अरबी समुद्रातील बुडालेली पर्वतरांग 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

नवलाई
 

भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यापासून ४७५ किमी अंतरावर, अरबी समुद्रात १६ अंश ३७ मिनिटे उत्तर अक्षांश आणि ६८ अंश ५० मिनिटे पूर्व रेखांश असे स्थान असलेल्या ठिकाणी लक्ष्मी पर्वताची एक रांग आहे. तिला ‘लक्ष्मी पर्वत रांग’ असे म्हटले जाते. ३५०० ते ४००० मीटर खोल असलेल्या समुद्रतळावरची ही पर्वतरांग आणि भारताचा पश्‍चिम किनारा यामधे सहाशे किमी लांब आणि तीनशे किमी रुंद लक्ष्मी याच नावाचा लांबरुंद खळगा म्हणजे बेसिन आहे. समुद्र तळावरची ही पर्वतशृंखला अनेक सागरी उंचवटे  यांनी बनली आहे. याच परिसरात समुद्रतळावर १६४५ मीटर उंचीचा रमण नावाचा पर्वतही आहे. अरबी समुद्रात असलेले सेचेलीस हे लघुखंड पूर्वी भारतीय उपखंडाचा भाग होते. या दोघांच्या दरम्यान सध्या अस्तित्वात असलेली लक्ष्मी पर्वत शृंखला आणि तिच्या पूर्वेकडील विस्तृत लक्ष्मी खळगा व त्यातील पर्वत हे अनेक कारणांमुळे आजही मोठे भूशास्त्रीय रहस्य आहे. 

वास्तविक, जगातील सर्वच महासागरांत आणि लहान समुद्रांत अनेक पर्वत, पर्वत रांगा आणि उंचवटे आहेत. त्यांच्या निर्मितीविषयी नेमके स्पष्टीकरण बऱ्याच अंशी आज उपलब्ध आहे. मात्र लक्ष्मी पर्वतरांग व लक्ष्मी बेसिन ही सर्वमान्य भूशास्त्रीय गुणधर्म लागू न होणारी भूरूपे आहेत. पृथ्वीवरील समुद्रतळावर असलेल्या ‘सागरमग्न पर्वतरांगां’ची एकूण लांबी सुमारे ७४ हजार किमी असून अटलांटिकच्या मध्यभागी असलेली पर्वत श्रेणी हिंदी आणि प्रशांत महासागरातील पर्वतरांगेशी संलग्न आढळते. अशा अनेक पर्वतरांगा महासागरांच्या आणि लहान-मोठ्या समुद्रांच्या तळावरही आढळतात. यातील भेगांमधून पृथ्वीच्या अंतरंगातील वितळलेला लाव्हा बाहेर येतो व दोन्ही दिशांनी पसरू लागतो. पसरण्याचा त्यांचा वेग सगळीकडे सारखा नसतो. सागरतळ निर्मितीपासूनच अजूनही ही प्रक्रिया चालू असल्यामुळे प्राचीन काळी वर आलेला लाव्हा दूर ढकलल्या गेलेल्या भूमीखंडाच्या किनाऱ्याजवळ व नवीन लाव्हा व त्याने बनलेले कवच पर्वतरांगेजवळ आढळते. 

लक्ष्मी बेसिनच्या मध्यवर्ती भागात आज अनेक अवशिष्ट डोंगरमाथे आहेत. या माथ्यांवर लाव्हा पसरण्याचा, म्हणजे पर्यायाने सागरतळ विस्तार पावण्याचा आत्ताचा वेग दरवर्षी २६ मिमी आहे. बेसिनच्या दोन्ही बाजूस म्हणजे पश्‍चिमेकडील लक्ष्मी पर्वताजवळ आणि पूर्वेकडील भारताच्या किनाऱ्याजवळच्या सागरी उतार भागात तो १ सेंमी ते ३ सेंमी असावा, असे तेथील खडकात अश्‍मीभूत झालेल्या चुंबकीय गुणधर्मातून लक्षात येते. 

सागरतळावर अनेक ठिकाणी तप्तस्थळे (Hot Spots) असतात व त्यातून लाव्हा बाहेर पडत असतो. लक्ष्मी बेसिन हे ७ कोटी वर्षांपूर्वी असेच एक तप्तस्थळ असावे व त्यातून बाहेर आलेला लाव्हा पश्‍चिमेकडे पसरत जाऊन साठल्यामुळे लक्ष्मी पर्वत तयार झाला असावा, असे मानण्यात येते. सागराच्या पोटातील ही पर्वतरांग, गुरुत्वशक्ती, चुंबकीय वैशिष्ट्ये आणि खडकांची घनता या सर्वच बाबतीत असामान्य असून तिचे सगळे गुणधर्म सागरी पर्वतासारखे नसून एखाद्या खंडीय पर्वतासारखे आहेत. तिच्या पूर्वेकडील लक्ष्मी बेसिनचे गुणधर्म मात्र सागरी कवचासारखे आहेत. पूर्वीचा समज असा होता, की लक्ष्मी बेसिनसुद्धा खंडीय कवचासारखेच आहे. 

आज या लक्ष्मी बेसिनमधे भूजन्य गाळाचा मोठा थर आहे. लक्ष्मी पर्वत रांगेच्या शिखर रेषेवरचा लांबट उंचवटे असलेला भाग आज  केवळ एक नष्ट झालेल्या पर्वत शिखराचा उर्वरित भाग आहे. त्यातून लाव्हा वर येण्याची घटना ७ कोटी वर्षांपूर्वीची असावी, असेही संकेत मिळाले आहेत. लक्ष्मी पर्वतरांगेच्या प्रदेशात आढळणारे खडक आपल्या दख्खनच्या पठारावर आढळणाऱ्या बेसाल्ट खडकासारखे आहेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या