झाडांच्या मुळांचे नैसर्गिक पूल 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

नवलाई
 

ईशान्य भारतातील मेघालय राज्यांत खासी आणि जैंतिया टेकड्यांचा परिसर हा विस्तृत डोंगराळ भाग आहे. वेगवान वाहणाऱ्या नद्यांनी तो अगदी भरून गेलाय. या नद्यांच्या दोन्ही तीरावर असलेल्या भल्या मोठ्या वृक्षांची दुय्यम मुळे (Secondary roots) एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याकडे सरळ वाढत गेल्यामुळे त्यांचे नदीमार्गाच्याही थोडे वर नैसर्गिक पूल बनले आहेत. यांना ‘झाडांच्या मुळांचे पूल’ (Root Bridge) असे म्हटले जाते. 

नैसर्गिकरीत्या आडव्या दिशेने वाढत जाणारी ही मुळे अतिशय कठीण आणि भक्कम असून ती रबराच्या झाडाची (Ficus elastica) असतात. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या मुख्य खोडापासून, जमिनीपासून थोडे वरच्या बाजूला अनेक दुय्यम मुळे वाढतात आणि ती सहजपणे नदी किनाऱ्यावरील प्रचंड मोठ्या दगडांच्या अडथळ्यांवरून आडव्या दिशेने समोरच्या किनाऱ्याकडे वाढू शकतात. वाढत असताना ती एकमेकांत गुंतून त्यापासून पुलासारखी भक्कम रचना वेगवान नद्यांच्या वर नैसर्गिकपणे तयार होते. मेघालयात बऱ्याच नदीपात्रांवर असे ‘झाडांच्या मुळांचे पूल’ गेल्या अनेक शतकांच्या काळात तयार झाले आहेत. 

झाडांच्या मुळांपासून बनलेले हे पूल जगभरात त्यांचा विस्तार, भक्कम व कठीणपणा यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बाबतीत असे म्हटले जाते, की मेघालयात नदी ओलांडण्यासाठी ‘पूल बांधले जात नाहीत तर ते उगवतात’ (Bridges are not built, they Grow) वर-खासी आणि वर-जैंतिया या दोन आदिवासी जमातींना अनेक वर्षांपूर्वी या पुलांचा शोध लागला. या पुलांचा  भक्कमपणा बघून आज मेघालयात अनेक ठिकाणी या जमाती रबराची ही झाडे नदीकिनारी मुद्दाम वाढवून असे पूल तयार करतात. पूल  सहजपणे तयार व्हावा म्हणून हे लोक आडवी वाढणारी झाडांची दुय्यम मुळे ओढतात, वेडीवाकडी करतात, एकमेकांत गुंतवतात आणि हवा तसा आकार पुलाला यावा, पुलाची लांबी व रुंदी आपल्याला हवी तशी मिळावी म्हणून वाढणाऱ्या मुळांना आपल्या इच्छेप्रमाणे वळवून वाढू देतात. 

अनेकदा नदीपात्रात वरच्या दिशेने मचाणासारख्या (Scaffold) रचना, लाकडाचे ओंडके, बांबू यांचा वापर करून तयार केल्या जातात आणि त्यावरून आडवी वाढणारी मुळे सहजपणे पसरतील याची काळजी घेतली जाते. मेघालयात मॉन्सूनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पावसात या रचना कुजून जाऊ नयेत म्हणून वारंवार बदलल्याही जातात. रबराच्या या दणकट, दुय्यम मुळांना सहजगत्या वाढता यावे व त्यांना नेमकी दिशा मिळावी म्हणून नोंग्रीआट गावातले लोक सुपारीच्या झाडाची खोडे वापरतात. या खोडांमुळे रबराच्या झाडाची मुळे आजूबाजूला पसरत नाहीत, एकाच दिशेने पुढे वाढत राहतात. शिवाय सुपारीची खोडे कुजल्यानंतर तयार होणारे अन्नघटक रबराच्या झाडाच्या मुळांना मिळतात. रबराच्या झाडाची मुळे नदीच्या पलीकडच्या काठावर पोचली, की तिथे ती जमिनीत घट्ट रुजतील व संपूर्ण पुलाला भक्कमपणा येईल याचीही काळजी घेतली जाते. 

अशा तऱ्हेने तयार झालेल्या आणि नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या पुलांची ताकद अगदी असामान्य असते. पन्नास माणसे त्यावरून एकाच वेळी सहजपणे पूल ओलांडू शकतात. हे पूल पाचशे वर्षेतरी टिकून राहू शकतात. दक्षिण मेघालयात हे पूल ६० मीटरपर्यंत वाढू शकतात. नदीपात्राच्यावर ते २० ते ३० मीटर उंचावर वाढताना दिसून येतात. काही ठिकाणी हे पूल एकाशेजारी एक असे समांतर वाढलेले दिसतात. उमशियांग गावाजवळ ते एकावर एक असे डबल डेकरसारखेही वाढलेले दिसतात. नोंग्रीआटजवळ आता एकावर एक अशा तीन पुलांची वाढ करण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत.

Tags

फोटो फीचर

संबंधित बातम्या