मनाचे आंतरिक सौंदर्य 

गौरी कानिटकर 
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

नाटकातील लग्न

सद्य परिस्थितीत लग्नाचे वय पूर्वीच्या मानाने उलटून गेलेले आहे. पूर्वी म्हणजे, फार पूर्वी नाही तर ३० - ३५ वर्षांपूर्वीपर्यंत मुलीचे लग्न तिच्या २२-२३ व्या वर्षी, तर मुलाचे लग्न साधारणपणे २५-२६-२७ या वयात होत असे. पण गेल्या काही वर्षांत लग्नाबद्दलची  परिस्थिती आमूलाग्र बदलली आहे. लग्नाचे वय तर पुढे गेलेच आहे, पण वेळेवर लग्न होत नाही म्हणून काही मुलामुलींना नैराश्याने घेरलेले आहे. लग्न वेळेवर होत नाही, मनासारखा जोडीदार मिळत नाही, सगळ्या अपेक्षा एकाच व्यक्तीकडून पूर्ण व्हायला हव्यात याचा अट्टहास, पैशाला आलेले अवाजवी महत्त्व अशा अनेक गोष्टींमुळे लग्ने लांबणीवर पडत आहेत. त्यातून मुलगी सावळी असेल, दिसायला चांगली नसेल तर लग्नाला उशीर होतो. ही परिस्थिती आजचीच नाही तर अनेक वर्षांपासून आहे. लग्न या एकूणच प्रकारात बाह्यरूपाला दिले गेलेले अवाजवी महत्त्व याचे अत्यंत तरल चित्रण विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या १९७० मध्ये लिहिलेल्या ‘अशी पाखरे येती’ या नाटकात केले आहे. ‘रेनमेकर’ या इंग्रजी नाटकाचे हे रूपांतर आहे तरीही ते माझ्या जगाशी संबंधित आहे,’ असे तेंडुलकर प्रस्तावनेतच म्हणतात. 

या नाटकातले प्रमुख पात्र अरुण सरनाईक हा एक सडाफटिंग, कलंदर व्यक्तिमत्वाचा तरुण असतो. त्याची ही कहाणी आहे. अरुणचा लग्नसंस्थेवर अजिबात विश्वास नसतो. त्यामुळे त्याने लग्न केलेले नसते. लग्न म्हणजे त्याला गुंतवणूक वाटते आणि गुंतवणुकीमुळे जबाबदारी वाढते असेही त्याचे मत असते. हा सहजपणे अलिबागमध्ये हिंडत असताना एका खिडकीतून त्याला एक चेहरा दिसतो. विटलेला आणि काकूबाई टाइप. त्याच्या मनात येते, ‘चांगली राहिली तर माल दिसेल..’ जुनी ओळख असल्यासारखा अरुण त्या घरात शिरतो. कुठल्या कुठल्या जुन्या ओळखी सांगतो आणि त्या घरातलाच होऊन जातो. पण त्याच्या त्या जुन्या ओळखींना त्या घरातली ती काकूबाई मुलगी सरस्वती ऊर्फ सरू अजिबात दाद देत नाही. सरू सामान्य रूपाची आणि साधारण आर्थिक परिस्थिती असलेली असते. 

मुलीने चांगले दिसणे हा तिच्या लग्नासाठी एक महत्त्वाचा निकष मनाला जातो. एकीकडे सौंदर्य ही ईश्वराची देणगी आहे, असे मानणाऱ्या समाजात स्त्री कुरूप असणे आणि दिसायला बरी असूनही पुरुषाला नेत्रसुख देण्यायोग्य न राहणे हा तिचा अवगुण मानला जातो. सरू लग्नाच्या वयाची असते पण तिचे लग्न ठरत नसते. त्यामुळे तिचे आईवडील चिंतेत असतात. कसेही करून तिचे लग्न झाले पाहिजे या दडपणाखाली ते वावरत असतात. तिला एक मुलगा बघायला येणार असतो. तिचे वडील - अण्णा तिला म्हणतात, ‘चांगली सजवा कार्टीला... आजचे स्थळ पुढारलेल्या नवमताचे आहे... आणि तोंड जरा हसरे ठेव, अजागळ कार्टी!’ या त्यांच्या विधानावरून ते किती उद्विग्न झालेले असतात ते लक्षात येते. 

मात्र सरूदेखील या पाहण्या - बघण्याच्या प्रकाराला कंटाळली आहे. केवळ नवरा मिळण्यासाठी सुंदर दिसायचे. स्वतःला सजवायचे ही कल्पना तिला हताश, उद्विग्न करणारी वाटते. तिला मनापसून या प्रकाराचा कंटाळा आलेला असतो. ती म्हणते, ‘मी आज अश्शी राहणार, उलट तोंडाला आणखी तेल फासणार, केस पिंजारणार आणि येतील त्यांच्या पुढे ही अश्शी कडकलक्ष्मीचा नाच करणार, नाच!’ 

लग्नाळू मुलीची उद्विग्नता यावरून लक्षात येते. तिला सारखे तेच तेच करण्याचा आणि आणखी एक नकार घेण्याचा कंटाळा आला आहे. ती मनाने खचलेली असते, त्यामुळे आता लग्नच नको अशा विचारापर्यंत ती येते. दरवेळी नटून सजून परक्या माणसासमोर एखाद्या वस्तूसारखे स्वतःचे प्रदर्शन करायचे आणि स्वाभाविकच त्या त्या वेळी त्या विशिष्ट पुरुषाबरोबर संसाराची चित्रे रंगवायची आणि नंतर नकार घ्यायचा या मानसिक आंदोलनाला सरू कंटाळलेली असते. आपल्या मुलीने तिला जो मुलगा पसंत करेल त्याच्या गळ्यात मुकाट्याने माळ घालावी आणि आपले भविष्य सुरक्षित करावे असा विचार तिची आईदेखील करते. 

अरुण हे सगळे ऐकत असतो. पाहातही असतो. त्याला मनापासून वाटते, की या पोरीचे जमलेच पाहिजे. तो तिला म्हणतो, ‘सरू, मी देईन तुला तो मंत्र!’ बोलत बोलत तो तिला एकदम ‘सुंदर’ म्हणतो.  
तिला सांगतो, ‘तुम्हीच तुम्हाला फसवता, तुमच्यावर अन्याय करता, देवाशप्पथ सांगतो, तुम्ही सुंदर आहात. फक्त स्वतःतलं प्रेम जागवा. स्वतःला प्रेमानं वागवा, प्रेमाला स्वतःत वागवा आणि हसत राहा, फुलत राहा, गुणगुणत राहा... वर वर नव्हे, खूप खूप आतून काळजातून... बाईसाहेब तुम्ही भलत्याच सुंदर आहात. भर दुपारी तुमच्या डोळ्यात चांदणं पडलं आहे...’ 

त्याच्या बोलण्याने ती खुलते. तिच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. दिसणे आणि असणे यातला फरक सांगून अरुण तिच्यावर जणू जादू करतो. त्यानंतर तिला पाहायला येतात. तो प्रसंग नीट पार पडतो. तिला होकार येतो. कुठेही न गुंतण्याचा जणू वसा घेतलेला  अरुण जायला निघतो. पण सरू रडत रडत येते आणि त्या लग्नाला नकार देते. अरुण तिला कारण विचारतो. तीही स्पष्टपणे, कोणताही आडपडदा न ठेवता त्याला सांगते. तिला त्या पाहायला आलेल्या मुलाच्या जागी अरुणच दिसत असतो. ती म्हणते, ‘तुमच्यामुळे मी मला सापडले. मला जागे केलेत, जिवंत केलेत. जे पाहायला आले होते न, ते मला मुळी दिसतच नव्हते. मी बोलत होते ती तुमच्याशी. फार वेगळे वाटत होते मला. फार छान, फार शांत, सुंदर वाटत होते मला... मग सांगा, मला कुणी पाहिले? मी कुणाला दिसले? कुणाची झाले? मी ज्याला पाहिलेच नाही, स्वतःला दाखवलेच नाही, त्याची बायको कशी होऊ? मला पाप वाटते ते.’ 

अरुणने या हेतूने काहीच केलेले नसते. असे भावनांचे पाश त्याला जोडायचे नसतात. तो जायची तयारी करतो. तेवढ्यात आदल्या दिवसाच्या दाखवण्याच्या प्रसंगातला तो मुलगा - विश्वास तिथे येतो. तिचे आंतरिक सौंदर्य त्याला भावलेले असते. तिने नकार का दिला हे त्याला जाणून घ्यायचे असते. तो तिला नकाराचे कारण विचारतो. ती अरुणचे नाव न घेता सर्व सांगते. तो भारावून जातो. त्याला कळते की तो दुसरा तिसरा कुणी नसून अरुणच आहे. तो सरूच्या आई अण्णांना सांगतो, की अरुणला जाऊ देऊ नका. पहिल्या मुहूर्ताला सरूचे लग्न यांच्याशी करून द्या. 

इथे तेंडुलकर एका प्रगल्भ पुरुषाचे दर्शन घडवतात. तो तिला पूर्णपणे समजून घेतो. तिच्या आनंदात त्याचा आनंद सामावलेला असतो. विश्वासमधला समंजस, परिपक्व पुरुष तिला सांभाळून घेतो. तो तिचे अधिकार, तिचे मतस्वातंत्र्य व निर्णयस्वातंत्र्य याचा आदर करणारा असतो. परंतु अरुण मात्र तिथून बाहेर पडतो. त्याला कुठेच गुंतायचे नसते, यथावकाश सरूचे विश्वासशी लग्न होते. तिला मुलगा होतो. त्याचे नाव ती ‘अरुण’ ठेवते. याचाच अर्थ तिच्या मनाच्या हळुवार कोपऱ्यात अजूनही अरुण विराजमान असतो. तो तसाच तिथे असणार असतो. त्यानेच तिच्या जीवनाला खरा अर्थ दिलेला असतो आणि सर्वांत महत्त्वाचे हे विश्वासला मान्य असते. हे समजून घेणे विलक्षण आहे. विश्वासशी लग्न केलेले असूनही तिला अरुणबद्दल वाटणारी कृतज्ञतेची भावना विश्वास समजून घेतो. समंजस आणि परिपक्व विश्वास त्याच्या वागण्यामुळे नात्याला खोल अर्थ देऊ पाहतो. 

या नाटकात उगीचच गैरसमज, प्रेमाचा त्रिकोण अशा गोष्टी नाहीत. पण माणूस म्हणून समजून घेण्याच्या खुणा जागोजागी आहेत. एकीकडे लग्नाच्या ‘बाजारात’ असणारे बाह्यरूपाचे अतार्किक आणि अवाजवी महत्त्व आणि दुसरीकडे आंतरिक सौंदर्याची ताकद यातील तोल नाटककाराने मोठ्या सामर्थ्याने राखला आहे. सरू आणि विश्वासच्या रूपाने आशादायी शेवट केला आहे. 

या नाटकातली सरू आजच्या (देखील) विवाहेच्छू मुलींचे प्रतिनिधित्व करते. अनेक नकार पचवल्यानंतर एकूणच आयुष्यात कडवटपणा आलेला असतो. तिचा सावळा, काळा रंग लग्नाच्या बाजारात तिची फरफट करतात. पुरुषप्रधान समाजात स्त्रीच्या बाह्य रुपाला दिलेले अवास्तव महत्त्व आणि त्यामुळे सामान्य रूपाच्या मुलीला सतत स्वीकारावे लागणारे नकार आणि त्यामुळे तिची होणारी ससेहोलपट प्रकर्षाने समोर येते. वास्तविक लग्न टिकणे, प्रगल्भ होणे हे सर्वस्वी मनाच्या आंतरिक सामर्थ्यावर अवलंबून असताना गोरा रंग आणि बाह्यरुपाला असलेले महत्त्व कोणत्याही संवेदनशील मनाला व्यथित करणारेच आहे.

संबंधित बातम्या