स्वीकार

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 15 मार्च 2021

माइण्ड रि- माइण्ड

कोरोना विषाणू आपल्या आयुष्यात आला आणि त्याने आता ‘स्वीकार’ काय असतो याची एक शिकवणीच घेतली असं म्हणायला हरकत नाही. मुळात स्वीकाराविषयीच्या आपल्या सर्वांच्याच मनात काही गैरसमजुतीही असतात. 

गेल्या वर्षीपासून आपल्या जगण्याला कोरोना हे एक वेगळंच परिमाण निर्माण झालं. त्याबद्दल कोणी आपली (म्हणजे माणसांची, संपूर्ण जगाची) परवानगी घेण्याचा तर प्रश्नच नव्हता. तो आला. आता पहिली लाट-दुसरी लाट, त्याचे परिणाम, शाळा- महाविद्यालये कधी चालू होणार, परीक्षा कधी होणार की होणारच नाहीत? आता कायम असंच घरून काम करावं लागणार की काय? ‘बापरे! आता पुन्हा टाळेबंदी का’? या कोरोना काळाने असे अनेक प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच निर्माण केले आणि सातत्याने एक अनिश्चितता आपल्या सोबत कायमची राहायला आली. यातून आता आपली सुटका नाही..म्हणजेच मला ही परिस्थिती आवडो अथवा न आवडो मला त्या परिस्थितीचा ‘स्वीकार’ करणं क्रमप्राप्त होऊन बसलं.

‘स्वीकार’ Acceptance ही मानसशास्त्रातली अजून एक महत्त्वाची संकल्पना! स्वीकार या संकल्पनेबाबत आपण बरंच बोलतो, चर्चा करतो, पण जेव्हा गोष्टी ‘मनासारख्या’ घडत नाहीत तेव्हा स्वीकार किती अवघड असतो हे आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवलेलंच असतं. म्हणजे एखाद्या परीक्षेत, कामात किंवा नात्यात आलेलं अपयश, स्वतःच्याच स्वभावातले  त्रासदायक कंगोरे, कमतरतेची भावना, जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातल्या त्रुटी, स्वभावदोष किंवा त्रासदायक सवयी, ज्यामुळे आपल्याला खूप त्रास होत असतो पण त्याबाबत आपण काहीच करू शकत नाही, स्वतःला किंवा जवळच्या व्यक्तीला झालेल्या आजाराचं निदान, स्वतःची एखादी वाईट सवय, जवळच्या व्यक्तीने केलेली फसवणूक किंवा इतरांबाबत वाटणारी मत्सर किंवा रागासारखी भावना या किंवा अशा अनेक वेळी ‘स्वीकार’ या गोष्टीपाशी येऊन आपण थबकलेले असतो. कधी कधी त्या बरोबर आपलं एक प्रकारचं भांडणही झालेलं असतं. अशा मनाविरुद्ध झालेल्या गोष्टी स्वीकारताना आपल्या मनाचा कस लागलेलाही आपण अनुभवलेला आहे.

एकंदरीतच मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींबाबत ‘स्वीकार’ हा अवघडच वाटतो कारण अशा बाबतीत मनाच्या कक्षा खूपच रुंदावाव्या लागतात. 

    माझा जोडीदार मला असं फसवू शकतो यावर माझा विश्वासच बसत नाही. स्वतःपेक्षा माझा त्याच्यावर गाढ विश्वास होता आणि तो असं वागू शकतो?

 • माझं नातं असं तुटेल असं मला कधीच वाटलं नव्हतं अजूनही मला ते खरं वाटत नाही.
 • मला इतके कमी मार्क? शक्यच नाही.....
 • मी कधीच खोटं बोलत नाही. तुम्ही उगाच संशय घेत आहात माझ्यावर. 
 • अशा कित्येक गोष्टी येनकेन प्रकारे आपण
 • स्वीकारापासून लांब ठेवलेल्या असतात. 

पण कोरोना विषाणू आपल्या आयुष्यात आला आणि त्याने आता ‘स्वीकार’ काय असतो याची एक शिकवणीच घेतली असं म्हणायला हरकत नाही. मुळात स्वीकाराविषयीच्या आपल्या सर्वांच्याच मनात काही गैरसमजुतीही असतात. जसं स्वीकार म्हणजे असहायता (Helplessness) ‘आता काही इलाजच नाही ना... स्वीकारण्याशिवाय’़ किंवा स्वीकार म्हणजे हार किंवा स्वीकार म्हणजे कणाहीन वृत्ती किंवा बोटचेपेपणा... बऱ्याचजणांना असं काही स्वीकारण्यात एक प्रकारचं अपयशच वाटत असतं. तुम्हालाही असंच काहीसं वाटत असेल तर ‘स्वीकार’ म्हणजे काय हे समजून घेणं निश्चितच महत्त्वाचं ठरेल.

स्वीकार म्हणजे आहे ती परिस्थिती अजिबात न नाकारता, ती जशी आहे तशी बघता येणं. परिस्थिती जशी आहे तशी बघायला एक प्रकारचं धैर्य लागतं. गोष्टी आहेत तशा स्वीकारताना त्याचं कोणतंही मूल्यमापन करणं इथे अपेक्षित नाही. गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारून खरं म्हणजे आपण स्वतःला मदतच करत असतो. पण असं असलं तरी एखाद्या गोष्टीची जाणीव असणं आणि त्याचा स्वीकार होणं यात बऱ्याचदा बरंच अंतर पडत जातं. या काळात माणसं बऱ्याच भावनिक आंदोलनातून जातात. त्यासाठी आपल्याच मनाचे अनेक चढउतारही होत राहतात. 

नकार देणं (denial)  

परिस्थिती नाकारूनच जगायचं ठरवलं तर त्रास तात्पुरता कमी झाल्यासारखं वाटू शकतो पण त्याने खरे प्रश्न सुटत नाहीत. 

उदाहरणार्थ, मी काही व्यसनाधीन नाहीये. अधून मधून थोडी जास्त दारू घेतली जाते पण एवढं काही नाही. माझा कंट्रोल आहे माझ्यावर.... किंवा माझ्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलंय. कसं शक्य आहे? हं, रिपोर्टच चुकला असेल. परिस्थिती नाकारून आपण स्वीकारापासून लांब राहतोच पण त्याने आपल्याला मदत होत नाही, उलट आपल्या प्रगतीत त्याने एक अडथळाच निर्माण होतो. कोरोनाच्या काळात आपल्याला परिस्थिती आहे तशी स्वीकारण्याशिवाय पर्यायच नव्हता..(हीच ती शिकवणी..) 

समर्थन करणं
आपल्या वागण्याचं, विचारांचं, भावनांचं समर्थन करून आहे त्या परिस्थितीचा स्वीकारच न करणं.उदाहरणार्थ, आता समोरचीच माणसं अशी वागली की राग तर येणारंच ना? इथे माझ्या रागाला मी जबाबदार आहे हे आपण पूर्णतः नाकारत असतो.  

व्हाय मी?
मनाचा नकार केव्हातरी गळून पडतो आणि त्याची जागा राग घेतो, पण तेव्हा असं वाटतं मीच का? माझ्याच बाबतीत असं का? यात माझा काय दोष? परिस्थिती जेव्हा नाकारण्याच्या पलीकडे जाते तेव्हा चिडचिड वाढते, राग येतो. त्यामुळे टीकात्मक वृत्ती वाढते. स्वतःवर, इतरांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राग काढला जातो. म्हणजे मलाच कसा हृदयविकार झाला? बाकी माणसं कशीही वागत असतात त्यांना का नाही झाला? मीच का? किंवा माझ्याच आयुष्यात कशा अशा घटना घडतात? मुख्यतः गोष्टी जेव्हा मनाविरुद्ध घडतात तेव्हा हा स्वतःविषयीचा, इतरांविषयीचा, जगाविषयीचा, देवाविषयीचा राग उफाळून वर येतो आणि स्वीकारामध्ये मोठा अडथळा निर्माण करतो. 

सौदा करणं (Bargaining)

 • मला मधुमेह झालाय ते ठीक आहे पण मी आजच तर फक्त गोड खाणार आहे. (असं रोजच bargaining करणाऱ्या व्यक्ती तुम्हाला माहिती असतील)
 • अजून दोन महिने तरी आपण नातं टिकवायचा प्रयत्न करूया नं – इतक्यात नको निर्णय घेऊस तू. 
 • डॉक्टर मला एक महिना द्या. त्यात दारू नाही सुटली तर तुम्ही म्हणाल तिथे भरती होऊन जाईन मी. 

या अवस्थेतून जाताना परिस्थिती नाकारून चालणार नाही. त्रागा करून उपयोग होणार नाही हे मान्य झालेलं असतं, माहीत झालेलं असतं तेव्हा माणसं सौदा करायला म्हणजेच एका प्रकारे परिस्थितीसोबत समझोता करायचा प्रयत्न करतात. पण या अवस्थेकडे निव्वळ सौदेबाजी म्हणून पाहता कामा नये कारण या अवस्थेतून जाताना बऱ्याच व्यक्तींच्या मनात अपराधीपणाची असहायतेचीही भावना असू शकते. परिस्थिती स्वीकारण्याच्या मार्गातला हा अडथळा कसा कमी करता येईल हे नक्कीच पाहायला हवं. 

नैराश्य
परिस्थिती स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे आता कोणतेच पर्याय उपलब्ध नाहीत अशी जाणीव मनाला खोलवर भिडते तेव्हा मनाला प्रचंड नैराश्य येतं. आपण केलेल्या चुका, आपण गमावून बसलेल्या गोष्टी, झालेलं नुकसान याची प्रखर जाणीव होण्याचा तो क्षण असतो. 

 • व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होणं हाच आता पर्याय आहे नाहीतर आपण जिवंतच राहणार नाही.
 • घटस्फोट होतोय माझा, पण मला माहिती आहे माझ्याही यात खूप चुका झाल्या आहेत. 
 • मी अभ्यास केला नाही म्हणूनच तर हे अपयश आलं ना.
 • घडलेल्या गोष्टीत माझी खरंतर काहीच चूक नाही पण जे घडतंय त्याला मी सामोरं जायलाच हवंय.... 
 • या सगळ्या गोष्टी पार करत माणसं स्वीकारापर्यंत पोहोचतात. 

स्वीकार

स्वीकारापर्यत पोहोचणं ही मोठी प्रक्रिया आहे. आधी नमूद केलेल्या मानसिक चढउतारातून पुढे जाताना आपण स्वतःला समजून घेण्याची व्यक्त करण्याची संधी दिली तर परिस्थितीला स्वीकारण्याचं, सामोरं जाण्याचं बळ निश्चित मिळतं. स्वीकार म्हणजे वास्तवातली अपरिहार्यता खऱ्या अर्थाने समजणं आणि ती वाट चालायला लागणं! जेव्हा आपण घडणाऱ्या गोष्टींकडे त्या जशा आहेत तशा बघतो तेव्हा त्या परिस्थितीतल्या सर्व आवडणाऱ्या, न आवडणाऱ्या, पटलेल्या, न पटलेल्या, चुकीच्या किंवा बरोबर वाटणाऱ्या सर्व गोष्टींची दखल घेतो. याची आपल्याला त्या गोष्टींना सामोरं जायला, त्यातून मार्ग काढायला, परिस्थितीसोबत ॲड्जस्ट व्हायला मदत होते. आपण गोष्टींचा स्वीकार करतो तेव्हा असं नाही की ती परिस्थिती आपल्याला आवडायला लागेल किंवा त्याबद्दल काहीच वाटेनासं होईल किंवा त्याबाबत आपण अगदीच निर्विकार होऊन जाऊ... पण स्वीकार खरं म्हणजे आपल्याला एक प्रकारची मानसिक स्वस्थता देतो. गोष्टी नाकारात राहणं, हे असंच का ते तसंच का नाही, अशा प्रश्नासोबत झगडत राहणं यात जो मनाचा झगडा होतो त्यात आपली खूप सारी मानसिक ऊर्जा जात असते, स्वीकाराने हा झगडा संपतो आणि आपण एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात करतो. 

स्वीकार म्हणजे पूर्णविराम नाही किंवा स्वीकार म्हणजे पूर्णतः निष्क्रिय होऊन जाणंही नाही. पण स्वीकाराने आपल्याला वास्तवाची जाणीव होते. त्यामुळे आपण आता या वर्तमानातल्या क्षणामध्ये उपस्थित रहातो. स्वीकार आपल्यामध्ये परिस्थितीचं भान निर्माण करतो व या परिस्थितीतून जाताना आपण काय करू शकतो किंवा काय करू शकत नाही याचीही जाणीव निर्माण करतो. म्हणजेच स्वीकार आपल्याला सक्षम बनवतो आणि परिस्थितीची योग्य जाणीव मनात ठेवून त्यातून मार्ग काढायला शिकवतो. स्वीकार आपल्यातल्या सच्चेपणाला स्पर्श करतो.

त्यामुळे स्वीकार ही सुरुवात आहे...बदलांना सामोरं जाण्याची सुरुवात... So let’s say YES to the life!

संबंधित बातम्या