रसई

डॉ. मंदार दातार
सोमवार, 10 मे 2021


आंबा विशेष

ईसापूर या तालुक्याच्या गावाकडे जाणारा तो रस्ता कयाधू नदीच्या काठानं होता. या रस्त्यावर माणसांची, दुचाक्यांची अन क्वचित मोठ्या गाड्यांची वर्दळ असायची. मात्र विचारांच्या तंद्रीत चालणाऱ्या कल्पनाचं या सगळ्याकडे लक्षच नव्हतं. तिच्या मनात रुंजी घालत असलेला भूतकाळ तिला या वर्तमानाशी सांगड घालून देतच नव्हता. कधी एकदा आपल्या घरी पोचेन असं तिला झालं होतं. या रस्त्यानं कल्पना आज खूप वर्षांनी चालत होती. तिच्या मनातले विचार तिच्या वडिलांपाशी, त्यांच्या आठवणींपाशी केंद्रित झाले होते. तिचे वडील नानासाहेब देशमुख तहसीलदार होते.

‘तहसीलदार असूनही नानांना कधीच कशाचाच गर्व नव्हता. पिढीजात मोठी हवेली, काहीशे एकर बागायती शेतजमीन नावावर असलेले, भरीस म्हणजे एवढं शिक्षण आणि मोठ्या पदावर असलेले नाना किती साधे होते. आपण लहानपण त्यांच्या पंखाखालीच काढलं. मुंबईला शिक्षणाला गेल्यानंतर दहा वर्षं तरी दर उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुटीत त्यांच्याच ओढीनं गावाकडे येत राहिलो. शहरात रमायचा प्रयत्न होता, पण खरी ओढ गावाचीच असायची. मग निहार भेटला, लग्न केलं आणि परदेशात कायमचे स्थिरावलो. पुढे आई गेली आणि पाठोपाठ नानासाहेब गेले. ते गेले तेव्हा उभ्याउभ्याच येऊन गेलो. ते गेल्याचं दुःख होतं पण पर्याय नव्हता. बर्लिनला थाटलेला संसार खुणावत होता. इथली सगळी जबाबदारी शामरावांवर, नानांच्या विश्वासू सहकाऱ्यावर, सोडून परत निघून गेलो. परत गेलो पण खरंतर, पण आपलं मन कधी परदेशात रमलंच नाही. आज असं काय झालं की ते सगळं सोडून कायमचं इकडेच यावं वाटलं? 

त्या दिवशी आपण सुपर मार्केटला गेलो नसतो तर असं इकडं यावं वाटलं असतं? सुपर मार्केटमध्ये तो आंबा बघणं झालं आणि त्या पिकलेल्या फळाचा घमघमाट मनाला भिडला. खरंतर तो आंबा होता आफ्रिकेतून आलेला, भारतातला नव्हे. आंबा पाहणं हे युरोपातलं स्वतःच्या हातानं वसवलेले घर सोडून, संसार अर्धवट टाकून, नवऱ्याशी भांडून भारतात परत यायचं कारण होऊ शकतं? त्या दिवशी आंबा पाहिला अन नानांची, आईची अन् घराची बेदम आठवण झाली. सुपर मार्केटमधून घरी परत आले अन कपाटातले अल्बम काढले. फोटो बघण्यात किती वेळ गेला, समजलंच नाही. बालपणाच्या सगळ्या आठवणी भोवताली रुंजी घालायला लागल्या. मग आठवडाभर त्या आठवणींच्या जगातच राहिलो. पुढच्या आठ दिवसांत तर भारतात कायमचं परत यायचा निर्णय घेतलाही होता.’ 

कल्पनाचे वडील नानासाहेब जिल्ह्यातील मोठ प्रस्थं होतं. तहसीलदार असल्यानं तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. नानासाहेब मोठ्या उदार मनाचे. सुदैवानं नानासाहेबांना दैवानंही इतकं दिलं होतं, की लोकांना मुक्तहस्ते वाटूनही कधीच काही कमी पडलं नाही. नानासाहेबांचं घर अन्नधान्य, फळं, भाजीपाल्यानं कायम भरलेलं असे. वसईतील केळी ते नागपूरची संत्री त्या त्या हंगामात नानासाहेबांनी मागवून घेतलेली असत. डहाणूतून त्यांचा एक जुना मित्र चिक्कू पाठवत असे, तर ते स्वतः द्राक्षांच्या हंगामात नाशिकला एक चक्कर खात्रीनं मारत असत. पण या सगळ्या फळांमध्ये नानासाहेबांना आंबे अतिशय आवडत. वर्षभर आंब्याच्या मोसमाची ते जेवढ्या आतुरतेनं वाट पाहत असायचे तेवढी कशाचीच पाहत नसत. त्यांची स्वतःची मोठी आमराई होतीच, पण तालुक्यात भरपूर फिरल्यामुळे आणि दांडग्या जनसंपर्कामुळे तालुक्यात आणि परिसरात कुठं कुठल्या चवीचे आंबे आहेत, कोणाच्या शेतात कोणत्या चवीचा ‘रायवळ’ मिळतो याची इथ्यंभूत माहिती त्यांना होती. कुठला ‘गोट्या’ मधुर आहे, तर कुठला ‘वाकड्या’ रसाला उत्तम आहे, कुठला ‘करकऱ्या’ अर्धवट पिकल्यावरच चांगला लागतो याबाबतीत त्यांचे अचूक आडाखे होते. याउप्पर त्यांनी मदत केलेले लोक त्यांना त्यांच्या आवडीचे आंबे आवर्जून आणून देत असत. त्याच काळात एक नोकर देवगडला जाऊन खास ‘हापूस’ आंबे घेऊन येत असे. घरात नुसते आंबेच आंबे असत. पण हे आंबे एकट्यानं खाणं त्यांना कधीच मान्य नसे. आंब्याची चव इतरांना खाऊ घातल्यानं हजारपट वाढते असं ते कल्पनाला नेहमी सांगत. 
नानासाहेबांनाच होतं का हे आंब्याचं वेड? खरंतर इकडं सगळ्यांनाच असायचं. आमच्या मराठवाड्यात जमीन गहाण टाकली, तर त्या गहाण जमिनीवरच्या आंब्यांचा हक्क मूळ मालकाकडेच असे आणि आंब्याचं झाडच गहाण टाकलं तरी निम्म्या आंब्यांवर पुन्हा मूळ मालकाचाच हक्क असायचा. अनेक शतकांपासून हे नियम वापरात होते, स्थानिक माणूस आणि आंबा यांचं नातं दाखवत होते. 

दर वर्षी उन्हाळ्यात नानासाहेब ‘रसई’ करत असत. ‘रसई’ म्हणजे एक मोठा सोहळा असे. एका वाक्यात सांगायचं झालं, तर ‘रसई’ म्हणजे आंब्याचा रस खाणं. त्यासाठी ते सगळ्या माहेरवाशिणींना, दूर राहणाऱ्या नातेवाइकांना ईसापूरला बोलावत असत. तालुक्याबाहेर ठिकठिकाणी नांदायला गेलेल्या आत्या, पुतण्या, भाच्या सगळ्या ‘रसई’साठी जमत असत. घराभोवती मोठा मांडव घातलेला असे. आठवडाभर घरात लोकांची नुसती धांदल असे. पाहुणे येण्याआधीच नानासाहेब फर्मान सोडत. गावोगावच्या आंब्याच्या मालकांना निरोप जात, पेट्या भरभरून ठिकाठिकाणून वेगवेगळ्या चवीचे कलमी, रायवळ आंबे येत. आंब्याची माच किंवा अढी लावली जात असे. मातीची खोली, तट्टांच्या सारवलेल्या किंवा लाकडी भिंती अशी माच लावण्यासाठी खास तजवीज केली जात असे. ते चार पाच दिवस माच लावणं, वेगवेगळ्या चवीचे आंबे खाणं, आमरस-पोळी, आमरस पुरी, आमरस भात खाण्यात जाई. आंब्याचा रस वाळवून आंबा पोळ्या केल्या जात. जेवणानंतर गप्पांचे फड रंगत. गप्पांनी रात्र रात्र जागवल्या जात. माहेरवाशिणी आपल्या आठवणींच्या पोतड्या खोलत आणि गप्पा-गाण्यात, खाण्यापिण्यात आठवडा निघून जाई. परत निघताना सगळ्यांचे डोळे पाणावत. पुढच्या वर्षी परत येण्याची ओढ लागलेली असे. या ‘रसई’च्या मौसमानं कल्पनाचं सगळं बालपण व्यापून टाकलं होतं. नानासाहेब गेले आणि हे सगळं थांबलं. 

***

विचारांच्या तंद्रीत कल्पना घरी कधी पोहोचली आणि शामरावांनी तिच्या हातातली बॅग कधी घेतली हे तिचं तिलाच समजलं नाही. शामरावांना तिनं आपण ईसापूरला येतोय हे सांगितलंच नव्हतं. “ताई तुम्ही आधी सांगितलं असतं तर मुंबईला गाडी पाठवली असती. हे आहे ते सगळं तुमचं तर आहे. मी फक्त याचा राखणदार,” शामराव तिला म्हणाले. शामराव हे मनापासून म्हणत आहेत हे तिला माहीत होतं. 

कल्पना स्वतःशी विचार करत राहिली. ‘या सगळ्या ‘रसई’च्या आठवणी, नानासाहेबांचं मोठेपण, त्यांचं अस्तित्व हळूहळू माझ्याही सगळं विस्मृतीत जात होतं. सुपर मार्केटमध्ये तो आंबा पहिला नसता, घरी येऊन फोटोंची उजळणी झाली नसती, तर हे सगळं आठवलं असतं का? आणि आठवलं जरी असतं तरी इकडे यायची एवढी ओढ लागली असती का? माहीत नाही. आता एका जुन्या ओढीनं परत इथं आलेय तर आता बघू पुढे काय होतेय ते.’ पुढचे दोनतीन दिवस कल्पना ईसापूरलाच राहिली. ते दोन दिवस तिच्या मनात केवळ आणि केवळ नानासाहेब होते. तिनं विचार करून आणि शामरावांबरोबर चर्चा करून ठरवलं, की आपल्या शेतात नानासाहेबांना आवडणाऱ्या सगळ्या आंब्यांची रोपं लावायची. त्यांची आधीच असलेली आमराई अजून मोठी करायची, आंब्यांची जोपासना करायची आणि नातेवाइकांसाठी, मित्रांसाठी, स्नेह्यांसाठी ‘रसई’ पुन्हा सुरू करायची. 

पण हे वाटत होतं तेवढं सोपं नव्हतं. हे नीट, समजून उमजून करायचं असेल तर त्यासाठी नीट अभ्यास करावा लागणार होता. आंब्याची सारी विविधता इथं लावायची असेल तर त्यातलं विज्ञान नीट समजून घेतलं पाहिजे, हे तिला खात्रीनं माहीत होतं. पण हे विज्ञान ना एमबीए असलेल्या कल्पनाकडे होतं ना आयुष्य गावाकडे काढलेल्या शामरावांकडे. मग तिच्या डोळ्यासमोर आला प्रफुल्ल. तिच्याच वर्गात दहावीपर्यंत तो होता. वर्गात असण्यापेक्षा त्याचा जास्ती वेळ शेतातच जायचा. तो त्याच्या शिक्षकांना, त्याच्या आई-वडिलांना तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारायचा. लहानपणापासूनच त्याला शेतीविषयी अपार कुतूहल होतं. दहावीनंतर बारावी करून कृषी महाविद्यालयात जायचं त्याचं स्वप्न होतं. पण त्याच्या वडिलांना त्याचं हे स्वप्न पूर्ण करणं आर्थिकदृष्ट्या अवघड वाटलं, तेव्हा नानासाहेबांनीच त्याला मदत केली होती. आता प्रफुल्ल पुण्याच्या कृषी महाविद्यालयात प्राध्यापक होता. त्यानं म्हणे पुण्याच्या जवळपास कुठंतरी शेती घेऊन स्वतःचे प्रयोगही चालूच ठेवले होते. मग कल्पनानं शामरावांमार्फत गावातून प्रफुल्लचा नंबर मिळवला आणि सरळ त्याला भेटायला ती थेट पुण्यालाच गेली. 

कृषी महाविद्यालयाजवळच्या हॉटेलात दुपारच्या जेवणासाठी ते भेटले. प्रफुल्लनं तिचं म्हणणं सविस्तर ऐकून घेतलं आणि तिला म्हणाला, ‘‘नानासाहेबांचे माझ्यावर इतके अगणित उपकार आहेत. त्यातून उतराई होण्याची काही संधी मिळत असेल तर मी ती कधीच सोडणार नाही. मात्र तू फक्त आपल्या भागातले आंबे लावू नको, या निमित्तानं आपण भारतातल्या सगळ्या भागांतून आंब्याचे वेगवेगळे वाण, त्यांच्या जाती जमा करू. याला आम्ही आमच्या भाषेत ‘जर्मप्लासम’ म्हणतो. या विविध आंब्यांच्या एकत्रित लागवडीचा तुझा हा प्रकल्प भारतात एकमेवाद्वितियच होईल. आंबा मूळचा भारतीय पण या आपल्या फळासाठी कोणी आजपर्यंत भारतात तरी हा प्रयत्न केला नाहीये. या कामात तुला लागेल ती मदत मी करायला तयार आहे, त्या निमित्तानं माझं गावाकडंही येणं होईल.’’ प्रफुल्लचा पाठिंब्याचा सूर पाहून कल्पना आनंदातच ईसापूरला परत पोहोचली.     

पुढच्या काही दिवसांत तिनं प्रफुल्लकडून आंब्याविषयी खूप गोष्टी जाणून घेतल्या. आंब्यातील मूळ जनुकीय विविधतेचा पाया इतका मोठा आहे आणि परत त्यात पर-परागीभवन होत असल्यामुळे कोयीपासून वाढलेलं प्रत्येक झाड हे स्वतःच एक वेगळा प्रकार असतं. त्यामुळे आपल्याला मातृवृक्षात असलेले गुण टिकवायचे असतील तर कलमांशिवाय पर्याय नसतो. या कलमांमुळे हव्या त्या जाती टिकवणं आपल्याला शक्य झालं आहे, हे सारं प्रफुल्लनं तिला समजावून सांगितलं. अल्फान्सो दि आल्बुकर्क या पोर्तुगीज जनरलने आंब्यावर कलमाची पद्धत भारतात रूढ केली म्हणून त्या आंब्याला ‘अल्फान्सो’ व त्याचा अपभ्रंश होऊन ‘हापूस’ हे नाव मिळालं, ही सारी माहिती तिला नवीनच होती. मात्र या सगळ्या माहितीत तिला अजिबात आवडलं नाही ते आंब्याचं शास्त्रीय नाव. ‘‘मँजिफेरा इंडिका हे काय नाव झालं?’’ ती प्रफुल्लला म्हणाली. ‘‘रसाळ आंबा खाताना एकदम दातात कोय अडकल्यासारखं वाटतंय.’’ पण जेव्हा प्रफुल्लनं त्याचा अर्थ सांगितला तेव्हा तिला समजलं, की तमिळमध्ये कच्च्या आंब्याला मंगाई असं म्हणतात. यावरूनच त्याचं ‘मँगो’ हे इंग्रजी नाव आणि ‘मँजिफेरा’ हे वनस्पती शास्त्रीय नाव आलंय. 

प्रफुल्लनं कल्पनाला केवळ पुस्तकी 
ज्ञान दिलं नाही, तर तिला प्रत्यक्ष 

झाडं कशी लावायची, त्यांची कलमं कशी करायची, त्यांची निगा कशी राखायची 

हेही शिकवलं. तिच्यासोबत भारतभर फिरून संकलनासाठीही मोलाची मदत केली. 

पुढची दोन तीन वर्षं कल्पनासाठी धांदलीची होती. भरपूर नोकरचाकर मदतीला होते तरी कल्पना या कामानी झपाटून गेली होती. विविध जातींचे आंबे लावण्यासाठी जागा निवडणं, ज्यांच्यावर कलमं करता येतील अशी आंब्याची 

रोपं तयार करणं, ठिकठिकाणाहून ज्या जातीचे आंबे हवे आहेत त्या त्या जातीच्या फांद्या आणून लावलेल्या रोपांवर त्याची कलमं करणं इत्यादी अनेक गोष्टी तिनं स्वतःच मनापासून केल्या. या दरम्यान तिचं एकदोनदा निहारशी फोनवर बोलणंही झालं. तू तिकडंच भारतात कायमचं राहायचं ठरवत असशील तर आपल्या नात्यासंदर्भात काही निर्णय आपण घेतला पाहिजे हे निहारनं तिला दोन्ही वेळा सांगितलं. पण कल्पना तिच्या कामातच इतकी अडकली होती, की तिनं निहारचे विचार निग्रहानं मनातून बाजूला सारले. 

एकीकडे जसजसे दिवस सरत होते तसतसं कल्पनाचं स्वप्न प्रत्यक्षात यायला लागलं. पन्नास एकरावर पसरलेल्या जागेत तिनं भारतभरातून विविध भागातून आणलेली जवळपास एक हजार वाणं, जाती आणि प्रकार लावले. सोबतच अनेक रायवळ किंवा स्थानिक जातींच्या चवी असलेले आंबे होतेच. तो वृक्ष पडल्यावर ज्या चवी नष्ट झाल्या असत्या, त्या आता कल्पनाच्या प्रयत्नांतून जिवंत राहणार होत्या. त्याचबरोबर एक आंबा संग्रहालयही तिथं उभं राहत होतं. त्यातून आंब्याविषयी भरपूर माहिती वेगवेगळ्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचणार होती. कल्पनाबरोबरच शामरावांनी केवळ नानासाहेबांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कामासाठी केलेले कष्टही बहुमूल्य होते. 

काही महिन्यांनी येणाऱ्या नानासाहेबांच्या पुण्यतिथीला एक समारंभ करून हा प्रकल्प समाजापर्यंत न्यायचा असं त्यांनी ठरवलं. मात्र या प्रकल्पाला ‘रसई’ हेच नाव द्यायचं असं कल्पनाच्या मनात आधीपासूनच होतं. हा कार्यक्रम जवळ आला अन कल्पना आणि शामरावांची धांदल वाढतच गेली. प्रफुल्ल रजा काढून काही दिवस तिकडंच होता. कार्यक्रमाला दोन दिवस शिल्लक असताना कल्पनासाठी एकदम अविश्वसनीय अशी एक गोष्ट घडली. निहार त्याची जर्मनीतली नोकरी सोडून भारतात कायमचा परत आला आणि तो थेट ईसापूरला पोहोचला. कल्पनासाठी हा एक मोठा सुखद धक्काच होता. संध्याकाळी कयाधूच्या काठानं चक्कर मारायला गेल्यावर ते दोघं एकमेकांशी मनमोकळेपणानं बोलले. “आज खूप हलकं हलकं वाटतंय,” निहार तिला म्हणाला. “खरंतर माझी खूप द्विधा मनःस्थिती होती, एकीकडे तू आणि एकीकडे जर्मनीतली स्थिरावलेली नोकरी. पण प्रफुल्ल दोन वर्षांपासून माझ्या संपर्कात होता; तुझं या कामातलं गुंतणं, तुझ्या कामाचं त्याला जाणवणारं शास्त्रीय महत्त्व, आपल्या वडिलांच्या आठवणी जपण्यासाठी तू केलेला आटापिटा या सगळ्या गोष्टी तो मला कळवत राहिला आणि मग हळूहळू माझा निर्णय बदलत गेला. शेवटी माझी ‘अंबाबाई’ जिकडे, तिकडे मी,” या त्याच्या शेवटच्या वाक्यानंतर दोघं अनेक वर्षांनी खळखळून हसले. 

दोनच दिवसांत ‘रसई’ प्रकल्पाचं उद्‌घाटन झालं. आंब्याचे एवढे प्रकार, जाती, वाणं एकत्रित एका जागी जपणारा म्हणून माध्यमांमध्येही हा प्रकल्प  वाखाणला गेला. ‘चला चांगली सुरुवात झाली,’ कल्पना मनात म्हणाली. ‘ही  सगळी कलमं काही वर्षांतच मोठी होतील. आता आपण नानासाहेबांसारखा ‘रसई’चा वार्षिक कार्यक्रम पुन्हा सुरू करू शकू. नानासाहेब जिथं आहेत तिथून हे जेव्हा बघतील तेव्हा त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलीचा अभिमान वाटेल.’ या विचारांनीच कल्पना अपार आनंदून गेली. गेल्या तीन चार वर्षांतल्या कष्टापायी तिची झालेली धावपळ, पुढे नेमकं काय करायचं यासारखे प्रश्न, संसाराचं टेन्शन या साऱ्या गोष्टी आता बाजूला पडल्या  होत्या.

संबंधित बातम्या