स्फटिकांची गुहा 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

नवलाई
 

मेक्‍सिकोच्या चिहुआहुवा प्रांतातील नैका इथल्या चांदी, जस्त आणि शिसे सापडणाऱ्या खाणीत ३०० मीटर खोलीवर एक प्रचंड मोठ्या स्फटिकांची गुहा आहे. या गुहेत जिप्समचे, आजपर्यंत जगांत सापडलेल्या स्फटिकांपेक्षा सगळ्यात मोठे स्फटिक आढळतात. हे स्फटिक सरासरी १२ मीटर लांबीचे असून त्या प्रत्येकाचा व्यास ४ मीटर आणि वजन ५५ टन इतके आहे. 

ज्या गुहेत हे स्फटिक आहेत ती गुहा अतितप्त असून गुहेतल्या हवेचे तापमान ५८ अंश सेल्सिअस इतके जास्त आढळते. गुहेतल्या हवेत ९० ते ९९ टक्के आर्द्रताही जाणवते. या प्रतिकूल आणि असह्य परिस्थितीमुळे अजूनही या स्फटिकांच्या गुहेचे पूर्ण संशोधन आणि शोधन (Exploration) होऊ शकलेले नाही. गुहेतली परिस्थिती अशी आहे, की आत जाणारी कुणीही व्यक्ती दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ गुहेत राहूच शकत नाही. गुहेला आतून इतर छोट्या-मोठ्या गुहा जोडलेल्या दिसतात. त्यांनी आत गुंफांचे एक (Caverns) जाळेच तयार केले आहे. 

नैका हे गाव एका प्राचीन प्रस्तरभंग (Fault) रेषेवर आहे. वर्ष २००० मध्ये या प्रस्तरभंग प्रदेशातून बोगदा काढीत असताना खाणकर्मींना या गुहेचा शोध लागला. भूपृष्ठाखाली ही गुहा असून त्याखाली ३ ते ५ मीटर खोलीवर लाव्हाचा साठा असलेली खोबणी आहे. या लाव्हामुळे, पृष्ठभागावरून गुहेत उतरणाऱ्या सल्फरयुक्त भूजलाचे तापमान वाढत गेले. पृष्ठभागावरून खाली येणारे थंड पाणी आणि हे गरम झालेले पाणी यांची घनता वेगळी असल्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याने सल्फरयुक्त भूजलातील सल्फाईडचे, सल्फेटचे स्फटिक बनत गेले. स्फटिकीकरणाची ही क्रिया अतिशय संथ होती. गेल्या ५ लाख वर्षांच्या काळात झालेल्या या मंद स्फटिकीकरणामुळे या गुहेत हळूहळू भले मोठे स्फटिक तयार झाले. 

नैका खाणीत काम करणाऱ्या कामगारांना १२० मीटर खोलीवर याच गुहेत आणखी एक गुंफा आढळली. या गुंफेत एक मीटरपेक्षाही कमी लांबीचे अनेक लहान लहान स्फटिक दिसून आले. इथे कदाचित जास्त वेगाने स्फटिकीकरण झाले असावे. त्यामुळे स्फटिकीकरणाची प्रक्रिया पूर्णत्वाला जाण्याआधीच लहान आकाराचे स्फटिक बनले. इथल्या स्फटिकांच्या तलवारीसारख्या आकारामुळे या गुंफेला केव्ह ऑफ सोर्डस (Swords) असे नाव दिले गेले. 

मोठ्या स्फटिकांची ही गुहा एका चुनखडकात निर्माण झाली असल्यामुळे गुहेत नेहमीच पाणी ठिबकत असते. हे पाणी खाणकामाकरता सारखे बाहेर काढले जात असते. त्यामुळेच गुहेत प्रवेश करणे शक्‍य होते. पाणी काढले जात नाही, तेव्हा मात्र गुहेत भरपूर पाणी साठून राहते. गुहेत पाणी नसते तेव्हा घोड्याच्या नालीसारखा असलेला गुहेचा अर्धवर्तुळाकृती आकार सहज लक्षात येतो. गुहेच्या भिंती आणि तळभागातून विस्तीर्ण आकाराचे जिप्समचे स्फटिक सगळीकडून बाहेर डोकावताना दिसतात. 

या मोठ्या स्फटिकांची गुहेबरोबरच क्वीन्स आय केव्ह, कॅंडल केव्ह, आईस पॅलेस केव्ह आणि केव्ह ऑफ सोर्डस अशा अनेक आकारांच्या स्फटिकांनी बनलेल्या लहान गुहा इथे शोधण्यात आल्या आहेत. वर्ष २००६ मध्ये अनेक आधुनिक उपकरणे वापरून या गुहेचे पुन्हा शोधन करण्यात आले. त्यात मुख्य भर हा स्फटिकांचे भूरसायन (Geochemistry), जलीय भूशास्त्र (Hydrogeology) यावर होता. २०१७ मध्ये शास्त्रज्ञांनी काही स्फटिकांत बॅक्‍टेरिया सापडल्याचा आणि हे बॅक्‍टेरिया आज आपल्याला माहीत असलेल्या बॅक्‍टेरियांपेक्षा वेगळे असल्याचाही दावा केला आहे. 

फेब्रुवारी २०१७ मध्ये या गुहेतले खाणकाम थांबले असून गुहा पाण्याने पुन्हा भरून गेल्याचेही वृत्त आहे.  

Tags

फोटो फीचर

संबंधित बातम्या