आम्ही नवमतदार!

इरावती बारसोडे, ज्योती बागल
सोमवार, 8 एप्रिल 2019

माझे मत
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र दिसत आहे. सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहेत. या लोकसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू असणारा तरुण वर्ग या निवडणुकीविषयी नेमका काय विचार करतो आहे? या वर्गातदेखील उत्सुकता शिगेला पोचली आहे का? पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणारे अनेक तरुण-तरुणी आहेत. येणाऱ्या नवीन सरकारकडून या तरुण वर्गाच्या नेमक्‍या काय अपेक्षा आहेत? यांच्या मते कोणता राजकीय पक्ष या अपेक्षा पूर्ण करू शकेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याच शब्दांत...

खात्री वाटणे महत्त्वाचे 
यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करण्याचा अनुभव उत्सुकतेने भरलेला, शेवटपर्यंत अविस्मरणीय राहील असा असेल. आतापर्यंत आपण लहान आहोत, निर्णय घेण्यासाठी सक्षम नाही, समज नाही असे मोठ्यांकडून ऐकायला मिळते. समाजकार्य कराणाऱ्यांचा आदर्श आपल्या डोळ्यांपुढे असतो. मतदानासाठी ग्राह्य धरले जाणे म्हणजे आपण या देशात नागरिक म्हणून काहीतरी समाजासाठी चांगले करावे ही प्रेरणा मिळते. जो पक्ष समाजसेवा करताना दिसतो, तसेच भविष्यकाळात करत राहील अशी खात्री पटल्यावर मत द्यायला आवडेल.
- धनश्री विलास गायकवाड, तळेगाव (वय २१)


पक्ष नाही उमेदवार बघा
समजा माझा ‘अ’ पक्षाला पाठिंबा असेल आणि ‘ब’ व्यक्ती पंतप्रधान व्हावी असे मला वाटत असेल, तर मी मत आंधळेपणाने द्यावे का? इतर पक्षांचे उमेदवार कितीही लायक असले, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे का? नक्कीच नाही. याला जागरूक मतदान म्हणता येणार नाही. जागरूक नागरिक आणि मतदार तोच, जो पक्ष न पाहता उमेदवार पाहील. त्याचे कर्तृत्व, अनुभव, शिक्षण, समाजकार्य पाहील. भविष्यात प्रत्येकाने असाच विचार केला, तर सर्व राजकीय पक्षांवर योग्य उमेदवार उभे करण्याचे दडपण राहील. जनतेसमोर आपसूकच अनेक चांगले पर्याय उपलब्ध होतील. यामुळे कितीतरी गैरप्रकार बंद होऊ शकतील. म्हणूनच आंधळेपणाने मत देण्यापेक्षा निःपक्षपातीपणे, विश्‍लेषण करून मत द्यावे. तरच लोकशाही मजबूत होईल.
- आकाश कुलकर्णी, तळेगाव दाभाडे (वय १९)


नवीन जबाबदारी स्वीकारतोय
पहिल्यांदा मतदान करताना आपण एक नवीन जबाबदारी स्वीकारतो आहोत असे वाटते. भारताची प्रगती होण्यासाठी योग्य सरकार सत्तेवर येणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठीच मतदानाचा हक्क बजावून योग्य सरकार निवडून देणे हे आमचे कर्तव्य आहे, असे मला वाटते. येणाऱ्या सरकारने सगळी आश्‍वासने पूर्ण करावीत व ‘भारताची न्यायव्यवस्था’ सुधारावी. मतदान म्हटले, की मत ‘पक्षा’ला द्यावे की ‘उमेदवारा’ला हा एक स्वाभाविक प्रश्‍न उद्‌भवतो. माझ्या मते, सरकार हे कुठल्या एका उमेदवारामुळे चालत नाही, म्हणून पक्षाचा सशक्तपणा बघून पक्षाला मत द्यावे.  
- शिवानी सोमण, पुणे (वय २०)


माझं सरकार 
या वेळी मी पहिल्यांदा मतदान करत आहे. सरकारकडून माझ्या मोठ्या नाही, पण मूलभूत अपेक्षा नक्कीच आहेत. जसे की रोजगार, शिक्षण क्षेत्रातील बाजार कमी करणे, सामान्य माणसाच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि आपण जे लहानपणापासून ऐकत आणि म्हणत आलोय, ‘जय जवान जय किसान!’ तर जे शेती करतात आणि सीमेवर कशाचीही तमा न बाळगता आपल्या देशाचे रक्षण करतात, त्यांना खूप चांगल्या सुविधा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विविध सरकारी योजना पुरवाव्यात. जेणेकरून त्यांच्या मनात आपल्या लोकांवरील विश्वास अजून द्विगुणित होईल. आपला भारत देश हा सार्वभौम आणि लोकशाही तत्त्वावर चालणार देश म्हणून ओळखला जातो. म्हणून, माझ्या सरकारकडून मी अशी अपेक्षा बाळगतो, की भ्रष्टाचार आणि दहशतवाद हा आपल्या देशातून मुळासकट नष्ट करायला पाहिजे. 
- चैतन्य देशमुख, पुणे (वय २१)


दूरदृष्टी ठेवून मतदान केले पाहिजे 
लोकसभा निवडणुका विकास, ग्रामीण विकास तसेच राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अग्रस्थानी ठेवून झाल्या पाहिजेत. तरच ‘जय जवान - जय किसान’ व्यवस्थेत उतरेल. राष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्यांना मतदाराने स्वीकारावे. मतदान राष्ट्रनिर्माणासाठी योगदान म्हणून दूरदृष्टी ठेवून केले पाहिजे. 
- विकास विठोबा वाघमारे, सोलापूर (वय २२)


मला लोकशाही हवी आहे 
मतदान महत्त्वपूर्ण निर्णय आहे. मला लोकशाही आवडते आणि मला ती हवी आहे, म्हणूनच मला असा नेता निवडून द्यायला आवडेल, जो कोणतेही विकासकाम करताना लोकांचे हित लक्षात घेईल. मतदान करणे हा आपला हक्क आणि अधिकार आहे. उमेदवाराचे आणि पक्षाचे काम बघूनच मतदान करावे. म्हणून मी मतदान करणार आहे.
- प्रगती सावंत, वारजे माळवाडी (वय २२)


देशाची जबाबदारी, ही आपली जबाबदारी! 
यावेळी मी पहिल्यांदा मतदान करणार आहे, म्हणून खूप छान वाटत आहे. येणाऱ्या सरकारकडून वेगळ्या अपेक्षा नाहीत. प्रत्येक नागरिकांसाठी मतदान खूप महत्त्वाचे आहे, कारण आपण ज्या देशात राहतो, तो देश योग्य व्यक्तींच्या हातात देणे हे आपलेच काम आहे. म्हणून मी तर मतदान करणारच आहे, तर तुम्हीदेखील करा... 
- अदिती दाते, पुणे (वय १९)


लोकशाहीची सफलता मतदानावर अवलंबून
मतदानाचा हक्क महत्त्वपूर्ण आहे, कारण लोकशाहीचे यश मतदानावर अवलंबून आहे. भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करावी. सर्वसाधारण सुविधा, वाहतूक कोंडीचा सर्वव्यापक प्रश्‍न सोडवावा, ही नवीन सरकारकडून अपेक्षा आहे. मी ज्या पक्षाला मतदान करेन त्या पक्षाचे उमेदवार अनुभवी आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी उपलब्ध असतील, हे मी पाहीन.  
- अथर्व देशपांडे, पुणे (वय २०)


विकासासाठी मतदान कराच
सगळ्यांनी मतदान करणे महत्त्वाचे आहे. विकास हवा असेल, तर योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे. मतदान करताना मी पक्षापेक्षा उमेदवार बघेन. येणाऱ्या सरकारने स्वच्छता, वाहतुकीत सुधारणा, रोजगार संधी यांकडे आणखी लक्ष द्यावे, असे मला वाटते.  
- गंधार कुवळेकर, पुणे (वय १९)

संबंधित बातम्या