रहस्यमय बर्म्युडा ट्रॅंगल 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नवलाई
 

उत्तर अटलांटिक महासागरातील बर्म्युडा बेटे, मियामी (फ्लोरिडा) आणि प्योर्टो रिकोतील सान जुआन ही ठिकाणे जोडणारा त्रिकोणी प्रदेश म्हणजे अनेक अतर्क्‍य घटनांनी विख्यात असलेला जगप्रसिद्ध ‘बर्म्युडा ट्रॅंगल’ होय. अनेक महाकाय जहाजे आणि या प्रदेशावरून उडणारी विमाने यांच्या रहस्यमयरित्या गायब होण्यामुळे ‘बर्म्युडा ट्रॅंगल’ हे अजूनही एक न सुटलेले कोडे म्हणूनच अस्तित्वात आहे. संशोधकांना, वैज्ञानिकांना आणि शोध मोहिमा राबविणाऱ्या संस्थांना अजूनही या प्रदेशातील अनाकलनीय घटनांचा नीटसा उलगडा झालेला नाही. 

बर्म्युडा, मियामी आणि प्योर्टो रिको या त्रिकोणी प्रदेशाचे रहस्यमय स्वरूप सर्वप्रथम कोलंबसच्या पंधराव्या शतकाच्या अखेरीस केलेल्या सरगासो समुद्रातील शेवाळ व पाणवनस्पतीच्या गूढ आणि भयप्रद वर्तणुकीतून जगासमोर आले. त्यानंतर या प्रदेशात घडलेल्या विमाने व जहाजे नाहीशी होण्याच्या असंख्य घटनांमुळे तर त्याचे नामकरण ‘डेविल्स ट्रॅंगल’ असेच झाले. 

या प्रदेशात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देण्याचा आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केला आहे. यातील बरेचसे प्रयत्न हे शास्त्रीय व तार्किकतेच्या पातळ्यांवर चपखल बसणारे आहेत यात शंका नाही. वातावरणीय विपथन (Atmospheric aberration), हवेतील अशांतता (Air turbulence), विद्युतजन्य वादळे (Electrical stand storms), चुंबकीय विपथन (Magnetic aberration), उडत्या तबकड्यांचा संचार, काळ बाक (Time warp), सागर तळावरील भूकंप आणि त्सुनामी.. ही व अशी अनेक स्पष्टीकरणे यासाठी दिली गेली आहेत. 

बर्म्युडा ट्रॅंगलच्या भागातून ८० अंश पश्‍चिम रेखावृत्त जाते. या रेघेवर पृथ्वीवरील खरी व चुंबकीय उत्तर दिशा (True and magnetic north) यांची आखणी (alignment) एकच आहे. त्यामुळे येथे होकायंत्र, दिशेत बदल दाखवीत नाही. अशा वेळी अनुभवी जहाजचालकही भरकटू शकतो. या रेखावृत्ताच्या दुसऱ्या बाजूला असलेले रेखावृत्त पूर्व गोलार्धात जपानच्या पूर्व भागातून जाते. इथेही अशाच रहस्यमय घटना घडतात. या भागाला जपानी व फिलिपिनी कोळी ‘डेविल्स सी’ असे म्हणतात. या भागातही जहाजे नाहीशी होणे, सागरी बेटे समुद्रात बुडणे अशा घटना वारंवार घडताना दिसतात. 

‘बर्म्युडा ट्रॅंगल संघटना’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार १९४५ पासून या प्रदेशावरून जाणारी अनेक विमाने अक्षरशः गायब झाली आहेत. त्यांचा अजूनही कसलाच ठावठिकाणा लागलेला नाही. २००० नंतर या प्रदेशातील रहस्यमय घटना पूर्णपणे थांबल्यासारख्या वाटत असतानाच २००३, २००५, २००८, २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये अनेक लहानमोठ्या घटना या भागात घडल्याचे वृत्तांत येऊ लागले. ४ जानेवारी २०१३ रोजी लॉस रोक्‍स बेटांकडून व्हेनेझुएलातील कॅराकास जाणारे विमान जेमतेम २० किमी अंतर गेल्यावर आकाशात अक्षरशः नाहीसे झाले. त्यानंतर असंख्य वेळा शोध घेऊनही विमानाचा कुठलाही पुरावा किंवा विमानाचे कोणतेही अवशेष आजपर्यंत सापडलेले नाहीत. १५ मे २०१७ रोजी प्योर्टो रिकोकडून दक्षिण फ्लोरिडाकडे जाणारे एक खासगी विमान असेच नाहीसे झाले होते. 

ही २०१३ ची घटना आणखी एका गोष्टीमुळे महत्त्वाची होती. ही घटना मूळच्या ‘बर्म्युडा ट्रॅंगल’ प्रदेशाला लागून असलेल्या दक्षिणेकडच्या प्रांतात काही हजार किलोमीटरवर घडली होती. विमानाचा काहीही शोध न लागणे आणि त्याचे कुठलेही अवशेष न सापडणे यामुळे हे नक्की झाले, की मूळचा ‘बर्म्युडा ट्रॅंगल’ प्रदेश दक्षिणेकडे सरकतो आहे?! या प्रदेशात घडणाऱ्या घटनांत काहीही अतार्किक, गूढ आणि अनाकलनीय नसून काही विशिष्ट अशा वैज्ञानिक यंत्रणांचा आणि घटनांचा तो परिपाक आहे किंवा तसाच तो असला पाहिजे असे सिद्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेतच.

फोटो फीचर

संबंधित बातम्या