‘स्व’ची काळजी

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 12 एप्रिल 2021

माइण्ड रि- माइण्ड

टिकून राहायचं तर काहीतरी करायला हवं.. लवकर संपावा हा रस्ता असं वाटतंय पण तरी अजून बराच लांबचा पल्ला गाठायचाय हे ही लक्षात येतंय आणि म्हणून टिकून राहायचं असेल तर स्वतःची काळजी घ्यायलाच हवी.

मागच्या वर्षी ध्यानी मनी नसताना हा कोरोना विषाणू आपल्या आयुष्यात आला..मग ती अभूतपूर्व टाळेबंदी..मग पुनश्च सुरुवात...आणि जरा कुठे चार पावलं टाकून स्थिर व्हायचा प्रयत्न करतोय तर ही दुसरी लाट....अजून तिसरी पण येणार असंही म्हणतात...

मनाशी धीर धरून सगळे पुढे जाण्याचा प्रयत्न तर नक्की करतोच आहोत आणि यात कुठेतरी असं जाणवायला लागलंय बऱ्याच जणांना आणि जणींना सुद्धा की आता दमछाक व्हायला लागली आहे. अशा पद्धतीने राहाण्याची, सतत काम करण्याची तशी सवयच नव्हती आपल्याला आणि आता हे सगळं रेटून नेता नेता जीव दमत चाललाय..सतत दडपणाखाली राहिल्या सारखं...कधी जाणार हा विषाणू..

पण आपण सगळे शहाणे आहोत म्हणून हे कधी संपणार? असा प्रश्न मनात येऊनही आपण त्यावर फारसं बोलत नाही किंवा मान्यही करतो की लागणारच आहे बहुधा खूप वेळ अजून! पण आता यात टिकून राहायचं तर काहीतरी करायला हवं.. लवकर संपावा हा रस्ता असं वाटतंय पण तरी अजून बराच लांबचा पल्ला गाठायचाय हे ही लक्षात येतंय आणि म्हणून टिकून राहायचं असेल तर स्वतःची काळजी घ्यायलाच हवी.

कोणी म्हणेल काय असते ही स्वतःची काळजी? कोणाला असं वाटेल शिकवलंच नाही आम्हाला कधी कोणी काळजी घ्यायला. कुणाला असं वाटेल इतके दिवस वेळच नव्हता आमच्याकडे स्वतःकडे बघायला आणि आता वेळ आहे पण काय कशी काळजी घ्यायची असते स्वतःची, हे माहितीच नाहीये. खरंतर बऱ्याच जणांना असंही वाटेल की माहिती आहे आम्हाला काय सांगणार आहेस ते.. परत आपलं तेच- व्यायाम करा, विश्रांती घ्या, नीट खा... फार फार तर म्हणेल हे, की कडक निर्बंध संपले की हेअर स्पा नाहीतर हेड मसाज घ्या.

पण खरं सांगू मी तुम्हांला एकही ॲक्टिव्हिटी सुचविणार नाहीये. कारण मला माहिती आहे आपल्या सगळ्यांकडे अशा ॲक्टिव्हिटीचा खजिना आहे. पण विचार करून पहा खरंतर स्वतःची काळजी घेणं, हे इतकं वरवरचं असतं का? बऱ्याच जणांना यात असंही वाटतं की ही अशी स्वतःची काळजी घेत राहणं म्हणजे खूप आत्मकेंद्री -सेल्फिश -होणं, बऱ्याच जणांचे असे आणखीही बरेच गैरसमज असतात. 

तर स्वतःची काळजी घेणं म्हणजे काय?

स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःचं संरक्षण करायला शिकणं; म्हणजे अशा  गोष्टी करणं ज्यामधून तुमचा ताण कमी व्हायला त्याची मदत होईल. स्वतःची काळजी घेणं म्हणजे आपण आपल्याला जमतंय त्याहीपेक्षा खूप जास्त करतोय का याची जाणीव होणं आणि मग आवश्यक बदल करण्याचा प्रयत्न करणं. 

स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःचं शारीरिक, मानसिक स्वास्थ्य जपायचा सातत्याने आणि आवर्जून प्रयत्न करत राहणं.

स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःकडे लक्ष देण्याची स्वतःला परवानगी देणं... तशी मुभा स्वतःला देणं. मी बऱ्याचदा असं पाहिलं आहे बऱ्याच जणांच्या यादीत या स्वतःची काळजी घेण्यासाठी जागाच नसते. अगदी समजत असून, समजावून सांगून सुद्धा माणसं त्यांच्या जगण्यात हा मुद्दा सामावून घेत नाहीत. ‘आमच्याकडे वेळ नाही हे सगळं करायला’, असाही एक मुद्दा त्यात असतो..

मी असंही पाहिलं आहे की याबाबतीत काही सुचवायला गेलं तरी मनातून ते ऐकायला, ही विरोध केला जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती काय बोलते आहे हेच खूप जणांना ऐकू येत नाही. पण या सगळ्याची आपण काय किंमत मोजतो याचं भान येतं तेव्हा ते खूपच त्रासदायक झालेलं असतं आणि म्हणून prevention is better than cure हा मंत्र लक्षात ठेवून आपण सर्वांनी या विषयाकडे स्वतःला वळवायला हवं.

यातलं दुसरं टोक म्हणजे स्वतःची अति काळजी घेणं.. यात माणसं इतकी आत्मकेंद्री होतात की जे स्वतःपलीकडे कुणाचाच विचार करत नाहीत. मग फक्त स्वतःला जपण्याच्या नादात आपल्याच कोशात बसून राहातात आणि असाही जगण्याला न्याय देत नाहीत कारण ते जगण्याला सामोरेच जात नाहीत.

त्यामुळे खरं म्हणजे स्वतःची काळजी घेणं हा जगण्याला सामोरं जाण्याचा एक दृष्टिकोन आहे, हे एक मूल्य आहे, म्हणून स्वतःची काळजी घ्यायची असे म्हटल्यावर फक्त काय काय करायचं हे माहीत असून उपयोग नाही. नाहीतर मग फक्त टिकमार्क केल्यासारखं आपलं जगणं होईल.. आणि सर्वात महत्त्वाचं काहीतरी झाल्यावरच स्वतःकडे लक्ष द्यायला हवं असं नाही तर आपलं अगदी उत्तम चाललं असेल तरी स्वतःची काळजी घेणं आणि घेत राहणं याला पर्याय नाही.

त्यामुळे कोरोना विषाणूच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात झालेले बदल आणि त्यात येत जाणारा ताण; या आत्ताच्या काळातून जाताना तर याची विशेष गरज आहेच पण एकंदरीत इथून पुढे जगण्याला सामोरं जातानाही आहेच, याचं भान आपण सर्वांनी सतत ठेवायला हवं.

जेव्हा आतासारखी तणावपूर्ण परिस्थिती आहे अशावेळी स्वतःची काळजी घेणं म्हणजे ताणतणावांना सामोरे जाण्यासाठी काही तातडीचे मार्ग वापरण्या सारखं आहे. (महत्त्वाचं आहे हे सुद्धा..) पण ही त्यावेळेची गरज बनते म्हणून आपण करतो. पण स्वतःची काळजी घेणं हा आपल्या जगण्याचाच भाग असेल तर त्याचा, एकंदरीत आपल्या स्वास्थ्यावर चांगला परिणाम होतो व अशा अवघड काळातून जाताना एकंदरीत संतुलन राखायला त्याची मदत होते.

तर स्वतःची काळजी घेताना लक्षात घेण्याचे मुद्दे

छोट्या छोट्या गोष्टींनीही खूप फरक पडू शकतो. एवढी कामं संपली आणि वेळ मिळाला की मी हे सगळं करू शकेन असं सतत स्वतःला ‘होल्ड’वर टाकण्यापेक्षा छोट्या गोष्टींनी सुरुवात करता येईल का? याचा विचार करू या. खरंतर स्वतःची काळजी घेण्यासाठी फार काही मोठं करायचंच नाहीये. सगळ्या गोष्टी छोट्याच आहेत. आपण फक्त सुरुवात करायची आहे.

    स्वतःची काळजी घेण्यासाठी काही साधे प्रश्न पण लक्षात ठेवायला हरकत नाही.

१) मी वेळेवर जेवले का?

२) मी वेळेवर झोपले का? मी व्यवस्थित झोपले का?

३) मी व्यायाम केला का?

४) मी पाणी प्यायलं का?

५) आज मी स्वतःची काळजी घेण्यासाठी काय काय केलं किंवा करणार आहे?

६) आताच्या या काळात मी काय करू शकते? कारण आता एका नवीन गोष्टीतून आपण जात आहोत त्यासाठी बरेच बदल करावे लागत आहेत. त्याचा ताण येत असताना आत्ता कोणत्या गोष्टी आपण करू शकतो हे ही यात लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे या काळात फक्त विश्वासार्ह बातम्या ऐकणं), सोशल मीडियावर सतत वेळ न घालवणं हा स्वतःची काळजी घेण्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. 

     स्वतःची काळजी घेणं – हा प्रत्येकासाठी वेगळा मुद्दा आहे. मला जे आवडेल, पटेल, रुचेल आणि ज्याची मदत होईल त्याची दुसऱ्याला मदत होईलच असं नाही. म्हणून मला माझी काळजी घ्यायची असेल तर मी कशी घ्यावी याची पण एक जाणीव आपण निर्माण करायला हवी. आपण ज्या गोष्टी मनापासून करतो त्याची आपल्याला निश्चितच खूप मदत होते. म्हणून मला साजेशी होणारी ‘ॲक्टिव्हिटी कोणती’ ही निवड आपली आहे. (कपडे घेताना कसे आपण विचार करून घेतो ना.. तसंच इथेही थोडा विचार करून निर्णय घ्यायचाय).

स्वतःची काळजी घ्यायची तर अनेक गोष्टींचा विचार करता येईल. पण मुख्यतः तीन पातळ्यांवर विचार करता येईल. विचार, भावना, वर्तन

    माझी विचार करण्याची पद्धत कशी आहे? मनातल्या मनात आपण सतत स्वतःची परीक्षा घेतोय का? स्वतःवर सतत टीका करतोय का? नावं ठेवतोय का? सतत कसली तरी शिक्षा देतोय का? या स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल करणं, आपल्यामध्ये कमतरता आहेत – ‘I am not good enough’ या भावनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं हे यात महत्त्वाचं.

    स्व-संवाद, आतला आवाज यात खूप महत्त्वाची मदत आपल्याला करू शकतो. त्या स्व-संवादावर आपल्या भावना अवलंबून असतात म्हणून त्याकडेही लक्ष द्यायला हवं.

    आपल्याला कोणत्या गोष्टींचा ताण येत आहे, त्यामुळे मला कोणत्या भावना जाणवताहेत त्या भावनांची दखल घेणं – त्या बोलून अथवा लिहून व्यक्त करणं हे ही महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःच्या भावनांची काळजी घेणं, त्या योग्य पद्धतीने हाताळायला शिकणं महत्त्वाचं.

    जीवनशैलीतले बदल : आपली जीवनशैली कशी आहे? आपण कसे जगत आहोत – यामध्ये स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली -व्यायाम, झोप, आहार -या तर गोष्टी आल्याच पण स्वतःबद्दल छान वाटावं असं आपण काही करतो आहोत का? आणि म्हणून जगण्याची गुणवत्ता कशात असू शकते हा ही विचार यात करायला हवा.

    या सगळ्याचा अर्थ सतत गंभीर राहणं असा नक्की नाही. आपल्याला मजा करून हसताही यायला हवं, रिलॅक्स होता येणं ही तितकंच महत्त्वाचं. यात आपले छंद ही जोपासायला हवेत.

    इतरांसोबतच्या नात्याचा विचार यात महत्त्वाचा. नाती ही आपला आधार असतो. आणि मनापासून बोलायला; शेअर करायला आपल्याला आपली माणसं हवी असतात. नात्यांमधून आपल्याला ऊर्जा मिळत असते. आणि ही परस्परांना पूरक अशी प्रक्रिया आहे. अशी नाती जोपासणं हे ही आपल्यासाठी या स्वतःच्या काळजीमध्ये महत्त्वाचं आहे.

स्वतःची काळजी घेणं हा तसा न संपणारा विषय. आत्ता या काळात आपल्याला त्याचा विचार करायची संधी मिळाली आहे म्हणून आपण आत्ता या विषयात स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

स्वतःची काळजी घेण्याने आपण आपल्या मनाच्या काटकतेला खतपाणीच घालत असतो. इथून पुढच्या आपल्या जगण्यासाठी हा resilience – मनाची काटकता वाढवणं नक्कीच महत्त्वाचं आहे

संबंधित बातम्या