चुनखडक गुहा 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
शुक्रवार, 27 जुलै 2018

नवलाई

उत्तर थायलंडच्या थाम लुआंग या चुनखडक प्रकारच्या खडकातील गुहेत अडकलेल्या तेरा जणांची सुटका करण्यात अलीकडेच मोठे यश आले आहे. अशा कार्स्ट म्हणजे चुनखडक प्रदेशांतील खडकात जोड, भेगा, भंग-पातळ्या असतात व त्यातून पाणी झिरपण्याची क्रिया होऊन चुनखडक विरघळतो. जोड रुंदावून विवरे तयार होतात. अशी विवरे चुनखडक खोलवर पोखरतात आणि त्यामुळे गुंफा (Cavern), गुहा अशी भूरूपे बनतात. विवरे आणि गुहा, गुंफा अनेक बोगद्यांनी जोडली जातात. अनेकदा गुहा आणि गुंफांची निर्मिती झाल्यावर त्यांच्या छतावरून पाणी ठिबकून गुहेच्या तळाशी लवणस्तंभ तयार होतात. जगातील अशा चुनखडीच्या गुहा २८ ते ४० कोटी वर्षे जुन्या आहेत. 

याना हे उत्तर कर्नाटकातील कुमटा जंगलात वसलेले एक गाव आहे. इथेही चुनखडकांत तयार झालेल्या गुहा सह्याद्री पर्वत रांगेत, कारवारपासून ६० किमी आणि कुमटा गावापासून ३० किमी अंतरावर आढळून येतात. सह्याद्रीत इतरत्र अशा प्रकारचा स्फटिकमय कार्स्ट चुनखडक (Crystalline karst limestone) कुठेच आढळत नाही. मात्र केवळ इथेच गडद काळसर रंगाच्या ७ कोटी वर्षे जुन्या चुनखडकात उंचचउंच असे स्तंभ तयार झाले असून खूप अंतरावरून होणारे त्यांचे दर्शन अंगावर रोमांच उभे करते. यानाच्या आजूबाजूच्या ३ किमीच्या परिघात चुनखडकातील अशा ६१ रचना आहेत. मात्र त्या यानातील दोन शिखर रचनांऐवढ्या नजरेत भरणाऱ्या नाहीत. 

या सर्व रचना व त्यातील गुहा एकसंध अशा चुनखडकात तयार झालेल्या आहेत. त्यांचा विस्तीर्ण आकार आणि एकसंधपणा पाहून, या भागात प्राचीन काळी पडलेल्या उल्कांचे ते अवशेष असावेत असेही एक मत मांडण्यात येते. खडकांच्या खालच्या भागात आणि गुहेत वितळलेला लाव्हा घट्ट होऊन बनलेले बेसाल्ट खडकही दिसून येतात. इथल्या चुनखडकांत चुन्याच्या विरघळण्याने तयार झालेल्या गुहा मोठ्या प्रमाणावर विदीर्ण अवस्थेत आढळतात. गुहेत अनेक ठिकाणी ऊर्ध्वमुखी व अधोमुखी लवणस्तंभ (Stalactites and stalagmites) आढळून येतात. इथल्या गुहेच्या मुखाची रुंदी ३ मीटर असून खडकात चुनखडकाबरोबरच मॅंगेनीज व लोहसुद्धा आढळते. इ. स. १८०१ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतील एक अधिकारी डॉ. फ्रान्सिस बुखानन हॅमिल्टन यांनी या विलक्षण खडकांचा शोध लावला. त्या काळात या खडकाच्या आजूबाजूला आदिवासींची जवळजवळ दहा हजार लोकसंख्येची मोठी वस्ती होती. 

याना इथल्या या चुनखडकांतील असाधारण अशा संरचनात उंच स्तंभाकृतींसारखे दोन दोन भाग दिसतात. त्यातल्या १२० मीटर उंचीच्या शिखराला भैरवेश्‍वर शिखर आणि थोड्याशा लहान ९० मीटर उंचीच्या शिखराला मोहिनी शिखर असे म्हटले जाते. या दोन शिखरांच्या प्रदेशात सर्वत्र राखमिश्रीत काळी सैलसर माती आढळून येते. 

नवीनच बांधण्यात आलेले शिवमंदिर भैरवेश्‍वर शिखराच्या तळभागातील गुहेत असून तेथील शिवलिंग स्वयंभू असल्याचे मानण्यात येते. या शिवलिंगावर गुहेच्या छताकडून पाण्याचा सतत अभिषेक होत असतो.  हे पाणी चंडीहोल नावाच्या एका लहान नदीच्या प्रवाहाच्या स्वरूपात, दक्षिणेकडे असलेल्या उप्पीनपट्टण या गावापाशी आगनाशिनी नदीला येऊन मिळते. 

दरवर्षी महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव होतो. महाशिवरात्रीच्यावेळी इथल्या गुहेतील झऱ्याचे पाणी समुद्रकिनारी असलेल्या गोकर्ण या ठिकाणी महामस्तकाभिषेक करण्यासाठी नेले जाते. यानाचा परिसर आजही जैवविविधतेने समृद्ध, संवेदनशील प्रदेश आहे. सह्याद्रीत अशा गुहा आजही खूप दुर्मिळ असल्यामुळे त्यांचे संरक्षण होणे नितांत आवश्‍यक आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या