सहजीवनाचा आविष्कार 

गौरी कानिटकर 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

नाटकातील लग्न

काही वर्षांपूर्वीची गोष्ट.. माझ्या ओळखीतल्या एका जोडप्याच्या लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक छोटेखानी सोहळा आयोजित केला होता. अगदी मोजक्याच मित्र परिवाराला त्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. एकाने जोडप्यातल्या ‘तिला’ त्याच्याबद्दल बोलायला सांगितले. ती बोललीही छान! साहजिकच आता त्याने तिच्याबद्दल बोलावे असा आग्रह झाला. त्याने खूप टाळाटाळ केली. पण सगळ्यांनी खूपच आग्रह केला. एक मित्र तर म्हणाला, ‘अरे प्रेम आहे नं तुझं वहिनींवर, मग तेच बोलायचं!’ तो म्हणाला, ‘प्रेम आहे की नाही ते माहीत नाही, पण आम्हाला एकमेकांची सवय मात्र झाली आहे हे नक्की..’ 

मी विचार करू लागले. किती खरं बोलला होता तो! बहुतेक सगळ्या जोडप्यांची हीच अवस्था असते. प्रेम म्हणजे तरी नक्की काय? प्रगल्भ नातं म्हणजे तरी काय? 

पण तसे पाहिलं तर नातं आपोआप प्रगल्भ होत नाही. पती आणि पत्नी यांचं नातं प्रगल्भ होण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावे लागतात. एकमेकांना समजून घेत असताना परस्परांच्या भावना नेमक्या काय आहेत, कोणत्याही प्रसंगात तिला किंवा त्याला नेमकं काय वाटतं आहे, याची जाणीव असणं आवश्यक असतं. ते जाणून योग्य पद्धतीनं प्रतिसाद दिला तर त्या नात्याचा प्रवास प्रगल्भतेच्या मार्गावरून जातो. १९९३ मध्ये प्रशांत दळवींनी लिहिलेलं ‘ध्यानीमनी’ या नाटकाची या प्रसंगी आवर्जून आठवण होते आहे. या नाटकाचा विषय हा भारतीय समाज आणि मानसिकतेशी निगडीत आहे. आज इतक्या वर्षांनंतरही हा विषय कालबाह्य ठरत नाही. एक तीव्र आणि सुन्न करणारा अनुभव तेव्हा या नाटकानं प्रेक्षकांना दिला होता. माणूसपणाचा शोध हाच या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. मानवी स्वभाव, अपेक्षा, आकांक्षा या कधीही जुन्या न होणाऱ्या गोष्टी आहेत. 

‘ध्यानीमनी’मध्ये शालन आणि सदानंद यांच्या लग्नाला बरीच वर्षं झालेली असली तरी त्यांना मूल नसतं. मूल नाही म्हणून शालू दुःखी आहे. स्वतःचं मूल हवं ही तीव्र ओढ तिला वाटत असते. ही तिच्या मनातली घुसमट, अस्वस्थता सदानंदला समजत असते. मुलाची वाट पाहणं हेच तिच्या आयुष्याचं हळूहळू एकमेव ध्येय बनत जातं आणि मग एकमेकांमधलं नातंही शुष्क, कोरडं बनत जातं. तिला ओझं वाटत असतं ते सामाजिक दडपणाचं. 

दोघांचंही वय उलटून गेलेलं असते. अशावेळी शालनच्या मनात एक अमूर्त कल्पना तयार होते आणि त्यातून जन्माला येतो ‘मोहित’ नावाचा आभासी मुलगा. हळूहळू त्या कल्पनेलाच शालन सत्य मानायला लागते. वास्तविक ही एक मानसिक विकृतीच. पण या मनोविकृतीची मुळं सामाजिक दृष्टिकोनातच आहेत. 

कल्पनाविश्वात रमणारी शालू आणि तिच्या पतीचं - सदानंदचं भावविश्व हाच या नाटकाचा विषय आहे. 

शालनची घालमेल सदानंद समजून घेतो. तिला समजून घेणारा, कधी हताश होणारा, कधी समजूत काढणारा, तिला कधी कधी वास्तवात खेचून आणणारा, निराश होणारा, चिडणारा, हतबद्ध होऊन तिच्याकडंच शून्यात बघत राहणारा सदानंददेखील शालनच्या  आभासी अमूर्त खेळाला कळतनकळत प्रतिसाद देत असतो. त्यात रमत जातो.. या दोघांची गोष्ट म्हणजे हे नाटक. 

पण तिचं हे वागणं इतकं हाताबाहेर जातं की ती सदानंदलाच मोहित मानायला लागते. अखेर सदानंद मोहितची प्रतीकात्मक हत्या करतो. शालनला बरे करण्यासाठी एक नाटक खेळता खेळता वास्तव आणि काल्पनिक जगाच्या सीमारेषा भावनांच्या दाट धुक्यात काही काळ त्याला दिसेनाशा होतात. एव्हाना मोहित या जगातून गेल्याचं वास्तव शालननं आतल्या आत पचवलेलं असतं. ती बाहेर येते. तिला सदानंद फारशी पुसताना दिसतो. 

त्यावेळचा शालन आणि सदानंदमधील संवाद वेगळीच अस्वस्थता आपल्या मनात निर्माण करतो. 

शालू - अहो, हे काय करताय? असं काय करताय? 

सदानंद - (किंचित भानावर येत हातातला कपडा दूर फेकतो. पलंगाजवळ कोलमडून बसतो. त्याला रडून मोकळे व्हावेसे वाटतेय ) शालू, मी मारला गं त्याला. मी मारलं तुझ्या मोहितला. मी बाप होतो गं त्याचा, तरीही मारलं त्याला - 

शालू  - (स्वतःला सावरत आतल्या आत मनातला पसारा आवरत) वाया गेला म्हणून मारलात त्याला. आपल्याला हवा होता एक आदर्श भारतीय नागरिक. झाला का तो तसा? काय उपयोग आहे असलं मूल जन्माला घालून? 

सदा - (शालनचा हात आधारासाठी धरत आणि स्वतःही आधार घेत) आता तू दिवसभर काय करणार एकटी? घर खायला उठेल तुला - 

शालू - घर कशाला खायला उठेल? आपण आहोत ना एकमेकांना! आपण आहोत ना? तुम्ही असे खचू नका, खचू नका हो - 

सदा - (धुके निवळत चालल्यागत वाटतेय) शालू... (तो तिच्या कुशीत शिरून मांडीवर डोके ठेवतो) 

शालू - आपण एकमेकांजवळ राहावं म्हणून तर जन्म दिला त्याला आणि आता तुम्हीच असे दूर जाता? (सदानंदाच्या केसांमधून हात फिरवताना ती एकदम थांबते) हे काय? केस कधी पिकले तुमचे? हे इथले? मला का नाही सांगितलं कधी? 

सदा - तुझं कधी लक्षच नव्हतं गं माझ्याकडं - 

दोघांनाही अनामिक भावनेनं भरून येते. सदानंद शालनला जवळ घेतो. ती त्याच्या खांद्यावर अलगद मान ठेवते. एकमेकांना आधार देत दोघं जवळ येत असतानाच पडदा सावकाश सरकतो. 

सदानंद आणि शालन एकमेकांना अतिशय प्रेमानं जपणारी, एकमेकांच्या भावनेचा आदर करणारी आहेत. एकमेकांना सांभाळून घेणारी आहेत. आपापल्या वागण्यातून परस्परांना आश्वस्त करणारी आहेत. त्यामुळं त्यांच्या समस्येला ते समर्थपणे तोंड देऊ शकले. कोणत्याही परिस्थितीत सदानंद शालन बरोबर असल्याचं जाणवत राहतं. प्रेमामुळं त्यांचं नातं प्रगल्भ होत गेलेलं दिसतं. सहजीवनाचा एक वेगळाच आणि सुंदर आविष्कार त्यांच्या रूपानं पाहावयास मिळतो.

संबंधित बातम्या