समंजसपणाचे चित्रण 

डॉ. गौरी कानिटकर 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

नाटकातील लग्न

घरातील स्त्रियांना समजून घेण्याचे आणि वातावरण निकोप ठेवण्याचे भान जर घरातील पुरुषांना असेल तर दृश्य निराळे दिसते. ज्या नात्यांना तिने आपले मानले, ज्या माणसांसाठी तिने खस्ता खाल्ल्या, त्याग केले त्या घरातील माणसांनी तिच्या कष्टांची बूज ठेवली तर घराचा एकसंधपणा टिकून राहतो. पती-पत्नी नात्यातील गोडवा टिकून राहतो. याचेच प्रतिबिंब वसंत कानेटकर यांच्या ‘मला काही सांगायचंय’ या नाटकामध्ये दिसते. 

देवकीनंदन हे वकील असतात आणि घरातील कर्ते पुरुषही असतात. त्यांच्या घरी हरिपंत नावाचा नोकर असतो. हरिपंतांची मुलगी जान्हवी हिला विवाहापूर्वीच दिवस गेलेले असतात. हरिपंतांना हे समजल्यावर ते तिला मारझोड करतात. त्या माणसाचे नाव विचारतात, पण ती तोंड उघडत नाही. काहीही सांगायला नकार देते. देवकीनंदन यांची सून यशोधरा तिची समजूत घालते. देवकीनंदन यशोधरेला म्हणतात, ‘ती नाव सांगायला तयार असेल तर मीही तुझ्या बरोबरीने तिच्या पाठीशी उभा राहीन. तिचे त्या माणसाशी लग्न लावून देण्यासाठी मी माझे बळ पणाला लावीन.’ पण जानकी काहीही बोलत नाही. तेव्हा मात्र ते हरिपंत आणि जान्हवी यांना घर सोडायला सांगतात. तेव्हा देवकीनंदन यांचा दुसरा मुलगा दिलीप तो गुन्हा आपणच केल्याचे कबूल करतो. दिलीपचे प्रेम ललिता नावाच्या एका वेगळ्याच मुलीवर असते. (एका अर्थी तो तिचाही विश्वासघात करतो.) तरीही जान्हवीशीच लग्न करण्याविषयी देवकीनंदन त्याला निक्षून सांगतात. केलेल्या कृत्याची जबाबदारी घेण्यास सांगतात. आपल्याच मुलाने हे कृत्य केलेले आहे हे समजूनही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतात, हेच या नाटकाचे वेगळेपण आहे. देवकीनंदन यांच्या या ठाम भूमिकेमुळे दिलीप तिच्याशी नाइलाजाने लग्न तर करतो, पण त्याच्या मनात त्यानंतर घटस्फोट, पोटगी हे विचार चालू असतात. पण त्या वेळी यशोधरा समजूत घालते. माणसातून उठण्याची वेळ येऊनही जान्हवीने त्याचे नाव सांगितले नाही हे त्याच्या निदर्शनाला आणून देते. यशोधरेने घरातील सर्वांशी असलेले नाते अत्यंत आत्मीयतेने सांभाळलेले असते. या आत्मीयतेतूनच तिने अवघ्या घराला बांधून ठेवलेले असते. 

तारतम्याने वागण्याची एक उपजत वृत्ती स्त्रीमध्ये असते. तिचे मन गुंतलेले असेल तर ती स्त्री पुरुषाचे नुकसान होईल असे सहसा वागत नाही. नाव सांगितले तर दिलीपची प्रतिष्ठा धोक्यात येईल हे जान्हवीला पक्के माहित असते. वेळेला तिच्या तारुण्याचा फायदा उठवून केवळ नाइलाज म्हणून दिलीप तिच्याशी लग्न करतो. स्त्रीला गृहीत धरण्याची वृत्ती इथे दिसते. औट घटकेची मजा करण्यासाठी तो जान्हवीचा उपयोग करतो. इथेही स्त्रीच्या मनाचा विचार बाजूलाच पडतो. कितीही नाही म्हटले तरी जान्हवी ही एक प्रकारे आश्रित असते. तरीही इथे दिलीप स्वतःचा गुन्हा कबूल करतो हे महत्त्वाचे; पण लग्नानंतर हे नाते फेकून देऊ अशा अत्यंत अपमानास्पद आणि असंवेदनशील विचारांनी दिलीपचा ताबा घेतलेला दिसतो. विवाहाचा विचार तो किती संकुचित वृत्तीने करत असतो. हे लग्न त्याने तात्पुरती सोय मानलेली असते. हे उदाहरण पुरुषाच्या स्वतःपुरते पाहण्याच्या वृत्तीवर नेमके बोट ठेवते. विवाहासारखी गोष्ट आपल्या संस्कृतीमध्ये पवित्र मानली जाते. पण अशा प्रकारच्या विचारधारेमुळे विवाहसंस्थेचे पावित्र्य धोक्यात येते. 

याच नाटकातील यशोधरा ही कुमारी माता आहे. ती अनाथाश्रमात वाढलेली असते. वयाच्या चौदाव्या वर्षी पित्यासमान असणारे आश्रमाचे अध्यक्ष बाप्पाजी तिच्यावर अत्याचार करतात. त्यातून तिला दिवस जातात. मुलगीही होते. पण तिच्या लग्नाच्या वेळी ही गोष्ट सोयीस्करपणे लपविली जाते. (तसे केले नसते तर तिचे लग्न होणे अवघड झाले असते. आपल्या समाजात बलात्कारित स्त्रीची चूक नसतानासुद्धा तिलाच दोषी धरले जाते. हे नाटक १९७० मधले आहे. आजही यात काहीच बदल झालेला नाही.) हा प्रकार समजल्यावर तिचा पती राहुल सैरभैर होतो. वर्तमानात जगत असताना जेव्हा भूतकाळातील काही प्रसंग अचानक जागृत झाले तर काळाचे संदर्भ विस्कटून जातात. त्या व्यक्तीच्या अंतर्मनात कमालीची  खळबळ माजते आणि त्याच्या पारंपरिक संस्कारित मनाचा पायाच डळमळीत होतो. 

पण असे सगळे होऊनही राहुल तिला स्वीकारतो. तिला सोडून देणे ही कल्पनाच त्याला सहन होत नाही. त्याचे आणि तिचे मायेचे, प्रेमाचे, समजुतीचे आणि आंतरिक जिव्हाळ्याचे नाते इथे दिसते. इथे राहुलच्या रूपाने एक समंजस नवरा कानेटकर यांनी उभा केला आहे. देवकीनंदन यांनी विचारल्यावर तो म्हणतो, ‘पप्पा, एक गोष्ट खरीच की आपण ज्या माणसांच्या समाजात वावरतो तो समाज माझ्यासारख्या उनाड पुरुषाला क्षमा करतो, पण तिची काहीही चूक नसताना तिच्या एवढ्याशा पतनाबद्दलदेखील यशूसारख्या साध्वीला क्षमा करणार नाही. मग ती कुठे जाईल?’ राहुलचे हे बोलणे त्याच्या संवेदनशील वृत्तीची साक्ष पटवतात. तिला आपण नाकारली तर तिचे पुढे काय होईल हा महत्त्वपूर्ण विचार तो करतो. समाज तिला स्वीकारणार नाही याची पक्की खात्री त्याला असते. घडल्या गोष्टीत तिचा काहीही दोष नाही, याचाही तो विचार करत असतो. भावनिक पातळीवर त्याचे तिला समजून घेणे याचे प्रत्यंतर येते. त्याच्या या विचारला त्याचे वडील देवकीनंदन दुजोरा देतात ही गोष्ट विशेष महत्त्वाची. अशा प्रकारचे उदाहरण त्यावेळच्या समाजातच नव्हे, तर आजच्या काळातही घडणे अशक्य वाटते. 

या नाटकात दोन जोडपी आहेत. एक राहुल - यशोधरा आणि धाकटा मुलगा दिलीप - जान्हवी. यशोधरेने समजून सांगितल्यावर दिलीप आणि जान्हवी फिरायला जातात, यात त्यांचे मनोमीलन झाल्याचे सुचवले आहे. राहुल यशोधरेचा मुलीसह स्वीकार करतो.  त्यामुळे यशोधरेच्या मनात त्याच्याविषयी कृतज्ञता निर्माण होऊन त्यांचे त्यानंतरचे  
सहजीवन सुखात जाण्याच्या शक्यता वाढतात. त्यांच्या नात्याचा एक वेगळा आश्वासक रंग इथे दिसतो. दोन जोडप्यांमधील विवाहाची वास्तवचित्रे इथे रेखाटली आहेत. 

अशा प्रकारच्या घटनेकडे समाजाने आणि कुटुंबाने कसे बघावे हे कानेटकर यांनी या नाटकाद्वारे सूचित केले आहे. समजूतदारपणा आणि विनाअट स्वीकार ही मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. देवकीनंदन आणि राहुल या दोन पुरुषांच्या समंजस भूमिकांमुळे दोन संसार वाचतात. पती आणि पत्नी नात्यात क्षमा केल्याने त्यांचे नाते अधिक मजबूत होत असते, याचे चित्रण या नाटकात यथार्थपणे केले आहे.

संबंधित बातम्या