वेगळेपण जपणारे पदार्थ

सोलापूर विशेष
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मराठी खाद्यसंस्कृती
सोलापूर म्हटले, की शेंगदाण्याची चटणी आठवते. खरपूस भाजलेले दाणे हे त्याचे खास वैशिष्ट्य, पण त्या पलीकडेही सोलापूरचे खास वैशिष्ट्य आहे. या खाद्यसंस्कृतीवर कर्नाटकचाही प्रभाव आहे. अशा आगळ्या पाककृती...

बिनपाण्याची वांगी
साहित्य : सहा ६ वांगी, २ कांदे, अर्धा चमचा तिखट, काळा मसाला, गूळ, मीठ आवश्‍यकतेनुसार, ३ चमचे शेंगदाण्याचा कूट, जिरे, मोहरी, हळद असे सर्व फोडणीचे साहित्य. 
कृती : प्रथम कांदे व वांगी स्वच्छ धुऊन पुसून घ्यावीत. कढईत तेल गरम करून फोडणीत कांद्याच्या उभ्या चकत्या कापून परतून घ्याव्यात. त्यानंतर वांग्याच्या कापलेल्या उभ्या चकत्या त्यात टाकून मंद आचेवर परतून घ्याव्यात. कांद्याचा रंग लालसर होत आल्यावर मीठ, काळे तिखट, तांबडे तिखट टाकून परतत राहावे. त्यानंतर कढईवर झाकण ठेवून त्यावर एकच वाटी पाणी टाकावे. भाजीमध्ये एक थेंबही पाणी टाकायचे नाही. वांगी मऊ होत आली, की नंतर झाकण काढून शेंगदाण्याचा कूट मिसळावा. वरून कोथिंबीर पेरून भाजी सर्व्ह करावी. 

प्रेषिता चपळगावकर, सोलापूर


पंढरपुरी पेंडपाला 
साहित्य : तूर, मूग, मसूर डाळ, मोहरी, जिरे, तीळ, खोबरे, शेंगदाणे, चिंच, काळा मसाला, तेल, कढीपाला, मीठ, गूळ, चालत असल्यास लसूण. 
कृती : सर्व डाळी, अर्धा चमचा मेथ्या घालून व थोडेसे तेल घालून एकत्र शिजवून घ्याव्या. कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग कढीपाला घालावा. मग चिंचेचा कोळ घालून खोबरे-तीळ-शेंगदाणे कूट-गूळ, काळा मसाला, मीठ घालावे. शिजवलेल्या डाळी मिक्‍सरमध्ये फिरवून घ्याव्या. मग फोडणीत मिसळाव्या. आधी थोडे पाणी जास्त घालावे म्हणजे चांगली उकळी आली, की आपोआपच दाटपणा येतो. शिजत आले की वरून अर्धी वाटी तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. ताटात पोळी छान कुस्करून घ्यावी. वरून पेंडपाला घालावा व भरपूर तूप घालून खावे.

विष्णूप्रिया वाडेकर, पंढरपूर


सोयाबीनच्या हेल्दी वड्या 
तीन जणांसाठी एक प्लेट सोयाबीनच्या वड्या तयार करण्यासाठी चाळीस मिनिटांचा वेळ लागतो. सोयाबीन हे शरीरासाठी चांगले कडधान्य आहे. परंतु ते दैनंदिन जीवनामध्ये कमी प्रमाणात वापरले जाते. शरीरातील लोह वाढविण्यासाठी सोयाबीन महत्त्वाचे आहे. तसेच चटपटीत, कमी तेलाचा पदार्थ असल्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. 

साहित्य : पाव किलो सोयाबीन, १ एक चमचा हळद, १ चमचा तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, १ चमचा मीठ, २ चमचे आले, लसूण, कोथिंबीर पेस्ट. सोयाबीनमध्ये बसेल एवढे साधारण २ वाटी बेसन पीठ, २ चमचे तांदुळाचे पीठ, १ चमचा कणीक, २ दोन चमचे कॉर्नफ्लोअर, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ, जिरे, धणेपूड आणि मसाला. 
कृती : प्रथम सोयाबीनच्या बिया रात्री भिजत ठेवाव्यात. सकाळी सोयाबीन कुकरमध्ये उकडून घ्यावेत. मिक्‍सरमधून सोयाबीन बारीक वाटून घ्यावे. वाटलेल्या भागात वरील साहित्य मिक्‍स करून घ्यावे. चांगले मळून घ्यावे. त्याला तेलाचा हात लावून रोल बांधून चाळणीत वाफवून घ्यावे. चांगली वाफ आल्यानंतर, रोल थंड झाल्यावर चाकूला थोडे तेल लावून वड्या पातळ कापाव्यात. त्या वड्या कढईत टाकून तेलात मध्यम आचेवर तांबूस रंगावर तळून काढाव्यात. वरून चाट मसाला पसरावा. अगदी कुरकुरीत, चटकदार आणि खुसखुशीत सोयाबीनच्या हेल्दी वड्या तयार होतात. अशा प्रकारे कोणत्याही कडधान्याच्या वड्या आपण करू शकतो. कमी तेल लागते. चवही छान लागते.

अंजली शेंडगे, सोलापूर


मक्‍याच्या दाण्याचे उपीट 
साहित्य : दोन वाट्या मक्‍याचे दाणे, १ कांदा बारीक चिरलेला, २ लहान चमचे ओले खोबरे (किसलेले), फोडणीसाठी तेल, मोहरी, मीठ, हळद, तिखट चवीनुसार, थोडा चॅट मसाला/मॅगी मसाला, कोथिंबीर बारीक चिरलेली, लिंबू, १ टोमॅटो आवश्‍यकतेनुसार. 
कृती : प्रथम मक्‍याचे दाणे धुऊन ते मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावेत. थोडे जाडे भरडे ठेवावेत. नंतर कढईत तेल गरम करून त्याला मोहरीची फोडणी घालावी. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावे. नंतर त्यात मक्‍याचे दाणे, खोबरे, मीठ, हळद, तिखट घालून एकजीव करावे. वरून थोडा चॅट मसाला भुरभुरावा आणि गॅस बंद करून २ मिनिटे झाकून ठेवावे. सोबत हवे असल्यास लिंबाची फोड व टोमॅटोचे काप करून सजवावे. कोथिंबीर पेरून गरमागरम सर्व्ह करावे. रोजच्या नाश्‍त्यामध्ये हा थोडा बदल होऊ शकतो.

स्वाती इंगळे-भोसले, सोलापूर


धपाटे 
साहित्य : दोन वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, १ चमचा जिरे, १ चमचा ओवा, मीठ, हळद, कोथिंबीर, १ चमचा हिरवी मिरची पेस्ट, १ चमचा तीळ. 
कृती : परातीमध्ये गहू, ज्वारी, बेसन पीठ एकत्रित करावे. ओवा, जिरे वाटून घालावे, हिरवी मिरची पेस्ट घालावी. तीळ, मीठ, हळद चवीप्रमाणे घालावे. हे सर्व पीठ पाणी घालून मळून घ्यावे. गोळे करून चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटावे व तव्यावर तेल टाकून भाजून घ्यावे. खमंग धपाटे तयार.

वैशाली शहापुरे, सोलापूर


खिमा उंडे 
साहित्य : एक किलो खिमा, फुटाणे दाळ, काळे तिखट, तेल, मीठ. 
कृती : आधी खिमा धुऊन घ्यावा. त्यानंतर मिस्करमध्ये बारीक करावा. त्यानंतर फुटाण्याची दाळ बारीक करून घ्यावी. खिमा आणि दाळ एकजीव करून घ्यावे. त्यामुळे खिमा उंडे तळताना ते फुटत नाहीत. हे उंडे मसाल्यात एकत्र करावेत. त्यानंतर तेलात परतावे. सुके उंडे हवे असल्यास तेलाचे प्रमाण कमी ठेवावे. उंड्याबरोबर शेरवा (रस्सा) हवा असल्यास गरजेनुसार गरम मसाला व तिखटाचा वापर करावा. घरातील सदस्यांची संख्या पाहून शेरव्याचा अंदाज घ्यावा. तळलेले खिमा उंडे आणि शेरवा स्वतंत्रपणे खाण्याचा आनंद घ्यावा.

संगीता अशोक कटके, सोलापूर


सोलापुरी दालचा 
साहित्य : शंभर ग्रॅम मटण, ५० ग्रॅम तूर डाळ, ३० ग्रॅम कांदा लांब काप कापलेले, अर्धा लहान बारीक टोमॅटो, ३० ग्रॅम भोपळा, अर्धा टेबल स्पून आले पेस्ट, अर्धा टेबल स्पून लसूण पेस्ट, हिरवी मिरची बारीक चिरलेली, १० ग्रॅम दालचा मसाला, १ चिमूट हळद, १ टेबल स्पून चिंचेची पेस्ट, २ टेबल स्पून तेल, ३ कप पाणी, चवीनुसार मीठ. 
कृती : तूर डाळीला हळद लावून १ कप पाण्यात शिजायला ठेवावी. कुकरमध्ये ३ शिट्या द्याव्या. कढईमध्ये गरम तेलात कांदा गुलाबी होण्यापर्यंत परतून घ्यावा. आले आणि लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून १ मिनीट परतून घ्यावे. टोमॅटो, मटण, मीठ आणि  दालचा मसाला घालून १ मिनीट परतून घ्यावे. शिल्लक पाणी घालून थोड्या वेळाने मिश्रण हलवून झाकून शिजायला ठेवावे. शिजलेली डाळ आणि भोपळा घालावा. चिंचेची पेस्ट चवीनुसार घालून मिश्रण मंद आचेवर ठेवावे.

हीना शेख, सोलापूर


मुगाच्या डाळीचा हलवा 
साहित्य : दोन वाट्या मुगाची डाळ, पाऊण वाटी साजूक तूप, ३ वाट्या साईसकट दूध, २ वाट्या साखर, ४-५ वेलदोडे पूड, २ चमचे बेदाणे, २ चमचे काजूचे पातळ काप, २ चमचे चारोळ्या, १ चिमूट मीठ (हवे असल्यास). 
कृती : मुगाची डाळ धुऊन सावलीत सुकवावी. नंतर त्याचा रवा काढावा. पंधरा मिनिटे हा रवा भाजल्यावर खमंग वास येईल; रवा बदामी रंगावर आला की त्यात गरम दूध घालून ढवळावे व रवा चांगला फुलू द्यावा. रवा शिजला की त्यात साखर, मीठ, बेदाणे, काजूचे काप घालून पुन्हा हलवावे. झाकण ठेवून एक वाफ आणावी. बुडाला करपणार नाही याची काळजी घ्यावी. मिश्रण आळायला लागले, की खाली उतरवावे व नंतर वेलची पूड मिसळावी. त्यात थोडा खवा तुपावर भाजून परतून किंवा मोकळा कुस्करून घातला तरी चांगला लागतो. नेहमीच्या हलव्यापेक्षा हा प्रकार पचायला हलका व करायला सोपा आहे. स्पेशल दिवशी चमचाभर व्हॅनिला आइस्क्रीम घालूनदेखील हा हलवा करता येतो. 

मनीषा चंद्रशेखर शिवगुंडे, सोलापूर


मटण कुर्मा 
साहित्य : मटण, टोमॅटो, कोथिंबीर, आले, लसूण, लिंबू, गरम मसाले, मटण मसाला, पुदिना, तिखट, हळद, मीठ (चवीनुसार), दही (मलई) इत्यादी. 
कृती : प्रथम मटण स्वच्छ धुऊन घ्यावे. कोथिंबीर, पुदिना, टोमॅटो, आले-लसूण आणि गरम मसाला यांची मिक्‍सरमधून प्रत्येकी वेगळी बारीक पेस्ट करून घ्यावी. नंतर एका बाऊलमध्ये लिंबाचा रस काढून घेऊन ठेवावे. 
    एका मोठ्या बाऊलमध्ये मटण घेऊन त्यामध्ये वरील सर्व गरम मसाले, आले-लसूण, कोथिंबीर, पुदिना, टोमॅटो यांची पेस्ट करावी. नंतर लिंबाचा रस घालावा. चवीनुसार हळद, तिखट, मीठ टाकावे. दही घालून ते सर्व मिक्‍स करून अर्धा-एक तास ठेवावे.
    अर्ध्या/एका तासाने एका कढईमध्ये तेल टाकावे. तेल चांगले गरम झाल्यावर गरम मसाले चांगले परतून घ्यावी आणि नंतर मटणाचे मसाले लावून ठेवलेले मिश्रण घालून तेलात चांगले परतावे. मंद आचेवर हे मिश्रण/मसाला शिजवावे. आवश्‍यकतेनुसार थोडे-थोडे गरम पाणी घालावे. अर्धा ते पाऊण तासात मटण कुर्मा तयार होईल.

प्रियांका निकंबे, सोलापूर


सोलाणा वडे (हिरवे ढाळे) 
साहित्य : एक वाटी सोलाणे (हिरवे ढाळे/हरभरा), २ बटाटे, प्रत्येकी पाव वाटी मूगडाळ व हरभरा डाळ, जिरे, मीठ, हिरवी मिरची, गरजेनुसार ४-५ पाकळ्या लसूण, १ इंच आले, हळद व तेल. 
खोबऱ्याची चटणी साहित्य : ओले खोबरे, आले, लसूण, टोमॅटो, चवीनुसार हिरवी मिरची, दही, मीठ, कोशिंबीर, पुदिना, कढीपत्ता, हिंग व तेल. 
कृती : सोलाणे मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावेत. दोन्ही डाळी रात्री भिजत घालून सकाळी मिक्‍सरमधून जाडाभरडा करून घ्याव्या. बटाटे मऊ शिजवून कुस्करून घ्यावेत. जिरे, हिरवी मिरची, लसूण, आले यांची पेस्ट करावी. एका बाऊलमध्ये सोलाणे, डाळी, बटाटा एकत्र करून त्यात केलेली पेस्ट मिक्‍स करावी. त्यात मीठ, हळद घालावी. याचे बारीक वडे करून तेलात तळून घ्यावेत.
चटणी : ओले खोबरे, आले, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, दही यांचे मिश्रण मिक्‍सरमधून काढावे. गरम तेलात मोहरी, हिंग, कढीपत्ता व हळद यांची फोडणी करावी.

प्रेमलता कांबळे, सोलापूर

संबंधित बातम्या