मानसिकता तीच! 

गौरी कानिटकर
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

नाटकातील लग्न
 

नाटकातल्या लग्नांचा अभ्यास करताना अनेक मजेशीर गोष्टी लक्षात आल्या. काही गोष्टी आज दीडशे वर्षं झाली तरी तशाच सुरू आहेत; किंबहुना त्याला वेगवेगळी कारणं देऊन त्या अधिक जोमानं सुरू आहेत. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नातले सोहळे, धूमधडाक्यात लग्न साजरं करणं, कर्ज काढून का होईना पण मनासारखं लग्न करणं - या गोष्टी अगदी १८५८ मध्येही तशाच होत्या. इतकंच नाही, तर हे लग्न साजरं करण्याच्या मानसिकतेतही बदल झालेला नाही. तसंच नुकतीच वाचनात आलेली एक गंभीर गोष्ट, म्हणजे आजही अनेक ठिकाणी बालविवाहांचं प्रमाण लक्षणीयरीत्या मोठं आहे. म्हणजे हीही गोष्ट आज तशीच सुरू आहे तर! जीवनाची गती वाढली आहे, जीवनमूल्यं बदलत आहेत. अशा परिस्थितीत एका बाजूला वरवर पाहता विवाहसंस्थेत परिवर्तन होताना दिसत असलं, तरी काही बाबतीत आपली मानसिकता जुनाट वळण सोडताना दिसत नाही. वर्षानुवर्षं मनात रुजलेल्या संकल्पना आपण घट्ट धरून आहोत. काही परंपरा सोयीच्या आहेत म्हणून आजही सोडवत नाहीत. जीवनातले वाढते ताणतणाव, असुरक्षितता, अस्वस्थता या सगळ्याचे पडसाद विवाहसंस्थेवर उमटत असल्यानं अनेक आव्हानं समोर उभी आहेत. त्यातून अनेक रूढी-परंपरांचा विळखा आजही आपल्याभोवती आहे. आपल्या घरातलं लग्न आपल्याला डामडौलात करायचं असतं; भलेही त्यासाठी कर्ज काढावं लागलं तरी चालेल. त्यातून येणारे ताणतणाव कितीही सोसावे लागले तरी चालतील अशी मानसिकता आहे. हीच मानसिकता दीड - पावणेदोनशे वर्षांपूर्वीही होती. 

गोविंद नारायण माडगावकर लिखित ‘व्यवहारोपयोगी नाटक’ (१८५८-१८५९) या नाटकातील त्रिंबकराव आणि त्यांची पत्नी चिमाबाई यांच्या कुटुंबात त्यांचा सतरा - अठरा वर्षांचा मुलगा आणि दहा - अकरा वर्षांची मुलगी असे चौघेजण असतात. त्या वेळच्या रूढीप्रमाणं त्या दोघांचं लग्नाचं वय उलटून चाललेलं असल्यानं चिमाबाईला त्यांची लग्नं ‘उरकून’ टाकायची घाई झालेली असते. एकदा लग्नं उरकली, की आपण मोकळे होऊ अशी चारचौघींसारखी तिची इच्छा असते. पण या लग्नांपासून होणारे अनेक तोटे त्रिंबकराव यांच्या लक्षात येत असतात. ते चिमाबाईला समजावून सांगतात. इतक्या लहान वयात लग्न करणं, पती - पत्नी म्हणून एकत्र येणं हे शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं हानिकारक आहे हेही सांगतात. शिवाय लग्नासाठी कर्ज काढावं लागेल आणि ते फेडण्यासाठी कसून प्रयत्न करावे लागतील. मुलाचं शिक्षण अजून पूर्ण झालेलं नाही, ते अर्धवट राहू शकतं, हेही ते समजावून सांगतात. त्याचं शिक्षण पूर्ण होणं हे मुलाच्या आयुष्याच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं आहे असं सगळे सांगूनही चिमाबाईंची समजूत पटत नाही. जगरहाटीची भीती आणि समाज -लोक काय म्हणतील ही भीती तिला सतावीत असते. अखेरीस तिच्या हट्टापायी आणि अडाणी आग्रहास्तव कर्ज काढून मुलांची लग्नं केली जातात. मानपान, वाजंत्री, सगळ्या प्रकारची हौस मौज - सगळं यथासांग होतं. परिणामी मुलाला शिक्षणासाठी पैसा उरत नाही आणि त्याला कारकुनाची नोकरी करून लग्नासाठी झालेलं कर्ज फेडावं लागतं. या नाटकाद्वारे तत्कालीन समाजात रूढ असलेला बालविवाह आणि कर्ज काढून लग्नातली हौसमौज करणं या गोष्टींकडं लेखकानं लक्ष वेधलं आहे. लग्नाचा सोहोळा करणं, लग्न थाटामाटात करणं ही भारतीय मानसिकता आहे. 

मुलगी जन्माला आल्यापासूनच तिच्या लग्नाच्या खर्चाचं नियोजन तिच्या आईवडिलांना करावं लागतं. तेव्हापासूनच तिच्या लग्नाची चिंता त्यांना वाटत असते. आई तर मुलीच्या  अगदी लहानपणापासूनच थोडं थोडं सोनं जमा करणं सुरू करते. कारण लग्नात दागिने घालायचे असतात. मुलीच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च यांचे अंदाजपत्रकच जणू मांडले जाते. याच धर्तीवर योगेश सोमण यांचं ‘लगीनघाई’ नावाचं विनोदी अंगानं लिहिलेलं नाटक २०१७ मध्ये प्रदर्शित झालं आहे. मुलीच्या लग्नासाठी म्हणून साठवलेले सगळे पैसे मुलीचे वडील मुकुंद यांना हार्टॲटॅक आल्यानं त्यात खर्च होतात. आता मुलीचं - अवंतीचं लग्न कसं होणार, त्यासाठी पैसे कुठून आणायचे याची चिंता त्यांना सतावत असते. लग्नाला किमान पाच - सहा लाख खर्च येईल आणि तो आपण कसा करायचा? एवढे पैसे कुठून आणायचे? हा खर्चाचा खड्डा कसा भरायचा? अशी चिंता त्यांना भेडसावीत असते. अवंतीचे वडील मुकुंद हे एका शिक्षणसंस्थेत उपप्राचार्य असतात. पण ‘लग्न रजिस्टर करूया, साधेपणानं करूया’ असे विचार मनात येण्याऐवजी ‘अवंती, तू पळून जाऊन लग्न कर,’ असा सल्ला ते तिला देतात. नुसता सल्ला देऊन थांबत नाहीत, तर त्यांच्याच कॉलेजमधला सत्यजित नावाचा मुलगा - केवळ त्यांना स्कूटरवरून घरी सोडायला येतो, म्हणून त्याची कोणतीही माहिती न काढता त्याची निवड ते अवंतीसाठी करतात. तिला त्याच्याशी मैत्री वाढविण्यासाठी प्रोत्साहनही देतात. नाटकाच्या अखेरीस ते दोघं लग्न करून अवंतीच्याच घरी राहायला येतात. कारण सत्यजित एकटाच असतो, त्याला आईवडील नसतात. अशा रीतीनं लग्नाचा खर्च वाचावा म्हणून वेगळ्या पद्धतीनं मुलीला प्रोत्साहन दिल्यानंतर मुलीबरोबर जावयाचीही जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते. या नाटकातील विनोदी भाग जरी बाजूला ठेवला, तरी लग्नाच्या खर्चाची जबाबदारी आणि त्यासाठी वेगळे मार्ग शोधायला लागण्याची मजबुरी ही भयंकर आहे. 

प्रत्येक कुटुंबात लग्न हा एक मोठा सोहळा असतो. कायम लक्षात राहील असं लग्न झालं पाहिजे, अशी मानसिकता असते. लग्न ठरण्यापूर्वी लग्न कसं करायचं याचीच चर्चा जास्त होत असते. या सोहळ्यासाठी किमान काही लाख खर्च करणं हे आपलं कर्तव्यच आहे, असं कुटुंबातील कर्त्या पुरुषाला आणि विशेष करून त्या घरातील स्त्रीला वाटत असतं आणि त्यासाठी अनेक घरांत कर्ज काढलं जातं. हुंडाबंदी कायदा असूनही आजही कित्येक जातीजमातींमध्ये हुंड्याची प्रथा आहे. पण त्याचं स्वरूप बदललं आहे. बदलत्या स्वरूपामध्ये भेटी स्वीकारल्या जातात. आपल्या मुलीचं लग्न व्यवस्थित करून देणं, याचा ताण नकळतपणे त्या घरातील पुरुषावर येतो. ही समस्या दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही. अनेक सुशिक्षित घरांमध्येदेखील लग्नाच्या खर्चाचा बोजा मुलीच्या आईवडिलांवर टाकला जातो. दोन्ही बाजूंनी निम्मा निम्मा खर्च करणं आजच्या महागाईच्या काळात अपेक्षित आहे. पण सोईस्कररीत्या त्यासाठी रूढी-परंपरांचा आसरा घेतला जातो. याच्याही पुढं आताच्या मध्यम-उच्च मध्यम वर्गातील मुलं-मुली स्वतःच्या पायावर नुसती उभी असत नाहीत; तर भरपूर कमावत असतात. लग्नाचा खर्च मात्र आईवडील करत असतात. स्वतःच्या लग्नाचा खर्च आता मुलामुलींनी उचलणं अपेक्षित आहे. आताच्या काळात महागाई वाढलेली असतानादेखील, लग्न हा आठ - आठ दिवस चालणारा सोहळा (event) होत चालला आहे. त्यासाठी फुलांची सजावट, मोठं कार्यालय, संगीत, मेहंदी, बरेच पदार्थ असलेलं जेवण यासाठी केला जाणारा खर्च वारेमाप असतो. लग्न एकदाच तर होणार आहे, मला एकच मुलगा/मुलगी - मग हौसमौज नको का अशी कारणं दिली जातात. यात आता लग्नापूर्वीच शूटिंग (pre wedding shoot), bachelors party, थीम वेडिंग, डेस्टिनेशन वेडिंग या गोष्टीही नव्यानं आल्या आहेत. 

आपल्या देशात लग्न ही आयुष्यातली खूप मोठी घटना मानली जाते. अगदी छोट्या शेतकऱ्यापासून किंवा ज्यांची आर्थिक आवक कमी आहे अशा सगळ्यांपासून ते मोठमोठ्या कारखानदारांपर्यंत, उद्योगपतींपर्यंत सगळेजण लग्नात पैशाची उधळण करीत असतात. लग्न लक्षात राहील असं झालं पाहिजे, या विचारधारेसाठी जास्त व्याजानं कर्ज काढून लग्नाचा event केला जातो. परदेशातील माणसं घरासाठी कर्ज काढतात, पण लग्न साधेपणानं करतात. पण आपल्या समाजात मात्र राहतील एका छोट्या घरात पण लग्न मात्र उदंड खर्च करून केलं जातं. १८५८ ते २०१७ या दीड-पावणेदोनशे वर्षांनंतरही हीच मानसिकता आहे हे पाहून अचंबित व्हायला होतं.

संबंधित बातम्या