एकाकीपणा

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 24 मे 2021

माइण्ड रि- माइण्ड

आपल्याला कुणाचाच फोनही येत नाही बरेच दिवस... मग सगळे मला विसरून गेले की काय असंही वाटायला लागतं.. आणि एकाकीपणाची भावना मनात जाणवायला लागते.

कोरोना विषाणूचा प्रसार, त्यामुळे होणारा आजार आणि त्याच्या परिणामांना रोखायचे असेल तर घरीच थांबा, बाहेर जाऊ नका, कुणालाही भेटू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा... गेले काही दिवस आपण सगळेच हे ऐकतो आहोत आणि तसे वागतही आहोत. पण माणसाला मुळात अशी वागायची सवय नाही. 

मुळात माणसाला नाती जोडायला आवडतं. त्याला प्रेमाची गरज असते. नाती माणसाला मानसिक पातळीवर सुरक्षितता देतात आणि म्हणून जोडलेलं राहाणं, समाजासोबत राहाणं ही गोष्ट आपसूकच होते आपल्याकडून. पण आत्ता या कोरोना संसर्गाच्या काळात जगण्याचा, माणसांसोबत राहण्याचा, जोडलं जाण्याचा हा ताल अचानक थबकला. प्रत्येक नात्यात, प्रत्येक माणसाला पाहताना आपल्याला त्याच्यात आणि आपल्यात तो न दिसणारा विषाणू दिसायला लागला. सहज कुणाशी बोलता येत नाही, कुणाला भेटता येत नाही, आपल्यात आणि इतरांमध्ये उगाचच एक अंतर पडत चाललंय असं वाटत राहतं. दररोज भेटत असणारी माणसं भेटत नाहीयेत. मग त्यांच्या सोबतच्या गप्पा, वेळ घालवणं तर पुढची गोष्ट.

बोलणं, गप्पा मारणं, एकंदरीतच वावरणं यातली सहजताच आता संपल्यासारखी वाटतेय. आपल्या आसपासच्या परिघात कोणी येत नाही ना याचं भान बाळगत वावरावं लागतंय. व्हिडिओ कॉल, व्हर्च्युअल गॅदरिंगनी मजा येते; पण मग त्या गप्पांमध्ये जोक आवडला म्हणून जोरात टाळी देता येत नाही आणि खूप दिवसांनी कुणी दिसलं म्हणून पाठीवर थाप मारता येत नाही. थोडक्यात सहज वाटणारा, नकळतपणे आपल्या नात्यात असणारा स्पर्श हरवला आहे. एकंदरीत एकमेकांना सहजपणे भेटायला, बोलायला मर्यादा आल्या आहेत. आपल्यामुळे कुणाला त्रास व्हायला नको आणि आपल्याला कोणामुळे व्हायला नको या दडपणाखाली वावरताना मोकळा संवाद करायलाही अडचणी येत आहेत.

“आमचा मुलगा शिक्षणासाठी घर सोडून परदेशी शिकायला गेला तेव्हाही इतका एकटेपणा जाणवला नव्हता.”

“कांदा कैरीची चटणी केली आणि तुला देताच येत नाहीये...”

“किती दिवस झाले आपण भेटूच शकलो नाही,” अशी वाक्य ऐकायला मिळतात आणि माणसाच्या एकटेपणाची जाणीव होतेय. सध्याच्या काळात अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण जवळच्या माणसांना मिस करतोय.

या काळात प्रत्येक माणूस आपली स्वतःची लढाई लढण्यात मग्न आहे आणि यात आपल्याला कुणाचाच फोन येत नाही बरेच दिवस... मग सगळे मला विसरून गेले की काय असंही वाटायला लागतं.. आणि एकाकीपणाची भावना मनात जाणवायला लागते.

खरंतर इतर कोणतंही आव्हान आपल्यासमोर आलं तर एकमेकांना आधार द्यायला आपण पुढे धावतो. कोणत्याही  संकटात एकमेकांना धरून, एकमेकांच्या सोबतीने पुढे जातो पण आत्ता सध्या तशी परिस्थिती नाही. साथीचा आजार असल्याने नेमकी विरुद्ध कृती करायला भाग पडत आहे. हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातला सर्वात मोठा असा काळ आहे जो आपल्याला अशा तऱ्हेने एकांतात, फारसं कुणाबरोबर न मिसळता घालवावा लागत आहे. आणि हे सगळं आपल्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध आहे. आणि मग त्यातूनही एकाकीपणाची भावना जोपासली जात आहे.

या निर्बंधांच्या काळातून जाताना आपण आपल्या स्वतःसोबत राहतानाही अस्वस्थ करणारे बरेच प्रश्न मनात उभे राहातात. त्या प्रश्नांची काही उत्तरं असतातच असं नाही. असे विचार व्यक्त करायला, मन मोकळं करायलाही जमतंच असं नाही. कारण जिच्यासोबत हे करावंसं वाटतं तशी व्यक्ती भेटतेच/ उपलब्ध असतेच असं नाही.

कोरोना विषाणूच्या आधीच्या जगात या एकाकीपणातून बाहेर पडायला वाव होता कारण तेव्हा परिस्थितीवर आपलं काही प्रमाणात तरी नियंत्रण होतं पण आत्ता सध्याच्या काळात तेही नियंत्रण नाही आणि आपलं आपल्या जगण्यावरचं काही नियंत्रण नाही या भावनेतूनही एकाकीपणा वाढायला लागतो. 

थोडक्यात सांगायचं तर कोरोनाची साथ पसरत जाताना तो थांबवायला आपल्या जगण्यावर बरेच निर्बंध आले आणि त्यातून एकाकीपणाची साथ पसरायला लागली आहे का? असा प्रश्न पडायला लागला आहे.

मागच्या वर्षी टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात एकमेकांच्या चौकशीसाठी आवर्जून केले जाणारे फोन, एकमेकांच्या चौकशा, व्हिडिओ कॉलचे नावीन्य कमी होत चालले आहे, आणि आपल्या माणसांना प्रत्यक्ष भेटण्याची ओढ वाढायला लागली आहे. कारण आता तो समोर समोर बसून केलेला संवाद, एकमेकांना दिसणं याची ओढ वाटू लागली आहे. 

एकाकी वाटणं 
काय वाटतं नेमकं अशावेळी? कधी ना कधी, काही कारणाने ही भावना आपल्यापैकी सर्वांनी कमी अधिक प्रमाणात अनुभवली आहेच. आपल्याला एकाकी वाटतं तेव्हा त्यात एकप्रकारची तगमग, एक अस्वस्थता असते. मला माझ्या नात्यांकडून काही (महत्त्वाच्या) गरजा असतात, काही अपेक्षा असतात आणि मला असं ‘वाटतं’ की मला ते मिळत नाहीये, त्या गरजांकडे लक्ष दिलं जात नाहीये, त्यांची काळजी घेतली जात नाहीये. जेव्हा ही तफावत जाणवत राहाते तेव्हा ती एकाकीपणाची भावना जाणवायला लागते.

जेव्हा मला एखादी गोष्ट व्यक्त करावीशी वाटते पण मला व्यक्त करायला तशी जागा, तसं नातंच सापडत नाही तेव्हा एकाकी वाटायला लागतं. एखाद्या नाजूक क्षणी मला कुणाचा तरी आधार हवासा वाटतो तो मला मिळत नाही तेव्हा या पृथ्वीवर आता आपण एकटेच आहोत असं वाटायला लागतं.

एकाकीपणा म्हणजे फक्त माणसांची अनुपस्थिती नाही; पण अशा माणसांची अनुपस्थिती ज्यांना माझं म्हणणं समजून घेता येईल, ज्यांच्याशी मला मनापासून आणि मनातलं बोलता येईल. आणि त्यामुळेच अगदी माणसांच्या गराड्यातही कित्येकांना एकाकी वाटत राहातं कारण आसपासच्या माणसांच्या मनापर्यंत त्यांना पोहोचताच येत नाही. या निर्बंधांच्या काळातून जाताना अनेकांना एकटं राहावं लागतंय आणि जाणवणाऱ्या भावनिक ताणामुळे एकटं ..एकाकी वाटतंय.

एकटं असणं, एकांतात असणं आणि एकाकी वाटणं, एकटं वाटणं यामध्ये फरक आहे.

जेव्हा कुणालाही एकाकी वाटत असतं, एकटं वाटत असतं तेव्हा त्या भावनेनं आपल्या मनाचा कोपरा न कोपरा व्यापून टाकलेला असतो. आपण सर्वांपासून तुटत गेलेलो आहोत. जी नाती आपल्याला सुरक्षितता देत होती त्या नात्याचे बंध तुटले गेले आहेत, विसविशीत झाले आहोत, त्यात अंतर पडलं आहे असं वाटायला लागतं. आपण काही गमावून बसलो आहोत अशी ती भावना असते. या जगात आपण काहीतरी वेगळे आहोत अशीही ती भावना असते. त्यामुळे एकाकी वाटणाऱ्या व्यक्तीला अपूर्ण, अधुरं वाटत राहतं. पण ज्या व्यक्तींनी स्वतःचा स्वीकार केलेला असतो, आपण सक्षम आहोत असं ज्यांना वाटत असतं, मुख्यतः ज्यांना स्वतःची काळजी घेता येते, ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो अशा व्यक्तींना एकटं राहताना एकाकी वाटत नाही.

त्यामुळे आत्ताच्या काळातून जाताना आपण एकांतात राहात आहोत, एकटे राहात आहोत पण आपल्याला एकाकी वाटतंय का? आणि तसं वाटत असेल तर त्याची बाह्य परिस्थितीतील कारणं शोधण्यासोबत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील कारणंही शोधायला हवी, समजून घ्यायला हवी.

‘एकाकी वाटणं’ यावर भारतात फारसं संशोधन झालेलं नाही. पण एका सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की भारतातल्या जवळ जवळ पन्नास टक्के लोकांना मधून मधून एकटं वाटत असतं. ही एकटेपणाची भावना फक्त वयोवृद्ध माणसांमध्येच असते असं नाही तर आत्ताच्या तरुण पिढीलाही या एकाकीपणाच्या भावनेने ग्रासलं गेलं आहे.

या कोरोनाच्या काळामध्ये आपण एकटे राहायला लागलो, स्वतःमध्ये डोकावून पाहायला लागलो आणि कदाचित आपल्यामध्ये असणाऱ्या या एकाकीपणाची जाणीव व्हायला लागली. सतत आणि दीर्घकाळ एकटं वाटण्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. एकतर एकाकी वाटणाऱ्या व्यक्तीला समोर असणारी तणावपूर्ण परिस्थिती अधिकच तीव्रतेने जाणवायला लागते. या व्यक्तींना बेचैनी जाणवत राहते, त्यांच्या झोपेवरही परिणाम झालेला असतो त्यामुळे त्यातूनही सतत थकवा जाणवत राहातो. सतत चिडचिड होत राहाणं, चिंता वाटत राहणं, नैराश्य असे त्रास या व्यक्तींना होऊ शकतात. कधीकधी यातून वजन वाढणं व त्याचेही दुष्परिणाम होत राहातात. कधी कधी या व्यक्ती खूपच आत्मकेंद्री होतात तर कधी स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष करत राहातात. या व्यक्तींना या भावना फारच तीव्र झाल्या तर त्यातून आत्महत्येचे विचार, व्यसनाधीनता या गोष्टीही वाढायला लागतात.

या लॉकडाउनच्या काळातून जाताना काही प्रमाणात एकटं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण ही जर भावना त्रासदायक वाटत असेल तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

काय करता येईल?
    या सर्व परिस्थितीचा आपण काय विचार करतो आहोत, याची जाणीव निर्माण करा. कधीकधी मूळ परिस्थितीपेक्षा त्या परिस्थिती बद्दलचा विचार आपल्या मनावर ताण निर्माण करतो.

 • मला कोणाचा आधार वाटतो, कोण मला समजून घेतं अशा व्यक्तींची यादी करा. त्यांच्याशी रोज बोलायलाच हवं, त्यांना फोन करायलाच हवा असं नाही पण या व्यक्ती माझ्यासोबत आहेत ही भावना दिलासा देणारी असते.
 • आपल्याकडे असणाऱ्या चांगल्या गोष्टींची नोंद घ्या आणि त्याबद्दल कृतज्ञ राहा. 
 • निसर्गाशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा.
 • आपल्या भावनांना नाकारू नका. आपल्याला वेगवेगळ्या सकारात्मक नकारात्मक भावना जाणवू शकतात. अशा काळातून जाताना आपल्याला जसं वाटतं आहे तसं वाटण्याची मुभा स्वतःला द्या.
 • ज्यांच्याशी बोलून बरं वाटेल अशा व्यक्तींच्या संपर्कात राहा.
 • आपल्या रोजच्या जगण्यातही छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका.
 • सजगतेने जगण्याचा प्रयत्न करा.
 • मनातल्या भावना लिहून काढा.
 • गरज वाटली तर हेल्पलाइनची अथवा समुपदेशकाची मदत घ्या.
 • स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, स्वतःची काळजी घ्या.
 • या काळाचा स्वतःसोबत नातं जोडण्यासाठी, स्वतःसोबत मैत्री करण्यासाठी, स्वतःसोबत संवाद वाढवण्यासाठी उपयोग करा

संबंधित बातम्या