विस्कटलेले कुटुंब 

डॉ. गौरी कानिटकर 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

नाटकातील लग्न

साधारण १९६० च्या सुमारास कुटुंबसंस्था अनेक अंगांनी तुटत होती. कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास होण्याची सुरुवात झालीच होती. औद्योगिकीकरण आणि त्यामुळे झालेले शहरीकरण यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन होऊन कुटुंबसंस्थेची वाटचाल विभक्त कुटुंब पद्धतीकडे झाली. अर्थातच त्यामुळे कुटुंबाची जीवनशैली बदलत गेली आणि या बदलत्या जीवनशैलीचे पडसाद पती-पत्नी नात्यावर पडत गेले. विभक्त कुटुंबात घरात वयाने मोठ्या माणसांच्या अनुपस्थितीमुळे नवराबायकोच्या वर्तणुकीवर वचक राहिला नव्हता. आपोआप घरातले वातावरण सैलावत गेले. शिस्त नाहिशी झाली. नको त्या गोष्टींना घरात थारा मिळू लागला. घरात शिरलेल्या मद्यपानाने कुटुंबसंस्थेचा विनाश होण्याची ती सुरुवात होती. त्यामुळे अधिकाधिक स्त्रिया तीव्र स्वरूपाच्या हिंसाचाराला बळी पडू लागल्या. समाजातल्या या बदलाचे चित्रण वसंत कानेटकर यांच्या ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’ या नाटकात उमटलेले आढळते. मदिरा आणि मदिराक्षीच्या आहारी गेलेल्या शामकांतच्या लहरी वागण्यामुळे तो, त्याची पत्नी मंगला आणि त्यांच्या दोन मुलांच्या आयुष्याची कशी परवड होते, त्याचे चित्रण येते. सामाजिक स्थित्यंतरे आणि त्यामुळे दुरावत जाणारी नाती याचे कालसापेक्ष भान या नाटकात दिसून येते. 

शामकांत, मंगला आणि जाई, प्रसाद ही त्यांची दोन मुले - असे हे चौकोनी कुटुंब असते. शामकांत हा चित्रपटात काम करणारा कलावंत असतो. शामकांत आणि मंगलाचा प्रेमविवाह झालेला असतो. शामकांतला दारूचे व्यसन असते आणि तो बाहेरख्यालीही असतो. त्यामुळे त्या दोघांमध्ये भांडणे होऊ लागतात. त्याच्या रोजच्या दारू पिऊन आल्यानंतरच्या धिंगाण्याला मंगला कंटाळून जाते. घरात हा तमाशा मुलांसमोरच होत असल्याने अर्थातच त्याचा विपरीत परिणाम मुलांवर होत असतो. मंगलाला मुलांची काळजी वाटत असते. त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावेत म्हणून ती मुलांना घेऊन वेगळे राहण्याचा निर्णय घेते. पण तिच्या मुलीवर जाईवर त्याचा खोल परिणाम होत असतो. तिला आई आणि बाबा दोघेही हवे असतात. शामकांत आणि मंगला या दोघांनाही एकमेकांची गरज असते. पण शामकांतचे लग्नाबाबतचे तत्त्वज्ञान फार वेगळे असते. तो म्हणतो, ‘एकत्र राहून सुखाने संसार करायला नुसते प्रेम पुरत नाही. फार वेगळ्या कोरड्या निष्ठा लागतात. वेगळेच मनोधैर्य लागते. खरे एकच आहे, आपण एकमेकांसाठी नाही घडलो.’ मंगला आणि शाम यांच्या उद्ध्वस्त कुटुंबाच्या समस्येचे मूळ याच कारणात असते. दोघेजण दोन ध्रुवावर जाण्याचे कारणही ‘विवाह’ या संकल्पनेत दोघांची मते वेगवेगळी असण्यामध्ये दिसून येते. पण त्याचा परिणाम कोवळ्या मनाच्या मुलांवर होत असतो. याचा जराही खेद, खंत त्याच्या वागण्यातून दिसत नाही. त्याच्यातल्या निष्ठुरतेचे दर्शन हे नाटक घडवते. स्वतःच्या मुलांच्या मानसिकतेचा  विचारही ज्याच्या मनात येत नाही, त्याला अनुसरून जबाबदारीने वागणे ज्याचे नाही असा नवरा, बाप काय कामाचा? पती आणि पत्नी कोणत्याही कारणाने विभक्त झाले, तरी त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होत असतो. त्यांच्या विकासामध्ये अपूर्णत्व येत असते. 

मंगला त्याला हवे तसे स्वीकारू शकली नाही याची तिला खंत वाटते. जरी तिने वेगळे बिऱ्हाड केले असले तरी मनाने तिला त्याच्याशी नाते तोडता येत नाही. हे स्त्रीच्या स्वभावाचे मूळ आहे. वर्षानुवर्षे मनावर झालेल्या संस्कारांचे फलित आहे. नवरा कसाही वागला तरी त्याला आहे तसा पत्करणे, हेच वर्षानुवर्षे स्त्री करत आली आहे. तिच्याकडून अपेक्षिलेही हेच गेलेले आहे. त्याने तिला सतत गृहीत धरायचे. पण ती आहे तशी मात्र तिला कधीच स्वीकारायचे नाही. का? शामच्या आयुष्यात अनेक बायका आल्या हे तो बिनदिक्कतपणे सांगतो. पण हीच परिस्थिती विरुद्ध असती तर त्याने तिला स्वीकारले असते का, हा खरा प्रश्न आहे. मुलांची, त्यांना वाढवण्याची, त्यांच्या योग्य संस्कार करण्याची जबाबदारी फक्त आईने घ्यायची? आपण एकमेकांसाठी घडलो नाही, हे शामला  आता दोन मुले झाल्यावर कळले? हे सांगणे फक्त जबाबदारी टाळण्यासाठी असते. हेच कारण स्त्री कधी सांगू शकली नाही. कारण ती एक ‘आई’ आहे आणि म्हणून मुलांची काळजी तिनेच घ्यायची असते, असे म्हणून समाजानेदेखील आईला - स्त्रीला एका विशिष्ट चाकोरीतूनच वागायला लावले आहे. स्वतःचे मातृत्व ती विसरू शकत नाही. एक वेळ ती तिच्यातल्या स्त्रीवर अन्याय करेल, पण  मातृत्वावर नाही. घरातली आणि अर्थार्जनाची अशी दुहेरी जबाबदारी पेलताना तिची ओढाताण होत असते. मात्र याची जाणीव त्याला नसते, ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. स्त्रीच्या संदर्भात सहसा जे समोर येईल ते स्वीकारणे हे वळणच पडून गेले आहे. ‘आई’ ही भूमिका जसे अनेक अनुभवांचे संचित देते तसेच ते अनेकदा आई म्हणून, माणूस म्हणून जगताना तिची विचित्र कोंडीही करते. संसार टिकवणे ही जबाबदारी काय फक्त स्त्रीची आहे का? हे नियम कुणी घालून दिले? आणि शेवटी संसार म्हणजे तरी काय? रूढ स्वरूपातल्या नात्यांच्या मर्यादा हीदेखील पुरुषप्रधान संस्कृतीचीच देणगी आहे. कारण ती त्यांच्या सोयीची आहे. मंगलाचे अस्तित्व स्त्रीत्वाशी आणि पर्यायाने मातृत्वाशी बांधलेले असते. तिला हवेहवेसे वाटणारे नवऱ्याचे साहचर्य याचा विचार तो कधीच करत नाही. व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून तिचे असणे त्याच्या खिजगणतीतही नसते. तिच्या शारीरिक गरजेचाही, नवऱ्याच्या सहवासाचा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. तिचा काहीही दोष नसताना तिने कायम परित्यक्तेसारखे आयुष्य का जगायचे? मनासारखी साथ देणारा नवरा नसेल तर त्या विवाहाची मातब्बरी कशी मान्य करायची? 

‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’ या नाटकामध्ये आलेले हे चित्रण अनेक कुटुंबांमध्ये दिसणाऱ्या चित्राचे प्रतिनिधित्व करते. पुरुषी उपभोगवादी दृष्टिकोनामुळे स्त्रियांचे मानसिक, भावनिक आणि शारीरिक शोषण होते. त्यामुळे मनाने आणि शरीरानेदेखील दोन ध्रुवांवर राहणाऱ्या पती आणि पत्नीचे आयुष्य वसंत कानेटकर यांनी समर्थपणे  
चितारले आहे.

संबंधित बातम्या