विपरीत चुंबकत्वाचा परिसर 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

नवलाई
 

कोकणातल्या जांभा दगडाच्या पठारावर अनेक कातळशिल्पे आढळतात. या पठारांना स्थानिक भाषेत कातळ किंवा सडा असे म्हटले  जाते. यावर दिसणारी ही कातळशिल्पे हे आजही एक मोठे गूढ आहे. विविध चित्रे आणि अगम्य अशा आकृत्या व नकाशे यांनी ही  शिल्पे समृद्ध आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत असलेला जांभा खडक या शिल्पांसाठी अगदी आदर्श असावा, असे या भागात आम्ही आणि इतर अनेकजण करत असलेले संशोधन सुचविते. इथल्या कातळावर मासे, जलकुंभ, पाण्यातील साप अशा जलस्थानाशी निगडित अनेक चित्रविचित्र शिल्पाकृती खोदलेल्या आढळतात. मात्र सगळीकडेच त्या इतक्‍या स्पष्ट नाहीत. मे महिन्यात कातळावरचे सगळे गवत नाहीसे झाल्यावर असे अनेक चित्रविचित्र आकार दिसतात, असे स्थानिकांनी सांगितले. समुद्रसपाटीपासून ८० ते २०० मीटर उंचीवरच्या पठारांवर ही अशी शिल्पे आढळतात, असे आमच्या अभ्यासातून लक्षात आले. 

अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामांमुळे अशी दुर्मिळ शिल्पे गायब झाली असावीत. ही चित्रे, नकाशे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही. काहींच्या मताप्रमाणे ही कातळचित्रे इ. पू. ६००० वर्षे जुनी असावीत. अर्थातच हा एक अंदाज आहे. 

कातळावर काही ठिकाणी मनुष्यसदृश आकृत्याही कोरलेल्या दिसतात, असे काही स्थानिकांनी सांगितले. मात्र त्या अस्पष्ट, अर्धवट आणि अपूर्ण आहेत. शास्त्रीय पद्धतीने या प्रदेशातील सर्वच कातळचित्रांचा मागोवा घेणे गरजेचे आहे, हे लक्षात आल्यामुळे या कातळांचा आणि त्यावर कोरलेल्या आकृत्यांचा भूरुपिक (Geomorphic) आणि भूचुंबकीय  (Geomagnetic) अभ्यास हाती घेण्याची एक योजना आहे. त्यामुळे या अनाकलनीय कातळचित्रांच्या संशोधनात मोलाची भर पडेल यात शंका नाही. 

या कातळशिल्पांना भूचुंबकीय महत्त्व असावे, असे देवाचे गोठणे या गावात आढळलेल्या, जांभा दगडात कोरलेल्या मनुष्याकृतीच्या अभ्यासातून स्पष्ट झाले. या मनुष्याकृतीच्या नाभीच्या भागावर चुंबकीय सूची ठेवल्यास ती पूर्ण १८० अंशात सव्य दिशेत फिरते आणि  उत्तर दिशेचे निर्देशन दक्षिण दिशा असे करते. त्याच्या आजूबाजूचे चुंबकीय क्षेत्र तपासल्यावर त्याच्या आजूबाजूच्या परिसरात एक विशिष्ट चुंबकीय आकृतिबंध असावा असे माझ्या आणि रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या लक्षात आले. 

देवाचे गोठणे हे गाव रत्नागिरी शहराच्या दक्षिणेला ६० किमी अंतरावर राजापूर तालुक्‍यात आहे. या गावातील ९० मीटर उंची असलेल्या जांभा पठारावर कोरलेली एक आडवी मनुष्याकृती आहे. या कातळशिल्पाच्या आजूबाजूच्या ३०० चौरस मीटरच्या परिसरात आम्ही केलेल्या चुंबकीय सर्वेक्षणात अनेक गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी लक्षात आल्या. या मनुष्याकृतीच्या भोवती साधारणपणे १५ आणि ५ मीटर त्रिज्येच्या भागांत चुंबकसूची सामान्य उत्तर दिशेपासून अनुक्रमे १२० आणि १४० अंशात सव्य दिशेत (Clockwise) पुढे सरकल्याचे दिसून आले. मनुष्याकृतीच्या नाभी प्रदेशाजवळ चुंबकसूची पूर्ण १८० अंशात फिरून दक्षिण ही उत्तर दिशा असल्याचे दर्शविते. या बिंदूपासून ईशान्येला ७ मीटर अंतरावरचा कातळ खडक सामान्य उत्तर दक्षिण दिशा दाखवतो. आग्न्येय दिशेला १३ मीटर अंतरावर, नैऋत्येला १० मीटरवर; तर वायव्येला साधारणपणे ९ मीटर अंतरावर चुंबकसूची सामान्य उत्तर दक्षिण दिशेचे निर्देशन करताना दिसते. म्हणजे मनुष्याकृतीच्या अवती भोवती काही मर्यादित प्रदेशातील जांभा खडकात विपरीत चुंबकत्व आढळून येते. 

कातळावरील या मनुष्याकृतीपासून वर २ ते ३ मीटर उंचीपर्यंतच्या सर्वच भागात असे विपरीत चुंबकत्व दिसून आले. त्यामुळे या कातळशिल्पाचे गूढ अजूनच वाढले आहे. या सगळ्या निरीक्षणांचा उपयोग, कोकणातील कातळशिल्पांचा काळ नक्की करण्यासाठी आणि जांभा खडकांची निर्मिती समजण्यासाठी नक्कीच करून घेता येईल असे वाटते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या