मैत्र अनिश्‍चिततेसोबत

डॉ. संज्योत देशपांडे 
मंगळवार, 5 जानेवारी 2021

माइण्ड रि-माइण्ड

 

‘‘तर कोणे एके काळी एका देशात एक राजा राहत होता. त्याला एक राणी होती. त्यांना दोन मुलं होती. राजा त्याच्या मुलाबाळांसह, त्याच्या प्रजेसह आनंदात, सुखासमाधानात राहत होता. छान सुरळीत चाललं होतं त्याचं आयुष्य! मग एके दिवशी काय झालं... सोसाट्याचा वारा आला आणि त्याच्या राज्यात, राजा-राणीच्या आयुष्यात ‘काहीतरी’ घडलं. अघटित वाटावं असं. अगदी ध्यानीमनी नसताना घडलं... आणि मग बरंच काही बरंच काही होत गेलं...’’ 

गोष्ट ऐकायला कोणाला आवडत नाही! कल्पना करा आपणही जर आपली स्वतःची गोष्ट सांगायचं ठरवलं तर आपल्याही गोष्टीची सुरुवात अशीच काहीशी होईल. पण आपल्या आयुष्याकडे, जगण्याकडे आपण गोष्ट म्हणून पाहत नाही; जर पाहिलं तर आपल्याही गोष्टीचा प्रवास आपल्याला नक्कीच दिसायला लागेल त्यातल्या बऱ्याचशा चढउतारांसकट. या सर्व घटनांकडे त्रयस्थ म्हणून बारकाईने पाहताना त्यातल्या अनेक न जाणवलेल्या गोष्टीही मग जाणवायला लागतील. खरं सांगू का, तुम्हालाही पटेल, आपल्या जगण्यात अशा काही गोष्टी असतात; पण त्यांच्या अस्तित्वाची दखल आपण नेहमी घेतोच असं नाही. पण जसं त्या गोष्टीतल्या राजाच्या आयुष्यात ‘काहीतरी’ घडलं, तसंच काहीसं आपल्याही आयुष्यात घडतं तेव्हा मात्र आपल्याला त्या गोष्टीची दखल घ्यावीच लागते.

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मधल्या कतरिना कैफसारखा प्रश्‍न मी तुम्हाला विचारला तर तुम्हाला अंदाज येईल -‘‘ड्यूड, तुम्हे कैसे पता है तुम चालीस तक जिंदा रहोगे?’’ खरंच काय खात्री आहे? पुढच्या क्षणाची तरी आहे का? पण आता या गोष्टीची जाणीव करून द्यायला असे फिलॉसॉफिकल प्रश्‍न विचारण्याची गरजच उरली नाहीये. कारण नऊ -दहा महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूनी आपल्या आयुष्यात अचानक प्रवेश केला आणि एका गावात, एका देशातच नाही तर संपूर्ण जगभर एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. आपण सर्व त्याचे साक्षीदार झालो आणि या निमित्ताने जन्मापासून आपल्यासोबत असणाऱ्या ‘अनिश्‍चिततेची’ एक वेगळीच ओळख झाली. आज इतके दिवस झाले कोरोना विषाणूत बदल झाला; पण अनिश्‍चितता आजही आपल्यासोबत तशीच आहे. त्यामुळे ती जाण्याची वाट पाहण्यापेक्षा आता या अनिश्‍चिततेसोबतच मैत्र वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

अनिश्‍चितता म्हणजे काय? 
घडणाऱ्या घटनेविषयीची पूर्ण माहिती जेव्हा आपल्याला नसते; त्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी अज्ञात असतात तेव्हा पुढे कशी योजना आखायची, भविष्याचा अंदाज कसा लावायचा हेच समजेनासं होतं. त्या वेळी मनावर एकप्रकारचा ताण आणि सतत काय होईल किंवा काय होणार नाही किंवा नक्की काय घडणार आहे याबद्दलची भीती, हूरहूर सतत जाणवायला लागते. 

आपल्याला सगळ्यांनाच आपला एक दिनक्रम असण्याची गरज असते. रोजच्या ठरलेल्या गोष्टी नित्यनेमाने होत राहाव्यात अशी आपली अपेक्षा असते. खरं म्हणजे आपल्याला सर्वांनाच एक अतिशय शाश्‍वत, चिरंतन, सुरक्षित जिथे गोष्टींचा अंदाज बांधता येईल असं जग हवं असतं. किंबहुना हे जग असंच शाश्‍वत आहे अशी आपल्या मनाची समजूत असते. पण जेव्हा काही कारणाने आपण आखलेल्या गोष्टी घडायला काही कारणाने अडथळा निर्माण झाला तर शाश्‍वत आहे असं वाटणारं हे जग असुरक्षित वाटायला लागतं. काय होणार आहे याचा अंदाज बांधताच येत नाही, असं वाटायला लागलं तर एकंदरीतच आपली आयुष्यावर नियंत्रण असण्याची भावना (sense of control) डळमळीत व्हायला लागते. 

तसं पाहायला गेलं तर ‘कधीही काहीही घडू शकतं’ ही गोष्ट खरं म्हणजे आपल्याला माहिती असतेच. पण मनावर आघात करणाऱ्या घटना घडल्या तर ‘कधीही काहीही घडू शकतं’ या वाक्‍याचा खरा अर्थ आपल्याला समजतो आणि आता कोरोना विषाणूने आपल्याला सर्वांनाच एकाच वेळी तो समजावला, अनिश्‍चिततेचा एक खोलवर अनुभव देऊन शिकवला. 

कोणत्याही प्रकारची अनिश्‍चितता मनात प्रश्‍नच प्रश्‍न आणि खूप साशंकता निर्माण करते. जशा सध्या ह्या कोरोना विषाणूने आपल्या आयुष्यात निर्माण केल्या आहेत. शंका खूप आहेत, पुन्हा लॉकडाउन होईल का? कोरोनाची दुसरी लाट येईल का? हा व्हायरस गेलाच नाही तर? आणि जाऊन परत आला तर? असेच साथीचे रोग येत राहणार का आता? हे जगच संपून जाणार आहे का? 

कोविड-१९ने आपल्या सर्वांच्या मनात आपल्या अस्तित्वाबाबतचेच प्रश्‍न निर्माण केले. जेव्हा असे प्रश्‍न निर्माण होतात तेव्हा मनात एक आंतरिक भीती निर्माण होते. कोणत्याही प्रकारची अनिश्‍चितता म्हणजे धोका असं आपल्या मनाचं, आपल्या मेंदूचं समीकरण असतं. त्यामुळे अशा वेळी मी स्वतःला कसं वाचवू शकेन याचा सातत्याने विचार केला जातो. या परिस्थितीत जेवढी अनिश्‍चितता जाणवायला लागते तितकी भीती, चिंता, अस्वस्थता मनात भरून राहते. कोविड-१९ने सर्वांत प्रथम आपल्या जिवाची भीती तर मनात निर्माण केलीच, पण त्याचसोबत आपल्या जगण्यातला कोपरानकोपरा त्याने व्यापला. जिवासोबतच आपल्या उपजीविकेच्या वाटेतही त्याने अडथळे निर्माण केले. थोडक्‍यात जीव वाचवायचा की जगणं या तिढ्यात कोविडने आपण आतापर्यंत कधीही न पाहिलेली अनिश्‍चितता आपल्याला दाखविली. 

अनिश्‍चिततेचे परिणाम 
आपल्या आयुष्यात अनिश्‍चितता आली की आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर त्याचा निश्‍चितच खोलवर परिणाम होतो. 

अनिश्‍चिततेचं अतिरंजित स्वरूप मनासमोर उभं राहतं. (माझा सगळा कामधंदा बुडेल, कर्ज होईल, माझी पूर्ण वाताहत होईल.) 

सुतावरून स्वर्ग गाठणे - समोरच्या माणसाला साधी शिंक आली की त्याला कोरोनाची लागण झाली आहे असा निष्कर्ष काढणे. 

या षडयंत्राच्या कल्पनेला व्यक्ती बळी पडतात. याचबरोबर अनिश्‍चिततेला सामोरं जाताना आपल्याला सतत मानसिक ताण जाणवतो. भीती- चिंता वाटत राहते. कधी कधी यातून काही जणांना नैराश्‍य येऊ शकतं. या सगळ्याचा माणसांच्या वागण्यावरही खूप परिणाम होतो आणि त्यातूनच गरजेच्या गोष्टींचा जरूरीपेक्षा खूप जास्त साठा करून ठेवण्याकडे कल वाढतो. या सगळ्यातून मानसिक सुरक्षितता मिळवणं एवढाच उद्देश असतो. 

अनिश्‍चिततेसोबत मैत्री 
कोविड-१९मुळे अनिश्‍चितता ही आपल्या जगण्यातली अटळ गोष्ट आहे, हे नक्की समजलं; पण इतका ताण निर्माण करणाऱ्या या गोष्टीसोबत मैत्री कशी करायची? शक्‍य आहे का? आताच्या जगाचं वास्तव आता आपल्याला हे नक्कीच सांगत आहे की आपल्याला अनिश्‍चिततेसोबतच जगायचं आहे. पण अनिश्‍चितता आली की आपण येन केन प्रकारे तिच्यापासून लांब जाण्याचाच प्रयत्न करत असतो. मग आपण आपल्यासाठी एक सुरक्षित कोष, कम्फर्ट झोन, तयार करतो व त्या कोषामध्येच आपण राहायला लागतो आणि याचा आपल्या प्रगतीवर, पुढे जाण्यावर नक्कीच परिणाम होतो.

अशा गोष्टींना सामोरं न जाऊन आपल्या मेंदूलाही आरामात राहण्याची सवय होते. एका अर्थाने त्याला गंज चढल्यासारखा होतो. पण अनिश्‍चिततेच्या निमित्ताने तुम्ही एका नावीन्यपूर्ण परिस्थितीला सामोरं जाता तेव्हा या अनुभवाला सामोरं जाताना मेंदू नवीन गोष्टी शिकत जातो. नवीन माहिती गोळा करतो व त्यात आपली वाढ, आपली प्रगती होतच राहते. थोडक्‍यात अनिश्‍चिततेला टाळण्यापेक्षा तिला सामोरं जाणं हे आपल्या मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. म्हणून अनिश्‍चिततेची भीती वाटून घेण्यापेक्षा त्याबद्दलची आपली सहनशीलता कशी वाढेल तिला आपलंसं करून कसं जगता येईल याचा जास्त विचार करणं उपयोगाचं होऊ शकेल. त्यासाठी या अशा परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे यावर अधिक काम करायला हवं.

अनिश्‍चिततेला सामोरं जाताना काय कराल? 

  • अनिश्‍चिततेचा विनाशर्त स्वीकार ही यातली महत्त्वाची गोष्ट. 
  • नेमक्‍या कोणत्या अनिश्‍चिततेची भीती वाटते आहे- व्यवसाय बंद पडेल किंवा नोकरी जाईल म्हणून की पुढच्या महिन्यात घराचा हप्ता भरता येणार नाही - हे समजण्यात नेमकेपणा असेल तितकं त्याचा त्या गोष्टीला सामोरं जायला त्याचा उपयोग होईल. 
  • अनिश्‍चिततेचा ताण सहन करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. आपली सहन करण्याची क्षमता जाणून घ्या व प्रयत्नपूर्वक ही क्षमता वाढवता येते हे लक्षात ठेवा. 
  • आपल्या नियंत्रणात असणाऱ्या गोष्टी व नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी जाणून घ्या व आपल्या नियंत्रणात असणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. उदा. रोजचा दिनक्रम चालू ठेवणं, विचारांना शिस्त लावणं, भावनांचं योग्य पद्धतीने नियमन करायला शिकणं या गोष्टी आपल्या नियंत्रणातील आहेत. 
  • वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. जगण्यामध्ये सजगता वाढवा. 
  • आपल्या क्षमतांवर विश्‍वास ठेवा. यापूर्वी माझ्या कोणत्या क्षमतांनी मला कठीण प्रसंगात मदत केली होती याची स्वतःला आठवण करून द्या. 
  • विचार करण्याच्या पद्धतीत, आपण स्वतःच स्वतःशी काय बोलतो आहोत याकडे लक्ष द्या व त्यात योग्य ते बदल करा. 
  • मनातल्या गोष्टी शेअर करा. लिहून काढा. त्याने मनावरचा भार हलका व्हायला मदत होते. 
  • स्वतःची योग्य काळजी घ्या. 

‘‘जगात कधीही काहीही घडू शकतं, हे जग खरचंच अशाश्‍वत आहे...’ हे वाक्‍य इथेच संपत नाही. ‘‘....पण माझ्यामध्ये याला सामोरं जाण्याची क्षमता आहे’ हे पुढचं वाक्‍य आपल्याला ऐकू येत नाही.

आध्यात्मिक विषयांवर लिहिणारे जर्मन वंशाचे लेखक एखर्ट टोल यांचं एक सांगणं लक्षात ठेवायला हवं -“If uncertainty is unacceptable to you, it turns into fear. If it is perfectly acceptable, it turns into increased aliveness, alertness, and creativity.”

लंडनमधील संशोधकांनी २०१६मध्ये एक छोटासा प्रयोग केला. त्यात सहभागी झालेल्या व्यक्तींचे दोन गट केले होते. एका गटाला बेल वाजल्यावर शॉक बसणार आहे हे माहिती होतं आणि दुसऱ्या गटाला बेल वाजल्यावर कदाचित शॉक बसेल किंवा बसणारही नाही, असं सांगितलं होतं. ज्यांना शॉक बसणार आहे त्यांचा ताण, ज्यांना शॉक बसण्याची ५० टक्केच शक्‍यता होती त्यांच्यापेक्षा तुलनेने कितीतरी कमी होता, असं या संशोधनाच्या निष्कर्षात दिसून आलं. म्हणजेच माणसं जेव्हा अनिश्‍चिततेला सामोरी जातात तेव्हा त्याचा प्रचंड मानसिक ताण त्यांना येतो. बऱ्याचदा आपण असं पाहतो, की एकदाचं जे काही आहे ते समजावं (म्हणजे ते कितीही वाईट, नकारात्मक, त्रासदायक असलं तरी चालेल) अशी बऱ्याच माणसांची भूमिका असते. काय होईल काय होईल याची तगमग सहन करणं अशा वेळी अनेकांना नकोसं वाटत असतं.

संबंधित बातम्या