चला भिजायला... पाऊसधारांत!

ओंकार वर्तले
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा
 

मनुष्याच्या जीवनात पावसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच्या आगमनाची उत्सुकता जशी ताणून धरली जाते तशीच तो किती काळ धरतीवर कोसळणार आहे याची चिंताही लागून राहत असते. प्रत्येकाच्याच नजरेत पावसाची व्याख्या वेगळी असते. प्रत्येकाशी तो वेगळे नाते सांगत असतो. डोळ्यांत प्राण आणून तो वाट पाहायला लावतो. तसाच तो प्रदीर्घ विरहदेखील सहन करायला लावतो. संपता संपत नसलेल्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तो आला, की त्याचे बेभान होणे, मध्येच आलेले रुसवे-फुगवे, लहरीपणा असे मानवी नात्याचे सारे कंगोरेच पावसाच्या धारांमधून व्यक्त होत असतात. या साऱ्यांत एक धागा असतो तो भटकंतीचा! मनाला स्पर्शून जाणारी, निखळ आनंद देणारी, भरभरून ऊर्जा देणारी भटकंती ही या ओल्या ऋतूत जास्तच खुलत असते.
 एकदा का पाऊस सुरू झाला, की निसर्गाचे रूपच पालटते. रुक्ष, ओसाड, काळे-करडे वाटणारे डोंगर, टेकड्या, जमिनी साऱ्या हिरव्यागार होऊन जातात. सृष्टीत एक नवचैतन्य संचारते. बळीराजा शेतकऱ्यापासून ते जीवसृष्टीतल्या प्रत्येक सजीवाला या पावसाकडून भरभरून अपेक्षा असते. याच्या अस्तित्वावरच साऱ्या सजीवांचे जीवनचक्रच अवलंबून असते. या पाऊसधारांत कोणाला ना कोणाला जगायचे असते, फुलायचे, बागडायचे, भिजायचे, फिरायचे, अनुभवायचे असते. त्यामुळे पाऊस सुरू झाला, की सारी सृष्टीच कात टाकून आपल्यासमोर उभी असते. पावसाच्या धारांत सक्रिय झालेली ही सारी सृष्टी न्याहाळण्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि हा आनंद अर्थातच आहे तो भटकंतीत! 
 पावसाळी भटकंतीचा ट्रेंड सध्या बऱ्यापैकी रूळत चालला आहे. या दिवसांत बाहेर पडणाऱ्यांची संख्याही वाढत चाललेली आहे. धरतीचे रूपही पालटले आहे. या पावसात सह्याद्रीही ओलाचिंब होऊन तुमची वाट पाहत उभा आहे. येथल्या भिजलेल्या वाटा तुमच्या पावलांसाठी आतुर झाल्या आहेत. गार वारा घराबाहेर ओढतोय... मैतराच्या या हाकेला ‘ओ’ देण्यासाठी थोडी औपचारिकता बाजूला ठेवा...

खांडी परिसरातील धबधबे
 एकदा का पाऊस रंगात आला, की मग मावळातल्या पाऊस-सोहळ्याला सुरुवात होते. हा पाऊस सोहळा अनुभवायला रसिक प्रेक्षक मावळ तालुक्‍यातील पश्‍चिमेकडे धाव घेतात. यातला ‘खांडी’चा परिसर हा सर्वांत जास्त गर्दी खेचणारा आहे. आंदर मावळातील हा परिसर म्हणजे पर्यटनाची खाणच जणू. धबधब्यांच्या असंख्य माळा तुम्हाला या परिसरात दिसतील. पर्यटनाच्या सोयींनी आता हा भाग बदलत आहे. चांगले रस्ते, खाण्या-पिण्याची ठिकाणे यामुळे सहकुटुंब येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळेच या भागात जर तुम्ही आला नाहीत, तर मग तुम्ही पाऊस अनुभवलाच नाही असे समजायला हरकत नाही. काळे-कुळकुळीत डांबरी रस्ते, धुक्‍याने आणि ढगांच्या पुंजक्‍यांनी लगडलेले हिरवेगार डोंगर, चौकोनी-आयताकृती-त्रिकोणी आकाराची भातखाचरे, या भातखाचरात डोक्‍यावर उरले घेऊन राबणारा शेतकरी, डोक्‍यावर कोसळणाऱ्या पावसाच्या धारा.. असे या आंदर मावळचे स्वरूप आहे. पुणे-मुंबई रस्ते महामार्गावरील ‘कान्हे’ फाट्यावरून ‘टाकवे’ सोडले, की मग बेंदेवाडी-बोरिवली-डाहुली असे ओळीने धबधबे कोसळताना दिसतात. यात सर्वांत प्रसिद्ध आहे तो खांडी गावचा धबधबा. चुलीवरील भाजी-भाकरी, इंद्रायणी भात ही अस्सल मावळी मेजवानी आपण येथे टेस्ट करू शकता. एकंदरीत ‘खांडी’ वर्षाविहार न चुकवावा असाच!

भाजे परिसरातील धबधबे
 मावळ तालुक्‍यातील प्रसिद्ध भाजे लेणी माहीत नाही असा पर्यटक विरळाच. ही भाजे लेणीसुद्धा पावसाळ्यात पाहण्यासारखी असते. याच भाजे लेणीच्या अलीकडे एक मनमोहक धबधबा पावसात कोसळत असतो. मागच्या उंच डोंगरावरचे पाणी वाहत येऊन एका मोठ्या खडकावरून खाली पडून हा धबधबा तयार झाला आहे. सुरक्षित असल्याने येथे सहकुटुंब वर्षा विहारासाठी जाता येते. असाच एक छोटा धबधबा लेण्यांच्या पुढेच लोहगड रस्त्यावर आहे. भाजे गावाच्या अलीकडेच पाटणगावातसुद्धा सुंदर धबधबे आहेत. यासाठी स्थानिकांना विचारणा केलीत, तर तुम्हाला याबाबत मार्गदर्शन मिळू शकेल. पण या ठिकाणी शनिवार-रविवार खूप गर्दी असते. म्हणूनच हे वार सोडून गेलात, तर तुम्हाला मनसोक्त आनंद घेता येईल.

भोरगिरी 
 भोरगिरी हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडचे गाव. पुणे-नाशिक महामार्गावरून राजगुरुनगर-वाडामार्गे भोरगिरीला जात येते. भोरगिरी या गावाचे सौंदर्य पावसाळ्यात अक्षरशः खुलून दिसते. चहूबाजूंनी फक्त हिरव्या रंगाचेच राज्य दिसते. या गावातच भोरगिरी नावाचा किल्ला आहे आणि याच्या जवळच एक छोटा धबधबादेखील आहे. या दोन्ही ठिकाणी आपण निसर्गाचा मनमुराद आनंद लुटू शकता. याच भोरगिरीवरून भीमाशंकरला जाण्यासाठी एक पायवाट आहे. ही पायवाट म्हणजे कित्येक भटक्‍यांचा पट्टीचा राजमार्ग आहे. डोक्‍यावर धो-धो पाऊस कोसळत असताना, चिखल तुडवत जाताना आणि निसर्गाला जवळून अनुभवताना चालत राहणे किती आनंददायी असते हे तुम्हाला बहुधा येथे आल्याशिवाय कळणार नाही. खेड तालुक्‍याच्या या नितांत सुंदर ठिकाणी एकदा तरी गेलेच पाहिजे!

पवनमावळातले आंबेगाव 
 आंबेगाव आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यातील पवनानदीच्या खोऱ्यात. जुने आंबेगाव पवना धरणाच्या निर्मितीत बुडाले. पण या गावाचे पुनर्वसन धरणाकाठीच करण्यात आले. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या आंबेगावचे निसर्गसौंदर्य शब्दातीत आहे. या आंबेगावला पावसाळ्यात पर्यटकांचा राबता असतो. सहकुटुंब भिजता येईल असे सुरक्षित धबधबे हे इथले वैशिष्ट्यच आहे. पुणे-मुंबई जुन्या रस्ते महामार्गावरील कामशेतवरून कडधे-पवना धरण मार्गे आंबेगावला येऊ शकता. एकदा का आंबेगावला आलात, की मग आपल्याला पवना धरणाचे जे काही दृश्‍य दिसते, त्याला तोड नाही. पावसाळ्याच्या दिवसात तर हे दृश्‍य फ्रेम म्हणून लटकवावी इतके दिलखुलास दिसते. अशा या आंबेगावमध्ये तीन धबधबे अगदी रस्त्याच्या कडेलाच कोसळताना दिसतात. डोंगराच्या कड्यांवरून कोसळणाऱ्या या धबधब्यांवर तुम्हाला सहकुटुंब मनसोक्त भिजता येते.

मंदोशी
भोरगिरीवरून एक डांबरी रास्ता भीमाशंकरकडे जातो. हा रस्ता काहीसा खड्या चढाईचा आहे. याच रस्त्यावर ‘मंदोशी’ नावाचे गाव लागते. मंदोशी हे गाव कमी आणि निसर्गचित्रच जास्त वाटते. या देखण्या गावाला सह्याद्रीची कूस लाभली आहे. येथील धबधबा प्रसिद्ध आहे. डोंगरमाथ्यावरून कोसळणारा जलप्रवाह येथील मूळ सौंदर्यात भर घालतो. हा धबधबा देखणा तर आहेच; शिवाय मनसोक्त भिजवणारा आहे. अगदी रस्त्यावरूनच याचे दर्शन होते. कडेला गाडी लावून चालत अगदी १० मिनिटांतच आपण येथे पोचतो.

हे लक्षात ठेवा
पावसाळी पर्यटनाचा ट्रेंड वाढतो आहे, पण त्याबरोबर हुल्लडबाजीही वाढते आहे. म्हणूनच पाऊस कळायला मनही कलासक्त हवे. हा उत्सव पावसाचे मनापासून स्वागत करणाऱ्यांचा आहे. पाऊस म्हणजे फक्त कांदाभजी आणि चहा नाही. पाऊस म्हणजे हुल्लडबाजी तर मुळीच नाही. अशांनी तर पावसाच्या वाटेलाही जाऊ नये. आपल्या चुकीच्या कृतीतून पावसाला बदनामही करू नये. हा उत्सव आहे निसर्ग आणि पावसाच्या पवित्र नात्याचा! हा उत्सव आहे निसर्गावर प्रेम करणारे भटके आणि सह्याद्रीचा! तसे पाहिले, तर धबधब्यात भिजणेच मुळी सध्या धोकादायक होत चालले आहे. कारण या प्रकारच्या भटकंतीला अरसिकतेचा विळखा पडत चालला आहे. धबधब्यांमध्ये भिजण्यापेक्षाही पाण्याचा प्रपात पाहणेसुद्धा तितकेच आनंददायी असते हे कळणे गरजेचे आहे. आणखी एक, आपली भटकंती ही स्थानिकांना अजिबात त्रासदायक होता कामा नये.

संबंधित बातम्या