियम    ९ मिलिग्रॅम    २ टक्के
मँगेनीज    ०.०२७ मिलिग्रॅम    १ टक्के
जस्त    ०.०४ मिलिग्रॅम    ० टक्के
विशेष पोषकतत्वे
बीटा कॅरोटिन    ४४५ मायकोग्रॅम    -
अल्फा कॅरोटिन    १७ मायकोग्रॅम    -
बीटा क्रिप्टो झॅन्थिन      ११ मायकोग्रॅम    -
 

संबंधित बातम्या