‘वाङ्‌मयीन राजकारण नको!’ 

डॉ. सुजाता शेणई 
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

मुलाखत
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. आपल्या घरातीलच कोणा व्यक्तीला हा सन्मान मिळाला असल्याची भावना सर्वत्र आहे. या मनस्वी लेखिकेबरोबर साधलेला संवाद. 

ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि आनंदाची व समाधानाची मनःपूर्वक लकेर समाजाच्या सर्व थरात उमटली. कुणी देवापुढे साखर ठेवून आनंद व्यक्त केला, तर कुणी अरुणाताईंना पुस्तकांचा ‘गुच्छ’ भेट दिला. संमेलनाध्यक्ष ‘निवडणूक ते निवड’ या परिवर्तनाला दिलेली ही जणू पावतीच होती. अरुणाताईंवर, त्यांच्या साहित्यावर आणि ढेरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचाच हा आनंदोत्सव ठरला. 

: ‘आपल्या अरुणाताई संमेलनाध्यक्ष झाल्या’ ही रसिकांची पहिली बोलकी प्रतिक्रिया सर्व माध्यमांतून व्यक्त झाली. याबद्दल काय सांगाल? 
डॉ. अरुणा ढेरे ः साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा हा आनंद मला निश्‍चित समाधान देणारा आहे. आज मला जरी हे संमेलनाध्यक्षपद मिळाले असले, तरी त्यात अनेकांचा सहभाग आहे. मुळातच आपली जडणघडण आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करीत असते. मी आई, अण्णा, आत्या, बहीण, भाऊ आणि वाडा संस्कृती यामध्ये वाढले. आम्हाला सख्खे नातेवाईक कमी, पण जोडलेली माणसे खूप. माणसांविषयी प्रेम, ओढ, लोभ हीच आमची श्रीमंती. या श्रीमंतीच्या जोरावर अभावांवर मात करण्याचे बळ मिळाले. चण्डिदासांचें ‘सबार उपर मानुष सत्य, तहार उपर नाही’ हे वाक्‍य जणू आमच्या घराच्या भिंतींवर अदृश्‍यरुपात कोरलेले होते. अण्णांचा लोकसाहित्य आणि संशोधनाकडे ओढा असल्याने पिंगळा, वासुदेव यांच्यापासून ते शास्त्री, पंडितांपर्यंत सगळ्यांशी जनसंपर्क होता. ते लोक घरी यायचे. त्यातूनच माणसांशी उत्स्फूर्तपणे जोडले जाणे, त्यांच्याशी संवाद करणे ही आमच्यासाठी स्वाभाविक आणि नैसर्गिक गोष्ट होती. दारात आलेला भिक्षेकरी खूप छान आवाजात गायचा. त्या  भिक्षेकऱ्याबद्दलसुद्धा आपुलकीची भावना आम्हाला वाटायची. औरंगाबादहून रात्रीच्या गाडीने उशिरा कधी तरी ओंकारदादा महानुभाव पुण्यात यायचे. आईने पहाटे पाच वाजता दारापुढचा दिवा लावला की दार वाजवायचे आणि मग गप्पांना सुरुवात व्हायची. माणसांचे आदरातिथ्य करायचे, त्यांना नाही म्हणायचे नाही हे संस्कार असे लहानपणापासून रुजत गेले. आई-आत्याने कधीही कामाची तक्रार केली नाही. 
वाडा संस्कृतीत आम्हाला समूहजीवनाने जगण्याचे धडे मिळाले. अंगण सारवणे, रांगोळी घालणे हे फक्त आपल्या दारापुरते नसते तर सगळ्यांसाठी असते, हे नकळत घडत होते. वाड्यात सामिलकीची भावना असते, ज्यातून ‘स्व’च्या क्षमता वापरताही येतात आणि ‘स्व’चा शोधही घेता येतो. वाडासंस्कृतीमुळे काही चांगल्या बाजू वाट्याला आल्या आणि वाईट बाजूची ओळख झाली नाही, कारण पाठीशी असलेले भरभक्कम घर. आज ही संस्कृती लोप पावत आहे. पार्टी आणि औपचारिकता वाढत आहे. पण माणसांच्या संबंधाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने विश्‍वासावर होत असते. तो विश्‍वास मला घराने, वाड्याने अन्‌ माणसा-माणसांतील संबंधाने दिला आणि म्हणूनच माझी निवड ही रसिकांना आपली निवड वाटली असेल. 

: विपुल लेखन करूनही ‘कवयित्री’ ही आपली ओळख अधिक आहे, असे का व्हावे? 
डॉ. अरुणा ढेरे ः कवितेपासून माझी लेखनाची सुरुवात आहे, पण माझी गद्याची पुस्तके अधिक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. प्रेमात पडल्याशिवाय त्या माध्यमाची सुरुवात तुमच्याकडून होत नाही, तसे माझे झाले. सात-आठ वर्षांपासून मी कविता करायला सुरुवात केली. स्वतःचा अनुभव, सामर्थ्य सापडायला मला त्यातून मदत होत गेली. संतकवींची रचना माझ्याकडून खूप वाचली गेली. जाणत्या वयात तर मला अण्णांनी दर वाढदिवसाला कवितेचे पुस्तक हातात दिले. ग्रेस, नामदेव ढसाळ, दया पवार, मर्ढेकर, अरुण कोलटकर हे सगळे कवी मी वाचत होते. बोरकर कविता ऐकवायचे. कविता करायची तर नव्या, जुन्या कवींबरोबर प्रवाहातील सगळे वाचले पाहिजे, हे जणू अण्णांनी मला पुस्तक भेट देताना शिकवले. त्यातून माझी समज वाढत गेली आणि वाचनही विस्तारत गेले. पुढे मी गद्य लिहीत गेले, पण काव्यात्मकतेचा धागा मात्र तसाच राहिला. संवाद, भाषण, वक्तृत्व यातही कवितेची लय सुटली नाही, त्यामुळे जनमानसावर कवयित्रीचा ठसा तसाच राहिला असेल. 

: ‘साहित्यात राजकारण नको’ या आपल्या मताची खूप उलट-सुलट चर्चा झाली. नक्की आपल्याला काय म्हणायचे होते? 
डॉ. अरुणा ढेरे : संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक न होता, निवड झाली, या बदलाविषयी कोणीतरी प्रश्‍न विचारला होता. त्याला उत्तर देताना, साहित्य क्षेत्रात राजकारण केले जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. कोणतीही कला एका सामाजिक वास्तवाचा किंवा समकालाचा उद्‌गार असते. त्यात राजकीय वास्तवाचे प्रतिबिंब साहजिक, सहजतेने पडत असते. आपली कोणतीही कृती ही एका परीने राजकीय असते हेही मी जाणते. त्यामुळे राजकीय वास्तवाचा अनुभव अभिव्यक्तीपासून कसा दूर राहणार? ‘राजकारण’ या शब्दाबरोबर काही अर्थ मनात उमटतात. साहित्य ही एक राजकीय कृती असते, या संकल्पनेहून वेगळे असे अर्थ राजकारण या शब्दाबरोबर येतात. साहित्य संमेनाध्यक्षपदाच्या बाबतीत घटनाबदल करण्यात आला त्यामागे हाच विचार असावा, असे वाटते. निवडणूक प्रक्रियेत राजकारण येते, त्यामुळे चांगले साहित्यिक या प्रक्रियेपासूनच दूर राहायचे. ही प्रक्रिया गढूळ होती, त्याचेही दुःख होते. या नव्या पद्धतीत राजकारण येणार नाही, अशी अपेक्षा करता येते. सर्वसामान्यांच्या, जाणत्या वाचकांचे प्रतिबिंब या निवडीत दिसेल. आणखी एक गोष्ट, वाङ्‌मयीन राजकारण हे वाङ्‌मयापेक्षा आणि साहित्यकारापेक्षा मोठे नको, असे मला म्हणायचे आहे. 

: साहित्याची उदंड निर्मिती होत असताना संशोधनात्मक साहित्य मात्र मोजकेच येताना दिसते. त्या लेखनाकडे पाहण्याची लेखकांची आणि वाचकांची दृष्टी कशी हवी किंवा असावी? 
डॉ. अरुणा ढेरे : सर्जनशील साहित्याची निर्मिती उदंड आणि संशोधन मोजकेच हे आता कायमच होत राहणार. आधीच्या पिढीत वैचारिक साहित्याला आणि बुद्धिवंतांना मानाचे स्थान होते म्हणून संशोधनात्मक साहित्याकडे आदराने पाहिले जायचे. आता परिस्थिती बदलली आहे. वैचारिक वाङ्‌मयाची परंपरा खंडित झाली तर निबंध वाङ्‌मय संपले. परंपरा संपल्याचे दुःख आहे. माहिती म्हणजे ज्ञान हे चुकीचे समीकरण मान्य होताना दिसते आहे. महाजालावरून माहिती ‘डाऊनलोड’ करून घ्यायची, त्याची खातरजमाही करून घ्यायची नाही आणि ती ज्ञान म्हणून मिरवायची, अशी रीत झाली आहे. संशोधक पोटार्थी झाले आहेत. विद्यापीठात जे संशोधन होते त्यात संशोधन पद्धती, पूर्वसिद्धता याचे संशोधकाला भान नाही. त्यांना त्यात जाणून घेण्याचा रसही नाही. प्राचीन मराठी किंवा भाषाशास्त्रीय पुस्तके याची त्यांना गरज वाटत नाही. विकिपीडिया विश्‍वासार्ह वाटत असल्यामुळे कोशवाङ्‌मयाकडे दुर्लक्ष होत आहे. अभ्यासाकडे गांभीर्याने पाहण्याची वृत्ती दिसत नाही. समकालीन प्रश्‍नाशी जोडले जाणारे काम समाजालाही जवळचे वाटत आहे. श्री. रं. कुलकर्णी हे लोकरामायणाचे काम मनःपूर्वक करत आहेत. पण ते रोजच्या जगण्याशी जोडले जात नसल्याने त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अशा संशोधनात्मक कामाचाही आदर केला पाहिजे. त्यांच्या कामालाही मान्यता दिली पाहिजे. क्षेत्रीय संशोधन, संहिता, चिकित्सा आणि विद्याशाखीय काम झाले पाहिजे. पण ज्ञानासाठी, काही सिद्धतेसाठी संशोधन करण्याऐवजी वेतनवाढ, पदोन्नतीसाठी संशोधन असा क्रम झाल्याने गंभीर संशोधन करणाऱ्याकडे समाजाचे दुर्लक्ष होते. ही माणसे मग निराश होतात. त्याचा परिणाम होत आहे. 

: मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळावी यासाठी आजपर्यंत अनेक प्रयत्न झाले, त्याविषयी काय वाटते? 
डॉ. अरुणा ढेरे : मराठी भाषेच्या प्राचीनत्वाविषयीचे अनेक पुरावे दिले गेले आहेत. भारतीय भाषांत मराठी कुठे हे समजून घेतले पाहिजे. अभिजात मराठी भाषा समितीने या संदर्भात चांगले काम केले आहे. हरी नरके यांच्यासारखे अभ्यासक याविषयी कार्यकर्त्यासारखे पाठपुरावा करीत आहेत. हा विषय आता केंद्र सरकारच्या पातळीवर गेला आहे. मराठीला अभिजात महत्त्व आहे, ते मिळाले पाहिजे. शासकीय पातळीवर त्याचा कधी तरी निर्णय होईल. पण आपण आपल्या भाषेची अभिजातता टिकवण्यासाठी काय करीत आहोत, याचाही प्रत्येकाने विचार केला पाहिजे. 

: बहुभाषिकता वाढते आहे, पण एकूणच भाषेविषयीची सजगता कमी होत आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषा आपले रूप टिकवून ठेवू शकेल का? 
डॉ. अरुणा ढेरे : बहुभाषिकत्व वाढणे आणि भाषेची जाण असणे यात फरक आहे. मागच्या पन्नास-साठ वर्षांपर्यंत अनेक भाषा बोलणारी माणसे आपल्या आसपास होती. सीमाभागात असणारी, बोलणारी, जगण्याच्या अपरिहार्यतेतून, दैनंदिन व्यवहारातून अनेक भाषा बोलणारी माणसे होती. त्यांच्या बोलण्यात साहित्य आणि संस्कृती यांचे प्रतिबिंब पडायचे. मराठीचे दक्षिणेशी असलेले सांस्कृतिक नाते आपल्या परिचयाचे आहे. पण आजची भाषा ही व्यावहारिक भाषा झाली आहे. बोलणाऱ्याच्या मनात भाषेविषयीची आस्था राहिली नाही. वरवरची आणि तात्पुरत्या व्यावहारिक संवादापुरती भाषा, असे चित्र दिसते आहे. जो जी भाषा बोलतो त्या भाषेवर त्याचे प्रेम असेल तर त्याला त्यातील सामर्थ्य आणि सौंदर्य जाणवेल. ते जाणवले की तो ती भाषा आपल्या बोलीतूनही टिकवून ठेवेल. द. रा. बेंद्रे यांच्यासारखा उत्तम मराठी जाणणारा, पण कन्नडमध्ये महाकवी झालेला विरळाच. 

: स्त्रियांच्या साहित्यात नाटक, कादंबरी, समीक्षा आणि विनोद यांची निर्मिती कमी प्रमाणात होते. ते का होत असावे? 
डॉ. अरुणा ढेरे : स्त्रियांकडून विनोदाची निर्मिती कमी प्रमाणात होते याला कारण समाजव्यवस्था म्हणावी लागेल. स्त्रिया या विनोदाचा विषय होतात, परंतु विनोद करण्यात मागे पडतात. स्त्री ही सतत ताण, दबाव याच्या छायेत असते. अगदी स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या स्त्रियांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. विनोदासाठी वृत्ती ही खेळकर असावी लागते. प्रसन्न आणि नैसर्गिक वातावरणाची अनुकूलता असावी लागते. ते वातावरण आणि ती जडणघडण स्त्रियांना लाभत नाही, त्यामुळे त्यांची विनोदासाठी आवश्‍यक असणारी जीवनदृष्टी तयार होत नाही. लक्ष्मीबाई टिळकांसारखी एखादीच परिस्थितीकडे हसून पाहू शकते. एरवी विनोदाने ओशाळणे एवढेच तिच्यासाठी असते. विनोदाला मोठ्याने हसून प्रतिक्रिया देणे अजूनही स्त्रियांच्याबाबत होत नाही. ज्ञानव्यवहारात स्त्रियांना गौण स्थान दिल्याने धिटाई, निरागसता आणि निखळ,
निर्भेळ आनंद यापासून त्या स्वतः वंचित राहतात, मग त्या विनोदनिर्मिती कशा करणार?
नाटक, कादंबरी यासाठी मोठा जीवनपट उभा करावा लागतो. हा मोठा पट उभारण्यासाठी मोठे, विस्तारशील असे आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि गुंतागुंतीचे विश्‍व त्याच्या गाभ्याच्या स्वरूपात असते. हे विश्‍व आकलन करून घेण्यासाठी आवश्‍यक अवकाश स्त्रियांना लाभत नाही. नाटकाची जी मूलभूत मागणी आहे ती जाणून घेण्याची स्त्रियांची मनोवृत्ती नाही असे वाटते. नाना भूमिकेत स्वतः शिरणे आणि ते मांडणे हे होताना दिसत नाही. कवयित्रींच्या कवितेतही नाट्य कमीच दिसते. काहीजणी समीक्षा करू लागल्या आहेत, पण कुसुमावती देशपांडे आणि सरोजिनी वैद्य यांच्या समीक्षेची उंची अजून कोणी गाठली असे वाटत नाही. या क्षेत्रातही काम व्हायला हवे. 

: कसदार साहित्य काळाच्या ओघातही टिकते. या साहित्याची वैशिष्ट्ये काय सांगता येतील? 
डॉ. अरुणा ढेरे : वाङ्‌मयीन महत्ता असलेले साहित्य काळाच्या कसोटीवर टिकते. माणसाचे जगणे हे कलेपेक्षा मोठे आहे हे ज्या लेखकाला कळते तो लेखक मानवी सुखदुःखाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू शकतो. मानवी मूल्ये ही शाश्‍वत आहेत, ती विपरीत परिस्थितीवर मात करू शकतात. जे साहित्य जीवनाचे सातत्य दर्शवते, ते टिकते. साहित्यकृतीत तात्कालिक घटक येतात, ते आवश्‍यकही असतात, पण ते घटक म्हणजे कलाकृती नाही. कलेसाठी की जीवनासाठी साहित्य हा वाद बाजूला ठेवू. कोणत्याही काळातल्या साहित्यात जगण्याची मूलभूत, पोषक अशी सत्ये यायला हवीत. भावभावनांशी ते जोडले जायला हवे तेव्हा ते टिकते. मग, भाषा कोणतीही असली तरी त्याची देश, काल, परिस्थितीची बंधने गळून पडतात. म्हणून तर जर्मन लेखक गटे संस्कृतातले कालिदासरचित महाकाव्य ‘शाकुंतल’ डोक्‍यावर घेऊन नाचला होता. 

: तंत्रज्ञानाच्या आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात मराठी साहित्य काय योगदान देईल? 
डॉ. अरुणा ढेरे : तंत्रज्ञानाचा रेटा अफाट आहे. तो आता थांबवता येणे शक्‍य नाही. साहित्य निर्मितीची अनेक तंत्रस्नेही माध्यमे उपलब्ध आहेत व अजूनही येतील. या माध्यमांच्या मागण्या पूर्ण करताना त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन पुढे जाता आले पाहिजे. या माध्यमातला तात्पुरतेपणा, ढोबळपणा सगळे फोडून गंभीर, विस्तारशील अशा आशयासाठी ते वापरायचे असेल तर नव्या क्षमता शोधायला हव्यात. प्रसिद्ध लेखक आणि समीक्षक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचे एक वाक्‍य आठवते, ‘शेतात खूप धाटं दिसतात, म्हणजे कणसंही आहेत. पण पीक कसं येतं ते पाहू. तसेच निर्मिती खूप होणार. त्यातील वीस टक्के सकस असणार, तेव्हा त्या वीस टक्‍क्‍यांची निर्मिती अधिक कशी होईल ते महत्त्वाचे, नाही का?’ खरे तर तेच काय, अजूनही बरेच काही महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या व्यासपीठांवरून आता बोलायचेच आहे. तूर्त एवढेच. 
अरुणाताईंनी त्यांच्या काव्यात्म शैलीत बोलत राहावे आणि रसिकांनी ते ऐकावे, ही पर्वणी आता मिळणारच आहे. अरुणाताईंच्या निवडीने साहित्यसंमेलनाध्यक्ष आणि सामान्य रसिक यांची वीण यावर्षी अधिक घट्ट विणली जाणार यात काही शंका नाही. 
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या