हापूस पोहोचला थेट खवय्यांकडे

एकनाथ पवार, वैभववाडी
सोमवार, 10 मे 2021

आंबा विशेष

कोरोनामुळे गेल्या वर्षी अनेक आंबा बागाइतदारांनी विक्रीची पारंपरिक साखळी तोडून थेट विक्रीचा प्रयोग केला. त्यात त्यांना चांगले यश मिळाले. देवगड तालुक्यातील शिरगाव आंबेखोल येथील विवेक शांताराम चव्हाण हे त्यापैकीच एक. त्यांनी थेट ग्राहकांशी जोडणारी मजबूत शृंखला तयार केली. आता ग्राहकांना दर्जेदार हापूस मिळतो आणि चव्हाण यांचा फायदाही तिप्पट झाला आहे. त्यांची ही यशोगाथा..

विवेक चव्हाण यांचा वडिलोपार्जित आंबा व्यवसाय आहे. त्यांची स्वतःच्या मालकीची २५० हापूसची झाडे आहेत. काही बागाइतदारांच्या बागा ते करारानेदेखील घेतात. इतर शेतकऱ्‍यांप्रमाणे विक्री व्यवस्थेमुळे त्रस्त असलेल्या चव्हाण यांनी काही वर्षांपासून घरातूनच थेट विक्रीचा प्रयत्न सुरू केला. देवगड-निपाणी मार्गालगत घर असल्यामुळे त्यांनी घराबाहेर स्टॉलवर विक्री सुरू केली. त्यात त्यांना थोडाफार फायदा होत होता, परंतु एकूण नुकसान कमी होत नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनात हा व्यवसायच सोडण्याचा विचार येत असे. पण तरीही आपले उत्पादन दर्जेदार आहे, त्यामुळे त्याची थेट विक्री केली तर त्यात आपल्याला यश येईल अशी आशा त्यांना होती. म्हणून त्यांनी पुण्यात किरकोळ आंबा विक्री सुरू केली.

सुरुवातीला आंबा खराब होणे, फळावर काळे डाग पडणे या समस्येने त्यांना सतावले. परंतु ते नाउमेद झाले नाहीत. त्यांनी देवगडच्या आंबा खरेदी विक्री संघातून आंबा पिकविण्याचे प्रशिक्षण घेतले. तेथील कर्मचारी राजेंद्र शेटे यांनी आंबा पिकविण्यातील बारकावे त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर आंबा पिकविण्यातील समस्या दूर झाल्या.

नंतर चव्हाण पुणे, मुंबई येथील आंबा महोत्सवात सहभागी झाले. या महोत्सवात अनेक ग्राहकांशी ओळख झाली. यातून मोठ्या प्रमाणात आंबा विक्री होऊन त्यांना अधिकचा नफादेखील झाला. याचवेळी त्यांच्या लक्षात आले, जर थेट ग्राहकाशी संपर्क ठेवला, त्याला आंब्याची खात्री दिली तर कायमस्वरूपी ग्राहक मिळेल आणि आपसूक फायदा होईल. त्यामुळे त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने थेट ग्राहक ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर यांसह विविध शहरातील ग्राहक निश्‍चित करून त्यांना ते थेट आंबा पाठवितात. ग्राहकांकडून आंब्याबद्दलचा अभिप्राय घेतात. क्वचित प्रसंगी आंबा खराब निघाला, तर त्या ग्राहकाला बदली आंबा दिला जातो. त्यामुळे ग्राहकांमध्ये चव्हाण यांनी विश्वास निर्माण केला आहे. त्या विश्वासाच्या जोरावर २००२पासून ते आंब्यांची थेट विक्री करीत आहेत. थेट विक्रीमुळे दलालांकडून होणाऱ्या विक्रीपेक्षा तिप्पट फायदा त्यांना होत आहे. विशेष म्हणजे १९ वर्षांपूर्वीचे त्यांचे ग्राहक आजही कायम आहेत. ग्राहकांमध्ये वर्षागणिक वाढच होताना दिसत आहे. चव्हाण सोशल मीडियाचादेखील वापर करतात. प्रत्येक सणासुदीला ते आपल्या ग्राहकांशी संवाद साधतात. त्यानंतर आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वी ते पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना आपल्या बागेतील आंबा कधी विक्रीयोग्य होईल याची माहिती देतात. ग्राहकांशी आपुलकीचा संवाद हेच त्यांच्या थेट विक्री व्यवसायाचे भांडवल आहे.

संबंधित बातम्या