''श्रीमंत''मधील विदारक वास्तव

डॉ. गौरी कानिटकर
सोमवार, 13 जुलै 2020

नाटकातील लग्न

स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्या सीमारेषेवर वि. वा. शिरवाडकर, पु.ल. देशपांडे यांच्या नाट्य लेखनास सुरुवात झाली होती. वसंत कानेटकर यांनीही नाट्य लेखनास प्रारंभ केला होता. वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, जयवंत दळवी, खानोलकर, महेश एलकुंचवार आदी नाटककारांनी आपल्या नाट्य कृतींमधून समकालीन सामाजिक प्रश्नांची दाखल घेतली. त्यामुळे सामाजिक आशय व्यक्त करणाऱ्या नाटकांचा प्रवाह बराच विस्तीर्ण झाला. नाटकातील कथावस्तूमध्ये माणूस, कुटुंब, एकूणच माणसाच्या आयुष्यातला शांततेचा अभाव, वाढलेला भ्रष्टाचार, बेकारी, दारिद्र्य, निराशावाद, महागाई, व्यक्तिगत प्रश्न, स्त्री-पुरुष यांच्यातील संबंध, नवरा-बायको यांच्यातील ताणतणाव आणि त्याचा नाते संबंधांवर होणारा परिणाम, सामाजिक विकृती, सामाजिक समस्या, वेड यांना स्थान मिळाले. काळानुरूप समाज झपाट्याने बदलत असतो. हे बदलते स्वरूप रंगभूमीत परावर्तित होत गेले. 

 कुटुंब हा सामान्य माणसाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असल्याने कुटुंब विषयक आशयसूत्रे बहुसंख्य नाटकांतून पाहावयास मिळतात. कुटुंब ही एक सामाजिक संस्था आहे. कुटुंब हे स्त्री करिता एक सुरक्षिततेचे साधन मानले गेले. पण पुरुषप्रधान आणि पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीची नेहमीच परवड झाली. विजय तेंडुलकर यांच्या १९५५ मध्ये रंगमंचस्थ झालेल्या ''श्रीमंत'' या नाटकात पितृप्रधान कुटुंब पद्धतीनुसार जीवनमूल्ये बाळगणाऱ्या एका कुटुंबाची कहाणी आहे. 

  दादासाहेब वागळे हे एक उच्च मध्यमवर्गीय कारखानदार, त्यांची पत्नी मालिनीबाई. त्यांचा कोणताही कामधंदा न करणारा मुलगा आणि मुलगी मथुरा असे हे चार जणांचे चौकोनी कुटुंब. नाटकाच्या सुरुवातीलाच समजते, की मथुरेचे लग्न झालेले नाही, पण तारुण्यसुलभ आकर्षणामुळे तिला दिवस गेले आहेत. ती चार महिन्यांची गर्भार असते, पण तिची प्रकृती नाजूक असल्याने गर्भपात शक्य नसतो. मथूच्या या कृत्यामुळे घरातील सर्वजण अस्वस्थ असतात. या अचानक अस्थिर करणाऱ्या परिस्थितीतून सुटण्याचा एकच मार्ग दादासाहेबांना वाटतो, तो म्हणजे बाळासाठी पिता शोधणे. पैसे देऊन बाळासाठी पिता शोधण्याचे ठरते. कसाही, त्याची कोणतीही माहिती नसताना, त्याचा सामाजिक दर्जा माहीत नसताना, त्याची जीवनशैली माहीत नसलेला असा श्रीधर पिता म्हणून त्या कुटुंबाच्या ओळखीच्या डॉक्टरांच्या मध्यस्थीने घरी येतो. त्याचे कुल, गोत्र काहीही विचारात न घेता त्याला पिता म्हणून विकत घ्यायचे ठरते. त्यामुळे दादासाहेबांचा घरंदाजपणा, प्रतिष्ठीतपणा जपला जाणार असतो. डॉक्टर मथुरेचे मत घ्यावे असे सुचवतात, पण दादासाहेब ते नाकारतात. त्यांना वाटते, की एखाद्या दरोडेखोराशी किंवा जन्माधांशी लग्न करायची वेळ आली, तरी ती आता कोणत्या तोंडाने नाही म्हणणार? दादासाहेब तिला धीर देण्याऐवजी कलंकित मानतात. आमच्या तोंडाला काळोखी फासली, नादान कार्टी अशा नेहमीच्या शेलक्या शब्दांनी तिची संभावना करतात. वेळ आली तर स्वतःच्या मुलीला कुणाच्याही गळ्यात बांधायला ते तयार असतात. मथूची आई मात्र कमालीची अस्वस्थ असते. तिला आपल्या मुलीची काळजी वाटत असते. पण दादासाहेबांना मिळेल त्या किमतीला, मिळेल तो माणूस आणून मथूचे लग्न करावयाचे असते. कारण समाजातली प्रतिष्ठा त्यांना जास्त महत्त्वाची वाटत असते. ज्याच्याबरोबर आपल्या मुलीला जन्म काढायचा आहे, तो धनाने नसला तरी मानाने श्रीमंत असावा अशी गरज त्यांना वाटत नसते. मथूसाठी जो माणूस निवडला गेलेला असतो, तो दादासाहेबांच्या इभ्रतीला साजेसा नसतो. जुगार खेळणारा, निर्धन असा असतो. तो म्हणतोही, ''काय आहे पैसा म्हणजे? जुगाराच्या अड्ड्यावर या हातांनी गोळा करून याच हातांनी उधळतो मी! असा निर्धन, गलिच्छ, राकट वयावरचा आडदांड - तुमच्या मुलीला चालेल असला नवरा?'' पण मथूची आई सोडली तर घरातल्या कुणालाच त्याची पर्वा नसते. आपण कुणाच्या तरी उपयोगी पडत आहोत, या भावनेने श्रीधर हा सौदा विना अट स्वीकारतो. 

 पुढे यथावकाश मथूला मुलगा होतो. त्या बाळाचा पिता श्रीधर आहे, हे सगळ्या जगासमोर येते. आता त्याचे काम संपले आहे, तेव्हा अशा माणसाला घराबाहेर जाण्यास सांगावे असा विचार पुढे येतो. श्रीधर ते मान्यही करतो. जाताना तो बाळाचा पापा घ्यायला जातो, त्यावेळी त्याच्या राकट स्वभावातल्या हळव्या भागाचे दर्शन मथूला होते आणि ती बाळाला घेऊन त्याच्या मागोमाग घरातून निघून जाते. काहीही झाले तरी तो आपल्या बाळाचा पिता आहे, हे तिच्या लक्षात येते. त्यामुळे ती घर सोडून त्याच्याबरोबर जायचा निर्णय घेते. 

  या संपूर्ण कथेत मथूचा विचार तिच्या आईखेरीज कुणीच केलेला नसतो. कोणत्याही बाबतीत अनुरूप नसलेला श्रीधर तिच्यासाठी आयुष्याचा जोडीदार म्हणून नव्हे, तर तिच्या बाळाचा बाप म्हणून शोधला जातो. तिचे वैवाहिक आयुष्य कसे असणार आहे, याचीही कुणाला पर्वा नसते. स्वतःवर आलेल्या प्रसंगामुळे मिटून गेलेली मथू या नाटकात जागोजागी दिसते. विवाहानंतरच्या आयुष्यात श्रीधरने मथूला नवरा म्हणून स्पर्शही केलेला नसतो. इथे तिची अवस्था कशी होत असेल, तिला किती गुदमरल्यासारखे होत असेल, याची कुणाला जाणीवही नसते. लग्नापूर्वी पुरुषी वासनेला बळी पडलेल्या आणि त्यामुळे मिटून गेलेल्या मथूचे प्रत्ययकारी चित्रण तेंडुलकरांनी या नाटकाद्वारे केले आहे. शेवटी जेव्हा श्रीधरला घराबाहेर जायला सांगितले जाते, त्यावेळी तो बाळाचा निरोप घ्यायला जातो, त्यावेळी मथू त्याला विचारते की, ''काय केलेत बाळाला?'' त्यावेळी आडदांड असलेल्या श्रीधरमधला हळवा कोपरा तिच्या लक्षात येतो. तो म्हणतो, ''पापा घेतला त्याचा एक. त्याला घट्ट उराशी धरलं... त्याचं रेशमी जावळ कुरवाळत त्याला कानात सांगितलं, की विसरू नको गुलाम बापाला...'' ते ऐकताक्षणी ती बाळाला घेऊन त्याच्या मागोमाग घरातून निघून जाते. 

  घरातील कल्लोळात स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणारी मथू परंपरेच्या चौकटी मोडताना दिसत नाही. आपला नवरा कितीही वाईट असला, तरी इतर कुणी त्याला नावे ठेवलेली कोणत्याच स्त्रीला चालत नाही. याचा प्रत्यय तिच्या वर्तनातून येतो. परंतु, ही कुमारीमातेची अवस्था ज्या पुरुषामुळे आली त्याचा उल्लेखही संपूर्ण नाटकात नाही. या अवस्थेला तिला आणणाऱ्या पुरुषाच्या ते गावीही नाही. त्याला शिक्षा नाही. हे सगळे भोग स्त्रीनेच सोसायचे असतात. समाजही तिलाच शिक्षा करतो. 

  मालिनीबाई मथूच्या आई आहेत. तिच्या सुरक्षित भविष्याचा विचार करताना त्या दिसतात. मात्र, कुटुंब प्रमुखाने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार पुरुषी समाजव्यवस्थेने स्त्रीला दिलेला नाही. पुरुष प्रधान संस्कृतीच्या संस्कारांनी घडलेल्या मालिनीबाई तडजोडवादी भूमिकेतून संसाराला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मथूचा भाऊ आणि त्याची पत्नी यांचे नातेही दुभंगलेलेच आहे. पती-पत्नी नात्याचे संदर्भ, त्याची चौकट इथे सैल पडलेली दिसते. कुण्या एका नायकिणीला भौने फसवलेले असते. इथे तो पत्नीचा विश्वासघात आणि उपेक्षात करत असतो. तीनही जोड्यांमधले पुरुष स्वतःच्या बायकोवर अरेरावी करताना दिसतात. विवाहसंस्थेचे विदारक दर्शन तेंडुलकरांनी घडवले आहे. 

  आजही लग्नापूर्वी दिवस जाणे ही गोष्ट ''समस्या'' म्हणूनच मानली जाते. वास्तविक मातृत्व ही हवीहवीशी वाटणारी गोष्ट, पण विशिष्ट परिस्थितीत आलेले हे कुमारी मातृत्व तिला अडचणीत टाकते. विवाहाशिवाय मातृत्व हे पाप आहे, हे ठरवणारा समाज, या ''पापात'' बरोबरीने भागीदार असलेल्या पुरुषाला मात्र अनैतिक व पापी मनात नाही. तसेच पुरुषाशिवाय जर स्त्रीने अशा संततीला जन्म देऊन वाढवण्याचे ठरविले, तर ते स्वातंत्र्यही स्त्रीला विवाहसंस्थेच्या पावित्र्याच्या नावाखाली समाज देत नाही. विवाहित नसताना मातृत्व ही समस्या स्त्रियांना महाभारतातील कुंतीपासून छळत आली आहे. त्याही वेळी लोकापवादाच्या भीतीने कर्णाला नदीत सोडून द्यावे लागले होते आणि ते शल्य आयुष्यभर बाळगून ती मनोमन सोसत राहिली. आजही त्याला मान्यता नाही आणि त्याला उपाय नाही. अशावेळी समाजातली आपली पत, प्रतिष्ठा यालाच महत्त्व देण्यात येते. आपल्या मुलांची लग्ने समाजासाठी केली जातात हे एक विदारक सत्य आहे. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील याची चिंता पालकांना सदैव वाटत असते. पण येत्या काळात अशी सक्ती स्त्रिया नाकारतील. मथूसारख्या गप्प राहणार नाहीत. स्वतःचे समर्थनही करणार नाहीत. स्वतःला अपराधी, दोषी मानणार नाहीत. स्वतःच्या भूमिकेशी प्रामाणिक राहून समाजाला टक्कर देतील. स्वतःच्या भाष्याची जबाबदारी स्वतः पेलतील आणि स्वतःच्या आयुष्याचे सुकाणू स्वतःच्या हातात घेतील. याचे प्रत्यंतर १९९१ मध्ये रंग मंचावर आलेल्या ‘चारचौघी'' नाटकातल्या आईच्या वागणुकीतून येते. आत्ताच्या काळात अनेक मुली लग्न न करता एकट्या राहू लागल्या आहेत आणि काही वर्षांनी बाळाला दत्तक घेऊ लागल्या आहेत. परंतु, ६०-७० च्या दशकात मात्र स्त्रीचे भवितव्य पुरुषांच्याच हातात होते...

संबंधित बातम्या