आंबा आणि अक्षयतृतीया

श्रीकांत नवरे
सोमवार, 6 मे 2019

आंबा विशेष
 

प्राचीन वैदिक आर्यांना अक्षय, अविनाशी, चिरंतन, शाश्‍वत अशा प्रकारच्या गोष्टींची ओढ होती; ध्यास होता. अशा गोष्टी करण्याकडे त्यांचा विशेष कल होता. वेद, उपनिषदे आणि ब्राह्मण ग्रंथांमधून निरनिराळ्या ऋषींनी विविध देवतांना उद्देशून ज्या प्रार्थना किंवा यज्ञ सांगितलेले आहेत, त्यांची या दृष्टिकोनातून पाहणी केली तर ही गोष्ट सहजच दृष्टोत्पत्तीस येते. आपण केलेली साधना किंवा तपश्‍चर्या कधीही नष्ट होऊ नये, आपल्याकडील यज्ञ हे आपल्याकडेच राहावेत; ते असुरांकडून हिरावून घेतले जाऊ नयेत. आपण केलेल्या अध्ययनाला कोणत्याही कारणाने कुठल्याही परिस्थितीत मालिन्य येऊ नये, विस्मरण होऊ नये. ईशकृपेने मिळाले हे मौल्यवान शरीर जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत निरामय किंवा निरोगी राहावे. आपली स्थावर आणि जंगम मालमत्ता कधीही संपून जाऊ नये. आपल्याला कधीही मरण येऊ नये, आपण अमर असावे. थोडक्‍यात, आपल्याकडे जे जे काही आहे, ते अक्षय आणि अविनाशी म्हणजेच न संपणारे असावे, यासाठी मानवाची पुरातन कालापासून आजतागायत खटपट सुरू आहे. विष्णू धर्मोत्तर पुराणात ‘स्वर्ग’ या शब्दाची व्याख्या वरील दृष्टिकोन स्पष्ट करणारी आहे, ती अशी ः
यन्न दुःखेन सम्भिन्नं न च ग्रस्तमनन्तरम्‌।
अभिलाषोपनीतं यत्‌ 
तत्‌ सुखं स्वःपदास्पदम्‌।।

 याचा अर्थ जे दुःखमिश्रित नाही, म्हणजे दुःखापासून निराळे आहे. जे मिळाल्यानंतर नष्ट होणार नाही आणि ज्याची इच्छा केली आहे, तेच किंवा जे स्वतःच्या इच्छेने मिळविलेले आहे ते सुख असा ‘र्स्व’ पदाचा अर्थ आहे. हा जो सर्व प्रपंच केला, तो अक्षयतृतीया या शब्दामधील अक्षय शब्दाची भूमिका समजावी यासाठी.

वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीया ही अक्षयतृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. अक्षयतृतीयेचा सर्वांत प्राचीन उल्लेख विष्णू धर्मसूत्रामध्ये आलेला दिसतो. या दिवशी दिलेले दान, अगर केलेला जप, होम, स्नान (विशेषतः समुद्रस्थान) आदी कृत्यांचे फल अक्षय म्हणजे कधीही न संपणारे किंवा कधीही नाश न पावणारे असते. यामुळेच या तिथीला अक्षयतृतीया म्हणतात. मत्स्यपुराण (६.५.१.७) वैशाख महिन्यातील ही महत्त्वाची तिथी म्हणून गणली जाते.

वैशाख मासाचे प्राचीन नाव माधव असे आहे. चैत्र व वैशाख हे दोन वसंत ऋतूचे महिने मानले जातात. तथापि, वैशाखात उन्हाळा बराच असतो. त्यामुळे या मासातील व्रत-वैकल्ये उन्हाळ्याला योग्य अशीच सांगितलेली आहेत. उदाहरणार्थ, या दिवशी (वसंत) माधव या देवतेला उद्देशून ब्राह्मणाला उदकाने (पाण्याने) पूर्ण असा कुंभ दान द्यावा असे सांगितलेले आहे. हे उद कुंभाचे दान स्वतःसाठी त्याचप्रमाणे पितरांची अक्षय तृप्ती व्हावी, यासाठीही देतात. या उद कुंभदानानंतरच लोकांनी पाणी थंड करून पिण्यास सुरुवात करावी, अगोदर पाणी प्याले, तर आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहे. याकरिता पितरांना थंड पाणी दिल्याशिवाय आपण थंड पाणी पिऊ नये, असा निर्बंध घालून ठेवलेला आहे.

अक्षयतृतीयेला महत्त्व येण्याचे कारण या तिथीचा साडेतीन शुभमुहूर्तांमध्ये समावेश केला गेला. या दिवसाची साडेतीन शुभमुहूर्तावर गणना होण्याचे कारण हा कृतयुगाचा प्रारंभदिन आहे. कालविभागाचा कोणताही प्रारंभ दिवस भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो. शालिवाहन शकाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवसाची या दृष्टिकोनातूनच साडेतीन मुहूर्तांत गणना केली आहे. हे साडेतीन शुभमुहूर्त स्वयंसिद्ध असल्यामुळे कोणतेही शुभकर्म करण्यास पंचांगशुद्धी किंवा दिनशुद्धी पाहण्याची आवश्‍यकता नाही. त्यामुळेच वास्तुशांती, विवाह, गृहप्रवेश, साखरपुडा, नामकरण, उष्टावण, भूमिपूजन, नव्या उद्योगाचा आरंभ वगैरे गोष्टी साडेतीन मुहूर्तांचे निमित्त साधून घडू लागल्या. या साडेतीन मुहूर्तांमध्ये धर्मशास्त्रीयदृष्ट्या कोणत्या गोष्टी करण्यास मुभा आहे, हा एक स्वतंत्र विचाराचा विषय आहे.

सामाजिक व कौटुंबिक विशेषतः स्त्रियांच्या दृष्टीने या दिवसाला फार महत्त्व आहे. चैत्र शुद्ध तृतीयेला महाराष्ट्रातील स्त्रिया गौरीला झोपाळ्यावर बसवितात आणि पुढे महिनाभर तिची पूजा करतात. याला ‘दोलोत्सव’ असे म्हणतात. अक्षयतृतीयेला चैत्रात बसविलेल्या या गौरीचे विसर्जन करायचे असते. कोकणात या दिवशी हळदी-कुंकवाला आलेल्या सुवासिनींचे व कुमारिकांचे पाय धुऊन भिजलेल्या हरभऱ्यांनी आणि फळांनी त्यांची ओटी भरतात. त्यांच्या हातावर चंदनाचा लेप करतात आणि त्यावरून शिरा असलेली शिंप फिरवितात. त्यांना आंब्याची डाळ व पन्हे देतात. देवीची पूजा झाल्यावर आरती करताना ‘गौरीचे माहेर’ नावाचे गाणे म्हणण्याची पद्धत आहे. या गौरीच्या स्तुतीबरोबरच माहेरची माणसे, माहेरचे वातावरण, परिस्थिती यांचेही वर्णन नितांत रमणीय आणि अस्सल आहे. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते. आपल्या आईकडून सर्व प्रकारची कौतुके करून घेते. मैत्रिणींबरोबर खेळते. झोपाळ्यावर बसून झोके घेते आणि अक्षयतृतीयेला परत सासरी जाते, अशी समजूत आहे. म्हणून या दिवशी मिष्टान्न करून सुवासिनीला भोजन घालण्यात येते. बायका एकमेकींकडे हळदी-कुंकवाला जातात-येतात. माहेरी आलेल्या गौरीला निरोप देण्याचा हा कुलाचार आहे. ब्राह्मणेतर समाजातही हा उत्सव साजरा केला जातो. त्या समाजात या दिवसाला ‘आखेती’ असेही म्हणतात.

अक्षयतृतीया ही वास्तविक पितृतिथी आहे. म्हणजे ही तिथी किंवा हा दिवस पितृकर्माला अत्यंत प्रशस्त आहे. सध्या पारंपरिक सनातनी लोकांमध्येच फक्त या तिथीचे पितृतिथी म्हणून महत्त्व टिकून आहे. ऋग्वेदातील दहाव्या मंडळातील पितृसूक्ते आणि इतर मंडळातील पैतृक मंत्रांमध्ये वैदिक ऋषींनी पितरांना देवासमान मानलेले आहे. स्मृती आणि पुराणकारांनीही देवकार्यापेक्षा पितृकार्य विशेष आहे, असा वारंवार उद्‌घोष केला आहे. अक्षयतृतीया हा कृतयुगाचा प्रारंभ आहे. त्यामुळे या तिथीवर केलेल्या श्राद्धापासून पितरांना अक्षय संतोष मिळतो, असे मानले जाते. 

अक्षयतृतीया, दशहरा व्रत (ज्येष्ठ शुक्‍ल प्रतिपदा ते ज्येष्ठ शुक्‍ल दशमी) आणि वटपौर्णिमा या दिवशी स्त्रिया ब्राह्मणाला व सुवासिनी स्त्रियांना आंब्याची वाणे देतात. काही आदिवासी समाजात आंब्याची कच्ची कैरी खाण्याच्या विधीपासून पहिले पिकलेले फळ खाण्यापर्यंतचे विधी नाचून गाऊन साजरे करतात. काही लोक प्रथम आंब्याचा विवाह करून मग त्याची फळे खातात. काही जमातींचे आंबा हे देवक आहे. आंबा हा दीर्घजीवी आहे, ही त्यामागे कल्पना आहे.

हिंदूंचे सर्व धार्मिक विधी, सण, उत्सव, कुलधर्म-कुलाचार, व्रतवैकल्ये यामध्ये आम्रवृक्ष, आंबा, आम्रमंजिरी, आंब्याची पाने या सर्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक विधी आंब्याच्या पानांवाचून करत नाहीत. आम्रवृक्ष हा मंगलकारक मानलेला आहे. माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी चंद्राला व शिवरात्रीच्या दिवशी शंकराला आम्रमंजरी अर्पण करतात. मंगलकार्याच्या प्रसंगी मंडपात आणि दारावर आंब्याच्या पानाची तोरणे बांधायची पद्धत आहे. सुवासिनींची पाच फळांनी जी ओटी भरली जाते त्यामध्ये आंबा हा प्राधान्याने घेतला जातो. शंकराला उद्देशून जो अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र केला जातो तो काही ठिकाणी आंब्याच्या रसानी करण्याची पद्धत आहे.

रामायण, महाभारत, पाणिनीची अष्टाधायी इत्यादी ग्रंथात आंब्याला उद्देशून निरनिराळी नावे त्या मागच्या कल्पनांचे संदर्भ येतात.  ‘आंबा शिंपणे’ हा लग्नविधीतला एक महत्त्वाचा सोहळा. ऐरिणीदान (झाल) झाल्यावर वधू-वरांना गौरीहरापाशी नेतात. तिथे भिंतीवर आंब्याचे झाड काढलेले असते. हा आंबा वधूने शिंपायचा असतो. त्यासाठी वधू आपला डावा पाय वराच्या उजव्या मांडीवर ठेवते व नागवेलीचे पान कुंकवाच्या पाण्यात बुडवून तो चित्रित वृक्ष शिंपते. कोकणात हा विधी वधूचा गृहप्रवेश झाल्यावर दुसऱ्या दिवशी करतात. वधू-वर खऱ्या आंब्याची पूजा करून त्याला पाणी घालतात.  

संबंधित बातम्या