कोकणच्या श्‍वासातला आंबा

शिवप्रसाद देसाई, सावंतवाडी
सोमवार, 10 मे 2021

आंबा विशेष

आंबा आणि कोकण यांचे नाते अतूट आहे. इथल्या संस्कृतीत, कोकणी माणसाच्या नसानसात आंबा भिनलेला आहे. कोकणच्या संस्कृतीत आंबा सामावलेला आहे. कोकण आणि आंबा यांच्या नात्यावर एक दृष्टिक्षेप...

मे  महिन्याच्या रणरणत्या उन्हात अख्खा कोकण कौलारू घरांच्या आडोशाला विसावलेला असतो. उन्हाच्या प्रचंड झळा, झळा कसल्या उष्म्याच्या लाटाच त्या. अंगाची नुसती लाही लाही होत असते. मृग कधी बरसतो याकडे कोकणी माणसाचे डोळे लागलेले असतात; पण सूर्य अगदी माथ्यावर असतानाही कोकणातल्या आमरायांमध्ये मात्र लगबग सुरू असते. तिथे फक्त कोकणच्या राजाचेच अधिराज्य असते.

देवगड, मालवणच्या किनारपट्‌टीकडे जाल, तर हापूसच्या बागांमध्ये गजबज दिसेल. सह्याद्रीच्या रांगामध्ये मात्र जरा वेगळं दृष्य दिसेल. इथे हापूस हवा तसा होत नाही. गावाबाहेर, आग ओकणाऱ्या उन्हात आपले अजस्र हिरवेगार बाहू पसरलेला एखादा रायवळ आंबा सहज दृष्टीस पडतो. क्‍वचित तो घराजवळ, नारळ-सुपारीच्या बागायतीतही मालकाच्या दोन-तीन पिढ्या पाहत ताठ मानेने उभा असतो. एप्रिल-मेमध्ये सूर्य जसा रौद्ररूप धारण करायला लागतो तसा हा रायवळ आंबाही बाळसं धरतो. आधी मोहोर, मग कैरी आणि हळूहळू पिकू लागलेल्या आंब्यांचे घोसाच्या घोस सजलेल्या नववधूच्या दागिन्यांसारखे दिसू लागतात. मग आंब्याखालचा माणसांचा राबता वाढतो. अगदी पहाटेपासून काळोख पडेपर्यंत अबालवृद्धांची आंबा शोध मोहीम सुरू असते. आंबा टपकल्याचा आवाज आला की आंब्याखाली धावणाऱ्या लहानग्यांच्या पावलांनी वाट मळून जाते. 

बरं या प्रत्येक रायवळ आंब्याची एक वेगळी ओळख असते. जसा एकसारखाच दिसणारा, असणारा दुसरा माणूस सापडणं कठीण असतं, तशी याचीही वेगवेगळी रूपं असतात; त्याच्या गुणांवरून अर्थात चव, आकार, रंग अशा कितीतरी वैशिष्ठ्यांवरून. कुठल्या आंब्याची चव गोड साखरेसारखी, तर कुणाची मिरमीरीत, कुठचा तरी आंबट, तर कुठला बहुसंख्येने पिकल्यावर काळसर लास पडणारा, कोणता गोल, तर कुठे लांबट, कुठल्या फळाला मिशांसारखे भरपूर तंतू तर कोणाला ओसंडून वाहणारा रस. कशाचं रायतं चांगलं होत तर कुठला चोखून खायला बरा. मग यावरून ‘साखर आंबा’, ‘रायत्याचा आंबा’, ‘मिशयाळा आंबा’, ‘वाटोळा’, ‘लांबट’, ‘लासा’, नदीच्या काठी आहे म्हणून ‘न्हय आंबा’ अशी कितीतरी नावे कोकणातल्या गावगावात ऐकायला मिळतात. बरं असं नाव एकदा प्रचलीत झालं की, ते तो आंबा असेपर्यंत म्हणजे तीन-चार पिढ्या टिकतं. तो आंबा मरून गेला तरी पुढच्या पिढीसाठी ती जागा त्याच आंब्याच्या नावावरून ओळखली जात असल्याचीही उदाहरणं वाड्या-वस्त्यांगणीक मिळतात.

इथे आज भेटलेल्या जिवाभावाच्या माणसांची नावं दुसऱ्या दिवशी आठवत नाहीत मग

एखाद्या झाडासाठी कोकणात इतकी ॲटॅचमेंट का.. असा प्रश्‍न कदाचित तुम्हाला

पडला असेल. याचं साधं सरळ कारण म्हणजे आंबा कोकणच्या संस्कृतीचा श्‍वास आहे. आंब्याचं गोड फळ एवढंच या जिव्हाळ्याचं एकमेव कारण नाही. आंब्याचं सर्वांगिण अस्तित्वच मुळात कोकणी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. अगदी धार्मिक रीतिरिवाजांपासून ते उदरभरणापर्यंत आम्रवृक्ष कोकणच्या जीवनशैलीत पिढ्यान्‌ पिढ्या सामावला आहे.

 

भारतीय संस्कृतीत शुभकार्यात आंब्याला महत्त्व आहेच; पण कोकणात ते विशेष आहे. इथे अस्सल मालवणीत ‘आंब्याचो टाळ कसो सगळीकडेच दिसतच’ असा एक वाक्‌प्रचार आहे. सगळीकडे संचार असलेल्या व्यक्तीसाठी हा वा‍क्‌प्रचार वापरतात. यावरून आंब्याचा सर्वत्र असलेला संचार लक्षात यावा. नव्या घराचे छप्पर उभारताना, सणासुदीला, शुभकार्याच्या वेळी सगळ्यात आधी आंब्याचा टाळ अर्थात फांद्या छपराला बांधून कार्याची सुरुवात होते. पूजेत, कलश पूजनावेळी कलशावर, दसऱ्याला फुलांची माळ बनवताना आंब्याची पाने लागतातच.  ही प्रथा महाराष्ट्रात अन्य बऱ्याच भागातही पाहायला मिळते. 

कोकणात घरात लग्नकार्य असेल तर मुख्य दरवाजाच्या बाजूला मुहूर्तमेढ रोवण्याची प्रथा आहे. आंब्याची सरळ, लांबलचक फांदी उभी करून बांधली जाते. यानंतर घरात खऱ्या अर्थाने शुभकार्य सुरू होतं. याचं कारण जुन्या संस्कृतीत, लोकजीवनात दडलेलं आहे. पूर्वी आतासारखी साउंड सिस्टीम, बॅन्डबाजा, रोषणाईची सोय नसायची. मग त्या घरात शुभकार्य होतंय किंवा झालंय हे समजण्याचे चिन्ह म्हणून ही मुहूर्तमेढ असायची. पुढचे बरेच दिवस ही आंब्याची काठी त्या घराची शोभा वाढवायची.

गणेशोत्सव हा कोकणातला मुख्य सण हे वेगळं सांगायला नको. यातही आंब्याला मानाचं म्हणजे गणपतीच्या मूर्तीच्या डोक्‍यावर छत्र धरण्याचं काम असतं. गणेशमूर्ती जिथे पूजेला बसवली जाते त्याच्या वर ‘माटवी’ बांधण्याची पध्दत कोकणात आहे. माटवी म्हणजे लाकडाच्या रिपांच्या मदतीने केलेली एक चौकट असते. तिला रानफुले, फळे, वनस्पती बांधून सजवले जाते; पण जिथे मूर्ती असते त्याच्या बरोबर वरच्या भागात माटवीला आंब्याच्या हिरव्यागार फांद्या म्हणजे टाळ बांधले जातात. या आणि अशा किती तरी धार्मिक कार्यात आंब्याचे अस्तित्व असतेच. बर या फांद्या, काठ्या कलम केलेल्या नाही तर रायवळ आंब्याच्याच लागतात.

हापूसशिवाय कोकणचं आंबा विश्‍व अपुरं आहे. पण हापूस जाणून घेण्याआधी इथे

आंब्याची कलमं कधीपासून तयार व्हायला लागली हे समजून घ्यायला हवे. इथे

प्रामुख्याने हापूसबरोबरच ‘माणकूर’, ‘गोवा माणकूर’, ‘फरनास’, ‘पायरी’ या कलमी आंब्यांचं अस्तित्व अनेक वर्षांपासून आहे. या जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात; मात्र याची निर्मिती रोपापासून नाही तर कलमापासून होते. यामुळे त्यांच्या गुणवैशिष्ट्यात एकसारखेपणा असतो. अलीकडे रायवळ आंब्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. उलट कलमी आंब्याचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे; पण कलम बांधण्याची ही पध्दत जुनी आहे. हापूसच्याही आधी माणकूर, गोवा माणकूर, पायरी आणि क्वचित फरनास जातीच्या आंब्याची कलमे गावोगाव दिसायची. अनेक पिढ्यांपर्यंत त्या कलमांची फळे मिळायची. कोकणात भाऊबंदकीत जमिनीची वाटणी झाली तरी ही आंबा कलमे सर्रास सामाईक ठेवली जातात. त्यांची एकत्र काढणी करून जितके भाऊ तितक्‍या वाट्यामध्ये फळे विभागून घेतली जातात. 

ही कलम करण्याची कला कोकणातल्या शेतकऱ्यांना अनेक पिढ्यांपूर्वी अवगत आहे. याबाबत अनेक वर्षे कलम बांधण्याचा अनुभव असलेले एम. के. धोंड सांगतात, ‘‘पूर्वी खुंटी कलम केले जायचे. रायवळ आंब्याला शिंगाड्याच्या अणकुचीदार शिंगाने खाच पाडून त्यात ज्याचे कलम करायचे त्या आंब्याची फांदी खोवली जायची. माती, डिंक भरून ते कलम बांधलेले असायचे. अशी तयार केलेली कलमे आजही गावोगाव पहायला मिळतात.’’

तसं पाहिलं तर हापूस कोकणात पाहुणाच. तो इथे कसा आला याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. एका संदर्भानुसार अल्फान्सो नावाच्या एका नाविकाने सगळ्यात आधी दुसऱ्या देशामधून त्या काळात कोकणाला जोडलेल्या गोव्यात हापूस आणला. हा ब्राझीलमधून आणल्याची शक्‍यता सांगितली जाते. तेथून हापूसच्या फांद्या आणल्या गेल्या. त्याचे येथील रायवळ आंब्यावर कलम करण्यात आले. पुढे त्याचा प्रसार होत गेला. हा अल्फान्सो पोर्तुगीज होता. दुसऱ्या एका थिएरीनुसार पोर्तुगीज गोव्यात आले आणि स्थिरावले. पूर्वी भारतात चोखून खाता येणाऱ्या रसदार रायवळ आंब्यांचेच अस्तित्व होते. पोर्तुगिजांना मात्र कापून खाता येतील असे आंबे हवे होते. शिवाय इथल्या आंब्यात तंतूचे म्हणजेच केसांचे प्रमाण जास्त होते. ते पोर्तुगिजांना आवडायचे नाही. त्या काळात पोर्तुगिजांना कलम करण्याची कला अवगत होती. त्यांनी आपल्याला हव्या तशा आंब्याच्या काड्या अर्थात फांद्या आणून त्याची कलम तयार केली. गोवा आणि लगतच्या कोकणात याची लागवड झाली. इथल्या वातावरणात अविट गोडीचा, आकर्षक रंगरूपाचा हापूस तयार झाला. याला ‘अल्फान्सो’ असे नाव दिले गेले. ‘अल्फान्सो दी अल्बुकर्क’ हा पोर्तुगिजांची एक प्रसिद्ध गव्हर्नर होता. त्याच्या सन्मानार्थच या नव्या आंब्याच्या जातीला ‘अल्फान्सो’ हे नाव दिले गेले असावे. त्याचा पुढे अपभ्रंश होत हापूस असे नाव प्रचलीत झाले. 

हापूस कलम बांधून तयार केला जात असला तरी वातावरणाचा याच्यावर मोठा परिणाम होतो. वातावरणानुसार त्याचा रंग, गोडी, आकार आदींमध्ये थोडाफार बदल दिसतो. यामुळेच रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस असे दोन मुख्य प्रकार प्रचलीत झाले; पण पोर्तुगिजांनी आपल्या सोईसाठी आणलेल्या हापूसचा आतापर्यंतचा फळांचा राजा म्हणून झालेला प्रवास खूपच वळणावळणांचा आहे. 

देवगड येथील आंबा व्यावसायिक माधव साटम यांनी हा प्रवास उलगडायचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेल्या संदर्भानुसार पूर्वी हापूसची आतासारखी व्यापारी तत्त्वावर लागवड झाली नव्हती. देवगड हापूसचे नाव मोठे करण्यात देवगडमधील गोगटे कुटुंबाचा मोठा वाटा आहे. देवगडमधून अनेकदा आमदार म्हणून निवडून आलेले अप्पासाहेब गोगटे आणि त्यांच्या कुटुंबाने यासाठी मेहनत घेतली. अगदी जलवाहतुकीपासून आंब्याला बाजारपेठ मिळवण्यासह पहिला आंबा ट्रान्स्पोर्ट सुरू करण्याचे श्रेय या कुटुंबाला जाते. देवगड हापूसचे लागवड क्षेत्र वाढवण्यासाठीही त्यांनी बरेच प्रयत्न केले. देवगड हापूस मुंबईच्या मार्केटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला. मागणी वाढल्यामुळे देवगडसह अख्ख्या कोकणात बागाइतदारांना ही संधी वाटू लागली. यातून हापूसचे लागवड क्षेत्र वाढत गेले. पुढे कोकण कृषी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर कलम बांधणीचे तंत्र आणि तयार कलमे बागाइतदारांच्या बांधापर्यंत पोहोचली. नव्वदीच्या दशकाच्या मध्यावर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांची फलोत्पादन योजना हापूसला आणखी बळ देणारी ठरली, असे साटम सांगतात.

असे असले तरी देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस अशी एकाच आंब्याची दोन रूप

हळूहळू ठळक होत गेली. यात श्रेष्ठ कोण हे ठरवणं कठीण आहे; मात्र या दोघांची स्वतःची अशी ओळख आहे. देवगड हापूसची साल काहीशी पातळ तर रत्नागिरीची थोडी जाड असते. रत्नागिरीचा रंग पिवळसर तर देवगडचा केशरी असतो. दोघांच्या वासातही फरक असतो. देवगड हापूस थोडा गोलसर, तर रत्नागिरी थोडा लांबट असतो. खरा खवय्या हे फळ बघूनच ओळखतो. आता तर आता या दोन्हींनाही ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. हापूसचे हे गुणधर्म शास्त्रीयदृष्ट्या समजावताना आंबा अभ्यासक डॉ. विजय दामोधर सांगतात, ‘हापूस’मध्ये जास्त म्हणजे तब्बल ४२ गुणसूत्रे असतात. त्यात मेल-फिमेल गुणसूत्रे नैसर्गिकरीत्या एकत्र येताना कोणती गुणसूत्रे कुठे जातील हे सांगता येत नाही. त्यामुळे आंब्याची बाटी रुजवली तर त्या झाडापासून हापूसचे परिपूर्ण गुणधर्म असलेले झाड तयार होत नाही. त्यासाठी कलमच करावे लागते. हापूस हे संवेदनशील पीक आहे. वातावरणाचा, जमिनीचा आणि इतर अनेक घटकांचा त्याच्या रंगरूपावर, वासावर, उत्पन्नावर परिणाम होतो. यामुळेच रत्नागिरीपेक्षा देवगडकडचा हापूस अधिक केशरी असतो. हा कातळावर पिकत असल्याने याची गोडीही अधिक असल्याचा दावा शेतकरी करतात.’ एकुणातच कोकण आणि आंबा हे एक अद्वैत आहे. अनेक पिढ्यांपासून हे नातं जोडलं गेलं आहे. हापूस हा यातला  महत्त्वाचा घटक असला तरी तो या कुटुंबातला सगळ्यात तरुण सदस्य  आहे. हापूसच्या आधीही कित्येक पिढ्या आंब्याचे कोकणवासीयांच्या मनात अढळ असे स्थान तयार झाले आहे आणि पुढच्या कित्येक पिढ्या ते तसंच अढळ राहणारही आहे.

वर्षभराचा गोडवा 
आंब्याचे खाद्यसंस्कृतीतील महत्त्वही मोठे आहे. अगदी वर्षभर आंबा कोकणी माणसाच्या ताटात असतो. आंब्याचे लोणचे, साठ, आंब्याचा मावा इत्यादी पदार्थ करून वर्षभर आंबा टिकवला जातो. कोवळ्या कैऱ्या मिठात मुरवून ठेवून, कैरीच्या फोडी सुकवून लोणची करण्यात, आंबा किसून आमचूर करण्यात कोकणी कुटुंबाचा अाख्खा उन्हाळा जातो. आंब्याशी संबंधित आमरसासह कितीतरी रेसिपी कोकणातल्या गावागावात, पिढ्यान्‌पिढ्या जिभेवर साखरपेरणी करत आल्या आहेत.

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ 
हापूस व इतर कलमाच्या आंब्याच्या लागवडीमुळे रायवळ आंब्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. बागायती, इतर झाडांची लागवड, इमारती, जळाऊ लाकूड यासाठी आंब्याची मोठ्या प्रमाणात तोड झाली आहे. आंब्याच्या पेट्या तयार करण्यासाठीही प्रामुख्याने आंब्याचेच लाकूड वापरतात. यामुळे रायवळ आपल्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे.

आंब्यावरचे संशोधन 
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आंब्यासंदर्भात खूप मोठे संशोधन केले आहे. हापूसबरोबरच ‘रत्ना’, ‘सिंधु’, ‘कोकण रुची, ‘केसर’, ‘पायरी’, ‘निलम’, ‘आंब्रपाली’, ‘गोवा माणकूर’ अशा आंब्याच्या जातींच्या प्रसारासाठी अनेक वर्षे काम केले जात आहे. विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रात जवळपास साडेतीनशे प्रकारच्या आंब्यांच्या जातीचे संवर्धन केलेले दिसते. यात काही परदेशी जातींचाही समावेश आहे.

लाईफटाईम गिफ्ट 
कोकणातील बहुसंख्य भागात अनेक पिढ्यांपासून लग्न होऊन जाणाऱ्या मुलीला झाड भेट म्हणून देण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी नारळाचे झाड दिले जाते. बरेच वेळा आंब्याचे झाड देतात. बरं हे झाड म्हणजे रोप नसते. आपल्या बागेतील सगळ्यात चांगले झाड त्या माहेरवाशिणीच्या नावाने तिचे वडील देतात. त्याची फळे काढून तिलाच दिली जातात. शक्‍यतो आंबा, नारळ अशी दोन-तीन पिढ्या जगणारी झाडे देतात. आपल्या वडिलांनी मुलींसाठी एक वेगळी बाग दिली आहे, असं बागाइतदार माधव साटम सांगतात. 

भारतात आंब्यामध्ये गोडीला महत्त्व दिले जाते. परदेशात मात्र फार गोड फळ चालत नाही. यामुळे ‘केंट’, ‘टॉमी ॲटकिन्स’, ‘कीट’ अशा जातींना निर्यातीमध्ये महत्त्व आहे. असे असूनही हापूस परदेशी मार्केटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करून आहे. अगदी प्रक्रियेमध्येही हापूसचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो. याची अनेक वैशिष्ट्ये आहे. कोकणातील अनुकूल वातावरणामुळे तो अधिक श्रेष्ठ बनतो.
- डॉ. विजय दामोधर,  प्रभारी अधिकारी, 
   आंबा संशोधन उपक्रेंद्र, रामेश्‍वर-देवगड

संबंधित बातम्या