मन

डॉ. संज्योत देशपांडे 
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

माइण्ड रि- माइण्ड

‘मला काय झालंय? माझं मन थाऱ्यावर आहे, मानसिक आरोग्य एकदम ठणठणीत!’ असं म्हणतो आपण. पण खरंच तसं असतं का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ‘मानसिक आरोग्य’ म्हणजे मनाचं आरोग्य सांभाळायला हवं हे अनेकांच्या लक्षातही येत नाही.

मार्च २०२०मध्ये कोरोना विषाणूने आपल्या आयुष्यात प्रवेश केला आणि आपलं जगणं खऱ्या अर्थाने बदलून गेलं. आता एका वेगळ्याच जगात आपण आलो आहोत... नवीन नियमांसह... अनिश्चिततेचं पार्श्वसंगीत अजून संपलेलं नाही, पण आपल्याला त्याची काहीशी सवयही झाली आहे. या परिस्थितीतून जाताना आपण सर्वांनी कमी अधिक मानसिक चढउतार अनुभवले. तसं पाहायला गेलं तर आत्ताही आपण एका संदिग्ध अवस्थेतूनच जात आहोत. तिसरी लाट परत येणार का? परत टाळेबंदीला सामोरं जावं लागणार का? असे  प्रश्न आपल्या मनात रेंगाळत आहेत. पण त्यासह आपण जगणं पुढे नेण्याचा प्रयत्न करतच आहोत.

पण या सगळ्या कोरोना काळात, मला असं वाटतं, आपण सगळे आपल्या मनाच्या खूपच जवळ आलो आहोत. नाहीतर कुठेतरी दूर भरकटत राहायचो, मनापासून लांब ..पण आता मनात काय चाललंय... काय वाटतंय… हे जाणवायला लागलंय. कारण ‘मन’ नावाची एक गोष्ट असते, याची जाणीव या काळात आपल्याला काही प्रमाणात का होईना झालेली आहे.

‘मन म्हणजे काय?’हा प्रश्न तसा आता जुना झाला पण तरीही खूप जणांना मन म्हणजे काय याचं उत्तर देता येत नाही, हा माझा अनुभव आहे. मग मन कुठे असतं हा तर अजून गहन प्रश्न.. (पण, या निमित्ताने आपल्याला सर्वांना “मन वढाय...वढाय....” म्हणणाऱ्या बहिणाबाईंची आठवण मात्र येते, एवढं मात्र नक्की!!) आता मनाची व्याख्या शोधतानाच जर एवढा वेळ जातोय, तर ‘मानसिक आरोग्य’ म्हणजे काय हा तर खूप खूप प्रश्नचिन्हांचाच प्रश्न!

‘मन’ ही गृहीत धरण्याची गोष्ट आहे, असंच बहुतेकांना वाटतं. आपण गृहीतच धरलेलं असतं मनाला. म्हणून तर मनात कितीतरी गोष्टी साठवून ठेवतो त्रास होणाऱ्या, त्याचा कितीही ताण आला तरी!

आपल्या सर्वांकडे ताणाला सामोरी जाण्याची अमाप क्षमता असते आणि आपणही आपल्या मनाला त्या ताणासोबत राहायला भाग पाडतो. कितीही ताण आला तरी तो सहन करत करत चालत राहातो पुढे.

मग मन केव्हातरी दुखायला लागतं, त्रास द्यायला लागतं, कधी शरीरातून व्यक्त व्हायला लागतं तर कधी नात्यांमधून-कामामधून आपली व्यथा मांडत राहातं. आपण जमेल तसं लक्ष देतो किंवा देतही नाही. आजही आपण असंच करतो आहोत का? पण मग या मनाकडे आणि पर्यायाने  मानसिक आरोग्याकडे कधी लक्ष देणार?

कोरोना काळातून जाताना टाळेबंदी आणि त्याबद्दलची अनिश्चितता याचा परिणाम मनाच्या आरोग्यावर होतो आहे, हे तरी समजलं आणि आपण ते मान्य केलं म्हणून त्याकडे लक्ष द्यायलाच हवं.

नुकतीच दिवाळी झाली. त्याआधी ऑक्टोबर महिन्यात मानसिक आरोग्य दिनही होऊन गेला. ‘जागतिक मानसिक आरोग्यदिन साजरा’ अशा बातम्या तुम्ही काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचल्या असतीलही. पण याची नोंद कितीजणांनी घेतली ? ‘मानसिक आरोग्य दिन’ नावाचा असा काही दिवस असतो हे तरी कितीजणांना माहिती असतं? 

‘मला काय झालंय? माझं मन थाऱ्यावर आहे, मानसिक आरोग्य एकदम ठणठणीत!’ असं म्हणतो आपण, पण खरंच तसं असतं का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ‘मानसिक आरोग्य’ म्हणजे मनाचं आरोग्य सांभाळायला हवं हेही अनेकांच्या लक्षातही येत नाही.

आपल्या शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्याचेही काही निकष आहेत. तेसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. केरोल राईफ या मानसतज्ज्ञाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मानसिक आरोग्याचे निकष सांगितलेले आहेत. या निकषांच्या आधारावर स्वतःला तपासून बघा आणि तुम्हीच ठरवा की, तुमचं मानसिक आरोग्य किती चांगलंय ते..

स्वतःचा स्वीकार: Self Acceptance 
‘स्वीकार’ म्हणजे काय? स्वतःला स्वीकारायचं म्हणजे काय करायचं? असा विचार आपण बरेचदा करतो. पण स्वीकार या टप्प्याआधी एक गोष्ट येते, ती म्हणजे स्वतःबद्दल जाणीव निर्माण करण्याची! जाणीव कसली तर स्वतःच्या क्षमतांची आणि मर्यादांची. ही जाणीव निर्माण झाली की, स्वतःचा विनाशर्त स्वीकार करणं फार महत्त्वाचं. आपण आहोत हे असे आहोत, हे मान्य करणं. तसं केलं तरच आपण स्वतःकडे सकारात्मक पद्धतीने पाहू शकतो. स्वतःवर प्रेम करू शकतो. त्याचबरोबरीने स्वतःमध्ये सकारात्मक बदलही प्रयत्नपूर्वक करणं शक्य होतं. असं करणाऱ्या माणसांमध्ये कोणत्याही प्रकारचा गंड (न्यूनगंड अथवा अहंगंड) आढळत नाही. अशाच व्यक्तींचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. त्यामुळे सगळ्यात पहिले स्वतःचा आहे तसा स्वीकार महत्त्वाचा.
 
स्वतःचा विकास : Personal Development 
मानसिक आरोग्य सुदृढ असणाऱ्या व्यक्ती नेहमीच स्वतःच्या विकासाबाबत जागरूक असतात. आपल्याला येणाऱ्या चांगल्या –वाईट अनुभवातून काही शिकण्याची त्यांची तयारी असते. नव्या गोष्टींना, नव्या अनुभवांना, नवीन आव्हानांना सामोरे जायला ते तयार असतात. त्यांच्या विचारांमध्ये लवचिकता असते. त्यांचे विचार हट्टी, दुराग्रही, ताठर भूमिका असणारे असे नसतात. त्यामुळे ते त्यांच्यात आवश्यकतेनुसार बदल घडवून आणू शकतात. स्वतःचे विचार, भावना याची जबाबदारी ते स्वीकारतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला सामोरं जाताना ते पॉझिटिव्ह विचार करतात, स्वतःत बदल करून सुधारणाही करतात.

आयुष्यातलं उद्दिष्ट: Purpose in Life  

आपण आयुष्य जगतो..पण  जगतो कशासाठी? ज्यांचं मानसिक आरोग्य निरोगी असतं ते नेहमीच आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आयुष्याला अर्थ देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपल्या आयुष्यात काय साध्य करायचं, याविषयी त्यांच्या मनात स्पष्टता असते. आपल्या ‘असण्यानं’ अवतीभोवतीच्या जगात काहीतरी गुणात्मक बदल व्हावा अशी त्याची इच्छा असते. दे वॉन्ट टू मेक अ डिफरन्स. त्यामुळे त्यांचं आयुष्य भरकटत नाही. आपलं ध्येय गाठण्यासाठी स्वतःमध्ये काही कौशल्य निर्माण करण्याची त्यांची तयारी असते. अडथळ्यानां सामोरं जायची हिंमत असते. आपलं ध्येय ते चिकाटीनं गाठतातच.  

लाइफ इन कंट्रोल/ परिस्थितीवरची पकड: Environmental Mastery  
स्वतःच्या कार्यक्षमतेचा सुयोग्य विश्वास आणि त्या कार्यक्षमतेचा उत्तम वापर हा मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा निकष! कोणत्याही गोष्टीत पुढे जायचं असेल, काही साध्य करायचं असेल तर रोजच्या जगण्यावर आपली पकड असणं खूप महत्त्वाचं आहे. आपली जीवनशैली योग्य ठेवणं, आपण राहत असलेल्या, वावरत असलेल्या जागांची योग्य व्यवस्था करणं, हेही यात महत्त्वाचं आहे. मुळात आपलं जगणं गुंतागुंतीचं आहे. घरात साखर आहे का.. इथपासून ते पैशाचं नियोजन कसं करायचं ते नातेसंबंधांची काळजी कशी घ्यायची अशा अनेक पातळ्यांवर आपल्याला नियोजन करत जगावं लागतं. मानसिक आरोग्य निरोगी असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यावरच्या नियंत्रणाची योग्य जाणीव असते. ते गोष्टी पक्क्या आवाक्यात ठेवतात.

स्वयंपूर्णता: Autonomy 
मानसिक पातळी निरोगी असणाऱ्या व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण असतात. सातत्याने इतरांवर अवलंबून न राहता जबाबदारी घेऊन काम करण्याची त्यांची तयारी असते. त्यांचा त्यांच्या विचारांवर, मूल्यांवर विश्वास असतो. त्यांच मन निर्भय असतं.स्वतःसह इतरांच्या मताचा ते आदर करतात.

इतरांसोबत असणारे निरोगी आणि सकारात्मक नातेसंबंध:
ositive Relations with Others 

इतरांशी उत्तम नातं असणं, प्रेमानं नाती जोडणं, जपणं हे मानसिक आरोग्याचं आणखी एक लक्षण. ही नाती जोडताना ते स्वतःच्या व इतरांच्या हिताची योग्य ती काळजी घेऊ शकतात. त्यात समतोल साधू शकतात. नातं जोडताना अपेक्षित असणारी संवेदनशीलता, तरलता त्यांच्यामध्ये असते. आपल्या जगण्यातलं नात्याचं महत्त्व ते जाणतात. ही नाती, आपण जोडलेली माणसं आपल्या जगण्यात ऊर्जा निर्माण करतात याची त्यांना जाण असते.

उत्तम मानसिक आरोग्य हवंय? 

  • हे नक्की करा!
  • स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या. त्यातले चढ-उतार समजून घ्या.
  • स्वतःच्या मनाशी बोला. मन काय सांगतंय ते लक्षपूर्वक ऐका.
  • आपले हट्टी, दुराग्रही विचार, दृष्टिकोन तपासून पहा त्यात बदल करण्याचा प्रयत्न करा. “आपलंच खरं..” अशी वृत्ती असेल तर ती बदलण्याचा प्रयत्न करा..
  • स्वतःशी जरा प्रेमानं वागा, तुमच्या गुणांचं तुम्हीच कौतुक करा.
  • त्रास देण्याऱ्या भावनांची, अडथळा निर्माण करणाऱ्या विचारांची वारंवारता तपासून पाहा. त्या नीट हाताळा, कुठल्याच गोष्टीचा अतिबाऊ करू नका.
  • स्वतःच्या मनाला व्यक्त होण्याची मुभा द्या. जिवाभावाच्या माणसांशी बोला; लिहा, पण व्यक्त व्हा.
  • योग्य आहार, व्यायाम, कामं वेळच्यावेळी करण्याची सवय स्वतःला लावा.
  • अडचण वाटल्यास न लाजता समुपदेशकाची मदत घ्या. डॉक्टरकडे 
  • जा.

संबंधित बातम्या