समंजस पती-पत्नी 

गौरी कानिटकर 
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

नाटकातील लग्न
 

मातृत्व ही निसर्गाने स्त्रीला दिलेली एक देणगी आहे, एक अलौकिक शक्ती आहे. मातृत्व, आई होणे हे स्त्रीला पूर्णत्व देते, तिचे जगणे सार्थकी लावते अशी बहुतेक स्त्रियांची भावना असते. स्त्रीसाठी आई आणि पत्नी ही दोन्ही नाती महत्त्वाची असतात. अपत्याच्या संगोपनात आई आणि वडील ही दोन्ही नाती आवश्यक असतात. अपत्य हे आई आणि वडील या दोघांचेही भावविश्व व्यापून टाकतेच, पण त्याच्या घरात असण्याने घरालाही घरपण असते.  

काळानुसार कुटुंबातील स्त्रीच्या भूमिकेत बदल होऊ लागला. तिचे कर्तृत्व हा कौतुकाचाही विषय होऊ लागला. तिनेही तिच्या करिअरमध्ये भरारी मारली आहे. तरीही मातृत्व, गृहिणीपद या गोष्टी तिच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. संसारामध्ये मूल नसणे हा तिला तिच्या मातृत्वाचा अपमान वाटतो. असा संसार तिला अर्थहीन वाटतो. १९६६ मधले वसंत कानेटकर लिखित ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक विनोदी अंगाने याच विषयावर भाष्य करते.. आणि याच विषयावर प्रशांत दळवी बरोब्बर सत्तावीस वर्षांनंतर (१९९३) ‘ध्यानीमनी’ हे नाटक अत्यंत गंभीरतेने लिहून जातात.

‘लेकुरे..’मधली राणी काय किंवा ‘ध्यानीमनी’मधली शालू काय, दोघीजणी मूल नाही म्हणून दुःखी आहेत. समाजाने निपुत्रिक म्हणून उपहास केल्याचे शल्य त्यांना वाटत राहते. मूल नाही ही समस्या म्हटले तर या दोघींची आहे, म्हटले तर मूल नसलेल्या अनेक स्त्रियांची आहे. समाजाची अशा स्त्रियांकडे पाहण्याच्या दूषित दृष्टिकोनाची आहे. 

दोन्ही नाटकांमध्ये पती-पत्नी नात्यात ओलावा असतो, आपुलकी असते. आपल्याला मूल नाही हे सत्य राणीने मनोमन स्वीकारलेले असते. तरीही जेव्हा कुणी तिला निपुत्रिक म्हणते, तेव्हा ती या कारणामुळे जेव्हा जेव्हा खट्टू होते.. आणि त्या त्या वेळी राजा तिला सावरून घेत असतो, तिला प्रेमाने जपत असतो. वास्तविक आपल्या संसारवेलीवर फूल नाही याचे दुःख त्यालाही असते. घर नीटनेटके राहात असल्याचा त्रास त्यालाही होत असतो आणि अशा वेळी राणी त्याला समजून घेत असते. 

एकाच विषयावर विनोदी अंगाने आणि गंभीर अंगाने चित्रण कसे केले आहे ते पाहण्यासारखे आहे. वसंत कानेटकर यांनी ‘लेकुरे’मध्ये अपत्यहीन जोडप्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी, प्रसंग हलक्या फुलक्या पद्धतीने वर्णन केल्या आहेत. या नाटकातील नायक राजा संगीतकार आहे. सुरुवातीला एका शाळेत संगीत शिक्षक म्हणून नोकरी करणारा तो चित्रपट क्षेत्रात येतो आणि तिथे स्थिरावतो. त्याची बायको राणी ही त्याची पत्नी आणि नाटकाची नायिका आहे. ही चित्रकार आहे. दोघेही तरुण, उमदे, देखणे आहेत. मोठा बंगला, घरात शोभेच्या आणि सजावटीच्या सुंदर, कलात्मक आणि श्रीमंत वस्तूंची रेलचेल आहे. मात्र, त्यांच्या संसारात फक्त एकच कमी असल्याचे त्यांना वाटते ते म्हणजे लग्नाला तेरा वर्षे होऊनही त्यांना मूल नाही. अपत्य नसण्याचे सगळे ताण त्यांच्या मनावर आहेत पण तरी या गोष्टीचे भांडवल न करता नवरा बायको म्हणून ते उत्तम जगत असतात. सहजीवनाबरोबर येणारे नाजूक, हळवे, प्रेमाचे असे सगळे क्षण ते भरभरून जगत असतात. म्हणूनच त्यांचे घर करुणेने भरलेले नाही तर अत्यंत हसरे, आनंदी, प्रसन्न, विनोदाचा शिडकावा करणारे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचे मनापासून स्वागत करणारे आहे. नायक राजा प्रेक्षकांशी संवाद साधताना आम्हाला मूल नाही हे सांगीतिक पद्धतीने सांगतो. संपूर्ण नाटकभर त्या ओळी कोणतीही अस्वस्थता निर्माण न करता सकारात्मकता निर्माण करतात. 
‘अहो, या गोजिरवाण्या घरात 
माणसांना लागलंय खूळ 
यातली गोम अशी आहे 
की आम्हाला नाही मूल... 

राजाला हे इस्त्री केलेलो घर अजिबात आवडत नसते. एक दिवस राणी बाजारात गेलेली असताना गाणे म्हणता म्हणता राजा ते घर पार विस्कटून टाकतो. तेवढ्यात राणी येते आणि दचकून ब्रेक लावल्यागत राजा खाड्कन उभा राहतो. गडबडीने सगळे आवरू लागतो. हे करता करता धडपडून ठेचकाळून आणखी पसारा करतो.. आणि मग राणी म्हणते, ‘दमलंऽऽऽ माझं लेकरू...’ 

असे निखळ सुंदर प्रसंग नाटकात विखुरले आहेत. राजा आणि राणीचे परस्परांत मिसळून गेलेले भावजीवन सुखद गारव्यासारखे भासते. राणी एखादे वेळी रागावली तर राजा कासावीस होतो. एखादी छोडी ‘गोंडस बछडी’ पाहिली की त्याला राणीची ‘दर्दभरी याद’ येते. तो म्हणतो, ‘अरे राणीच्या नुसत्या दृष्टीला ती चित्रासारखी सुंदर बाहुली पडली असती, तर लागलीच धावून तिला कडेवर घेऊन माझ्यासारखी थयथया नाचली असती, बागडली असती आणि गात गात म्हणाली असती, 
‘किती गोड बाई बाळ 
असे कमल उमलले 
ओठांच्या पाकळ्यात 
ब्रह्म साठले’ 

असे दोघांच्यातले निखळ प्रेमाचे अनेक क्षण नाटकभर व्यापून उरले आहेत. 

राजा स्वतःला सूर तालांच्या दुनियेत रमवण्याचा प्रयत्न करतो तर राणी घर सजावट, बागकाम आणि चित्रे यामध्ये दुःख विसरण्याचा प्रयत्न करत असते. राजा आसपासची मुले जमवून क्रिकेट खेळत असतो. दोघेही राजाच्या भावाच्या आणि राणीच्या बहिणीच्या मुलांमध्ये जीव गुंतवण्याचा प्रयत्न करत असतात. दोघांना मूल नाही, त्यामुळे त्यांच्या  संपत्तीचे ते काय करणार , असा परस्पर विचार करून याचा फायदा त्यांचे नातलगच नाही तर त्यांच्या ओळखीचेही घेतात. यांच्या वागणुकीचा फार मोठा फटका राजा आणि राणीला बसतो. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावते. याच दरम्यान राणीला बाळाच्या आगमनाची चाहूल लागते आणि दोघे अत्यानंदाने खुश होतात. नातलगांचा स्वार्थीपणा पाहून ते त्यांना हाकलून देतात, कारण आता त्यांना काळजी घ्यायची असते त्यांच्या होणाऱ्या बाळाची. त्याच्या निरोगी असण्याची आणि आर्थिकदृष्ट्या त्याला सुरक्षित करण्याची. 

पण पुढच्याच  क्षणी तिला म्हणतो, ‘माझ्या पोटात तर आत्ताच गोळा उठलाय, आपल्या बाळासाठी पैसा कुठाय? होते नव्हते ते आपण घालवून बसलो.’ ती म्हणते, ‘काही प्रलय ओढवणार नाही त्यामुळे. जसे आपण ऊनपावसात वाढलो तसाच आपला बाळ थंडी वाऱ्यात लहानाचा मोठा होईल..’ राजाला आता शून्यातून सुरुवात करायची असते. पण दोघेजण एकत्र असल्यावर कोणत्याही संकटाला तोंड देण्याचे सामर्थ्य गुणाकाराने वाढत असते. 

सहजीवनामध्ये एकमेकांना कठीण प्रसंगांत आधार देणे, एकमेकांना समजून घेणे अपेक्षित असते. एकमेकांशी असलेली बांधिलकी त्यांचे नाते प्रगल्भ करत असते. राजा आणि राणीचे हे नाते नितांत सुंदर आहे. मग संसारात एखादे न्यून असले तरी एकमेकांना सावरून घेत आनंद निर्माण करता येतो. एकमेकांच्या आवडीचा आदर करणे, एकमेकांना जपणे, अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या प्रसंगांतही एकमेकांचे मन राखणे यांतून त्या दोघांच्या गहिऱ्या नात्याचे मनोज्ञ दर्शन घडते. 

असेच पती-पत्नीचे प्रगल्भ नाते ‘ध्यानीमनी’ या प्रशांत दळवी लिखित नाटकात बघायला मिळते.. पाहूया पुढच्या लेखात.

संबंधित बातम्या