लुप्त झालेली प्राचीन नदी

डॉ. श्रीकांत कार्लेकर
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नवलाई
 

चार हजार वर्षांपूर्वी लुप्त झालेली भारताच्या वायव्य भागातील सरस्वती नदी हे अजूनही एक मोठे गूढच आहे. सरस्वती नदीचे अस्तित्व  हे संशोधकांसाठी आजही मोठे आव्हान आहे. तिचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आजवर अनेक देशी आणि विदेशी संशोधकांनी भरपूर प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आलेले नाही. ख्रिस्तपूर्व १२०० ते १५०० वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदातही सरस्वती नदीचा उल्लेख आढळतो. वायव्य भारतात, पूर्वेकडील यमुना आणि पश्‍चिमेकडील सतलज या दोन नद्यांच्या दरम्यान सरस्वती नदी होती असा उल्लेख त्यात दिसतो. ‘वाळवंटात कोरडी पडलेली नदी’ असा महाभारतात तिचा उल्लेख आहे. ही नदी बीन्सना (सध्याचे सिरसार) या गावापाशी लुप्त झाली असावी आणि पुढे छामासोदभेडा या गावापाशी पुन्हा दिसू लागली असावी, असाही उल्लेख महाभारतात आढळतो. 

आज भूरूपशास्त्रीय व भूगर्भशास्त्रीय नकाशे आणि कृत्रिम उपग्रहांनी घेतलेल्या प्रतिमांच्या अभ्यासातून असे लक्षात आले आहे, की वायव्य भारतातील घग्गर हाकरा नदीमधला कोरडा पडलेला नदीमार्ग म्हणजे प्राचीन सरस्वती नदी असावी. कांस्य युगात (Bronze  age) म्हणजे ख्रिस्तपूर्व १२०० ते ३३०० या काळात घग्गर हाकरा नदी खोऱ्यात संपन्न हराप्पा संस्कृती अस्तित्वात होती. आजचे  संशोधन असेही सांगते, की प्राचीन सरस्वती नदीची लांबी १५०० किमी, रुंदी ३ ते १५ किमी आणि सरासरी खोली ५ मीटर असावी. एका मताप्रमाणे चार हजार वर्षांपूर्वी भूप्रक्षोभक (Tectonic) हालचालींमुळे, नदीला पाणी पुरवणाऱ्या मूळ स्रोतात स्थानबदल झाले  असावेत आणि त्यामुळे नदीचा उर्वरित मार्ग भूमिगत झाला असावा. नदीला पाणी पुरवणारा मूळ स्रोत हिमालयातच असावा. 

घग्गर आणि तिच्या हरयाणा, पंजाब, राजस्थान, गुजरातमधील असंख्य उपनद्या सरस्वती नदीचे अस्तित्व अधोरेखित करतात असाही दावा केला जातो. 

पंजाब, हरयाणा आणि उत्तर राजस्थानातून वाहात सरस्वती नदी खंबातच्या आखातात समुद्राला जाऊन मिळत असावी. राजस्थानमध्ये  प्रवाह कोरडा होऊन पुढे हनुमानगड, पिलिबंगन, अनुपगडाच्या दिशेने जात असावा. सरस्वतीचा उगम उत्तराखंडमधील बंदरपूंछ या गढवाल हिमालयातील शिवालिक पर्वतरांगांतील हिमनदीतून झाला असावा. भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या (ISRO)  संशोधनानुसार सरस्वतीच्या प्राचीन प्रवाह रेषेवरून आज घग्गर नदी वाहते आणि तोच खरा प्राचीन सरस्वती नदीचा मार्ग आहे. या नदीच्या आजूबाजूच्या एकूण १४ विहिरीतील पाण्याच्या कार्बन डेटिंग पद्धतीने केलेल्या कालनिर्णयानुसार हे पाणी ८ हजार ते  १४ हजार वर्षे जुने असावे. इथली पाण्याची प्रतही खूप चांगली आहे. या प्रवाह मार्गाच्या नजीक असलेल्या वनस्पतीही वर्षभर आणि तीव्र उन्हाळ्यातही टिकून राहत असल्याचे आढळून आले आहे. नदीकाठची गावे गेली ४० वर्षे या विहिरी वापरत असूनही एकदासुद्धा पाण्याची कमतरता जाणवली नाही असे गावकरी सांगतात. अलीकडेच जैसलमेरमध्ये खोदण्यात आलेल्या कूपनलिकांतही मोठ्या प्रमाणावर हजारो वर्षे जुने भूजल सापडले आहे. या वाळवंटी भागात पाण्याचा कितीही उपसा केला तरी ते कमी होत नाही असे दिसून आले आहे. 

भारताच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे या भागात स्वतंत्रपणाने उत्खनन केले गेले आणि त्यातून सरस्वती नदी नक्कीच अस्तित्वात असावी असे सिद्ध करणारे पुरावे आढळले आहेत. जैसलमेरच्या आजूबाजूला संशोधन करताना तिथल्या स्थानिकांकडून कळले, की इथे खोदण्यात आलेल्या कूपनलिकेतून नेहमीच गोड पाणी मिळते. बाकीच्या गावांत मिळते तसे खारट पाणी इथे मिळत नाही. इथले गावकरी सांगतात, की या गावांखालून सरस्वती नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहतोय...

फोटो फीचर

संबंधित बातम्या