सामाजिक माध्यमं आणि नैराश्‍य 

नीलांबरी जोशी 
सोमवार, 1 एप्रिल 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

‘उद्या सकाळच्या ट्रेननं मी दिल्लीला जाणार आहे. तो माझी तिथं वाट पाहतोय. तुमच्या सगळ्यांपेक्षा त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे...!’ नववीत शिकणारी ऋजुता हे आईवडिलांना जेवणाच्या टेबलावर सांगत होती. ऋजुताच्या वडिलांचा स्वतःचा छोटा व्यवसाय होता. आई डिझायनर ज्वेलरीचा व्यवसाय करत होती. ऋजुताचा भाऊ आयआयटीमध्ये शिकत होता. ती ज्याच्याबद्दल बोलत होती, तो म्हणजे तिचा फेसबुकवरचा मित्र. ३५ वर्षांचा. घटस्फोटित. त्यांची फेसबुकवर ओळख होऊन दोन वर्षं झाली होती. ऋजुतावर त्याचं खूप प्रेम (!) होतं. ती किती सुंदर दिसते, तिचे भरतनाट्यम करतानाचे फोटो किती सुरेख आहेत, शाळेतल्या मैत्रिणींना - आईवडिलांना तिची कशी खरी कदर नाही... अशा वाक्‍यांमुळे त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. फेसबुकवर ओळख वाढली. देखणा, स्वतःची मर्सिडीज असलेला तो ऋजुताला भुरळ पाडून गेला. ‘तू दिल्लीला ये. आपण लग्न करू..’ इथपर्यंत मजल आल्यावर ऋजुतानं आईवडिलांना आपण दिल्लीला जाणार असं सांगून टाकलं. 

एका कुटुंबात घडलेली ही सत्यघटना आहे. या प्रकाराचं नाव आहे ‘कॅटफिशिंग.’ नात्यांमध्ये फसवायचं, याच इराद्यानं काही माणसं इंटरनेटवर खोटं प्रोफाइल तयार करतात. अनेकदा तर ते अशी असंख्य खोटी प्रोफाइल्स तयार करतात. फेसबुकसारख्या माध्यमांवर आपलं जाळं कुठं फेकायचं ते त्यांना पुरेपूर ठाऊक असतं. ‘कॅटफिश’ या अमेरिकन डॉक्‍युमेंटरीवरून ‘कॅटफिशिंग’ ही संज्ञा प्रचलित झाली असली, तरी साहित्यात ती अनेक वर्षं वापरली जाते. 

आपण कुरूप आहोत, आपल्याकडं कोणाचं लक्ष जाणार नाही, असं अनेक वेळा वाटणाऱ्या कित्येक असुरक्षित व्यक्ती खोटं प्रोफाइल तयार करतात. ‘आपण देखणे असतो तर आपल्या विश्‍वात काय घडलं असतं, हे चाचपून बघायचं होतं त्यासाठी सुरुवातीला खोटं प्रोफाइल गंमत म्हणून घेतलं, मग त्याचं व्यसन लागलं..’ असं सांगणारे अनेकजण असतात. एका ‘कॅटफिशिंग’ प्रकरणात एका महिलेनं  आपण समलिंगी आहोत हे लपवण्यासाठी पुरुषाचं खोटं प्रोफाइल घेतलं होतं. एकटेपणा वाटणं, जोडीदाराशी नातं तुटल्यानंतर त्याचा ऑनलाइन छळ करून बदला घेणं अशी अनेक कारणं खोटं प्रोफाइल धारण करण्यामागं असतात. २०१८ च्या सुरुवातीला फेसबुकवरच्या २२० कोटी प्रोफाइल्सपैकी ५८.३ कोटी प्रोफाइल्स खोटी निघाली होती. 

रोमॅंटिक नातेसंबंध प्रस्थापित करणं हा खोट्या प्रोफाइल्समागचा एक हेतू झाला. पण वेगवेगळ्या देशांतल्या लोकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यासाठीदेखील खोटी प्रोफाइल्स सर्रास वापरली जातात. उदाहरणार्थ, घटस्फोटानंतर एका ४४ वर्षांच्या महिलेकडं आपल्या मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी आली होती. तिला नोकरी मिळाल्यानंतर ती घटस्फोटाच्या दुःखातून जरा सावरली. तिचा आत्मविश्‍वास वाढला. अवाजवीपणे वाढलेलं वजन कमी झालं. परत एकदा जोडीदार शोधावा असं तिला तीव्रतेनं वाटायला लागलं. तेव्हा ती एक डेंटिंग वेबसाइट वापरायला लागली. तिथं ओळख होऊन ४८ वर्षांच्या एका पुरुषाबरोबर तिचं बोलणं सुरू झालं. नंतर त्यांचं इमेल्स आणि फोनवर संभाषण झालं. ते भेटणारच होते; तेवढ्यात त्या इसमाला एका कामासाठी दुबईला जावं लागलं. दुबईमधून त्याचे तिला फोन सुरू झाले. तो तिला प्रेमकविताही पाठवायचा. ‘लवकरच भेटू’ असं आश्‍वासन द्यायचा. काही आठवडे असे गेल्यावर त्यानं, आपल्या बॅंकेच्या कार्डला काहीतरी समस्या आहे म्हणून तिला पैसे पाठवायला सांगितले. तिनं त्याला ७०० डॉलर्स पाठवले. असे प्रसंग वारंवार घडले. एकूण दहा हजार डॉलर्स गेल्यानंतर नायजेरियातला एक ३३ वर्षांचा माणूस खोट्या प्रोफाईलवरून फसवत होता असं त्या महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर ती प्रचंड नैराश्‍यात गेली. 

आत्ताच्या वेगवान जगात अनेक कारणांमुळं नैराश्‍य येऊ शकतं. त्यामुळंच २०२० मध्ये नैराश्‍य हे मृत्यूसाठी सर्वांत मोठं कारण असेल असं ‘जागतिक आरोग्य संघटने’चा अहवाल सांगतो. नैराश्‍य हजारो वर्षांपासून माणसाला भेडसावतं आहे. त्यामागं एकटेपणा हे प्रमुख कारण असतं. इंटरनेटच्या जमान्यात ‘सोशल नेटवर्किंग साईट्‌स-एसएनएस’ची सुरुवात हा एकटेपणा कमी करण्यासाठी झाली. इंटरनेटमुळं आपल्या भावना आणि विचार या गोष्टी जुळणाऱ्या लोकांशी संवाद साधता येतो. अनेकांचं नैराश्‍य कमी होतं. 

मात्र जास्त प्रमाणात इंटरनेटचा केलेला वापरही नैराश्‍याला आमंत्रण देऊ शकतो. यावर झालेल्या अनेक सर्वेक्षणांपैकी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातल्या १४३ विद्यार्थ्यांचं एक सर्वेक्षण होतं. त्यात विद्यार्थ्यांचे दोन गट केले होते. एका गटातल्या विद्यार्थ्यांना तीन आठवडे सोशल मीडिया आधी वापरत होते त्याच प्रमाणात वापरायला परवानगी दिली होती. दुसऱ्या गटातल्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण घातलं होतं. दुसऱ्या गटाला फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट प्रत्येकी फक्त १० मिनिटं आणि दिवसभरात एकूण ३० मिनिटं वापरायला परवानगी होती. यासाठी त्यांना आयफोन दिले होते. त्यावरून त्यांनी किती वेळ कोणतं सोशल मीडियाचं ॲप वापरलं त्याची माहिती मानसशास्त्रज्ञांनी गोळा केली होती. 

ज्या गटानं सोशल मीडिया मर्यादित प्रमाणात वापरला होता त्यांचं मानसिक आरोग्य जास्त चांगलं होतं, असा निष्कर्ष या सर्वेक्षणानंतर मानसशास्त्रज्ञांनी काढला होता. हा निष्कर्ष काढताना विद्यार्थ्यांना वाटणारा एकटेपणा, चिंता, अस्वस्थता, नैराश्‍य, आत्मविश्‍वास, स्वावलंबन आणि ‘स्व’चा स्वीकार अशा गोष्टी विचारात घेतल्या होत्या. दुसऱ्या गटातल्या विद्यार्थ्यांमध्ये एकटेपणा, चिंता आणि नैराश्‍य यांचं प्रमाण त्यांना व्यक्तिगत पातळीवर सुरुवातीला असलेल्या प्रमाणाच्या तुलनेत कमी झालं होतं. 

पाचशे विद्यार्थ्यांच्या केलेल्या एका सर्वेक्षणातून फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्‌विटर किंवा स्नॅपचॅट यापैकी एक ॲप वापरणाऱ्यांमध्ये नैराश्‍याची लक्षणं जास्त होती. त्यांना सोशल मीडियाचं जवळपास व्यसन लागलं होतं असंही दिसून आलं होतं. जास्त प्रमाणात इंटरनेट वापरल्यामुळं शिक्षण, घरातल्या जबाबदाऱ्या यांच्याकडं दुर्लक्ष व्हायला लागतं. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींना भेटणं कमी होतं. सामाजिक मेळावे, स्नेहसंमेलनं या सर्व गोष्टींचं प्रमाण कमी होतं. 

मात्र, इंटरनेट कशासाठी वापरलं जातं त्यावरही नैराश्‍याचं प्रमाण बदलतं. ज्या व्यक्ती इंटरनेटचा वापर माहितीचा शोध घेणं किंवा डाऊनलोड करणं यासाठी करतात आणि ई-मेलिंग माफक प्रमाणात करतात त्यांना तुलनेनं नैराश्‍य कमी येतं. पण पोर्नोग्राफी, गेमिंग आणि फेसबुक यांचा अतिवापर आणि नैराश्‍याचं वाढतं प्रमाण यांचा जवळचा संबंध आढळून येतो. इंटरनेटवरून जोडलेल्या व्यक्तींबरोबर ज्या गोष्टींचं आदानप्रदान केलं जातं, त्या गोष्टींची गुणवत्ता आणि दर्जा यांचाही नैराश्‍य कमी होणं किंवा वाढणं याच्याशी संबंध असतो. 

इंटरनेटवर किती वेळ घालवला याबरोबरच तिथं असताना कोणत्या प्रकारचे अनुभव आले यावरही नैराश्‍याचं प्रमाण ठरतं. उदाहरणार्थ, फेसबुकवर आपल्याला कोणी अनफ्रेंड केलेलं कळल्यावर नकारात्मक विचार येतात. अशा गोष्टींवर रवंथ करत राहण्याची सवय असेल तर मग इतर कोणत्याच गोष्टींचा आनंद घेता येत नाही. गंमत म्हणजे, जवळच्या माणसानं अनफ्रेंड केलं असेल तर त्याचा जास्त त्रास होतो. आपण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ज्या व्यक्तीशी मैत्री झाली असेल तिनं अनफ्रेंड केलं तरी मनाला जास्त त्रास होतो. हीच फ्रेंड रिक्वेस्ट समोरच्या व्यक्तीनं पाठवल्यानंतर मैत्री झाली असेल तर अनफ्रेंड झाल्यावर तुलनेनं मनाला कमी त्रास होतो. अशा नकारात्मक विचारांमधूनच अनेकजण नकारात्मक स्टेटसही टाकतात. त्यातून नैराश्‍य वाढत जातं. हे वाढलेलं नैराश्‍य प्रत्यक्ष आयुष्यातल्या नातेसंबंधांवर विपरीत परिणाम करतं. समजा, एखाद्या व्यक्तीला इंटरनेटवर कोणी नाकारलं असेल, तर त्या व्यक्तीच्या स्वाभिमानाला धक्का बसतो. मग प्रत्यक्ष आयुष्यात नात्यांमध्ये आपला स्वीकार व्हावा ही गरज वाढत जाते. 

सोशल मीडियामुळं नातेसंबंधांवर परिणाम होण्यामागं, आपला जोडीदार काय करतो आहे याबद्दल सतत मिळणारी ऑनलाइन माहिती हे महत्त्वाचं कारण आहे. जोडपी एकमेकांवर नजर ठेवून असतातच. पण जोडीदाराबरोबरचे संबंध तुटलेले असतील, तर आपला पूर्वाश्रमीचा प्रियकर किंवा प्रेयसी काय करते आहे त्यावर नजर ठेवणं प्रकर्षानं वाढतं. यातून मनात मत्सर, हेवा, द्वेष अशा भावना वाढतात. असुरक्षित आणि एकाकी वाटायला लागतं. ज्यांचा जोडीदारावर कमी विश्‍वास असतो त्या व्यक्ती, ज्यांचा आत्मविश्‍वास कमी असतो त्या व्यक्ती आणि आपल्याला इतका चांगला जोडीदार मिळणं कसं शक्‍य आहे असं वाटणाऱ्या व्यक्ती, सोशल मीडियावर जोडीदारांवर जास्त नजर ठेवतात. यातून त्यांचं नैराश्‍य वाढतं. याउलट, इतरांवर अवलंबित्व कमी असणाऱ्या, कोणाशीही जास्त जवळीक साधू न शकणाऱ्या आणि अलिप्त मनोवृत्तीच्या व्यक्ती जोडीदारावर नजर ठेवण्याच्या भानगडीत पडत नाहीत, असं सर्वेक्षण सांगतं. नैराश्‍य असणाऱ्या व्यक्ती नैराश्‍य नसणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत ट्‌विटरवर कमी जणांना फॉलो करतात. त्यांना फॉलो करणारेही ३०० जणांपेक्षा कमी असतात असं दिसून येतं. इन्स्टाग्रामवरही साधारणपणे हाच प्रकार दिसतो. 

या सगळ्यावर उपाय म्हणून सोशल मीडियापासून पूर्ण दूर राहणं आत्ताच्या जगात शक्‍य नाही. आजची इंटरनेट जनरेशन तर यावरच पोसलेली आहे. त्यामुळं सोशल मीडिया अजिबात न वापरण्यापेक्षा तो वापरण्याचा कालावधी आणि वापरण्याचे प्रकार बदलणं उपयोगी ठरतं. सोशल मीडिया वापरताना ज्या गटाला किंवा व्यक्तीला फॉलो करून, त्यांच्याबरोबर संवाद साधून ताण वाढतो त्यांना अनफ्रेंड करणं हादेखील एक उपाय आहे. तसंच मनातल्या मनात तुलना करत ज्यांचं प्रोफाइल बघण्यात आणि नंतर तासन्‌तास त्यावर विचार करण्यात वेळ जातो त्या व्यक्तींना पूर्णपणे फाटा देणं; रोजची पाच - दहा मिनिटं सोशल मीडिया वापरल्यानंतर दिवसभर तिकडे न फिरकणं हे प्रयत्नपूर्वक जमवणं गरजेचं आहे. 

सहसा करायला काहीच नाही असा वेळ हाताशी असला तर आपण सोशल मीडियावर येतो. त्यामुळं रोजचं ऑफिसमधलं काम किंवा व्यवसाय सांभाळून उरलेल्या वेळासाठी व्यायाम करणं, पुस्तक वाचणं, संगीत ऐकणं, चित्रपट पाहणं, फिरायला जाणं, चित्र काढणं, याचं वेळापत्रक तयार केल्यानंतर करण्यासारख्या अनेक गोष्टी दिसायला लागतील. ऑफटाइम, मूमेंट अशी स्मार्टफोनच्या वापरावर निर्बंध आणणारी ॲप ब्लॉकर्स वापरायला लागणं हाही सोशल मीडियाचा वापर कमी करण्यावरचा एक उपाय आहेच. आपल्याला वेळेची सर्वांत जास्त गरज असते आणि मिळालेला वेळ आपण सर्वांत चुकीच्या प्रकारे वापरतो अशी आपली अवस्था सोशल मीडियामुळं होते, हे लक्षात घेणं हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे.

संबंधित बातम्या