आंब्याचे अर्थकारण नव्या वळणावर!

राजेश कळंबटे,रत्नागिरी
सोमवार, 10 मे 2021

आंबा विशेष

रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचे अर्थकारण मासेमारीसह आंब्यावरच अवलंबून आहे. आंब्याचा दर आंबा पिकविणारा ठरवत नाही. ते मोठ्या आंबा विक्रेत्यांच्या हाती. वाशी फळबाजारात आंबा पाठवायचा हा परवलीचा शब्द. मात्र कोरोनाच्या संकटाने ह्या परिस्थितीत काही बदल दिसतो आहे. उत्पादकही वेगळा विचार करू लागल्याने विक्रीतंत्रात बदल दिसू लागला. उत्पादक थेट ग्राहकांपर्यंत पोचू लागला. पुण्या-मुंबईसारख्या शहरांत सोसायट्यांपर्यंत पोचण्याचा मार्ग सुकर झाला आणि त्याला शासनाचेही पाठबळ मिळू लागले. यामुळे आंब्याचे अर्थकारण आता एका नव्या वळणावर येऊन उभे आहे.

हापूस फळांचा राजा खरा; पण हापूसचा बाजारभाव त्याच्या मालकाला ठरवता येत नाही. हापूसचा दर वाशीसारख्या मोठ्या बाजारातील बड्या आंबा व्यावसायिकांच्या हाती. वर्षानुवर्षे हीच पध्दत. नव्वद सालानंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत हापूस लागवडीला चालना मिळाली. आंब्याचे अर्थकारण भक्कम कसे होईल यावर आंबा उत्पादकांची नवी पिढी गेल्या काही वर्षांपासून विचार करू लागली होतीच. त्याला कोरोनातील परिस्थिती इष्टापत्ती ठरून अधिक चालना मिळाली आणि आंबा विक्रीसाठी आता आणखी एक दार किलकिले होताना दिसते आहे.

गावातून आंब्याच्या पेट्या मुंबई मार्केटला पाठवायच्या. हंगाम संपला की झालेल्या पेट्यांचा हिशोब करून पट्टी (बिल) बागाइतदारांना यायची. दर किती मिळाला हे बागाइतदाराला सगळा हिशोब झाला की हंगामाच्या शेवटी कळायचे. ही परिस्थिती बदलून आपण थेट विक्री करू शकतो, लगेच पैसा हाती येतो (पेटी विक्रीनंतर अगदी दहा मिनिटांत ‘गुगल पे’ने पैसे जमा होतात..) हे कळल्यावर बागाइतदारांच्या विक्री तंत्रात काहीसा बदल दिसू लागला आहे. वातावरणातले अनियमित बदल. अवकाळी पाऊस, थंडीचा वाढता कडाका आणि मधेच कमाल तापमानाची उच्चांकी नोंद हे सारे फळांच्या राजाला सोसत नाही. त्यामुळे दरवर्षी उत्पादनात घट होतेय. तरीही हाती आलेल्या उत्पादनाची विक्री वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकते आणि ती करणे आवश्यक आहे हे कोरोना परिस्थितीने शिकवले.

स्वतःची वेबसाइट बनवून त्याद्वारे मार्केटिंग करण्याचा प्रयत्न रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील संतोष आठवले यांनी सात वर्षांपूर्वी केला होता. वेगळ्या मार्केटिंग तंत्राची ती चाहूल होती. ग्राहकांपर्यंत थेट पोचण्याचा तो प्रयत्न होता. ह्या बदलाला गतवर्षीच्या कोरोना परिस्थितीने वेग दिला. मार्च २०२०मध्ये कोरोनामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातील शंभर टक्के व्यवहार थांबले होते. घरातून बाहेर पडायला मिळत नव्हते. ही परिस्थिती ऐन आंबा हंगामाच्या तोंडावर निर्माण झाली होती. झाडावर फळे लागलेली होती, पण ग्राहकांपर्यंत पोचवायची कशी हा मोठा प्रश्‍न होता. मात्र आंबा बागाइतदारांसाठी ही इष्टापत्ती ठरली. अहमदाबाद, सुरत, पुण्यासह सर्वात मोठा फळबाजार असलेल्या वाशीतील व्यवहार अनियमित होते. या परिस्थितीत आंबा बागाइतदारांनी खासगी विक्रीचा पर्याय निवडला. त्याला कृषी व पणन विभागाचे बागाइतदारांना मोठे सहकार्य मिळाले. 

विक्रीचा विचार करता कोकणातला सर्वाधिक आंबा मुंबई, पुण्यामध्ये विकला जातो. त्यानंतर तो कोल्हापूर, नाशिक, गुजरातकडे पाठविला जातो. जिल्हा बंदीमुळे आंबा पाठवण्याचाच प्रश्‍न होता. शेतमाल वाहतुकीवरील बंदी शासनाने उठवल्याने त्याचा फायदा आंबा बागाइतदारांना झाला. मेट्रो सिटीमधील अनेक छोट्या व्यावसायिकांसह नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांचे सहकार्य घेत वैयक्तिक संपर्क वाढीवर भर दिला. यामध्ये व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मदत झाली. त्यासाठी मोठ्या शहरात शेकड्यांनी रहिवासी असलेल्या सोसायट्यांच्या दारात आंबा पोचवण्याची हमी घ्यावी लागली. वाहतूक व्यावसायिकांनी भाड्यात थोडी वाढ करून बागाइतदार आणि ग्राहकांची ही गरज पूर्ण केली. हे अंगवळणी पडायला थोडा वेळ लागला. मात्र गेल्या मे महिन्यात आंबा विक्रीचा हा नवा पर्याय बागाइतदारांबरोबरच आंबाप्रेमींच्याही पचनी पडू लागल्याचे दिसून आले. शेतकरी ते ग्राहक अशी थेट साखळी निर्माण करण्यासाठी केंद्राने केलेल्या कायद्याचा बागाइतदारांना या आधी फारसा फायदा उठवता आला नव्हता, पण कोरोना आपत्तीत परिस्थितीवशात त्या कायद्याची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी झाली. हंगामाच्या किंवा महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या पट्टीऐवजी मालाचे पैसे बागाइतदाराला ग्राहकांकडून थेट बँक खात्यात जमा होत गेले. दर्जेदार रत्नागिरी हापूस ग्राहकाला त्याच्या दारात मिळाला. त्याचा विश्‍वास वाढला. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात दिसून आलेल्या ह्या विक्री पर्यायातून कोकणातल्या आंबा बागाइतदारांनी मुंबई, पुण्यासह धुळे, नाशिक, नागपूरमध्येही स्वतःचे मार्केटिंगचे जाळे निर्माण केले. नवीन बाजारपेठा विकसित होत गेल्या.

आंबा उत्पादकाला विक्रीसाठी आणखी एक दार उघडून देणारी ही सध्या तशी बाल्यावस्थेतच असलेली विक्री यंत्रणा; आंबा विक्रीच्या पारंपरिक पद्धती, मोठ्या बाजारपेठा, देशा-परदेशातल्या व्यापारासाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणांची घडी बसलेल्या तेथील व्यापार पद्धती या सगळ्याला पर्याय ठरेल, असे म्हणणे कदाचित धाडसाचे ठरेल, पण यामुळे कोकणच्या राजाचे अर्थकारण एका नव्या वळणावर आले आहे, हे मात्र नक्की!

कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी कोरोना इष्टापत्ती ठरल्याचा दाखला देत विक्रीचा हा पर्याय अनेक बागाइतदारांनी यंदाही राबविल्याचे सांगितले. यंदाही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली, तरीही आंबा बागाइतदार डगमगलेला नाही. येणाऱ्या अडचणीतून मार्गक्रमण करतोय याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यापूर्वी परजिल्ह्यातील व्यावसायिक नवी मुंबईतील फळबाजारातून हापूस खरेदी करून आपल्या जिल्ह्यात जात होते. पण बदलत्या परिस्थितीत यंदा तेच व्यावसायिक रत्नागिरीत शेतकऱ्यांच्या बागेत येत आहेत. शेतकऱ्याला जागेवर पैसे देत आहेत. यामुळे व्यावसायिक आणि उत्पादक या दोघांवरचेही दलालांचे वर्चस्व काही प्रमाणात कमी झाले, आणि दोघांच्याही हातात चार पैसे अधिक आले.

मोठ्या शहरात व्रिक्रीची स्वतःची साखळी

रत्नागिरीतील तरुण आंबा बागाइतदार प्रसन्न पेठे यांनी पुण्याच्या विविध भागांमध्ये आंबा विक्रीची यंत्रणा निर्माण केली. हजार फ्लॅटमागे एक याप्रमाणे प्रतिनिधी तयार करून त्यांना हापूस थेट ग्राहकाच्या घरात दिला. एखाद्या ग्राहकाकडून आंबा खराब झाल्याची तक्रार आलीच तर फळे बदलून देण्यासाठी त्यांनी या साखळीतल्या छोट्या व्यावसायिकांना पाच टक्के जादा आंबा दिला. विश्वासार्हतावाढीसाठी याचा उपयोग झाला. मोठ्या शहरातील काही तरुणांनी गावाकडील शेतकऱ्यांकडून आंबा मागवून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांकडील आंबा वाशी बाजारात, तिथून दलालांमार्फत छोट्या व्यावसायिकांकडे अशी साखळी होती. आता त्यात थोडा बदल झाला आहे. याचा दूरगामी परिणाम होणार आहे. यंदा वाशी मार्केटमधील मागणीत वीस टक्के घट झाली. याला तेथील व्यापारीही दुजोरा देतात. यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे मुळातच आवक कमी आहे. त्यात थेट विक्रीचा परिणाम होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता वाशीतील व्यापारीही उत्पादकांच्या बागेपर्यंत पोचले आहे. 

मात्र या नव्या विक्री तंत्राचे फायदे दिसत असले तरी पारंपरिक विक्री यंत्रणा आणि नवे तंत्र या दोन्हींची योग्य सांगड घालण्याचा सल्ला अनुभवी बागाइतदार देतात. विक्रीच्या पारंपरिक यंत्रणांची गरज राहणार किंबहुना ती साखळी पूर्णतः खंडित करून चालणार नाही, ते शहाणपणाचेही नाही, याकडे ते लक्ष वेधतात. आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यास थेट विक्री पद्धतीने साखळी निर्माण करून तो माल संपवणे अशक्य आहे. अशावेळी बाजार समित्यांमधल्या मोठ्या व्यापाऱ्यांची मदत आवश्यकच असणार आहे. आधी मुंबई, पुण्यात तेथून दूरवर किंवा परदेशात आंबा पाठवायचा असेल तर त्यासाठी मोठ्या व्यापाऱ्यांचीच मदत होणार. शिवाय मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन जमा करून ते विकण्याची क्षमता त्या व्यापाऱ्यांमध्येच असते. थेट विक्री करण्याला मर्यादा आहेत. परंतु त्याचे प्रमाण वाढत गेले की आंब्याचा दर निश्‍चित करण्यात उत्पादकालाही स्थान राहील, असा विचार बागाइतदार मांडतात. हा बदल बदलत्या विक्री तंत्राइतकाच महत्त्वाचा ठरेल. कारण आंबा उत्पादकाच्या अधिक पैसा खुळखुळेल.

भौगोलिक निर्देशांकाने हापूस ‘ब्रॅण्ड’
दोन वर्षांपूर्वी हापूस या नावाने कोकणातील पाच जिल्ह्यातील आंब्याला ‘जीआय’ मानांकन (भौगोलिक निर्देशांक) मिळाले. कोकण कृषी विद्यापीठासह आंबा उत्पादक सहकारी संस्था, केळशी आणि देवगड संघाच्या सहकार्याने २०१८ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंच्या पाठपुराव्याला यश आले. ‘जीआय’चे काम आता वेगाने सुरू झाले आहे. हापूसचा ब्रॅण्ड घराघरात पोचवण्यासाठी विक्री तंत्राचा हा आणखी एक वेगळा पैलू ठरेल. आतापर्यंत आठशेहून अधिक आंबा उत्पादक, प्रक्रियादार, व्यावसायिकांनी ‘जीआय’ घेतलाय. बाजारपेठेत हापूसचा ब्रॅण्ड विकसित करतानाच भेसळ रोखण्यासाठी हा पायलट प्रकल्प आशादायी आहे. यामध्ये प्रत्येक बागाइतदाराला ‘क्यूआर कोड’ देण्यात येणार आहे. तो स्कॅन केला की त्या फळाची सविस्तर माहिती वेबसाइटवर मिळेल. यामधून ग्राहकालाही हा हापूसच आहे हे समजू शकेल. आपल्याला मिळालेला हापूस कोणत्या शेतकऱ्याच्या बागेतून आलाय, त्याचे ‘जीआय’ सर्टिफिकेट आहे का, फळातील न्यूट्रियन्ट कोणती यासह विविध माहिती मिळणार आहे. या ‘क्यूआर कोड’चा स्टीकर प्रत्येक फळावर लावला जाईल. यंदा एक लाख स्टिकर तयार करून प्रायोगिक तत्त्वावर दहा शेतकऱ्यांना दिले आहेत. या माध्यमातून अस्सल हापूस निवडणे शक्य होणार आहे.

कृषी, पणनने दिला हात
याआधी शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी मोठ्या शहरातून कृषी, पणनच्या साह्याने आंबा महोत्सव झाले. तेथेही शेतकऱ्यांना फायदा झाला होता. दर्जेदार आंबा या महोत्सवांचे वैशिष्ट्य होते. महाराष्ट्रात सोलापूर, लातूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, पंढरपूर, अहमदनगर, मंचर आदी ठिकाणांसह परराज्यात मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थानमध्येही शेतकऱ्यांने आपला आंबा विकला. आता त्यापुढील पायरी म्हणून खरेदीदार आणि विक्रेते यांची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. शंभर डझनापासून पुढे कितीही मागणी याद्वारे करता येणार आहे.

विद्यापीठाची जबाबदारी
तुडतुडा, बुरशीजन्य रोग, लाल कोळी यासह फळांवर निर्माण होणारे डाग, साका निमूर्लन यांसारख्या अडचणी बागाइतदारांना येतात. सध्या दिवसादिवसाला वातावरणात बदल घडतात. त्याचे परिणाम आंबा उत्पादन व त्याच्या दर्जावर होतात. पर्यायाने आंब्याला कमी दर मिळतो. त्यातून सावरण्यासाठी बागाइतदारांना कोकण कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन झाले की या अर्थकारणाला विद्यापीठाचा आणखी मोठ्या प्रमाणावर हातभार लागेल.

बागाइतदारही निर्यातदार
बागाइतदार निर्यातदार व्हावा यासाठी शासनाने धोरण निश्‍चित केले आहे. याचसाठी वेंगुर्ले आणि रत्नागिरीत निर्यात प्रक्रिया केंद्र सुरू केली आहेत. या केंद्रात प्राथमिक प्रक्रिया करून दिल्या जात आहेत. युरोपला आवश्यक उष्णजल प्रक्रियाही रत्नागिरीत होते. बाष्पजल आणि विकीरण प्रक्रियेची व्यवस्था वाशीमध्ये केली आहे. अमेरिका, युरोपीय देश, न्यूझीलंड, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया अशा देशांमध्ये हापूसला मागणी आहे. त्याला पूरक अशी यंत्रणा उभारतानाच कोकणातील तरुण आंबा बागाइतदारांना निर्यातीविषयी मार्गदर्शन पणन विभागाकडून सुरू आहे. गतवर्षी रत्नागिरीतील तीन तरुणांनी कोरोना काळातही अमेरिकेला आंबा निर्यात केला. काही बागाइतदार स्वतःच्या पॅकहाऊसमध्ये प्रक्रिया करून मुंबईतील निर्यातदारांमार्फत हापूस थेट पाठवत आहेत आणि चांगला दरही मिळवत आहेत.

‘सेंद्रिय’ला मागणी
कल्टारसह रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांवर तयार होणाऱ्या हापूसला मोठी मागणी आहे. त्या दृष्टीने कोकणातील बागाइतदार पुढे येत आहे. कंपोस्ट, गांडूळसारख्या खतांची निर्मिती केली जात आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली खानू गावामध्ये प्रयोग केला गेला. तो यशस्वी ठरला आहे. त्याचा अवलंब अनेक बागाइतदार करत आहेत; परंतु सेंद्रिय खतांचा वापर करताना पहिली तीन वर्षे उत्पादन येत नाही. त्यामुळे हा प्रयोग करणाऱ्यांचा टक्का कमी आहे. सेंद्रिय म्हणून नेहमीपेक्षा अधिक दर देण्यास तयार असणारा एक वर्ग आहे. भविष्यात निवडक उत्पादक त्याच्यावरही लक्ष केंद्रित करतील.

पंधरा हजार बॉक्स ग्राहकाच्या दारी
गतवर्षी रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या अणसुरेतील आंबा बागाइतदार विशाल सरफरे यांनी लॉकडाउनच्या काळात थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोचवण्याचा प्रयोग यशस्वी केला. त्यांनी तीन महिन्यात पंचवीस हजार बॉक्सची विक्री केली. त्यातील पंधरा हजार बॉक्स थेट ग्राहकांपर्यंत पोचवले. उर्वरित दहा हजार बॉक्स नेहमीच्या व्यावसायिकांकडे पाठवले. ‘आत्मा’कडून मिळालेले ग्राहक आणि वैयक्तिक संपर्क याचा मेळ साधत सुरुवातीला सातारा, फलटणसह मुंबई, पुण्यात आंबा पाठविला. बागाइतदारांकडून घरपोच सेवा मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्राहकांकडून मागणी सुरू झाली. त्यांना चार डझनच्या बॉक्सला अठराशे ते दोन हजार रुपये, तर पाच डझनच्या बॉक्सला अडीच हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. ‘‘आंबा थेट ग्राहकांना घरपोच दिल्याने चांगला प्रतिसाद मिळाला. आता ग्राहकांचा डाटा तयार झाला असून भविष्यात बागाइतदार ते थेट ग्राहक अशी साखळी मजबूत होईल,’’ असे विशाल त्यांच्या या अनुभवाबद्दल सांगतात.

संबंधित बातम्या