नाटकातील आत्मभानाचा प्रवास

गौरी कानिटकर
सोमवार, 23 मार्च 2020

नाटकातील लग्न
 

आपल्यापेक्षा आपली बायको ही जास्त कमावते, तिला समाजात आपल्यापेक्षा जास्त मान आहे हे अनेक नवऱ्यांना रुचत नाही, पचनी पडत नाही. पण स्त्रियांनी मात्र पुरुषाच्या यशात स्वतःचे यश मानावे, स्वतःचे सुख मानावे, हीच वर्षानुवर्षे चालत आलेली रीत आहे. मो. ग. रांगणेकर यांचे १९४२ मधले ‘कुलवधू' हे नाटक याचे तंतोतंत उदाहरण आहे. या नाटकातील नायिका भानुमती आणि तिचा नवरा देवदत्त यांचे लग्न हे आंतरजातीय असल्याने देवदत्तच्या वडिलांचा त्याला विरोध असतो, त्यामुळे लग्नालादेखील आलेले नसतात. त्यानंतर काही कारणाने देवदत्तची नोकरी जाते. तो आजारी पडतो. साहजिकच संसाराची धुरा सांभाळण्याचे काम भानुमतीकडे येते. ती गाण्यात पारंगत असते. त्यामुळे तिला एका सिनेमात काम मिळते. नाटकाच्या सुरुवातीलाच त्याला पुन्हा नोकरी मिळाल्याचे समजते. पण त्याला पगार असतो साठ रुपये आणि तिला पगार असतो पंधराशे रुपये. हीच खरी संघर्षाची ठिणगी असते. 

जास्त पैसे मिळवत असूनही ती त्याचा टेंभा न मिरवता देवदत्तची मर्जी राखत असते. सासू सासऱ्यांनी तिचे तोंडही पाहिलेले नाही, याची तिला रुखरुख असते. म्हणून ती त्यांना आग्रहाने बोलावून घेते. आपल्या प्रेमळ सुशील वागणुकीने ती त्यांना जिंकून घेते. परिणामी त्यांच्या मनातला तिच्याबद्दलचा तिचा रागही जातो. पण देवदत्तच्या मनात तिच्याबद्दल राग आहे. आपल्यापेक्षा आपली बायको जास्त पैसे मिळवते, ती आपल्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे, जास्त यशस्वी आहे, यामुळे एक 'नवरा' म्हणून त्याचा अहंकार दुखावलेला आहे. तिची यशस्विता, लोकप्रियता जशी जशी वाढत जाते आहे तसतसे आपण दुर्लक्षित होत चाललो आहोत, ठेंगणे होत चाललो आहोत ही त्याची भावना बळावू लागते. एखाद्या शोभेच्या वस्तूपेक्षा जास्त अस्तित्व राहिले नाही असे त्याला वाटू लागते.

तिच्या उत्तम अभिनयाबद्दल सिनेमा कंपनीत हार तुरे, मेडल देऊन तिचा सत्कार होतो. पण या सत्काराला तिच्या शेजारी स्टेजवर आमंत्रित म्हणून बसण्याऐवजी स्वतःच्या पैशाने तिकीट काढून तो थिएटरमध्ये कुठेतरी कोपऱ्यात बसणे पसंत करतो. इतकेच नाही तर तिचा नवरा म्हणून सांगण्यात त्याला स्वतःची मानहानी वाटते. तिच्यामुळे त्याला लोक ओळखतील हे त्याला कमीपणाचे वाटते. 

'आपल्या नवऱ्याने मोठे व्हावे' असे बायकांना वाटत असते. त्यांच्या मोठेपणात सुख मानून घेण्याचा निर्व्याज उदारपणा बायकांत असतो. पण पुरुषांना मात्र बायको आपल्या वरचढ झालेली पाहून तिचा मत्सर वाटतो. देवदत्त तिला म्हणतो, 'तुझा एवढा गुणगौरव चाललेला असताना तुझ्या शेजारी बसणं मात्र मला असह्य झालं असतं. केवळ तुझा नवरा म्हणून लोक माझ्याकडं पाहणार होते. मी प्रत्यक्ष तुझा नवरा, पण कुणी कुत्रंदेखील मला ओळखत नव्हतं! मला स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. तू आहेस म्हणून मला लोक ओळखतात, हे शल्य पुरुषाला कधीही सहन होणार नाही. तू पूर्वीसारखी फक्त माझी बायको म्हणून राहिली असतीस, तर मी किती सुखी झालो असतो! पण तू आज मोठी झालीस आणि माझं सारं सुख नाहीसं झालं.''

हे सगळे ऐकून भानुमतीला धक्का बसतो. आपण जास्त पैसे मिळवतो म्हणून त्याला सुखात राहायला मिळत आहे असा विषाद त्याला वाटू नये म्हणून तिने खरोखरच त्याची काळजी घेतलेली असते. पण माझ्या सुखदुःखात माझा सहचर सहभागी नाही, इतकंच नाही तर त्याला आपल्या यशाबद्दल मत्सर वाटतो आहे हे पाहून ती आश्चर्य चकित होते. तिला त्याचा अतिशय राग येतो, वाईट वाटते. या सुशिक्षित नवऱ्यापेक्षा त्याचे ओबडधोबड, अशिक्षित आईवडील जास्त सुसंस्कृत आहेत आणि त्यांना तुमच्यापेक्षा शतपटीने माणुसकी आहे ती असे त्याला ऐकवते आणि बाणेदारपणे घरातून निघून सासू-सासऱ्यांकडे खेडेगावात जाते. त्यांच्याबद्दल तिला जास्त विश्वास वाटतो. तिला आदरपूर्वक स्वीकारले जाईल याची खात्री वाटते. घरात अडगळीसारखे असलेले स्थान तिला मान्य नाही. जिथे तिला स्त्री म्हणून आदर मिळत नाही त्या घरात राहायचे नाही, हा खंबीर निर्णय ती घेते. संपूर्ण कुटुंबाचा तोल जी व्यक्ती सांभाळते, कुटुंबात जी सहनशील आहे, कणखर आहे आणि असे असूनही तिचे स्थान कायम दुय्यमच का राहिले आहे? कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य स्त्रीमध्ये असते, तरीही तिला कुटुंबात आदर मिळत नाही. 

गृहिणी म्हणून तिने घरातली सगळी कामेही करावीत आणि त्याच वेळी सोशिकता, चारित्र्य संपन्नता, आपुलकी, हळुवारपणा, सात्त्विकता, नैतिकता यांचे अधिष्ठानही हवे, अशी दुहेरी अपेक्षा नाटककारही ठेवतात. भानुमती शेवटी घर सोडून जाते. ती सासरी खेड्यात जाते. भानुमती खेड्यात का जाते? तिच्या व्यक्तिमत्वाला वाव मिळेल, अभिनय क्षेत्रात कर्तृत्व गाजवण्याचे समाधान मिळेल अशा ठिकाणी न जाता कोकणातल्या खेड्यात ती जाते. सासू-सासऱ्यांकडे, एक सोज्वळ सून म्हणून जगण्यासाठी. इथे रांगणेकर यांनी पारंपरिक विचारांचा आधार घेतला आहे. तरीही तिचा घर सोडण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरतो (आजच्या काळातली मुलगी नवऱ्याशी नाही पटले, तर तिच्या आई वडिलांकडे जाते किंवा एकटी राहून परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद अजमावते आणि घटस्फोट घेण्याची तयारी दाखवते किंवा एकटीच्या बळावर नवऱ्याची विचारधारा बदलवून टाकण्याचे धैर्य दाखवते).

स्त्रियांमध्ये अशा तऱ्हेचे आत्मभान जागे होण्यासाठी अनेक वर्षे जावी लागली. स्वतःचे अस्तित्व आधी स्वतःला जाणवणे आणि नंतर त्या अस्तित्वाची दखल घरातल्या माणसांनी घ्यावी यासाठी तिला सतत संघर्ष करावा लागला. बंड पुकारावे लागले. अत्यंत धीम्या गतीने सुरू झालेल्या या आत्मभानाच्या प्रवासाची दखल त्या काळातल्या अनेक नाटककारांनी घेतली. 

'स्वतःचा अपमान सहन करीत जगायचे नाही' हा विचार करून ठामपणे घरातून बाहेर पडणे यासाठी स्वतःला आतून एक प्रकारचे बळ निर्माण करावे लागते. धाडस दाखवावे लागते. तरीही भानुमती बाहेर पडली आणि आपल्या सासू-सासऱ्यांकडेच गेली. स्वतःच्या हिमतीवर घराबाहेर पडून एकटीने जगायचा निर्णय तिने घेतलेला नाही. पण याच काळातली लक्ष्मी मात्र आपल्या नवऱ्याला समजून घेत स्वतःचे विचार सडेतोडपणे मांडते आणि नवऱ्याला बदलायला भाग पाडते. ही लक्ष्मी आहे रांगणेकर यांच्याच १९४५ मधल्या 'माझे घर' या नाटकातील. कर्ता पुरुष ही संकल्पना त्या काळी कुटुंबात रुजली होती. घरातले सगळे निर्णय घरातला कर्ता पुरुष घेत असे. त्या घरात कर्त्या पुरुषाचे सार्वभौमत्व असे. घरातील इतर पुरुषांनाही त्या कर्त्या पुरुषाच्या तालावर नाचावे लागे, अशा वेळी दुसऱ्या घरातून आलेल्या त्या स्त्रीला तसे करावे लागे यात काही आश्चर्य नाही. लग्नानंतर आपण दोघांनीच फक्त सिनेमाला जावे, फिरायला जावे, दोघांचाच फोटो काढावा असे लक्ष्मीला वाटत असते. पण घरात बाकीची माणसे असताना आपण दोघांनीच फिरायला जाता कामा नये असे त्याचे मत असते. 

घरातल्या सगळ्यांचा फोटो काढायचा आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी तयार राहावे असा सूचनावजा आदेश लक्ष्मीचे सासरे म्हणजेच घरातला कर्ता पुरुष देतो. घरातल्या सगळ्यांचा फोटो काढायचा आणि तो भिंतीवर टांगायचा ही पद्धत तत्कालीन कुटुंबांमध्ये रूढ होती. त्यातून आम्ही कसे सगळे एक आहोत, एकत्र आहोत हे पिढ्यानपिढ्या दाखवायचे ही पद्धत रूढ होती.. आणि असा फोटोही त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे नऊवारी लुगडे नेसून, अंगभर दागिने घालूनच काढला पाहिजे ही अटही होती. लक्ष्मी ते नाकारते. फोटो काढायला तिची ना नाही, पण त्यावेळी काय घालायचे, कोणती साडी नेसायची हे स्वातंत्र्य मला नाही तिथे मला जायचे नाही, हे ती ठामपणे सांगते. तो फोटो माझा नाही, त्या शेला आणि दागिन्यांचा आहे असेही म्हणते. तिला हा दिखाऊपणा नकोसा वाटतो. तिला स्वतःची मते आहेत. पण तिचा नवरा नारायण मात्र त्याच्या वडिलांच्या मताबाहेर नाही. त्याचे वडील – नाना जे म्हणतील तसा तो वागणारा आहे, स्वतःचे विचार नसणारा आहे. यातून या नाटकातील संघर्ष उभा राहतो. शेवटी त्याला आपल्या खुरटलेल्या  व्यक्तिमत्त्वाची जाणीव होते. त्यांच्यापासून दूर गेल्यावर त्याला स्वतःचा दुबळेपणा लक्षात येतो. तो आपल्या वडिलांना म्हणतो, 'तुम्ही आम्हा साऱ्यांना आपल्याच आत्म्यात विलीन करून टाकलंत. पांगुळगाड्याशिवाय रांगतं मुल चालू शकत नाही तसं तुमच्या पांगुळगाड्याशिवाय मला हालता येईना.. चालता येईना.. बोलता येईना.. विचारदेखील करता येईना.' लक्ष्मीने स्त्री असूनही स्वतःच्या स्वतंत्र मताचा आग्रह धरला. हा विचार रांगणेकर यांच्या लक्ष्मीने मांडला आणि स्वतःबरोबरच आपल्या नवऱ्यालाही कणखर केले. स्वतःबरोबरच नवऱ्याचाही विचार त्यामध्ये आहे हे विशेष!   

संबंधित बातम्या