‘घराबाहेर’ पडणारी नायिका 

गौरी कानिटकर
सोमवार, 9 मार्च 2020

नाटकातील लग्न
 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांची संख्या लक्षणीयरीतीने वाढत होती. त्यांच्या विचारात परिवर्तन होत होते. शिक्षणामुळे स्त्रियांच्या विचारातल्या परिवर्तनावर प्रख्यात लेखक आचार्य अत्रे यांनी आपल्या 'घराबाहेर' (१९३४), 'उद्याचा संसार' (१९३५) आणि 'जग काय म्हणेल' (१९४६) या नाटकांतून नेमकेपणाने भाष्य केले आहे. अत्रे यांच्या या सगळ्याच नाटकांनी काही मूलभूत प्रश्न निर्माण केले आहेत. 

त्या आधीची सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली, तर स्त्रियांमध्ये असलेले आर्थिक परावलंबित्व, परंपरा, रूढी यांमुळे स्त्रियांची कुचंबणा होत होती. स्त्रीशिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य याबद्दल गैरसमज होते. स्त्री शिकली की विशाल जगाची तिला ओळख होणार आणि त्याचबरोबर ती लिहू लागली, की बंदिस्त घराचा एखादा भाग ती घराबाहेर, उघड्यावर नेणार आणि त्यामुळे घरातल्या गोष्टी, त्यातले ताणतणाव, तिच्या मनातले तरंग बाहेर जाणार आणि त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंध खिळखिळे होणार, अशी भीती घरातल्या वडिलधाऱ्या मंडळींना वाटली असणार. त्याचे स्पष्ट प्रत्यंतर 'घराबाहेर' या नाटकातून येते. घराबाहेर या नाटकाची निर्मला ही नायिका. तिचे सासरे आबा हे म्हणतातदेखील, 'बायकांच्या हाती लेखणी म्हणजे माकडाच्या हाती कोलीत.' 

निर्मला ही गरिबाघरची अनाथ मुलगी असते. ती आबासाहेब या जहागीरदारांची सून होते. घरातल्या तीन पुरुषांच्या तीन तऱ्हा असतात. शौनक हा निर्मलाचा पती - हा फाजील लाडामुळे बेताल वागत असतो. शिवाय तो स्वभावानेही दुबळा असतो. सासरे आबासाहेब जुलमी आणि विषयांध असतात. नीलकंठ हा शौनक याचा सावत्र भाऊ असतो. त्याच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेले असते. आबासाहेबांच्या आधिपत्याखाली सगळे व्यवहार होत असतात. जहागीरदारी वैभव आणि सुखासीनता यांमुळे एक प्रकारचा आळशीपणा आलेला असतो. या घरात सूनदेखील आणली जाते ती गरिबाघरची. उपकाराच्या, श्रीमंतीच्या ओझ्याखाली दबेल अशी. सासरे आबासाहेब आणि दीर नीलकंठ या दोघांचीही तिच्यावर वाईट नजर असते. ज्या पतीवर निर्मलेची भिस्त असायला हवी तो तिचा पती शौनक मुखदुर्बळ असतो आणि इतकेच नाही, तर तो आपल्याच विश्वात दंग असतो. त्याला निर्मला आपली बायको आहे, तिचा आदर करत तिच्याशी वर्तन करणे हे त्याच्या गावीही नसते. तरीही निर्मला आपल्या शीलाचे रक्षण करीत जगत असते. ती फारसा प्रतिसाद देत नाही असे लक्षात येताच हे दोघेजण तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला लागतात. (कायमच बायकांचे चारित्र्य ही गोष्ट अशी हातचा राखून ठेवल्यासारखी असते. वेळ येताच भलेभलेही त्याचाच आधार घेताना आजच्या काळातही दिसून येते.) या प्रसंगानंतर मात्र निर्मलेची सहनशक्ती संपते. तिच्यावर कुभांड रचून आबासाहेब तिला घराबाहेर काढायचा निर्णय घेतात. त्याही वेळी शौनक तिची बाजू ऐकून न घेताच म्हणतो, ''तिच्या अपराधाबद्दल जर तुम्हां दोघांची खात्री झाली असेल, तर मला काहीच बोलायचे नाही.'' 

या सगळ्या प्रकारामुळे निर्मला चवताळून उठते. पुरुषी अहंकार, स्त्रीकडे पाहण्याचा भोगवादी दृष्टिकोन आणि ती आपल्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही असे दिसताच तिच्याकडे पाहण्याचा तिरस्काराचा दृष्टिकोन या सगळ्याचा ती निषेध करते. स्वतःच्या नवऱ्याच्या नेभळटपणाचा धिक्कार करते आणि स्वतःच 'घराबाहेर' पडायचा निर्णय घेते. पण आबासाहेब तिच्या मुलाला तिच्यापासून हिसकावून घेतात. तिच्या अंगावरचे दागिनेही मागून घेतात. त्याच क्षणी ती उरलेसुरले मंगळसूत्रदेखील त्वेषाने तोडून टाकते. १९३४ मध्ये  

स्वतःच्या गळ्यातले मंगळसूत्र तोडून घराबाहेर पडणे ही फारच धाडसाची गोष्ट होती. दुबळ्या नवऱ्याची निर्भत्सना, मंगळसूत्र तोडून घराबाहेर पडणारी निर्मला ही पहिली स्वतंत्र नायिका आहे. आचार्य अत्रे यांनी १९३४ मध्ये लिहिलेल्या या नाटकात निर्मलेच्या तोंडून स्त्रीला पुरुषाकडून - विशेषतः पतीकडून कोणत्या अपेक्षा असतात ते स्पष्टपणे आणि निर्भीडपणे मांडले आहे. निर्मला पतीला स्पष्टपणे सुनावते, ''सौंदर्य हे जर स्त्रीचे सामर्थ्य मानले, तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य ठरायला हवे. कोणाही स्त्रीला दुर्बळ नवऱ्याबद्दल आकर्षण वाटणे शक्यच नाही. ज्या पतीला आपल्या पत्नीचे घरातदेखील संरक्षण करता येत नाही त्याच्याबद्दल तिला विश्वास कसा वाटेल?'' 

स्त्रीच्या तिच्या पतीबद्दलच्या अपेक्षा प्रथमच इतक्या स्पष्टपणे मांडल्या गेल्या. पुरुषांच्या अपेक्षापूर्तीला समाजाने कायमच पहिली पसंती दिली आहे. मंगळसूत्राला ती देवाब्राह्मणांच्या साक्षीने बांधलेला गुलामगिरीचा फास संबोधते. तिच्या चारित्र्यावर चिखल उडवणे, तिच्या अंगावरचे दागिने काढून दे असे सांगणे, तिच्या मुलाला तिच्यापासून हिसकावून घेणे अशा एकापेक्षा एक जीवघेण्या घटना घडत असताना तिचा नवरा शौनक केवळ बघ्याची भूमिका घेतो. त्याला स्वतःचे मतच नसते. त्याचा निर्मलावर केलेल्या आरोपांवर विश्वास नसतो, पण तिची बाजूही ऐकून घ्यायची तसदीही तो घेत नाही. 

आजपर्यंत स्त्री ही कोणाच्यातरी आधारावर उभी होती. लग्न होईपर्यंत वडील, नंतर पती आणि नंतर मुलगा यांच्या आधाराने जगणे हेच तिचे प्राक्तन होते आणि तिलाही त्याची सवय होती. पण शिक्षणामुळे ती स्वावलंबी होऊ लागली होती. स्वतः खंबीर होऊ लागली होती. सगळीकडून निराधार झाल्यावर, इथे आपल्याला कोणीच मदत करणार नाही असे लक्षात आल्यावर ती स्वतः खंबीर होते. धीर एकवटते आणि या घरात राहायचे नाही असे मनोमन ठरवून तसे अमलातही आणते. पती आणि पत्नी या महत्त्वपूर्ण नात्यावर लेखकाने प्रकाश टाकला आहे. 

आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून उतरलेली काही वाक्ये विवाहसंस्थेसंबंधी विचार करायला लावणारी आहेत. शौनकला निर्मला म्हणते, ''स्त्रीला या जगात तिचे स्वतःचे घर नसते. स्त्री ही आपल्या पतीच्या घरातील दोन खणाच्या खोलीतील भाडेकरी असते. तिच्या मालकाच्या मनात आले, तर तो चोवीस तासांची नोटीस देऊन तिला त्या घराबाहेर, संसाराबाहेर, जगाबाहेर हाकलवून देऊ शकतो.'' आजही, एकविसाव्या शतकातही हे प्रश्न सुटले आहेत का? हा प्रश्न पडतो. स्त्री पुरुष संबंधातील बदलते संदर्भ या नाटकाने अचूक टिपले आहेत. स्त्रीचे आत्मभान जागे होऊ लागल्याच्या त्या खुणा होत्या. स्वातंत्र्याच्या दिशेने मराठी नाटकातील स्त्रीची सुरू झालेली वाटचाल अत्रे यांच्या 'घराबाहेर'ने अधोरेखित केली. त्यामुळेच स्त्रीला अर्थार्जनाची निकड भासू लागली. घराबाहेर पडल्यानंतर पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा ही विवंचना असतेच. शिवाय घराबाहेर पडल्यानंतर स्वतःच्या शीलाचे रक्षण करीत वर्तन कसे असावे याचा विचारही तिला करावा लागतोच. पण हीच आत्मभानाची खूण होती.   

संबंधित बातम्या