बदल

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

माइण्ड रि- माइण्ड

कोरोना व्हायरसमुळे झालेला लॉकडाउन आणि त्यामुळे आपलं बदलत गेलेलं किंवा बदलत जाणारं जगणं! ‘बदल’ (change) हा खरंतर आपल्या जगण्याचा, आयुष्याचा अविभाज्य घटक! तुम्हाला सर्वांना कल्पना आहेच, आपल्या आयुष्यात एक गोष्ट सातत्याने आपल्यासोबत असते. ती गोष्ट म्हणजे ‘बदल’....

तसं पहायला गेलं तर आपल्यालाही आपल्या जगण्यात बदल हवेच असतात.

‘किती दिवस झाले (टाळेबंदीमुळे) कुठे गेलोच नाही. कंटाळा आला आता, काहीतरी चेंज हवा.’ ‘स्टॅग्नंसी आलीय या नोकरीत, जॉब बदलायला हवा.’ ‘तेच तेच काय खायचं रोज, आज हॉटेलमध्ये जाऊया.’ ‘कंटाळा आला या गाडीचा, नवीन गाडी घेऊया.’ असे विचार मनात येणं यात काही नवं नाही. पण या कोरोना विषाणूच्या निमित्ताने मात्र आपलं जगच बदलून गेलं आहे. आपल्या रोजच्या जगण्याला एक वेगळीच नियमावली लागू झाली आहे आणि त्या बदलांसोबत आपल्याला जगावं लागत आहे. उदा. बाहेर जाताना मास्क वापरा, दुकानात गेलं की रांगेत उभं रहा, हात धुवा, सोशल डिस्टंसिंग या शब्दामुळे तर बरंच काही बदलतंय- लग्न, सण समारंभ कसे साजरे करावेत, सहज कुणी भेटलं तर त्यांच्याशी कसं वागावं? म्हणजे हातात हात घेऊ नये, पाठीवर थाप मारू नये, वगैरे. असं बरचं काही बदललं...

कोरोना विषाणूच्या आधीच्या जगात बरं होतं. तेव्हा आपण परिस्थितीत बदल करून समस्यांना उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचो. पण आता कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या नवीन जगात कोरोनासोबतच टिकून रहायचं असेल तर आपल्याला स्वतःमध्येच बदल करणं गरजेचं ठरणार आहे, किंबहुना त्याचीच मदत होणार आहे.

‘बदल’ हा शब्द आल्याबरोबर आपल्याला सर्वांनाच बाय डिफॉल्ट रिस्पॉन्स देण्याची सवय असते. आपलं मन ‘बदल’ या गोष्टीलाच विरोध करणारं असतं. तुम्ही आठवून पहा कितीतरी वेळा आपणही ठरवलंय की मला माझ्यात हा विशिष्ट बदल घडवून आणायचा आहे. उदा. रात्री लवकर झोपायचं आहे, किंवा या वर्षी वाढदिवसापर्यंत वजन कमी करायचं आहे, माझी अमुक एक सवय मोडायची आहे.

आता असा कोणताही बदल करायला आपण कसा आणि किती वेळ घेतो, त्यासाठी आयुष्यात कितीतरी वेळा संकल्प करतो, त्या संकल्पांचं पुढे काय होतं... हे पण तुम्हाला माहितीच आहे. ही स्वत:मध्ये बदल करण्याची गोष्ट एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला रोजच्या जगण्यातले साधे-साधे बदल आपल्याला चालत नाहीत.
‘झोपेची जागा बदलली. मला नाही चालत....’, ‘माझ्या खुर्चीवर का बसलीस तू?’, ‘आज पावभाजी करणार होतीस ना तू?’  बऱ्याचदा झोपेची जागा बदलली अशासारख्या छोट्या छोट्या बदलांनी कमालीचे अस्वस्थ होत जातो आपण. त्यामुळे ‘बदल’ या शब्दासोबतच आपलं एक प्रत्येकाचं असं खास नातं आहे आणि आता या कोरोना विषाणूच्या निमित्ताने ‘बदल’ या शब्दाशीच असणारं नातं आता तपासून बघण्याची वेळ आली आहे.

काय नातं आहे माझं ‘बदल’ या गोष्टीसोबत?

‘बदल म्हटलं की मला कंटाळाच येतो, नकोसंच वाटतं.’ ‘बदलांच्या बाबतीत मला आरंभशूर म्हणता येईल.’ ‘बदल करायला हवेत असं पटतं माझ्या मनाला पण.. काय करू? कळतं पण वळत नाही.’ ‘बदल ना... करूना... बघू वेळ आली की ... ’ ‘बदल? कशाला करायचा..काय फरक पडणार आहे शेवटी?’ ‘कित्ती ठरवते हे करायचं म्हणून पण जमतच नाही.’ ‘बदल करायला सुरुवात करतो मी पण सातत्यच नाही ठेवता येत.’ ‘पण मीच बदल का करू?’, असं काहीही असू शकतं. ‘बदल’ करायचा म्हटला की तो न करण्याची हजारो कारणं असतात. आणि बदलांना विरोध करण्याची प्रत्येक व्यक्तीची त्याची त्याची एक पध्दतही असते. विरोध करण्याची तुमची खास पध्दत कोणती? याचा या निमित्ताने विचार करायला हवा.

इतके दिवस परिस्थितीतील बदल, इतर माणसांमध्ये बदल, जागेत बदल असे बाह्य बदल मला माझ्या आतल्या बदलांपेक्षा सोपे वाटत होते. कित्येकदा हेच करणं योग्य आहे अशी आपली ठाम समजूत होती.

पण आता परिस्थितीत बदल करणं शक्य नाही. बदल करायचा असेल तर तो मला माझ्या आत करायला हवा. माझ्या व्यक्तिमत्वात, माझ्या विचार करण्याच्या पध्दतीत, माझ्या दृष्टिकोनात, माझ्या जीवनशैलीत, माझ्या वागण्यात, माझ्या कामाच्या पद्धतीत, माझ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये..... कारण या परिस्थितीत अनिश्चितता आहे आणि ती अनिश्चित काळासाठी आहे; किंबहुना अनिश्चितता हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे आणि म्हणून मला आता या काळातून जाताना आणि इथून पुढं मी कसं असायला हवं याचं भान जागं करायला हवं... मी कसं असायला हवं? म्हणजे माझ्यात कोणते बदल करायला हवेत जे मला या न्यू नॉर्मलमध्ये, या नवीन जगातल्या आव्हानांसोबत जुळवून घ्यायला मदत करतील? त्यासाठी या कोरोनाच्या काळाआधी मला माझ्या मधल्या कोणत्या गोष्टी अडचणीच्या ठरल्या होत्या? याचा विचार करायला हवा. माझ्या व्यक्तिमत्वातल्या कोणत्या गोष्टींमुळे मी अडचणीत आले होते? कोणत्या गोष्टी माझ्या प्रगतीत अडथळा म्हणून आल्या होत्या? कोणत्या गोष्टींनी माझ्या नात्यात गुंतागुंत निर्माण केली होती?

आपण स्वतःला असे काही प्रश्न विचारले तर त्यातून नेमके कोणते बदल करायचे याची उत्तरं आपल्याला शोधता येतील. उदा. माझ्या उतावळ्या स्वभावामुळे मी चुकीचे निर्णय घेतो आणि नंतर त्याची मला भरपाई करावी लागते, माझ्या चालढकल करण्याच्या सवयीमुळे माझी कामं वेळेवर पूर्ण होत नाहीत किंवा माझ्या तापट स्वभावामुळे माझी नाती टिकून राहत नाहीत.. खरंतर काय बदल करायचा या इथपर्यंतच्या सर्व गोष्टींपर्यत आपण अगदी आरामात पोहोचतो. पण मग मोठा ‘पण’ येतो आणि ही बदलाची गाडी 

पुढे जातच नाही. बदल करणं खरंच एवढं कठीण असतं? ज्या गोष्टी मला तत्त्वतः पटलेल्या आहेत, ज्याचं महत्त्वही मला समजलेलं असतं अशा गोष्टींसाठी बदल करायला एवढे कष्ट का पडतात?

१) कम्फर्ट झोन

आपल्याला आपला ‘कम्फर्ट झोन’ प्यारा असतो. त्रासदायक परिस्थितीतही आपला एक कम्फर्ट तयार झालेला असतो. आजूबाजूची परिस्थिती आपल्या ओळखीची झालेली असते. कोणताही बदल करणं म्हणजे नवीन गोष्टींना सामोरं जाणं आणि यात एकप्रकारचा डीसकम्फर्ट येतो तो आपल्याला नको असतो. उदा. मी सर्व गोष्टी अस्ताव्यस्त ठेवतो. मला त्या गोष्टी नीटनेटक्या ठेवल्या तर त्याचा उपयोग होईल. पण त्यासाठी कष्ट घ्यायला लागतात. या अस्ताव्यस्त असण्यातच बऱ्याच गोष्टी आपण निभावून नेलेल्या असतात. त्याचा त्रास झाला तरी! मग कुठे आवराआवर करा त्यात वेळ घालवा. आत्ता काही अडत तर नाही ना... बघू नंतर.
त्यामुळे हा कम्फर्ट झोन सोडायला आपलं मन तयार होत नाही. त्यामुळे बदल का करायचा याची अनेक कारणे आपल्याला फक्त विचारांच्या पातळीवर तयार असतात पण भावनिक पातळीवर मात्र ही तयारी अजिबातच झालेली नसते.

२) आहे त्या गोष्टी तशाच चालू ठेवण्यात; थोडक्यात बदल न करण्यातही एक प्रकारचा ‘फायदा’ असतो.
सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याची अगदी मनापासून पटलेली कल्पना अमलात आणताना त्रास का होतो? कारण ती ‘पाचच मिनिटं झोपूया’ म्हणून पुढे लागणारी झोप (किती मोठी आहुती आहे हो!), किंवा गोड खाणं कमी करायला हवंय मी, स्क्रीन टाइम तर बंदच करायला हवाय. पण हे करत असताना मिळणारा आनंद, होणारा टाइमपास याची किंमत द्यायला नको वाटतं. थोडक्यात, आपल्या नकारात्मक सवयीसोबतचे ‘फायदे’ आपल्याला सोडून देणं कठीण वाटतं.

मग आपण स्वतःच स्वतःसोबत तडजोडी करायला लागतो. रोज एकच तर सिगारेट. आजचा दिवस झोपूया –उद्यापासून व्यायाम. थोडावेळच मोबाईल पाहू.

पण ही आपणच आपल्याला दिलेली सर्व वचनं टिकत नाहीत. हे सगळं असंच चालू राहिलं तर आपण कालांतराने स्वतःवर नाराज होत जातो. स्वतःच्या मनातून उतरत जातो आणि कायमचं एक निरुत्साही वातावरण मनात रेंगाळत रहातं. त्यामुळे मला बदलायचं असेल तर या तात्पुरत्या, क्षणिक आनंदापलीकडे जाऊन विचार करायला हवा आणि स्वतःबद्दल छान वाटण्याची संधी निर्माण करायला हवी.

३) ‘बदल’या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन:
बदल पटापट व्हायला हवा. मला लगेच (त्वरित, तात्काळ) अपेक्षित परिणाम मिळायला हवा. (उदा. व्यायाम करायला लागलं की आठ दिवसात फरक दिसायला हवा.) बदल आपोआप व्हायला हवा. (उदा. हा लेख वाचून, समुपदेशनाला जाऊन आपोआप बदल झाला तर...) मी केलेला छोटासा बदल इतरांच्या नजरेत तातडीने भरायला हवा. त्यांनी त्याचं लगेच कौतुक करायला हवं.... बदल सहज सोपा हवा.
आणि असं काही होणार नसेल तर जाऊदे मग! बदल या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच जर असा अडथळा निर्माण करणारा असेल तर तो दूर करणं आवश्यक आहे.

कोणताही बदल ही एक प्रक्रिया आहे. बदल होणं म्हणजे या प्रक्रियेतून जाणं. दोन पावलं पुढे-तर एक पाऊल मागे असा प्रगतीचा आलेख अनुभवणं. बदलाला सामोरं जाणं म्हणजे आपण चुका करू शकतो हे मान्य करणं; त्या चुकांनी नाउमेद न होता त्याच त्या चुका टाळण्यासाठी प्रयत्नशील रहाणं. त्यानुसार मनात कृतीचा आराखडा तयार करणं आणि मी ती गोष्ट नेमकेपणाने कशी करणार आहे. त्यात कोणते संभाव्य अडथळे येतील त्याचं मी काय करणार आहे याचं भान निर्माण करायला हवं.

४. स्वत:ला सवलत देण्याची वृत्ती:
पुढचा लेख वाचण्याआधी नियमितपणे व्यायाम न करण्याची कारण लिहून काढा. लक्षात आलं ना? आपली वृत्ती जर सतत सवलत देणारी असेल तर ‘बदल’ हा शब्दच आपण विसरून जायला हवा. ही वृत्ती जोपासली की त्याचं रूपांतर कंटाळ्यात होतं. या कंटाळ्याने अनेक आरामदायी गोष्टी करायला खतपाणी मिळते. म्हणजेच बदल करायचा असेल तर माझ्या या वृत्तीचं मी काय करणार आहे? हासुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे.

बदल ही आपोआप घडणारी गोष्ट नाही. जादूची कांडी फिरवल्यासारखे बदल होत नाहीत. बदल करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावं लागतं. कोरोना विषाणूसोबत असणाऱ्या या नव्या जगात मी का बदल करायचे आहेत हे नीट समजून घेतलं तर त्याची सातत्याने प्रयत्नशील राहायला मदत होऊ शकेल. खरं म्हणजे स्वतःमध्ये बदल करून आपल्याला सामावून घ्यायचं आहे या परिस्थितीला आणि त्यामुळे या परिस्थितीसोबत युद्ध किंवा झगडा करण्यापेक्षा तिचा स्वीकार करणं आपल्यासाठी हितकारक असणार आहे.

बदल करण्यासाठी स्वतःवर प्रेमही असायला लागतं आणि स्वतःबद्दल आदरही असायला लागतो. तरच आपल्याला आपण स्वत:शी असे का वागत आहोत असा प्रश्न पडतो.. आणि मला आयुष्यात काय महत्त्वाचं आहे आणि ते मिळवण्यासाठी मी काय करणार आहे या प्रश्नाला आपण सामोरे जातो. बदल म्हणजे ताण असंच समीकरण अनेकांच्या मनात असतं. पण आता हे समीकरण बदलायला हवं. बदल म्हणजे ताण नाही तर बदल म्हणजे विकास, वाढ..

आपण बदलायला हवं..जगण्यातला छोटासा बदलही आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढवणारा असू शकतो..

खूपच विचारात पाडलं का मी तुम्हाला? नुसता विचार करू नका... विचार कृतीत आणा.

उठा आणि कामाला लागा...

संबंधित बातम्या