नाण्याची तिसरी बाजू...

डॉ. संज्योत देशपांडे 
रविवार, 31 जानेवारी 2021

माइण्ड रि-माइण्ड

कोरोना- कोविड १९ आपल्या सर्वांसाठीच आयुष्य बदलून टाकणारा अतिशय आव्हानात्मक असा अनुभव! काय मिळालं आपल्याला यातून?  आपण जगभरात झालेली झालेली उलथापालथ पाहिली, वैयक्तिक ते जागतिक अशा सर्व पातळ्यांवर बरंच बरंच काही घडताना पाहिलं – अभूतपूर्व असं! खूप जणांना कदाचित आपण खूप काही गमावूनच बसलो की काय असंही वाटत असेल.

प्रत्येक अनुभवाच्या नाण्यासारख्याच दोन बाजू असतात. कोविड-१९ने काही गोष्टी जशा आपल्याकडून हिरावून घेतल्या तशाच काही गोष्टी शिकवल्यासुद्धा! त्याची गोळाबेरीज केली तर वैयक्तिक पातळीवर सकारात्मक- नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी मांडता येतील. पण नाण्याला तिसरी बाजूसुद्धा असते आणि तीही आपल्या  नकळतपणे अनेकजणांनी अनुभवलेली असते. 

कोणत्याही अनुभवाला आपण सामोरे जातो तेव्हा आपल्यात काही ठळक, काही सूक्ष्म बदल होत जातात. त्या अनुभवाचा एक ठसा आपल्या मनावर – व्यक्तिमत्वावर निश्चितपणे उमटतो. असे बदल होत जाताना काही जणांमध्ये तर एक प्रकारचं परिवर्तन होतं- ती असते नाण्याची तिसरी बाजू. या आव्हानातून, आघातातून- दुःखातून जाताना जगण्याचा, आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधला जातो आणि या झगडण्याच्या पल्याड जाऊन जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी निर्माण केली जाते. आघातानंतर होणारी मानसिक वाढ, प्रगती, परिवर्तन असं काहीही म्हणू शकतो आपण या गोष्टीला.

आपल्या जवळपास अशी बरीच उदाहरणं आपल्याला माहिती असतात. वानगीदाखल सांगायचं तर सुप्रसिध्द नर्तिका सुधा चंद्रन. दोन्ही पाय गमावल्यानंतरही नृत्य करण्याची अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी प्रचंड मेहनत आणि जिद्दीने साध्य केली. किंवा स्वतःच्या मतिमंद मुलाला वाढताना अशा प्रकारची समस्या असणाऱ्या इतरही मुलांसाठी शाळा सुरू करणारे पालक आपल्याला माहिती असतात अथवा आपल्या जीवलगाच्या आत्महत्येनंतर आणखी आत्महत्या होऊ नयेत यासाठी प्रयत्न करत राहणारे अनेकजण किंवा लहानपणी लैंगिक अत्याचारांना बळी पडलेली, पण नंतरच्या आयुष्यात अशाच पद्धतीचा त्रास अनुभवण्याऱ्यांना मदत करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ होणारी एखादी व्यक्ती.

अशी उदाहरणं पहिली की वाटतं कोणत्या प्रेरणा आहेत ज्यामुळे या लोकांनी त्यांना आलेल्या अनुभवातून पुढे जाताना, स्वतःसाठी, इतरांसाठी जगण्याचं एक वेगळंच परिमाण उभं केलं? राखेतून भरारी घेण्याऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे ह्या व्यक्ती उभ्या राहिल्याच, पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी त्यांच्या अस्तित्वाचा एक वेगळा अर्थ शोधला. कोविड-१९चा अनुभवही आपल्याला खूप काही सांगू पाहत आहे. आपण त्याचं म्हणणं नक्कीच ऐकायला हवं. आघात अनुभवल्यानंतर होणारी सकारात्मक मानसिक वाढ (पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ) म्हणजे काय? आघात अनुभवल्यानंतर होणारी मानसिक वाढ या विषयाचा रिचर्ड तेडेशी आणि लॉरेन्स कालहोन साधारण गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी पासून अभ्यास करत आहेत. त्यांच्या मते पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ म्हणजे अतिशय आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे गेल्यावर किंवा एखादा आघात अनुभवल्यानंतर माणसांच्या मानसिकतेत होणारे सकारात्मक बदल! 

असे सकारात्मक बदल जेव्हा आपल्या मानसिकतेत होतात तेव्हा एकंदरीतच आयुष्याकडे, नात्यांकडे, पैशाकडे, आरोग्याकडे, यशापशायाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलून जाते. या सकारात्मक वाढीत झालेल्या त्रासदायक गोष्टीचा स्वीकार असतोच, पण स्वतःमधल्या क्षमतांची एक वेगळी जाणीवही यातून निर्माण होते. झालेल्या आघातामुळे निर्माण झालेली वेदना संपत नाही तर ती वेदनाच जगण्याला वेगळी दिशा देत राहाते. कोरोनाच्या काळाला आघात म्हणावं की नाही- कदाचित सगळ्यांसाठी तो तशा अर्थाने आघात नसेलही पण हा काळ आपल्या सर्वांसाठी आव्हानात्मक नक्कीच होता. कोरोनाच्या काळाची दाहकता काही प्रमाणात संपत चालली असताना (निदान असं वाटतंय!) आपलं जगणं पूर्वपदावर येण्याच्या आणि पुन्हा एकदा आधी सारखंच कामामध्ये व्यग्र होण्याआधी या अनुभवासोबत बोलायला काय हरकत आहे? 

मानसशास्त्रज्ञांनी या सकारात्मक वाढीचे  पाच पैलू सांगितले आहेत. (यातल्या प्रत्येक मुद्द्याला जोडून स्वतःसाठी काही प्रश्न दिले आहेत. पण त्याही पलीकडे जाऊन या मुद्द्यांचा विचार करायला हरकत नाही.) 

जीवनाबद्दल कृतज्ञतेची भावना

 • कोरोनाकाळातून जाताना आपण आपलं आरोग्य, आयुष्य किंवा कोणत्याच गोष्टीला गृहीत धरता कामा नये हे खूपच तीव्रपणे समजलं. पण याच बरोबर आजूबाजूचं जग पाहताना व अनुभवताना आपल्याकडे असणाऱ्या जमेच्या गोष्टींची जाणीव झाली. उदाहरणार्थ, माझी नोकरी या काळातही टिकून आहे, काळजी करावी असा कोणताही गंभीर आजार मला नाही, मला किंवा माझ्या जवळच्या व्यक्तींना कोरोनाचा त्रास झाला नाही.
 • या कोरोना काळातून जाताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याबद्दल मी कृतज्ञ असायला हवं?  माझ्याकडे असणाऱ्या जमेच्या बाजू कोणत्या? 

नात्यांची गुणवत्ता 

 • टाळेबंदीमुळे आपल्याला घरात रहावं लागलं. जवळच्या माणसांशी भेटीगाठी कमी झाल्याने भेटण्याला, सहज वागण्याला मर्यादा आली. नात्यांचं एक वेगळंच महत्त्व आणि गरज या काळात अनेकांच्या लक्षात आली. त्यानिमित्ताने माणसं आवर्जून एकमेकांच्या चौकशा करू लागली. हा काळ नात्यांना वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा ठरला. वर्तमानपत्र अथवा इतर माध्यमांतून कळणाऱ्या बातम्यांमुळे ज्यांना आपण पाहिलंही नाही अशा व्यक्तींबाबत मनात आस्था निर्माण झाली. 
 • या काळातून जाताना माझ्या समाजासोबतच नातं कसं बदललं?
 • मला मदत करणाऱ्या, माझी आवर्जून चौकशी करणाऱ्या माणसांबद्दल मला आज काय वाटतंय? 
 • एकंदरीतच नात्यांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन कसा बदलला?
 • माझं स्वतःसोबतचं नातं या काळात बदललं का?  

स्वतःच्या क्षमतांची जाणीव 
कोणतीही आव्हानं एका अर्थी आपल्या क्षमतांची परीक्षा घेत असतात. कोरोनाच्या काळात त्या पद्धतीने जीवनशैली बदलली व ध्यानीमनी नसताना एका वेगळ्याच परिस्थितीला आपल्याला सामोरं जायला लागलं आणि आजपर्यंत जाणवल्या नव्हत्या अशा काही क्षमतांची नव्याने ओळख झाली. म्हणजे आपण अशा पद्धतीने इतके दिवस घरात राहू शकतो, आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो याची जाणीव झाली. कित्येक जण या काळात नव्याने स्वयंपाक करायला शिकले. आपण इतकं झोकून देऊन काम करू शकतो, संकटकाळातही निर्भय राहू शकतो याची जाणीव अनेकांना झाली.

 • मला या काळात माझ्यामधल्या कोणत्या क्षमता जाणवल्या?
 • मला या काळात माझ्यात काही बदल करता आले का? कोणते?
 • मी नवीन गोष्टी करून पाहण्याचा प्रयत्न केला का? 

आध्यात्मिक वाढ
या काळातून जाताना आपल्याला आपल्या अस्तित्वाशी निगडित असणारेही प्रश्न पडले. जगभरात आणि आपल्या जवळपासही जीवन मृत्यूचा लढा चालूच होता. त्यात परत टाळेबंदीमुळं स्वतःलाही सामोरं जावं लागलं. या परिस्थितीमुळे जीवनाविषयी आपल्या या अस्तित्वाच्या अर्थाविषयी, जगण्यातल्या अर्थपूर्णतेविषयी अनेक प्रश्न मनात नकळत उमटत गेले. स्वतःबरोबर जोडलं जाण्याची ही एक आगळीवेगळी संधीच होती असं म्हणावं लागेल. पण त्याचबरोबर स्वतःपलीकडे जाऊनही विचार करणं आणि तसं वागणं याचाही प्रत्यय आपल्यापैकी अनेकांना नक्की आला असेल. यानिमित्ताने  दुसऱ्यांना जाणून घेण्याची संवेदनशीलता, तदनुभूती या गोष्टींचीही जाणीव अनेकांना झाली. 

 • आयुष्याच्या अर्थपूर्णतेविषयी तुम्हाला काय वाटतं?
 • आपण आपलं आयुष्य अर्थपूर्ण करण्यासाठी काय करायला हवं? 

जगण्याच्या नवीन शक्यता
कोरोनामुळे आपलं जगणं खऱ्या अर्थानं बदलून गेलं. पण या काळातून जाताना आपल्याला जगण्याचे प्राधान्यक्रमही समजले. आपल्या जगण्यात आपलं आरोग्य, आपली नाती याचं महत्त्व किती आहे, आपण स्वतःसोबत कसं वागायला हवं याची समज आली. आयुष्य या ही प्रकारे जगता येऊ शकतं याचीही जाणीव झाली. बदललेली जीवनशैली आत्मसात करताना काही शक्यता जशा मावळल्या तशा काही नवीन शक्यता निर्माणही झाल्या. वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर हा बदल, या शक्यता ज्यांना समजल्या, अजमावता आल्या त्यांनी या संधीचं काय केलं? 

 • माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर मला अशा शक्यता दिसल्या का? 
 • त्या शक्यता आजमावताना मी त्याला कसा/ कशी सामोरी गेले/ गेलो? 
 • मला जगण्यातले प्राधान्यक्रम समजले का? 

या पाच मुद्द्यांपैकी एका जरी मुद्यावर तुम्हाला तुमच्यामध्ये फरक/ बदल जाणवत असेल तर ती सकारात्मक मानसिक वाढ आहे.

सकारात्मक मानसिक वाढीसाठी अजून काय करायला हवं?

 • मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे आपली ढासळलेली गृहितकं (उदा. आपण सुरक्षित आहोत, माझ्या बाबतीत वाईट काही होऊ शकत नाही इ.), आपल्या धारणा यांचा पुनर्विचार करून त्यांची नवीन मांडणी करायला हवी. पण त्यासाठी अर्थातच वेळ द्यावा लागतो. स्वतःसोबत बोलावं लागतं.
 • कोणतीही भावना ही आपल्या जगण्यात महत्त्वाची आहे. आपल्या भावनांचं नियमन करणं त्यांना योग्य पद्धतीने हाताळायला शिकणं आवश्यक आहे. भीती, चिंता, राग अशा भावनांना टाळणं, दाबून टाकण्यापेक्षा त्यांना हाताळायला शिकण्याचा उपयोग होतो. 
 • सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अनुभवांसोबत बोला. आपल्या नियंत्रणातल्या- नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी कोणत्या याचा विचार करा. घडलेल्या गोष्टींचा आपल्या मनाशी अर्थबोध होणं आपल्याला मदत करतं. 
 • या निमित्ताने आपली स्वतःची गोष्ट लिहा. म्हणजे आपण कसे होतो, या आणि इतर अनुभवातून जाताना आपल्यात कसे बदल झाले, आत्ता आपल्याला काय वाटतं आहे, याची जाणीव व्हायला व जे घडतंय त्याची जबाबदारी घ्यायला मदत होते. 
 • स्वतःपलीकडे जाऊन इतरांसाठी काही करता येईल का याचा विचार करा. 
 • हा सगळाच अनुभव आपल्यावर खोलवर परिणाम करणारा आहे त्यामुळे त्या अनुभवाला थोडा वेळ द्या! नाण्याची ही तिसरी बाजू जगण्याची गुणवत्ता वाढवणारी असते...

संबंधित बातम्या