ज्वालामुखीचे गंधकीय धूममुख 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
गुरुवार, 19 जुलै 2018

इंडोनेशियाच्या जावा बेटावर कावा इजेन (८ अंश दक्षिण अक्षवृत्त/११४ अंश पूर्व रेखावृत्त) नावाचा एक जागृत ज्वालामुखी आहे. त्यावरच्या गंधकीय धूममुख (Solfatara) आणि हिरवट निळ्या रंगाच्या (Turquoise blue) पाण्याने भरलेला माथ्यावरील खळगा (Caldera) या दोन विलक्षण घटनांमुळे तो जगप्रसिद्ध आहे. 

इंडोनेशियाच्या जावा बेटावर कावा इजेन (८ अंश दक्षिण अक्षवृत्त/११४ अंश पूर्व रेखावृत्त) नावाचा एक जागृत ज्वालामुखी आहे. त्यावरच्या गंधकीय धूममुख (Solfatara) आणि हिरवट निळ्या रंगाच्या (Turquoise blue) पाण्याने भरलेला माथ्यावरील खळगा (Caldera) या दोन विलक्षण घटनांमुळे तो जगप्रसिद्ध आहे. 

ज्वालामुखीतून उद्रेकानंतर सामान्यपणे काही काळानंतर शिलारस (Magma) बाहेर पडणे बंद होते व त्यातून नंतर वाफ आणि विविध वायू आणि अनेक द्रवरूप व घनरूप पदार्थ बाहेर पडू लागतात. फक्त वाफ आणि वायुरूप पदार्थ बाहेर टाकणाऱ्या ज्वालामुखीच्या विवरांना धूममुखे (Fumerole) म्हटले जाते. ‘कावा इजेन’सारख्या गंधकयुक्त वायू बाहेर टाकणाऱ्या विवरांना   गंधकीय धूममुख (Solfatara) असे म्हणतात. 

‘कावा इजेन’च्या गंधकीय धूममुखातून बाहेर पडलेला गंधकयुक्त (Sulferous) वायू पृथ्वीभोवती असलेल्या प्राणवायूयुक्त वातावरणात पेट घेतो आणि त्यामुळे निळ्या रंगाच्या प्रचंड मोठ्या ज्योती तयार होतात. रात्रीच्या वेळी त्यांचा प्रखरपणा चांगलाच जाणवतो. 

बऱ्याच ज्वालामुखींच्या उद्रेकानंतर शिलारसाचा म्हणजे लाव्हारसाचा एक शंकू बनतो. शंकूच्या माथ्यावर कुंड बनून त्यातून शिलारस बाहेर येतो. नंतरच्या उद्रेकावेळी शिलारस आणखी जोराने बाहेर पडल्यास कुंड खचते आणि एक प्रचंड मोठा खळगा (Caldera) तयार होतो. त्यात नंतर पाणी साचून सरोवरे तयार होतात. ‘कावा इजेन’च्या माथ्यावरही अशा रीतीने बनलेल्या खळग्यात पाणी साचून त्याचे सरोवर बनले आहे. मात्र या सरोवरातील पाण्याचा रंग हिरवट निळा दिसतो. भरपूर आम्लता आणि विरघळलेल्या धातूंचे अवाजवी प्रमाण यामुळे सरोवरातील पाण्याला हा रंग येतो असे आढळून आले आहे. या सरोवराच्या काठावरील पाण्याचा आम्लता निर्देशक सामू (pH) ०.५ असून सरोवराच्या मध्यभागी तर तो ०.१३ एवढा आहे. खळग्यातील या पाण्याचा स्रोत त्याखाली असलेल्या वितळलेल्या शिलारसाचा साठा (Chamber) आणि त्यातील वायूयुक्त औष्णिक पाणी आहे. या सरोवरातूनच इथल्या बन्यूपाहीत नावाच्या नदीचा उगम होतो. ‘बन्यूपाहीत’ या शब्दाचा स्थानिक भाषेत अर्थ ‘कडू पाणी’ आहे. 

उद्रेकातून बाहेर पडलेल्या गंधकयुक्त वायूचे आजूबाजूच्या थोड्या कमी तापमानामुळे झपाट्याने सांद्रीभवन (Condensation) होते आणि त्याचा प्रवाह बनून तो माथ्यापासून काही अंतर पुढे वाहात जातो व त्याचवेळी घट्ट होतो. यातून गंधकाचे मोठे साठे उपलब्ध होतात. सरोवराकाठी असलेल्या गंधकीय धूममुखातून कायम गंधकयुक्त वायू वर येत असतोच त्यातून अशा तऱ्हेने मिळणारे गंधक खनिज गोळा करून स्थानिक लोक ते जवळच्या साखर शुद्धीकरण कारखान्यात नेऊन विकतात. 

तीन लाख वर्षांपूर्वीपासून हा ज्वालामुखी सक्रिय (Active) झाला आहे. त्यानंतर वारंवार झालेल्या उद्रेकामुळे या ज्वालामुखीच्या शंकूची उंची ३३०० मीटरपर्यंत वाढली. यातून बाहेर पडलेला शिलारस आजूबाजूच्या दोन कोटी वर्ष जुन्या चुनखडकावर पसरलेला आहे. पन्नास हजार वर्षांपूर्वी एकामागून एक झालेल्या उद्रेकांनंतर या ज्वालामुखीच्या माथ्यावर १६ किमी व्यासाचा प्रचंड मोठा खळगा तयार झाला. उद्रेकातून बाहेर पडलेल्या पदार्थांमुळे जवळच्या प्रदेशावर २०० मीटर जाडीचा राखेचा व शिलारसाचा थर तयार झाला. हा ज्वालामुखी अजूनही जागृत असून १७९६ पासून आत्तापर्यंत त्याचे १५ वेळा उद्रेक झाले आहेत (१७९६, १८१७, १९१७, १९३६, १९५०, १९५२, १९९३, १९९४, १९९९, २०००, २००१, २००२, २००४, २०१२ आणि २०१८). यावर्षी २७ मार्च २०१८ रोजी याचा पुन्हा उद्रेक झाला. उद्रेकांवेळी यातील शिलारसाचे तापमान ५०० ते १२०० अंश सेल्सिअस इतके होते. हा ज्वालामुखी संयुक्त प्रकारचा (Composite, stratovolcano) आहे. एकाच ठिकाणी अनेकदा वारंवार उद्रेक होऊन असे ज्वालामुखी तयार होतात. यातील मुख्य शंकू राख आणि शिलारसापासून बनलेला असतो. मोठ्या उद्रेकानंतर पूर्वी तयार झालेल्या कुंडाचा भाग उडवून लावला जातो व तेथे दुय्यम शंकू तयार होतो. 

‘कावा इजेन’ ज्वालामुखीच्या सरोवरातील पाणी भूजल स्वरूपात खाली झिरपते आणि बन्यूपाहीत नदीत अवतीर्ण होते. यामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषितही झाले आहे. मात्र दरवेळी झालेल्या उद्रेकानंतर आजूबाजूच्या प्रदेशावर  खनिजयुक्त पदार्थांचे थर साचून इथल्या जमिनी खूप सुपीक झाल्या आहेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या