चटपटीत स्नॅक्‍स

शुभा मुडीकेरी
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा
पावसाळ्यात सतत काहीतरी चमचमीत, चविष्ट खाण्याची हुक्की येते. भजी, बटाटे वडे तर नेहमीचे पदार्थ. त्याहीपेक्षा काही वेगळ्या आणि घरी अगदी सहज करता येतील अशा पदार्थांच्या रेसिपीज खास तुमच्यासाठी...

मसाला वडा
साहित्य : अर्धा कप हरभरा डाळ, अर्धा कप मूग डाळ, पाव कप उडीद डाळ, अर्धा कप तांदूळ, अर्धा चमचा मिरी, अर्धा चमचा जिरे, २ इंच आले, ७-८ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. 
कृती :  सर्व डाळी आणि तांदूळ चार तास एकत्र भिजवणे. नंतर ते चाळणीतून उपसून थोड्या वेळाने मिक्‍सरमधून पाणी न घालता रावळ वाटून घेणे. त्यात आले-हिरव्या मिरचीची पेस्ट, काळी मिरी पूड, जिरे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित हाताने एकत्र करावे. मग तळहातावर छोटे छोटे वडे थापून तेलात खमंग तळून घ्यावेत. हे मसाला वडे नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता.

पालक कटलेट
साहित्य : एक कप बारीक चिरलेला पालक, १ कप ब्रेड क्रम्स, अर्धा कप बारीक रवा, १ चमचा आले-लसूण पेस्ट, १ चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा आमचूर पूड, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा लिंबाचा रस, १ कप उकडून मॅश केलेला बटाटा, चवीनुसार मीठ.
कृती :  एका मोठ्या बाऊलमध्ये एक कप स्वच्छ धुऊन बारीक चिरलेला पालक, ब्रेड क्रम्स, बारीक रवा, उकडून मॅश केलेला बटाटा, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, तिखट, आमचूर पूड, जिरे पूड, लिंबाचा रस व चवीपुरते मीठ हे सर्व जिन्नस एकत्र करून व्यवस्थित मळून घ्यावे. मग तळहातावर छोटे छोटे गोळे थापून छानपैकी खरपूस तळावेत. सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

मिनी इडली रस्सम 
साहित्य : इडलीचे पीठ (मिनी इडली स्टॅंड मधून ५०-६० मिनी इडल्या तयार करून घेणे.), ४ मोठे टोमॅटो, २ चमचे तुरीची डाळ, १ चमचा रस्सम मसाला, १ चमचा चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तूप, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद, २-३ सुक्‍या मिरच्या.
कृती :  एका प्रेशर कुकरमध्ये टोमॅटो, भिजवलेली तुरीची डाळ ठेवून थोडे पाणी घालून चार-पाच शिट्ट्या करून घ्याव्यात. थंड झाल्यावर टोमॅटो व तूरडाळ एकत्र मिक्‍सर मधून बारीक वाटून गाळून घ्यावी. एका कढईत तूप घालून कढई गॅसवर ठेवावी. त्यात फोडणीसाठी मोहरी, सुक्‍या मिरचीचे तुकडे, हिंग, हळद, कढीपत्ता, घालावा. नंतर त्यात मिक्‍सरला बारीक केलेले टोमॅटो घालून चिंचेचा कोळ, रस्सम मसाला, तिखट, मीठ व चार कप पाणी घालून छानपैकी उकळावे. सूपच्या बाऊलमध्ये गरमागरम रस्सम व त्यात मिनी इडली सोडून त्याचा आस्वाद घ्यावा.

पोहा वडा
साहित्य : दोन वाट्या जाड पोहे, २ मध्यम आकाराचे उकडून मॅश केलेले बटाटे, २ मोठे चमचे हिरवी मिरची-आले-लसूण-कोथिंबीर पेस्ट, १ चमचा आमचूर पूड, १ चमचा बडीशेप पूड, अर्धा चमचा जिरे पूड, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : कांदे पोहे करताना जसे पोहे भिजवून घेतो त्याच प्रमाणे पोहे भिजवावेत. १० ते १५ मिनिटांनंतर पोहे मिक्‍सर मधून बारीक करून घ्यावेत. नंतर त्यात हिरवी मिरची, आले, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट, उकडून मॅश केलेले बटाटे, आमचूर पूड, चवीनुसार मीठ, बडीशेप पूड, जिरे पूड घालून व्यवस्थित हाताने मळून घ्यावे. लहान लहान गोळे करून तळहातावर दाबून टिक्कीसारखा आकार देऊन खमंग तळून घ्यावेत. खरे तर या वड्याबरोबर सॉस किंवा चटणीची गरज नाही, वडे आणि चहा बास...!

रवा बटाटा फिंगर्स
साहित्य : एक कप रवा, २ उकडलेले बटाटे, पाव चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तेल. 
कृती :  एका नॉनस्टिक पॅनमध्ये दोन कप पाणी, एक चमचा तेल, पाव चमचा मीठ घालून गॅसवर ठेवावे. पाणी गरम झाल्यावर त्यात रवा घालून व्यवस्थित एकत्र करावे व झाकण ठेवून दोन मिनिटे वाफवावे. त्यानंतर एका ताटात ठेवून गार करावे. उकडलेला बटाटा (मॅश केलेला), चाट मसाला, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर व हिरवी मिरची घालून मिश्रण मळून घ्यावे. मग तळहातावर छोटे गोल गोळे करून त्याला लांबट आकार द्यावा. छान तळून सॉसबरोबर खाण्यास द्यावे.

सुंडल (तमिळ पदार्थ)
साहित्य : काबुली चणे/हिरवे चणे/हरभरा यापैकी आपल्या आवडीनुसार कोणतेही २ कप भिजवलेले चणे, २ सुक्‍या मिरच्या, २-३ हिरव्या मिरच्या, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, ४-५ चमचे तेल, थोडा कढीपत्ता, अर्धी वाटी खवलेला ओला नारळ, चवीनुसार मीठ.
कृती :  एका कुकरमध्ये भिजवलेले चणे घेऊन त्यात तीनपट पाणी घालावे. त्यामध्ये एक चमचा मीठ, पाव चमचा हळद घालून कुकरला तीन ते चार शिट्ट्या द्याव्यात. कुकर गार झाल्यावर चणे चाळणीत काढून घ्यावेत. एका मोठ्या कढईत तेल घ्यावे. तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. ती तडतडली, की सुक्‍या मिरच्यांचे तुकडे, चिरलेली हिरवी मिरची, हळद, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी एक मिनिट हलवावी. नंतर त्यात उकडलेले चणे, चवीनुसार मीठ घालून वरून ओला नारळ व कोथिंबीर पेरून छान वाफ आणावी.

बेसन रवा बटाटा स्ट्राइप्स 
साहित्य : एक कप बेसन, अर्धा कप रवा, १ कप उकडून मॅश केलेला बटाटा, ३-४ हिरव्या मिरच्या, पाव चमचा चिली फ्लेक्‍स, २ इंच आले, अर्धा चमचा काळी मिरी पूड, १ आख्ख्या लिंबाचा रस, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मोहरी, १०-१२ पाने कढीपत्ता, ४ चमचे तेल. 
कृती :  एका बाऊलमध्ये बेसन, रवा, हिरवी मिरची, हळद, चिली फ्लेक्‍स, किसलेले आले, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व पदार्थ मिसळून घेणे. त्यात जवळजवळ दीड कप पाणी हळूहळू टाकत गुठळ्या न होता व्यवस्थित मिसळावे. गॅसवर नॉनस्टिक कढई गरम करून त्यात फोडणीसाठी तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग, ओवा आणि कढीपत्ता घालावा. त्यानंतर त्यात तयार केलेले बेसन रवा पीठ हळूहळू घालावे. एका बाजूने चमच्याने फिरवत राहावे. चांगले एकत्र झाल्यावर पीठ घट्ट व्हायला लागते. तीन-चार मिनिटे व्यवस्थित फिरवावे. पिठाचा गोळा झाला व कढईचा तळ सोडू लागला, की एका मोठ्या ताटात काढून पीठ पसरवून घ्यावे. १०-१५ मिनिटांनंतर त्यात उकडून मॅश केलेला बटाटा मिसळून घ्यावा. मग ताटाला तेल लावून त्यावर गोळा व्यवस्थित थापून जवळजवळ एक तास फ्रीजमध्ये ठेवावा. नंतर बाहेर काढून त्याच्या वड्या कापून घ्याव्यात व छानपैकी खरपूस तळाव्यात.

बटन इडली टॉस्ड इन मोळगा पोडी 
साहित्य : पन्नास-साठ बटन (मिनी) इडल्या, (मिनी इडलीचे पात्र नसेल, तर नेहमीचे इडली पात्र चालेल. त्यात एक एक चमचा पीठ घालून बटण इडल्या करू शकतो.), १ वाटी तूप, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता, अर्धी वाटी मोळगा पोडी (गन पावडर).
मोळगा पोडी (गन पावडर) साहित्य : चार चमचे चणा डाळ, २ चमचे उडीद डाळ, अर्धा चमचा हिंग, २ चमचे तीळ, १ चमचा तिखट, ८-१० काळी मिरी, चवीनुसार मीठ. मोळगा पोडी आजकाल सगळ्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहे. तुम्ही दुकानामधूनही आणू शकता.
मोळगा पोडी कृती : चणा डाळ, उडीद डाळ, पांढरे तीळ व काळी मिरी हे सर्व वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. गार झाल्यावर त्यात मीठ, तिखट, हिंग एकत्र करून मिक्‍सरमधून बारीक दळून घ्यावे. 
कृती :  एक नॉनस्टिक पॅन गॅसवर गरम करून त्यात तूप घालावे व मोहरी टाकावी. ती तडतडली की हिंग, कढीपत्ता आणि मोळगा पोडी टाकून एकत्र करावे, शेवटी बटन इडल्या टाकून छान एकत्र करून दोन ते तीन मिनिटे वाफ द्यावी. हा पदार्थ अगदी दोन वर्षांपासून ८० वर्षांपर्यंतच्या सर्वांना आवडतो.

संबंधित बातम्या