समुद्रातला आभासी धबधबा 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नवलाई

हिंदी महासागरांत आफ्रिकेच्या आग्न्येय किनाऱ्यापासून २२३० किमी अंतरावर मादागास्करच्या पूर्वेला मॉरिशस हे अतीव सुंदर असे सागरी बेट आहे. या बेटाच्या नैऋत्य किनाऱ्यापासून ६०० मीटर अंतरावर पाण्याखाली एक ‘आभासी धबधबा’ आहे. जगातील अनेक लोक या विलक्षण आभासी धबधब्याचा अनुभव घेण्यासाठी इथे येत असतात. 

उथळ समुद्राच्या तळावर होणारा हा धबधब्याचा भास काही विशिष्ट सागरी परिस्थितीचा परिणाम आहे. जगात इतरत्र असा प्रकार आढळत नाही आणि म्हणूनच तो इतका प्रसिद्ध आहे. हा आभासी धबधबा, तिथल्या स्थानिक समुद्रतळावर होत असलेल्या वाळू आणि गाळाचे बारीक कण (sand and silt) यांच्या संचयनाचा व हालचालींचा परिणाम असल्याचे दिसून आले आहे. वाळूच्या आणि बारीक कणांच्या हालचालींमुळे पाण्याचा रंग आणि खोली बदलल्यासारखी व पाणी खाली कोसळत असल्यासारखी भ्रामक प्रतिमा तयार होते आणि इथे धबधबा असावा असे वाटू आणि दिसू लागते. मॉरिशसच्या मध्यवर्ती डोंगराळ भागाच्या झीजेतून तयार झालेल्या गाळाचा या समुद्रतळावर वर्षभर पुरवठा होत असतो. म्हणूनच हा आभासी धबधबा वर्षभर दिसू शकतो. किनारी प्रदेशात हेलिकॉप्टरमधून फिरताना आणि ‘गूगल अर्थ’च्या प्रतिमेवरही हा आभासी धबधबा स्पष्टपणे दिसतो. 

इ. स. ९७५ या वर्षी अरब लोकांनी सर्वप्रथम मॉरिशसचा आणि या आभासी धबधब्याचा शोध लावला. नंतर १५१० मध्ये पोर्तुगिजांनी पुनर्शोध घेतला. मॉरिशसभोवती पसरलेला समुद्र नेहमीच विविधरंगी दिसतो. इथल्या उथळ समुद्रतळावर अनेक प्रवाळजीव विपुलतेने आढळून येतात. ३५० किमी लांबीच्या किनाऱ्यावरून समुद्रतळाच्या दिशेने वाहात येणारी वाळू समुद्रातील प्रवाहांमुळे जास्त खोलीकडे ओढली जाते. या बेटाच्या भोवती असलेली उथळ समुद्रबूड जमीन किंवा भूखंडमंच (Continental Shelf) अरुंद असून तो १५० मीटर खोल आहे. मात्र बेटाच्या नैऋत्य किनाऱ्याजवळ हा विभाग जास्तच अरुंद असून तो सागरतळाच्या ‘सागरी उतार’ या तीव्र उताराच्या विभागाकडे हजारो मीटरनी एकदम खाली झेपावतो. यामुळे वाळू आणि बारीक कणांनी संपृक्त झालेले समुद्रप्रवाह उतारावरून एकदम पुढे जाताना धबधब्याचा आभास निर्माण करतात. इथे किनारा समीप असलेल्या प्रवाळ खडकांमुळेही हा आभास अधिक गडद होत असावा. कारण मॉरिशस बेटाच्या सर्व बाजूंनी उथळ समुद्रांत रोधक प्रवाळांचे (Fringing Reef) अक्षरशः एक कडेच बनलेले आहे. 

काही लाख वर्षांपूर्वी मॉरिशस हे जास्तीत जास्त ८३० मीटर उंचीचे बेट सागरतळ विस्तार (Seafloor spreading) प्रक्रियेतून एका पठारसदृश भागावर समुद्रात तयार झाले. बेट समुद्रातून वर येण्याची घटना एक कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली. पुढची ५० लाख वर्षे ते वर येतच होते. ३५ ते १५ लाख वर्षांपूर्वीच्या काळात बेटावर ज्वालामुखीचे उद्रेक झाले. त्यातून बेटावर तयार झालेला पार्य (Permeable) बेसाल्ट खडक आणि बेटावर पडणारा भरपूर पाऊस यामुळे तेव्हापासूनच बेटाच्या उंच भागाची झीज चालू आहे. त्यातून तयार झालेली 

वाळू समुद्रात व समुद्रतळावर मोठ्या 

प्रमाणात येण्याची क्रिया इथे सदैव चालू असते. लाटांच्या आणि समुद्रप्रवाहांच्या प्राबल्यामुळे ही वाळू सहजगत्या आजूबाजूच्या उथळ भूखंडमंचावर पसरत असते. बेटाच्या नैऋत्य किनाऱ्याच्या दिशेने समुद्रातील प्रवाहांमुळे वाळूची हालचाल मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामुळेच आभासी धबधब्याचा दृष्टिभ्रम इथे जाणवतो. आभासी धबधबा हे मॉरिशसचे प्रमुख पर्यटन ठिकाणही आहे.

संबंधित बातम्या