टेक्‍नोफरन्स..

नीलांबरी जोशी 
गुरुवार, 31 जानेवारी 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
पालक, मुले, जोडीदार किंवा कोणत्याही नात्यातल्या देवाणघेवाणीमध्ये तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या उपकरणांच्या अतिवापराने जे मानसिक परिणाम होत जातात त्याला ‘टेक्‍नोफरन्स’ म्हटले जाते..

तो  तिरीमिरीत आपल्या मुलीला प्रॅममध्ये बसवतो आणि फिरायला घेऊन जातो. त्यांना रस्त्यावर नेहमीचा घोडेवाला दिसतो. त्याची चिमुरडी घोड्यावर बसायचा हट्ट धरते आणि घोडेवाला तिला चक्कर मारायला घेऊन जातो. हा समोरच्या कॉफी शॉपमध्ये जातो. तिथे टीव्हीवर फुटबॉलची मॅच चालू असते. तो तिथल्या सगळ्यांबरोबर मॅच पाहण्याची धमाल अनुभवायला लागतो. तेवढ्यात घोडेवाला एकदा, दोनदा, तीनदा येतो. दरवेळी तो ‘अजून एक चक्कर मार..’ असे सांगून मॅच पाहण्यात गुंग होतो. मॅच संपल्यावर घरी येतो. ‘मुलीला वाढवण्याच्या नादात बायको आपल्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते’ या विषयावरून सकाळी झालेल्या भांडणाबद्दल बायकोची माफी मागतो. तेवढ्यात बायको किंचाळते ‘मुलगी कुठे आहे?’ मुलगी घोडेवाल्याकडेच विसरलेली असते..! ‘शादी के साइड इफेक्‍टस’ या चित्रपटात फरहान अख्तर आणि विद्या बालन यांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखांमध्ये हा प्रसंग घडतो. 

हे झाले चित्रपटातले. पण प्रत्यक्ष आयुष्यात तुम्ही तुमच्या मुलांबरोबर खेळत असताना जर तुमचा फोन व्हायब्रेट झाला तर तुम्ही लगेच  चेक करता. आलेला मेसेज महत्त्वाचा नसला, तरीही तुम्ही व्हॉटसॲपवर काही आलेय का? फेसबुकवर काय दिसतेय? इन्स्टाग्रामवर काय नवीन पोस्ट झालेय ते पाहता. मग १० मिनिटांनी मान वर करून पाहता तेव्हा मूल दुसरे काहीतरी खेळायला लागलेले असते. अर्थात ‘समोरचे माणूस जे काही करत असेल, बोलत असेल त्याला फार महत्त्व दिले नाही तर चालते’ हा संदेश मुलाच्या अंतर्मनाने नकळत टिपलेला असतो. अशा प्रकारे पालक, मुले, जोडीदार किंवा कोणत्याही नात्यातल्या देवाणघेवाणीमध्ये तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या उपकरणांच्या अतिवापराने जे मानसिक परिणाम होत जातात त्याला ‘टेक्‍नोफरन्स’ म्हटले जाते..! सारा कोयेन या ब्रिगहॅम यंग विद्यापीठातल्या प्राध्यापिकेने ‘टेक्‍नोफरन्स’ हा शब्द प्रथम वापरला होता. 

तंत्रज्ञानावर आधारित लॅपटॉप, टॅबलेटस, स्मार्टफोन्स अशा उपकरणांमुळे साऱ्या जगातली माणसे एकमेकांच्या जवळ आली. ती सहजगत्या एकमेकांशी संवाद साधायला लागली. त्यांच्यात व्हर्च्युअल कम्युनिटीज तयार झाल्या. ‘द व्हर्च्युअल कम्युनिटीज’ याच नावाच्या पुस्तकात होवार्ड ऱ्हाईनगोल्ड याने ‘या व्हर्च्युअल जगातली माणसे एकमेकांपाशी आनंद व्यक्त करतात, वाद घालतात, बौद्धिक चर्चा करतात, आर्थिक व्यवहार करतात, गेम्स खेळतात, माहितीची देवाणघेवाण करतात, एकमेकांना भावनिक मदत करतात, एखाद्या संकल्पनेवर ब्रेनस्टॉर्मिंग करतात, गॉसिपिंग करतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात, मित्र मिळवतात आणि गमावतात. थोडक्‍यात वास्तव जगात होणारी माणसांमधली देवाणघेवाण या जगातही घडते’ हे सविस्तरपणे मांडले होते. व्हर्च्युअल कम्युनिटीजमुळे काहीवेळा आपले शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आयुष्य जास्त अर्थपूर्ण आहे असे वाटते. पण त्यामुळे त्यावरचे आपले अवलंबित्वही वाढत जाते. त्याचे व्यसन लागायलाही वेळ लागत नाही. या ‘टेक्‍नोफरन्स’ जोडप्यांमधल्या आणि पालक-मुले यांच्यातल्या नात्यांवर सर्वांत जास्त परिणाम होतो. 

यापैकी जोडप्यांवर काय परिणाम होतात या प्रश्‍नाकडे अनेक मानसशास्त्रज्ञ, संशोधक आणि समाजशास्त्रज्ञ लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. खरे तर जोडप्यांबाबत डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोगही होऊ शकतो. मुळात ऑनलाइन विवाहसंस्थांमुळे लग्ने जुळणे सोपे झाले आहे. जोडीदार दूरच्या शहरात किंवा देशात असताना इमेल, चॅट, मेसेजेस अशा अनेक प्रकारे जोडपी एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात. जोडीदारापैकी एकाला ताण जाणवला तर तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांमुळे तो लगेच व्यक्त करता येतो. 

पण नेहमीच असे घडते का? या प्रश्‍नाचा वेध घेताना ‘अमेरिकन सायकिॲट्रिक असोसिएशन’ने २०१६ मध्ये रोमॅंटिक नातेसंबंधांमध्ये आणि त्यामुळे स्त्रियांच्या भावविश्‍वावर ‘टेक्‍नोफरन्स’चा परिणाम आजमावण्यासाठी १४३ विवाहित स्त्रियांचे एक सर्वेक्षण केले. या स्त्रियांनी जी एक प्रश्‍नावली सोडवली होती त्यात कॉम्प्युटर्स, सेलफोन्स/स्मार्टफोन्स, टीव्ही अशा उपकरणांमुळे जोडीदाराबरोबरच्या संवादांमध्ये अडथळा येतो हे मान्य केले होते. 

याचे कारण म्हणजे अनेकजण कामाच्या इमेल्स घरी चेक करतात. तिथला ताण मग घरापर्यंत पोचतो. त्याचे नकारात्मक वातावरण घरात भरून राहते. अनेक घरांमध्ये उठल्याउठल्या काहीजण आधी फेसबुक/व्हॉटसॲप चेक करतात. तेव्हा एका जोडीदाराला आधीच्या दिवसभरातल्या गमतीजमती एकमेकांना सांगायच्या असतात, सुटीचा काहीतरी प्लॅन आखायचा असतो. तेव्हा दुसरा जोडीदार मात्र इमेल पाहात बसलेला असतो. आजकाल अनेक जोडपी एकमेकांशी दिवसभरात प्रत्यक्षात फक्त १२ मिनिटे बोलतात. जिथे या नात्यात एकमेकांच्या गरजा, आवडीनिवडी जाणून घेणे, एकमेकांचा सांभाळ करणे यासाठी एकमेकांना वेळ देण्याची गरज सर्वांत जास्त असते, तिथे या तुटपुंज्या बारा मिनिटांवर नात्याची ढकलगाडी कशीबशी तग धरते. 

सारा कोयेनने २०१४ मध्ये १४० महिलांना याच समस्येच्या अनुषंगाने प्रश्‍न विचारले होते. तेव्हा जोडीदाराबरोबर सूर पुरेसे जुळत नाहीत याचे सेलफोन हे कारण असल्याचे ७५ टक्के जणींनी मान्य केले होते. इतकेच नव्हे, तर स्मार्टफोन्सच्या अतिवापराने एकमेकांत भांडणे आणि वादविवाद वाढतात. त्यातून नैराश्‍याचे प्रमाण वाढत जाते, असे जवळपास सगळ्यांनी सांगितले होते. इतर काही मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगांनुसारही जेवताना आणि रोमॅंटिक क्षणांमध्ये ‘टेक्‍नोफरन्स’ नात्यांवर विपरीत परिणाम होतो असे निष्कर्ष निघाले होते. ‘हॅरिस इंटरॲक्‍टिव्ह पोल’च्या एका सर्वेक्षणानुसार तर एकमेकांबरोबर शरीरसुखाचा अनुभव घेतानाही १८ ते ३४ वयोगटातले २० टक्के अमेरिकन्स स्मार्टफोन बाजूला ठेवत नाहीत. तसेच शरीरसुखाला दुय्यम महत्त्व देऊन आपापले स्मार्टफोन्स रात्री वापरत बसतात असे ४० टक्के जणांनी कबूल केले होते. शरीराने शेजारी असलो तरी एकजण फेसबुक आणि दुसरा ऑनलाइन गेम खेळत असल्यामुळे बिछान्यावरही वेगवेगळ्या जगात जगतो आहोत याची जाणीव नंतर त्रास देते, असे एका युवतीने सांगितले होते.

हे अमेरिकेचे झालं. पण भारताची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे. त्यापैकी ६५ कोटी लोकांकडे आज स्मार्टफोन्स आहेत. २१.५ कोटी लोक फेसबुकवर आहेत आणि १७ ते ३४ हा वयोगट फेसबुक जास्त प्रमाणात वापरतो. या वयोगटात नातेसंबंधांत ‘टेक्‍नोफरन्स’ची ढवळाढवळ होत असणार हे उघड आहे. 

यासाठी स्मार्टफोन्स किंवा लॅपटॉपसारख्या उपकरणांना कटाक्षाने बाजूला सारून एकमेकांसाठी वेळ काढणे हा एक उपाय आहे. टेबलटेनिससारखे खेळ खेळताना, पिकनिक किंवा चित्रपट पाहायला जाताना मोबाईल घरी ठेवण्याची सवय करणे आणि वीकएंडला स्मार्टफोन्सचा वापर कमीत कमी कसा करायचा याच्या योजना आखणे असे उपाय यावर करायला हवे आहेत. 

ज्या जोडप्यांमध्ये ‘टेक्‍नोफरन्स’ जाणवतो त्यांना मुले असतील, तर मुलांबरोबरच्या नात्यातही ‘टेक्‍नोफरन्स’ आपली भूमिका निभावतो. खरे तर आपण सर्वजणच चांगले पालक बनायच्या प्रयत्नात असतो. मुळात पालकत्व निभावणे ही दमछाक करणारी गोष्ट असू शकते. कधी कधी तर त्याचा कंटाळाही येतो. जेवताना शंभर वेळा मूल टेबलावर चढायचा प्रयत्न करत असताना त्याला थांबवणे, हाताचा पाळणा जरा थांबवल्यावर लगेच किरकिर सुरू करणारे मूल वाढवणे अशा हजारो गोष्टी अनेक वेळा करताना कंटाळा येतोच. त्यात जरा बदल म्हणून स्मार्टफोन्ससारखी उपकरणे वापरली जातात. उदाहरणार्थ, ‘आई, मला काहीतरी खाऊ दे..’ असे तुमचे मूल सतत दोन-तीन मिनिटे तुम्हाला म्हणत असते. दरवेळेला त्याचा स्वर चढा होत जातो. तुम्ही मात्र फेसबुकवर मग्न असता. अखेरीस तुमच्या हातातल्या फोनला ते मूल हात लावायचा प्रयत्न करते. मग तुम्ही मान वर करता.. आणि तक्रारवजा सुरात ‘काय रे’ असे विचारता. अशा प्रसंगांबाबत विचारणा केल्यावर ६५ टक्के आयांनी आपल्या आणि मुलांच्यामध्ये ‘टेक्‍नोफरन्स’ आहे हे मान्य केले होते. तसेच मुलांना जर कधी बागेत खेळायला नेले आणि आजूबाजूला नजर टाकली, तर सगळेच पालक आपापल्या स्मार्टफोन्समध्ये गुंग झालेले दिसतात. ३५ टक्के पालक प्रत्येक ५ मिनिटांतले एक मिनीट स्मार्टफोन्सवर घालवतात असे निरीक्षण सांगते. 

मुले खेळत असताना स्मार्टफोन पाहिला तर त्यात काय चूक आहे? असा अनेक पालकांना प्रश्‍न पडतो. मुळात पालकांचे लक्ष दुसरीकडे जाईल अशा टीव्हीसारख्या गोष्टी कायमच होत्या. मग ‘टेक्‍नोफरन्स’लाच जास्त महत्त्व का आहे? तर स्मार्टफोन्स आणि इतर उपकरणे तुमचे लक्ष सतत वेधून घेण्यासाठीच बनवलेली असतात. त्यामुळे इतर कोणत्याही तंत्रज्ञानाने विचलित झालेल्या पालकांच्या तुलनेत ‘टेक्‍नोफरन्स’मुळे मुलांकडे लक्ष न देणाऱ्या पालकांचे प्रमाण कितीतरी जास्त आहे. यातून मुलाची देहबोली लक्षात न येणे, त्याला काय हवे आहे हे नीट न कळणे, स्मार्टफोन्समध्ये गुंगल्यानंतर मुलांना नेहमीपेक्षा जास्त कठोरपणे उत्तरे देणे आणि त्यांच्याकडे जेव्हा लक्ष द्यायला हवे असेल त्यापेक्षा खूप उशिरा लक्ष देणे असे प्रकार सर्रास घडतात. 

जे पालक आणि मुले यांच्यात ‘टेक्‍नोफरन्स’ असतो त्या मुलांमध्ये अस्वस्थता आणि नैराश्‍य झिरपत जाते. ती जास्त चुळबुळी आणि रागीट होतात असे मत ब्रॅंडन मायकेल या ‘कुटुंबातले नातेसंबंध आणि तंत्रज्ञान’ या विषयावर काम करणाऱ्या इलिनॉय विद्यापीठातल्या प्राध्यापकाने पालकांवर केलेल्या सर्वेक्षणाच्या आधाराने मांडले आहे. अशा प्रकारे सतत मोबाईल किंवा तत्सम उपकरणे वापरणाऱ्या पालकांमध्येही ताण आणि नैराश्‍य जास्त असते, असे ब्रॅंडन मांडतो. 
यावर काही उपाय करता येतात. आपण ही उपकरणे किती प्रमाणात वापरतो हे मोजणे ही याची पहिली पायरी आहे. त्यानंतर मुलांबरोबर असताना तुम्ही खरोखर मनानेही तिथे असाल अशा योजना आखा. तुमचा फोन मुलांशी बोलताना त्या खोलीत न ठेवणे अशा सवयी लावून घ्या. तुमच्यासाठी त्या क्षणी सर्वांत महत्त्वाची गोष्ट ‘तुमची मुले’ ही आहे हे जाणवणे मुलांसाठी खूप गरजेचे असते. मुलांसमोर असताना तुम्ही हातात फोन घेतलाच तर ते काम त्या क्षणी खरोखर इतके महत्त्वाचे आहे का? याचा विचार करा. शेवटचे म्हणजे, तुमच्या स्मार्टफोन्सच्या स्क्रीनशी अतूट नाते जोडले गेलेले असताना वास्तवातली नाती मात्र तुटत चालली आहेत याचे भान तुम्हाला आहे का? हा प्रश्‍न स्वतःला विचारा... 
 

संबंधित बातम्या