भावनिक बुद्धिमत्ता

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 13 सप्टेंबर 2021


माइण्ड रि- माइण्ड

आपण कितीही म्हटलं तरी प्रॅक्टिकल होता येत नाहीच. भावनांना पूर येतोच.... मनाला जे पटतं ते बुद्धीला पटत नाही आणि बुद्धीला जे समजतं ते मनात उतरत नाही, मग करायचं काय?

कोरोना काळ सुरू झाला आणि आपल्या सर्वांना आपल्या मनाची, मानसिक आरोग्याची विशेष जाणीव झाली. या काळात आपण खूप गोष्टी पहिल्या... अनुभवल्या आणि त्याचे कळत नकळत मनावर झालेले परिणामही अनुभवले. विविध भावनांचे चढ उतार अनुभवले. खूप वैताग, भीती, राग, नैराश्य, चिंता... कधी स्वतःच स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न केला तर कधी भावनांच्या कल्लोळात काय झालंय... काय करायला हवंय हेच समजेनासं झालं.... मग असंही वाटलं, ‘कशाला पाहिजे हा इमोशनल घोळ? त्यापेक्षा सगळे निर्णय डोक्यानं घ्यावेत, मनाला म्हणावं, ‘बाबा जरा गप्प बस! नको ज्यात त्यात घोळ वाढवू...’ पण असं कितीही म्हटलं तरी प्रॅक्टिकल होता येत नाहीच. भावनांना पूर येतोच.... मनाला जे पटतं ते बुद्धीला पटत नाही आणि बुद्धीला जे समजतं ते मनात उतरत नाही, मग करायचं काय?

तसं पाहता, गेले कितीतरी वर्षं हा दिल और दिमाग का ‘झगडा’ सुरूच आहे. अगदी पिढ्यानपिढ्या....  खरं तर या दोन्हीही गोष्टी आपल्या मनाचाच एक भाग आहे. एकाला आपण म्हणूया बुद्धीनं चालणारं मन तर दुसऱ्याला म्हणूया भावनेनं चालणारं मन. 

बुद्धीनं चालणारं मन विचार करत असतं, समोर दिसणाऱ्या गोष्टी समजून घेत असतं, त्याचं विश्लेषण करत असतं. त्या गोष्टीचे फायदे-तोटे याची बेरीज करत असतं. पण भावनेनं चालणारं मन अगदी मनस्वी असतं. त्या क्षणाला तीव्रपणे वाटणाऱ्या गोष्टीलाच ते बरं मानून चालतं. बऱ्याचदा या मनाची समजूत पटायलाही खूप त्रास होतो. त्या क्षणाला जे वाटतं, जसं वाटतं ते करून टाकणं... तत्क्षणी दिली जाणारी प्रतिक्रिया- घेतले जाणारे निर्णय... खूपदा आपण एखादी गोष्ट करून बसतो, (आणि नंतर त्याचा विचार करतो, आपण असे कसे वागलो?) पण म्हणून हे भावनेनं चालणारं मन वेडं आहे, असंही म्हणता येत नाही. कारण एखाद्या अतिशय मोक्याच्या क्षणी तेच आपल्याला मदत करतं. या भावनांमुळे तर आपण या जगात टिकून आहोत. पूर्वी आपण जेव्हा जंगलात राहत होतो तेव्हा, जंगली श्वापदांची भीती वाटली म्हणून आपण पळून जाऊन किंवा लढून स्वतःचा बचाव करायला शिकलो. आज कदाचित आपल्या पुढे जंगली श्वापदांचं आव्हान नाही पण आपण परीक्षा देतो तेव्हा आपल्याला काळजी वाटते म्हणून तर आपण अभ्यास करतो. 

याच मनामुळे जगातलं माणसामाणसामधलं भावनिक विश्व समजायलाही मदत होते. भावनांमुळे आपण नातं जोडतो. या भावना नसत्याच तर आपल्याला काहीच वाटलं नसतं. एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे आपण भावना विरहित जगलो असतो. आणि कदाचित आपल्या जगण्यातली गुणवत्ताही आपल्याला समजली नसती. त्यामुळे आपल्या जगण्यात भावना महत्त्वाच्या आहेतच. पण कधी कधी या भावना अडथळा निर्माण करतात, तेव्हा त्यांचं काय करायचं, त्यांना कसं हाताळायचं हे महत्त्वाचं आहे. 

आपल्या क्षमता, आपली जगण्याची, काम करण्याची, नातं टिकवण्याची प्रामाणिक इच्छा आणि या साऱ्याकडून आपल्या असलेल्या अपेक्षा यामध्ये आपल्याच भावना जर अडथळा निर्माण करत असतील आणि ते अडथळे टाळायचे असतील तर ही भावनिक पातळीवरची सक्षमता आपण निर्माण करायला हवी. 

त्यासाठी डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना समजून घ्यायला हवी. ती जर तुम्ही समजून घेतली तर तुम्हालाही असंच वाटेल, आपणही असंच हुशार असायला पाहिजे! म्हणजे आपल्या भावनांना बुद्धिमान बनवायला पाहिजे. 

  • नेहाला साध्या कारणांनीही इतका राग येतो की, ती रागाच्या भरात कुणालाही काहीही बोलते. त्यामुळे तिचे मित्र- मैत्रिणी तिला दुरावले आहेत. 
  • अभिषेकचा स्वभाव खूप ‘सणकी’ आहे. तो मनात येईल तसं वागतो. म्हणून त्याला कुणी फारसं गांभीर्यानं घेत नाही. 
  • रुपाला गटात काम करणं जमत नाही. तिचं कुणाशीच पटत नाही. ती लोकांना डॉमिनेटिंग वाटते.

अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. कधी स्वतःच्या वागण्यातलेही असे दोष आपल्याला दिसत राहतात. भावना आपल्या जगण्यात एक अडथळा निर्माण करत राहतात. बऱ्याचदा आपल्याकडे क्षमताही असते, पण या भावनांच्या गुंत्यात ती वापरता येत नाही असंही वाटतं. आणि म्हणूनच भावनांना समजून घेणं महत्त्वाचं आहे.  

भावनिक बुद्धिमत्ता 
म्हणजे नेमकं काय? 
भावनांची जाणीव

ज्यांना आपल्या भावनांची सखोल जाण असते ती माणसं आपल्या जगण्याची योग्य दिशा ठरवू शकतात, योग्य निर्णयही घेऊ शकतात. भावनांची जाणीव म्हणजे भावना ओळखता येणं, त्यांना नावं देता येणं, भावनांमुळे निर्माण झालेल्या शारीरिक संवेदना समजणं. थोडक्यात आपण भावनिक दृष्टया साक्षर असणं. आपण जेव्हा भावनांना ओळखायला शिकतो तेव्हा आपली हळूहळू त्यांच्याशी मैत्री व्हायला मदत होते. भावनांशी मैत्री होणं म्हणजे त्यांचा विनाशर्त स्वीकार करता येणं. ‘ही भावना चूक आहे’, ‘असं मला वाटायलाच नको’, असं कोणतंही मूल्यमापन न करता भावना स्वीकारता येणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 

भावनांचं नियमन/नियोजन करणं 
कधी कधी या भावना इतक्या तीव्र होऊन जातात की, त्यांना योग्य पद्धतीनं हाताळताच येत नाही. मग रागाचा उद्रेक होतो. टेन्शनने अस्वस्थता येते. नैराश्यामुळे काहीच करावसं वाटत नाही. भावनांचं नियमन करणं म्हणजे त्यांना दाबून टाकणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं नाही. आपल्या भावना ओळखून योग्य पद्धतीनं प्रतिसाद द्यायला शिकणं. अर्थात या प्रक्रियेला वेळ लागतो. त्यासाठी काही सरावही करावा लागतो. आपल्याला कोणत्या गोष्टींचा त्रास होतो, त्यावेळी आपण काय विचार करतो, आपला दृष्टिकोन कसा आहे अशा अनेक पातळ्यांवर स्वतःला समजून घेऊन भावनांचं नियमन करायला शिकता येतं.

स्वतःलाच प्रेरणा देणं 
आपल्यासमोर असणारी उद्दिष्टं साध्य करण्यासाठी प्रत्येकानंच विशेष प्रयत्न करण्याची गरज असते. ती उद्दिष्टं साध्य करण्याचा ध्यास घेणं, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपल्या मनाला मुरड घालता येणं, ही पण त्यातली आवश्यक बाब असते. आपल्या वागण्याचे कसे आणि काय परिणाम होणार आहेत त्याचं तारतम्य बाळगून वागण्याची सवय त्यासाठी निर्माण करावी लागते. अशी क्षमता असणारी माणसं जे काम करतात त्यात एक वेगळा ठसा उमटवत राहातात. पण तारतम्य न बाळगता मनात येईल तसं आपण वागत राहिलो तर मात्र आपल्या जगण्याला कोणतीच दिशा राहात नाही.

दुसऱ्यांच्या भावना ओळखता येणं
दुसऱ्यांच्या भावनांची जाण असणं हा भावनिक बुद्धिमत्तेतला महत्त्वाचा पैलू आहे. त्यासाठी आपल्यामध्ये एक प्रकारची संवेदनशीलता आणि सहवेदना असायला हवी. आपण जितके स्वतःच्या भावनांबाबत जागरूक होत जातो तसं आपल्याला इतरांच्याही भावना ओळखता यायला लागतात. नातं जोडण्यासाठी ही आवश्यक गोष्ट आहे. गटात काम करताना, समाजात वावरताना, नाती सांभाळताना भावनांची ही जाण आपल्याला नक्कीच मदत करते. तुमच्या व्यवसायात, नोकरीत आणि व्यक्तिगत जीवनातही याचा खूप फायदा होतो. 

नाती सांभाळता येणं 
नात्यांना सांभाळताना, त्यांची गुणवत्ता वाढवताना फक्त स्वतःच्या भावना हाताळता येऊन चालत नाही तर आपल्याला दुसऱ्यांच्याही भावना हाताळणं जमायला हवं. आपण जगताना एकटे जगत नाही, तर आपल्या सभोवताली आपली माणसं असतात, आपली नाती असतात. आपल्या जगण्याची गुणवत्ता ही आपल्या नात्यांवर अवलंबून असते. त्यामुळे हा सुद्धा भावनिक बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पैलू आहे. 
भावनिकदृष्ट्या बुद्धिमान असणाऱ्या माणसांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास आढळतो. ते सहजगत्या जबाबदारी स्वीकारू शकतात. त्यांच्या वावरात सहजता असते आणि मुख्य म्हणजे ते स्वतःच्या भावनांची काळजी घेऊ शकतात. त्यांचं इतरांसोबतचंही नातं सुदृढ- निरोगी असतं. मुख्य म्हणजे हे सारं आपल्याला जमणारच नाही असं काही नसतं, भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला सातत्याने प्रयत्न करून वाढवता येते, शिकता येते. 

कोरोनाच्या या काळातून जाताना ज्या अनेक गोष्टी आपण शिकत जात आहोत, त्यामध्ये आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवायला शिकणं आणि त्यासाठी प्रयत्नशील राहणं हे नक्कीच महत्त्वाचं आहे.

तुमच्यासाठी एक छोटीशी टेस्ट:  

  • या लेखात सांगितलेले भावनिक बुद्धिमत्तेचे कोणकोणते पैलू तुमच्याकडे आहेत, असं तुम्हाला वाटतं? 
  • कोणते पैलू तुमच्याकडे नाहीत, असं तुम्हाला वाटतं? 
  • मला माझ्या भावना ओळखता येतात, असं तुम्हाला वाटतं का? 
  • भावना ओळखता येतात; पण त्याचं नियोजन करता येत नाही, असं वाटतं का? 
  • कोणतंही नातं मला नीटसं सांभाळता येत नाही, असं वाटतं का? 
  • आपल्या स्वतःच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विचार करताना त्यातल्या नेमक्या कोणत्या पैलूंवर अधिक लक्ष द्यावे लागेल याचा अंदाज या प्रश्नांच्या उत्तरांतून तुमचा तुम्हालाच येईल.

संबंधित बातम्या