पावसाची धून
सोमवार, 22 जुलै 2019
चिंब पावसाळा : कविता
उभा कातळाचा कडा कृष्णवर्णी
जणू थंड ज्वालामुखी झोपला
युगांपासुनी झेलतो ऊन-वारा
जिथे काळ गुंफांमधे थांबला...
जुन्या जीर्ण खडकांवरी रेशमाचा
अहा! पोपटी मखमली गारवा
अनिर्बंध वाऱ्यासवे नाचणारा
अरूपा सरींचा झुले दोरवा
खुळ्या पावसाची जिथे धून ओली
कपारींतुनी स्वैर ओथंबते
कळेना कशाची बरे वाट पाहे
उरी कोंडुनी नीर, नादावते...
प्रपातातुनी आदळे धबधबा जो
किती वेगवेडामध्ये सांडणे
स्वत:ला असे मुक्त उधळून देणे
कसे साधते ‘जीवना-ओतणे’
ऋतूसोबतीने असा शोध चाले
निसर्गासवे तोलणे मापणे
महारुद्रतेच्या पुढे नम्र होणे
तथा आपुले न्यून न्याहाळणे...
असा कोसळावा अहंकार माझा
फुटो दंभ आणि सरो वल्गना
रिते, मुक्त व्हावे अहंतेमधूनी
सुगीला मिळो निर्मिती चेतना!