प्रवाळांचा प्रचंड खजिना 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
मंगळवार, 17 जुलै 2018

नवलाई
 

कोकणातील विजयदुर्गच्या पश्‍चिमेला समुद्रात १२० मीटर अंतरावर आणि २० मीटर खोलीवर जगप्रसिद्ध असे आंग्रिया बॅंक नावाचे दुर्लक्षित प्रवाळ बेट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे प्रमुख कान्होजी आंग्रे विजयदुर्ग येथून मोहिमा सांभाळत होते, त्यामुळे त्यांचे नाव या प्रवाळ बेटाला देण्यात आले आहे. या बेटाचे सविस्तर संशोधन १६ डिसेंबर २०१३ पासून गोव्याच्या राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेमार्फत (NIO : National Institute of Oceanography) सुरू झाले आहे. आंग्रिया बॅंक हे एक बुडालेले कंकणाकृती प्रवाळ बेट (Atoll) असून जगातील सर्वांत मोठा प्रवाळ साठा तिथे असावा, असा जो अंदाज केला गेला होता तो खरा असल्याचे या संशोधनातून आता लक्षात येत आहे. 

जैव विविधतेने समृद्ध असा हा ६०० चौरस किमी क्षेत्रफळाचा प्रवाळ प्रदेश भारताच्या समुद्र बुड मंचाच्या (Continental Shelf) सीमेजवळच आढळतो. त्याची उत्तर दक्षिण लांबी ४० किमी असून पूर्व पश्‍चिम रुंदी १५ किमी आहे. प्रवाळांची भरपूर वाढ आणि अत्यंत दुर्मिळ अशा व्हेल शार्कचे अस्तित्व यामुळे या प्रदेशाला अनेक दृष्टींनी महत्त्व प्राप्त झाले आहे. असे असूनही अजूनपर्यंत हा प्रवाळ खजिना दुर्लक्षितच राहिला आहे. अजूनही या भागाचे संपूर्ण परिसर संशोधन होणे बाकी आहे. 

आंग्रिया बॅंकवर जिथे प्रवाळांची वाढ झाली आहे तिथे तळभागावर वाळू आणि शिंपल्यांचा थर आहे. प्रवाळ बेटाच्या ३५० चौरस किमी भागात विविध प्रकारच्या प्रवाळीय वनस्पती व प्राणी (Reef  flora and fauna) आढळतात. स्थलांतर करून येणाऱ्या १० ते १५ फूट लांबीच्या व्हेल्स आणि शार्क व्हेल जमा होण्याचे ते मुख्य ठिकाण आहे. होलोसीन (Holocene) या जीवशास्त्रीय कालखंडात म्हणजे गेल्या दहा हजार वर्षांत वाढलेल्या समुद्र पातळीमुळे इथल्या प्रवाळांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण झाली. काहींच्या मते, हे प्रवाळ सेनोझोइक (Cenozoic) कालखंडातील म्हणजे सहा ते साडे सहा कोटी वर्षे जुने असावेत. सरासरी २० मीटर खोलीवर असलेल्या या बेटाच्या आजूबाजूच्या समुद्राची खोली एक हजार मीटर इतकी आहे. 

प्रवाळ खडक (Coral Reef) तयार करणारे प्रवाळ (Corals) हे एकत्रितपणे चुन्याचे संचयन करून विस्तृत वसाहती करणारे सागरी जीव आहेत. सध्याच्या युगातील प्रवाळ हे खंडीय मंच किंवा समुद्रबूड जमिनीवर (Continental shelf) आणि खोल समुद्रातील बेटांच्या अवती भोवती वाढताना आढळतात. १६ ते ३६ अंश सेल्सिअस इतके समुद्राच्या पाण्याचे तापमान, दर हजारी २५ ते ४० इतकी क्षारता, घट्ट व गुळगुळीत तळ, पाण्याची सहज हालचाल आणि जोरदार भरती प्रवाह अशी परिस्थिती असणारे अपतट प्रदेश हे प्रवाळ वाढीला आदर्श प्रदेश असतात. गाळयुक्त प्रवाह किंवा गाळाचे संचयन प्रवाळांच्या वाढीला प्रतिकूल असते. 

आंग्रिया बॅंक हे जगातले सर्वोत्तम सागरी पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येऊ शकते. तेवढी त्याची क्षमता नक्कीच आहे. पण त्याहीपेक्षा त्याचे महत्त्व आहे ते त्यावर असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या प्रवाळ साठ्यात! सागरी वनस्पती, सागरी जीव आणि सागर पातळीतील भूशास्त्रीय बदलांचा सगळा इतिहासच उलगडून दाखविण्याची विलक्षण क्षमता या प्रवाळ बेटात आहे आणि म्हणूनच हे प्रवाळ बेट इतके महत्त्वाचे आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या