नाते वेळेशी...

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 21 जून 2021

माइण्ड रि- माइण्ड

कोरोनाच्या या काळात जरा बघूया आपल्या आणि वेळेच्या नात्याकडे! वेळेशी असलेल्या नात्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वावर काम करायला हवं.

गेल्या वर्षी टाळेबंदी झाली आणि वेळेचं अस्तित्व खूपच प्रकर्षाने जाणवायला लागलं. एरवी (म्हणजे कोरोनाच्या आधी) वेळ कसा जातो ते समजत नव्हतं. पण या टाळेबंदीच्या निमित्ताने ‘वेळ’ ही गोष्ट सारखी दिसायला लागली, जाणवायला लागली. कळत नकळतपणे आपण सर्वजण वेळेचा खूपच विचार करायला लागलो. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक प्रश्न रेंगाळत राहिला.. “आता हे एवढे एकवीस दिवस करू आपण वेळ मॅनेज, पण हे जर अजून काही ‘काळ’ लांबवलं गेलं तर मात्र.....” 

त्यानंतर टाळेबंदी बरीच लांबत गेली. मग दुसरी लाट आली, आपण परत निर्बंधांना सामोरे गेलो.. . आणि या काळात वेळ ही गोष्ट होतीच आपल्यासोबत... म्हणजे ती असतेच.

गेल्या वर्षी दूरदर्शनवर ‘महाभारत’ नावाची मालिका सुरू होती. आणि त्यातलं ‘समय’ ‘काळ’ हे आपल्याशी संवाद साधणारं पात्र… वेळेचा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा ‘काळ’ आणि ‘वेळ’ या दोन गोष्टी मनात येतात. किती काळ निघून गेला असं आपण म्हणतो तेव्हा या काळात खूप काही साठवलेलं असतं. कोरोनाचा काळ ही आपल्या आयुष्यातल्या कालखंडामधली एक महत्त्वाची खूण झाली.. आपल्या वेळेला कोरोनाच्या आधी आणि कोरोनाच्या नंतर असं एक परिमाण निर्माण झालं आणि याच कोरोनाच्या  काळात आपण कदाचित वेळ या गोष्टीची एक खोलवर आपल्या सर्वांच्या मनात जाणीव निर्माण झाली. 

वेळेचं भान जागं करणारा असा एक काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. तसं आत्ता या कोरोनाच्या निमित्ताने हे वेळेचं भान जागं झालं आपल्या सर्वांचं!

टाळेबंदी सुरू झाली आणि मग अनेकांनी काय काय करायचं याच्या याद्या तयार केल्या. त्यात झोप, सिनेमे पाहणे, छंद जोपासणे, नवीन दिनक्रम आखणे, व्यायाम अशा बऱ्याच गोष्टी आपण उत्साहाने करायला लागलो. कारण तेव्हा तरी हे सगळे मर्यादित काळासाठी आहे असंच आपल्या सर्वांना वाटत होतं. त्यामुळे अशी संधी परत मिळणार नाही  मग घ्या त्या वेळेचा उपयोग करून.. आहेच वेळ तर छान वेळ घालवायचा असं बरंच काही मनात ठेवून बरेच प्लॅन केले.. आणि हे सगळं मर्यादित काळासाठीच आहे म्हणून आपण वेळेसोबत अगदी शहाण्यासारखे, अगदी आदर्शरीतीने वागत आलो.. चार दिवसाच्या पाहुण्याचं आपण जसं आगत-स्वागत करू तसं... त्या पाहुण्यासोबत आपण छान वागू अगदी तसंच... कारण तोपर्यंत वेळ अमर्याद असतो अशीच आपली (भ्रामक) समजूत होती. त्यामुळे कोरोनाच्या आधीच्या काळात आपण वेळेला गृहीत धरलेलं होतं. पण या टाळेबंदीच्या निमित्ताने एक समजलं की आपण खरंतर इतकं वेळेचं भान ठेऊ शकतो, वेळेचं इतकं छान नियोजन करू शकतो मग इतर वेळेस काय होतं आपल्या आणि या वेळेचं?

 • कसे वागतो आपण या  वेळेसोबत?
 • वेळेची किंमत नसल्यासारखे...... 
 • की सतत तिला पकडायचा प्रयत्न करतोय, धावतोय आपले तिच्यामागे
 • की सतत कसला तरी ताण आहे वेळेमध्ये आणि आपल्यामध्ये... न दिसणारा अदृश्य ताण
 • की वेळ आणि आपण समांतर चालतो आहोत वर्षानुवर्षे. तू तुझी चालत राहा, काय वाट्टेल ते कर- मी माझी चालत राहीन.
 • वेळ सतत खेचतेय आपल्याला की आपल्यात आणि वेळेत एक रस्सीखेच सुरू आहे..
 • का आपण आपला नुसता वेळ ढकलतोय?
 • खू ऽऽऽ प वेळ आहे आपल्याकडे की वेळेची कमतरताच जाणवतेय सतत?
 • की वेळेचा तो सेकंद काटा आणि तुम्ही सतत शर्यत लावता आहात, कोण जिंकतय म्हणून?
 • तर काय वाटतं तुम्हांला कसं नातं आहे तुमचं ‘वेळे’बरोबर?

या कोरोनाच्या आधी वेळेचं आणि आपलं काही वेगळंच गणित होतं आणि आत्ता सध्या ते बदललेलं आहे. खूप छानच वाटतंय खरं म्हणजे आत्ता वेळेकडे पाहताना पण गेल्या वर्षीपासून हा कोरोनाचा काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसे कसे वागत गेलो आपण वेळेसोबत? परत आधी सारखेच…? आणि तसं असेल ना तर नक्कीच विचार करायला हवा. 

वेळेसोबतचा हा प्रश्न आहे ना, तो या निमित्ताने एकदा सोडवायला हवा.. तर हा प्रश्न सोडवायचा असेल तर आधी समस्या नेमकी समजायला हवी आणि आता वेळेत तर काही समस्या असूच शकणार नाही, कारण वेळ अतिशय निष्क्रिय गोष्ट आहे, आणि ती सर्वांशीच एकसारखंच वागते. ती कुणाबरोबरही कसलाही भेदभाव करत नाही. 

 • वेळेबरोबरच्या नात्यातला समस्या निर्माण करणारा घटक..
 • तर समस्या निर्माण करणाऱ्या या घटकाला जरा तपासून पाहू या.
 • तुम्ही वेळेचं अगदी काटेकोरपणे नियोजन करता आणि काहीही झालं तरी त्यात बदल केलेला, झालेला तुम्हाला आवडत नाही किंवा चालत नाही.
 • तुम्ही वेळेचं अतिशय काटेकोर नियोजन करता पण शेवटी तुम्ही त्यातली एकही गोष्ट न करता वेगळंच काही करता. (आपल्याला सगळ्यांना नवे वर्ष,  वाढदिवस या निमित्ताने केलेले आपले संकल्प माहिती आहेतच..)
 • ठरवलेल्या गोष्टीत चालढकल करत राहणं, आपल्या प्राधान्यक्रमांना महत्त्व न देणं आणि वेगळंच काही करत राहणं असा पॅटर्न आहे का तुमचा?
 • तुम्ही कधीच कोणतंही काम वेळेवर करूच शकत नाही का? कधीही कोणत्याही कामाला-उशीर, कुठे पोहचायचंय -उशीर. यांच्या कोणत्याही गोष्टीला उशीर अशी ख्याती आहे तुमची?
 • तुम्ही सतत घाईत असता का? सतत अर्जन्सी असणारे.
 • की तुम्हाला कसलीच अर्जन्सी नसते? निवांत एकदम.. होईल तेव्हा होईल.
 • वेळेमध्ये आणि आपल्यामध्ये काही खास पॅटर्न असतात. बहुतांश वेळा आपण त्या पॅटर्नप्रमाणे वागत राहातो. त्यामुळे वेळेबरोबरचं नातं जर बदलायचं असेल तर आपला पॅटर्न समजायला हवा आणि त्यात बदल करायला हवा.

वेळेच्या नियोजनाविषयीचे वर्कशॉप किंवा मोबाईलवरची वेगळी अॅप किंवा प्लॅनर हा प्रश्न सोडवू शकणार नाहीत. त्यातून आपल्याला उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी समजतातही पण त्या अमलात पण आणाव्या लागतात.

आपण आपल्या वेळेकडे कसे पाहतो? आपण वेळेला किती महत्त्व देतो? वेळेला कसं हाताळतो यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या बऱ्याच गोष्टी समजतात. उदाहरणार्थ, तुम्ही वेळेचा अपव्यय करत असाल तर खरं म्हणजे तुम्हाला स्व-आदराची भावना कमी आहे असं म्हणता येईल. 

म्हणजेच वेळे सोबतचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वावर काम करायला हवं. म्हणून स्वतःला काही प्रश्न विचारायला हवे.

 • या कोरोनाच्या काळापूर्वी आपण वेळ कसा वापरत होतो?
 • या कोरोनाच्याच्या काळात आपण आत्ता वेळ कसा वापरत आहोत?
 • आणि यानंतर वेळ मला कसा वापरायचा आहे?

या तीन प्रश्नांची उत्तरं आपण शोधली तर कुठून, कसं, कुठं जायचं आहे हे मनात स्पष्ट होईल.

पण वेळेचं नियोजन नुसतं करायचं म्हणून होत नाही. मला ते का करायचं आहे? याचं उत्तरही तितकंच महत्त्वाचं आहे. मागच्या लेखात आपण स्वतःसोबत नातं कसं जोडावं ते जाणून घेतलं. आपण जेव्हा स्वतःची जाणीव (sense of self) मनात निर्माण करतो तेव्हा त्यावेळी आपल्या मनात स्व-आदराची (self-respect) भावना निर्माण होते आणि जेव्हा ही स्व-आदराची भावना मनात निर्माण होते तेव्हा आपण वेळ गुणवत्तापूर्वक वापरायला लागतो.

गेल्या काही दिवसात बरेच जण गुणवत्तापूर्वक  वेळ वापरण्याबद्दल विचार करत होते, बोलत होते पण गुणवत्तापूर्वक वेळ वापरण्याची ही कल्पना इतकी मर्यादित का ठेवायची? कोरोनाच्या निमित्ताने आपण वेळेच्या गुणवत्तेचा विचार केला. पण या कोरोनाच्या काळानंतरही हा विचार चालू ठेवण्यास हरकत नाही. जेव्हा आपण गुणवत्तापूर्वक वेळ वापरतो तेव्हा खरं म्हणजे आपण गुणवत्ता असणारं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच कोरोनाच्या या निमित्ताने कोरोना संपल्यावरही गुणवत्ता असणारं आयुष्य कसं जगता येईल याचा विचार करायला काय हरकत आहे?

हो ना? मग करा विचार ..आता वेळ आहेच आपल्याकडे – विचार करायला!

 

संबंधित बातम्या