मेंदी स्पर्धेतील विजेत्यांचे मनोगत

मेंदी स्पर्धक
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

कौतुक सोहळा

मेंदीमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू केला
‘सकाळ साप्ताहिक’च्या मेंदी स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. या कलेला ‘सकाळ साप्ताहिक’च्या मेंदी विशेषांकामुळे उत्तेजन मिळते. बाकी इतर ठिकाणी आम्हाला अशी संधी मिळत नाही. मी माझ्या आईकडून मेंदीची डिझाईन्स काढायला शिकले. मेंदी शिकण्यासाठी मी कुठल्याही प्रकारचा क्‍लास वगैरे कधीच लावला नव्हता. इयत्ता आठवीत असल्यापासून मी मेंदी काढते. या कौशल्यामुळे माझा स्वतःचा मेंदी रेखाटनाचा व्यवसाय मी सुरू केला. हा व्यवसाय आता उत्तम सुरू आहे. मेंदी काढण्यासाठी वर्षभर ऑर्डर्स मिळतात. माझ्या दोन्ही मुलीही या कामी मला मदत करतात. आम्ही तिघींनी यंदाच्या सकाळ साप्ताहिकच्या मेंदी स्पर्धेत भाग घेतला होता आणि योगायोगाने आमची तिघींचीही डिझाईन्स निवडण्यात आली. मेंदीच्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळते त्यातून माझ्या दोन्ही मुलींच्या शिक्षण पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. मेंदीचा हा व्यवसाय सुरू केल्यानंतर माझ्या कुटुंबीयांचे मला कायम सहकार्य होते.
– प्रीती सेठी, नांदगाव नाशिक, (प्रथम क्रमांक)

सकाळ साप्ताहिकमुळे व्यासपीठ मिळाले
सकाळ साप्ताहिकाच्या मेंदी स्पर्धेत मी वर्ष २०१३ पासून दरवर्षी सहभागी होते. वर्ष २०१३ मध्ये पाचवा क्रमांक, वर्ष २०१४ मध्ये पहिला क्रमांक तर २०१७ मध्ये मला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले होते. या मेंदी विशेषांकामुळे आम्हाला मेंदी काढण्यासाठी आणि आमचा कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते. गेली सहा वर्षे मी या स्पर्धेत सहभागी होते. प्रत्येक वर्षी स्पर्धेत भाग घेताना नवीन डिझाईन देण्याचा माझा प्रयत्न असतो. भारतीय आणि अरेबिक असा दोन्ही प्रकारच्या मेंदी डिझाईन्सचे फ्युजन करून डिझाईन्सचे नवनवीन प्रयोग मी करते. या मेंदी विशेषांकामुळे बाकीच्या स्पर्धकांची वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स बघण्याची संधी मिळते.
– श्‍वेता चव्हाण, पुणे (द्वितीय क्रमांक)

मेंदी काढताना रांगोळीच्या डिझाइन्सचा वापर
सकाळ साप्ताहिकच्या स्पर्धेत सहभागी होण्याचे ही माझी पहिलीच वेळ होती. या स्पर्धेतला अनुभव खूप छान होता. मला रांगोळी काढण्याची आवड आहे त्यामुळे मेंदी काढताना रांगोळीच्या डिझाईन्सचा वापर करते. फुले, पाने यांच्या नक्षीचा वापर मी माझ्या मेंदी डिझाईन्समध्ये प्रामुख्याने करते. मेंदी शिकण्यासाठी मी कोणताही कोर्स किंवा क्‍लास कधीच लावला नव्हता. मेंदी काढण्याची आवड मला  लहानपणापासून होती. सकाळ साप्ताहिकच्या मेंदी स्पर्धेतील सहभागामुळे मला सगळ्यासमोर माझी मेंदी डिझाईन्स सादर करण्याची संधी मिळाली. तसेच इतर स्पर्धकांच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि मेंदीच्या संकल्पना बघता आल्या. यापुढे दरवर्षी मी स्पर्धेत सहभागी होणार आहे.
– मानसी मोहटकर, वाकड, पुणे (तृतीय क्रमांक)

गेल्या पाच वर्षापासून मी ’सकाळ साप्ताहिक’च्या मेंदी स्पर्धेत स्पर्धेक म्हणून सहभागी होते आहे. मेंदी आवड म्हणून काढायचे, नंतर त्याचे छंदात रूपांतर झाले. २०१६ मध्ये माझ्या डिझाईन्सला उत्तेजनार्थ म्हणून बक्षीस मिळाले होते. त्यानंतर या वर्षी पुन्हा माझ्या मेंदी डिझाईन्सला बक्षीस मिळाले; ’सकाळ साप्ताहिक’ने कार्यक्रमाचे आयोजन करुन बक्षीस दिले. ’सकाळ साप्ताहिक’चे मनापासून आभार. 
– गीतांजली मुकेश अनेचा, पुणे

मी विद्यार्थिनी आहे. ’सकाळ साप्ताहिक’च्या मेंदी स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला होता, आणि पहिल्याच प्रयत्नात बक्षीस मिळाले. ’सकाळ साप्ताहिक’ने बक्षीस विजेत्यांसाठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला. ही गोष्ट मला कौतुकास्पद वाटली. बक्षिसापेक्षाही कार्यक्रमाला बोलावून आमच्या मेंदी डिझाईन्सचे कौतुक केले. त्यामुळे विशेष आनंद झाला. या कौतुक सोहळ्याने भविष्यात अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी माझे मनोबल उंचावले आहे. ‘सकाळ साप्ताहिक’ला मनापासून धन्यवाद. 
 – शेजल रामेश्‍वर साबळे, पुणे

महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ’सकाळ साप्ताहिक’चा मेंदी स्पर्धा हा खूप चांगला उपक्रम आहे. गेल्या दोन वर्षापासून मी या स्पर्धेत सहभागी होते आहे. माझी नणंद श्रद्धा ओसवाल या गेली अनेक वर्ष या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे मी मेंदी स्पर्धेत सहभागी झाले होते. दोन्ही वर्षी सहभागी होऊन मला बक्षीस मिळाले, याचा विशेष आनंद आहे. 
– सपना अभिजित कासवा, राजगुरुनगर 

माझी चित्रकला चांगली आहे त्यामुळे मी मेंदी डिझाइन्स काढण्याकडे वळाले.  ’सकाळ साप्ताहिक’ मेंदी स्पर्धेत मी गेली तीन वर्ष सहभागी होते आहे. माझ्या मेंदी डिझाइन्सला स्पर्धेत बक्षीस मिळाल्याचे कळल्यानंतर खूपच आनंद झाला. विशेष म्हणजे ‘सकाळ साप्ताहिक’ने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेऊन आम्हाला सन्मानित केले.  एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आपले कौतुक व्हावे, ही बाब सुखद आहे. 
 – शुभांगी एकनाथ फापाळे, पुणे

गेली सहा वर्ष मी ‘सकाळ साप्ताहिक’ मेंदी स्पर्धेत सहभागी होत आहे. सुरूवातीला मी मेंदी आवड म्हणून काढत होते. आता त्याला मी व्यावसायिक रूप दिले आहे. मेंदी स्पर्धेचे बक्षीस मला तिसऱ्यांदा मिळाले आहे. ’सकाळ साप्ताहिक’ने मेंदी स्पर्धेसारखे रांगोळी स्पर्धेचे देखील आयोजन करावे, असे मनापासून वाटते. 
 – वृषाली नरेश पवार, पुणे

मेंदी काढण्याची मला आवड आहे. मात्र ’सकाळ साप्ताहिक’च्या मेंदी स्पर्धेत सहभागी होऊन पहिल्याच प्रयत्नात बक्षीस मिळाल्याने खूपच आनंद झाला. ’सकाळ साप्ताहिक’ने महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मेंदी स्पर्धेसारख्या इतर स्पर्धांचे देखील आयोजन करावे, ही विनंती. 
– उषा पवन गौड, पुणे

’सकाळ साप्ताहिक’कडून मेंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. याविषयी मला माहिती होती. मात्र मेंदी स्पर्धेत मी प्रथमच सहभागी झाले होते. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. त्यामुळे येथून पुढे ‘सकाळ साप्ताहिका’च्या प्रत्येकवर्षीच्या मेंदी स्पर्धेत आवर्जून सहभागी होणार. 
 – श्रद्धा सुयोग गुंदेचा, पुणे

’सकाळ साप्ताहिक’ महिलांसाठी मेंदी स्पर्धा आयोजित करते, याचे मला कौतुक वाटते. एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपल्याला बक्षीस मिळेल का? याची खात्री वाटत नव्हती. मात्र बक्षीस मिळाल्याचे कळताच मनापासून आनंद झाला. महिलांसाठी एवढे मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल ‘सकाळ साप्ताहिक’चे मनापासून आभार. 
– निशा प्रमोद गायकवाड, पुणे

गेली चार वर्ष मी ’सकाळ साप्ताहिक’च्या मेंदी स्पर्धेत सहभागी होत आहे. दोन वेळा मला बक्षीस देखील मिळाले आहे. २०१६ मध्ये माझा तृतीय क्रमांक आला होता. यंदा देखील उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. बक्षिसापेक्षा ’साप्ताहिक सकाळ’ने बोलावून आमचे कौतुक केले याचा जास्त आनंद झाला. 
 – पूनम गेनू थिटे, पुणे

संबंधित बातम्या