सामाजिक नाटक - सं. शारदा 

गौरी कानिटकर
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

नाटकातील लग्न
 

एकोणिसाव्या शतकात इंग्रजांच्या आगमनामुळे हजारो वर्षे चालत आलेली जडशीळ व्यवस्था खडबडून जागी झाली हे आपण पाहिले. तत्कालीन समाजातील सर्व घडामोडी धर्मकल्पनेशी निगडीत होत्या. उच्चवर्णीयांमध्ये शास्त्रप्रामाण्य मानण्याची प्रथा होती. समाजातील प्रत्येक गोष्टीला धर्माचे पालुपद लावले जाई. इंग्रजांमुळे विकसित अशा संस्कृतीचा परिचय आपल्या देशातील विचारवंतांना झाला. समाज मनावरचा ईश्वरी सत्तेचा प्रभाव कमी झाला. पाश्चात्त्य विचारवंतांना अभिजाततेची, सौंदर्याची जाण होती. युरोपीय साहित्य आणि शास्त्रे यांचा प्रसार करणे हे जरी ब्रिटिश राज्यकर्त्यांचे उद्दिष्ट होते, तरी त्यातूनच इंग्रजी भाषेचा परिचय आपल्या देशातील धुरिणांना झाला हे विसरता येत नाही. इंग्रजी साहित्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य, बंधुभाव, समानता ही मूल्ये समाजमनात रुजायला मदत झाली. शिक्षणामुळे आपल्या व्यवस्थेतील दोष सुधारकांना दिसू लागले होते. एक नवजागरण झाले. न्या. रानडे, गोविंदराव कानिटकर यांनी आपापल्या सहचारिणींना शिक्षण देण्यास सुरुवात केली. याचा परिणाम पती आणि पत्नी संबंधांवरही झाला. त्याकाळी घराण्याला वारस हवा म्हणूनच फक्त पती आणि पत्नी यांचे शारीरिक संबंध घरातील मोठी माणसे खपवून घेत असत. त्यासाठी उत्तेजनही देत असत. पती-पत्नी संबंधांमध्ये प्रियाराधन, अनुनय याला थारा नव्हता. अत्यंत रुक्ष, व्यवहारापुरतेच पती आणि पत्नीचे नाते असावे अशीच जनरीत होती. पती आणि पत्नीने एकमेकांशी बोलण्यावरही बंदी होती. अशा बंदीमुळे पती पत्नी नाते गुदमरलेले होते. बालविवाह ही अनिष्ट रीतही बोकाळलेली होती. तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये आईवडिलांना आपल्या मुलांची लग्ने लवकर करण्याची घाई झालेली असे. (आजच्या काळातही २०२० मध्येही आईवडिलांना आपल्या मुलांची लग्ने करण्याची जितकी घाई झालेली दिसते, तितकी मुलेमुली निवांत दिसतात. कालानुरूप लग्नाचे वय पुढे गेलेले दिसले तरी लग्नाचे योग्य वय कोणते, या बाबतीत मुले मुली आणि त्यांचे आईवडील यांचा मतात तफावत आहेच.) मुलगी वयात येण्याअगोदर तिचे लग्न केले नाही, तर मुलीच्या वडिलांना पाप लागते अशी समजूत होती. रजोदर्शनापूर्वी त्या मुलीचा विवाह झाला नाही, तर त्या कुटुंबाला वाळीत टाकण्याची प्रथा होती. बालविवाहाच्या पद्धतीमुळे लहान मुलींवर अन्याय होत असे. मुलींच्या मनात अनुरागाची भावना निर्माण होण्यापूर्वीच त्यांचा विवाह करून दिला जात असे. त्या वयात येतायेताच त्यांच्यावर मातृत्व लादले जाई. स्त्रीच्या दृष्टीने या विवाहाला कोणताच अर्थ नव्हता. परंतु, मुलीचे आईवडीलही अगतिक होऊन जात. लोकापवादाच्या भीतीने बालवधूला साजेशा वराचीच निवड व्हायची असे नाही, तर कित्येकदा त्यांचे विवाह प्रौढ किंवा जरठ वरांशी करून दिले जात. आपल्या पुरुषसत्ताक समाजरचनेत कन्येपेक्षा पुत्राला महत्त्व आहे. पितरांना स्वर्ग मिळावा म्हणून पुत्रप्राप्ती आवश्यक मानली जाई. बालविवाह हा शास्त्रसंमत आहे असेही मत होते. यातूनच पुरुषाला कितीही लग्ने करण्याची मुभा होती. साहजिकच अल्पवयीन मुलींची लग्ने जख्ख म्हाताऱ्या नवरदेवाशी लावून दिली जात. 

याच काळातल्या, ना. बा. कानिटकर यांचे ‘संमतीकायद्याचे नाटक’ (१८९२) आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे ‘संगीत शारदा’ (१८९९) या नाटकांचा त्याकाळातल्या समाजावर मोठा परिणाम झाला. विवाहसंस्थेतील परिवर्तनाचा विचार करत असताना ‘संगीत शारदा’ या नाटकाचा टप्पा फार महत्त्वाचा ठरतो. आज सुमारे १२० वर्षांनंतरही या नाटकाची लोकप्रियता कमी झालेली नाही. या नाटकाने एक नवीन पर्व निर्माण केले. मराठी नाटकांच्या इतिहासात देवलांच्या ‘शारदे’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारदेच्या काळात स्त्रीजागृतीची सुरुवात झालेली होतीच. शारदा नाटकात जरठ-कुमारी विवाह आणि कन्याविक्रय या दोन्ही गोष्टींवर देवलांनी लक्ष केंद्रित केले आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे तंतोतंत चित्रण त्यांनी केले आहे. 

भुजंगनाथ या पंचाहत्तर वर्षे वयाच्या म्हाताऱ्याच्या पत्नीचे निधन झाले आहे. तो एकटा पडला आहे आणि शिवाय तो निपुत्रिकही आहे. जो निपुत्रिक आहे त्याला शास्त्राने नरकवास ठरविला आहे, म्हणूनच पुन्हा विवाह करण्याची मनीषा तो बाळगून आहे; तेही अगदी लहान वयाच्या मुलीशी. हे लग्न ठरवण्यासाठी भद्रेश्वर नावाचा मध्यस्थ मदत करतो. आयत्या वेळी कोदंड नावाच्या तरुण समाजसेवकाच्या प्रयत्नामुळे ऐन मंडपात मंगलाष्टकांच्या वेळी हे लग्न मोडते. सामाजिक बदनामीच्या भीतीने शारदा जीव द्यायला जाते, पण कोदंड तिला तसे करू देत नाही आणि अखेरी शंकराचार्यांच्या आज्ञेने शारदा आणि कोदंड यांचे लग्न होते. 

नाटकातील अतिशय कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे संघर्षाचा. सर्वशक्तिमान पुरुष आणि सामाजिक रुढीमुळे हतबल झालेली स्त्री, भुजंगनाथ आणि शारदा आणि त्याचवेळी यापेक्षा जास्त विदारक कांचनभट - शारदेचे वडील - जे पैशाच्या लोभाने आपल्या मुलीचा विवाह म्हाताऱ्याशी करावयास तयार झाले आहेत. त्यांचा आणि शारदेची आई इंदिराकाकू यांचा संवाद या प्रसंगाची धार अधिकच तीक्ष्ण करतो. इंदिराकाकू म्हणतात, पोरीचं लग्न नाही झालं तरी तश्शी जवळ बाळगीन, पण पैशाच्या लालचीनं विकू द्यायची नाही. त्यावर कांचन भट म्हणतात, ‘तुम्ही बायका म्हणजे शुद्ध अडाणी जनावरं. घातलेलं खावं, दिलेलं नेसावं आणि सांगितलेलं करावं हे तुमचा काम!’ किंवा ‘गळ्यात दावं बांधून मी विकीन तिथं तुला गेलंच पाहिजे.’ कांचन भटांच्या या उद्‍गारांतून तत्कालीन पुरुषी मनोवृत्तीचे अचूक दर्शन घडते. स्वतःच्या पोटच्या मुलीवर अन्याय होत असतानादेखील आईला बोलण्याची प्राज्ञा नव्हती. शेवटी तिचे लग्न त्या म्हाताऱ्याशी ठरतेच. त्यावरून तिच्या मैत्रिणी तिची चेष्टाही करतात. पण श्रीमंत पंचाहत्तर वर्षाचे आहेत हे कळल्यावर त्या चेष्टेला करुण वळण लागते. पण एकाही मुलीला त्याबद्दल चीड निर्माण होत नाही. हे लग्न होता कामा नये असे कुणालाही वाटत नाही. याचाच अर्थ त्या काळात हे सर्रास घडत होते. ते नाईलाजाने का होईना पण सर्वांनी स्वीकारले होते. ‘आईबापांनी बुडवलं आणि नवऱ्यानं तुडवलं, सांगायचं कुणाला?’ हेच प्राक्तन तत्कालीन परिस्थितीतल्या स्त्रियांचे होते. इंदिराकाकू आणि शारदा आपापली मते स्पष्टपणे नोंदवतात, हेही खूप महत्त्वाचे होते. या काळात पुरुषी वर्चस्व होते, पण स्त्रिया मुकाट बसत नव्हत्या. पुरुषप्रधान संस्कृतीत भुजंगनाथासारख्या म्हाताऱ्याला त्याची नात शोभेल अशा मुलीशी लग्न करता येते, पण या बाबतीत मुलीचे मत विचारात घेतले जात नाही. पुरुष त्याची प्रत्येक इच्छा  पूर्ण करू शकतो, पण स्त्रीला मात्र तिचे मत उघडपणे बोलून दाखवण्याचेसुद्धा स्वातंत्र्य नाही. पुरुषप्रधानतेमुळे सर्वाधिकार पुरुषाकडे होते. तत्कालीन परिस्थितीत उपवर मुलीचे लग्न ठरवण्याचा अधिकार फक्त पित्याकडे असे. तिच्या मातेच्या मताचा काहीही विचार केला जात नसे. त्यामुळे मुलीचे मत जाणून घेण्याचा प्रश्नच उद्‍भवत नव्हता. आजही काही वेगळी परिस्थिती नाही. घरातील महत्त्वाच्या अनेक निर्णयांमध्ये पत्नीचे स्थान गौण मानण्यात येते. देवलांच्या काळात तर स्त्रिया सर्वार्थाने पुरुषांवर अवलंबून होत्या. त्यामुळे त्यांचे मत विचारात घेण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही. 

सामाजिक नाटकात व्यक्ती आणि तत्कालीन सामाजिक मूल्य व्यवस्था यांच्यामध्ये निर्माण झालेल्या संघर्षाचे चित्रण येत असते. ‘शारदा’ नाटकात त्याचे उत्तम दर्शन घडते. शारदेची आई इंदिराकाकू आणि वडील कांचन भट यांचे संबंध सौहार्दाचे नाहीत. स्त्रियांना असणारे वस्तूमूल्य आणि विवाहाच्या बाबतीत वडिलांना असणारे सर्वाधिकार यांचे यथातथ्य चित्रण या नाटकात आले आहे. शारदेची समस्या ही तिची व्यक्तिगत समस्या न राहता संपूर्ण समाजात खळबळ उडवून देणारी एक सामाजिक समस्या बनलेली होती. ‘जरठे विवाह न करावा’ अशी धर्माज्ञा जरी शंकराचार्यांनी दिलेली होती, तरी ‘सगोत्र विवाह सशास्त्र नाही’ याचा आधार घेतला आहे. (आजही या सगोत्राचा विचार लग्न जमवताना केला जातो.) पारंपरिक शास्त्रांचा आधार घेऊन एकप्रकारे लोकांच्या श्रद्धांची जपणूकच देवलांनी केलेली आहे. या नाटकाचा विषय, एका प्रसिद्ध संस्थानिकाने अल्पवयीन मुलीशी विवाह निश्चित केल्याची बातमी ऐकून देवलांना सुचला होता असे म्हणतात. यावरून समाज आणि साहित्य यांचा संबंध लक्षात येतो. कलात्मक उंची गाठणारे पहिले सामाजिक नाटक असा बहुमान मिळवणारे ‘संगीत शारदा’ या नाटकाला समीक्षकांनी दिला आहे, तो योग्यच आहे.

संबंधित बातम्या