घातक विषारी वायूंची गुहा 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

नवलाई

अमेरिकेच्या कोलोरॅडो प्रांतातील स्टीमबोट स्प्रिंग्स शहराखाली घातक विषारी वायू पसरवणारी १००,००० वर्षे जुनी एक मोठी गुहा आहे. वायव्य कोलोरॅडोत हॉवेलसेनच्या डोंगराळ भागांतल्या या गुहेचा शोध १८४३ मध्ये लागला होता. या गुहेच्या छतावरून स्नॉटीज नावाच्या एकपेशीय बॅक्‍टेरियांनी बनलेल्या चिकट संरचना, चुनखडीतील अधोमुखी लवणस्तंभाप्रमाणे (Stalectite), खाली लोंबत असतात. त्यातून सल्फ्युरिक आम्ल सतत ठिबकत असते. त्यामुळे सगळी गुहाच चिकट पदार्थांच्या थराने आच्छादून गेलेली असते. ही गुहा म्हणजे सूर्यप्रकाशविरहित सल्फर वायूने कोंडून गेलेली एक काळोखी परिसंस्था (Ecosystem) आहे. या गुहेत जाणाऱ्यांनी गुहेचे वर्णन करताना असे म्हटले आहे, ‘इथे उभे राहिल्यावर आपल्याला एखादा भयंकर प्राणी गिळत असल्याचा भास होत असतो.’ इतके गुहेतले वातावरण भयप्रद आहे. 

या गुहेत सल्फर वायू प्रचंड मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. तरीही आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे गुहेत अनेक कीटक, कोळी, बीटल, माशा   आणि सल्फर वायू घेऊनच श्‍वासोच्छवास करणारे जिवाणूही (Microbes) आहेत. अगदी काही वर्षांपूर्वीच लालभडक रंगाचे काही किडेही इथे वास्तव्य करून असल्याचे दिसून आले आहे. गुहेत असलेले हायड्रोजन सल्फाइडचे प्रमाण हे समुद्रतळावरील ज्वालामुखींच्या नलिकांत जितके आढळते त्याच्यापेक्षा दहा पटीने जास्त आढळून आले आहे. 

एका अरुंद खड्डा या गुहेचे प्रवेशद्वार असून पन्नास मीटर लांबीच्या या गुहेत पूर्ण तयारीनिशी घसरतच प्रवेश करता येतो. विषारी वायुपासून सुरक्षित राहण्याची काळजी न घेता आत उतरलेले अनेकजण गुहेतील सल्फरमुळे बेशुद्ध झाल्याच्या घटनाही इथे यापूर्वी घडल्या आहेत. गुहेत सर्वत्र पसरलेला, कुजलेल्या अंड्याचा वास असलेला वायू तिथे अजिबात राहू देत नाही. थंडीच्या दिवसांत या वायूच्या वाफा गुहेतून सतत बाहेर येत असताना दिसतात. 

असे असले तरी या गुहेला तिच्या या अशा भयप्रद वातावरणामुळे वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. नेहमीच काळोखाने भरून गेलेल्या गुहेत, भरपूर प्रकाश देणाऱ्या मोठमोठ्या बॅटऱ्या घेऊन गेल्यावर गुहेचे विलक्षण नैसर्गिक सौंदर्य पूर्णपणे नजरेस पडते. सगळीकडे जिप्सम या सल्फेट खनिजाचे चमकणारे स्फटिक गुहेच्या भिंती, छत आणि तळावर वाहणाऱ्या पाण्याच्या अनेक लहान मोठ्या प्रवाहांत पसरलेले दिसतात. वाहत्या पाण्याच्या प्रवाहांत, जिवाणूंनी बनविलेल्या वसाहती (Colonies), लांबच लांब तंतूंच्या स्वरूपात (Tendrils) तरंगताना दिसतात. 

सल्फर वायूंनी भरलेल्या अशा गुहा मेक्‍सिको आणि इटली वगळता जगात इतरत्र फारशा आढळत नाहीत. कोलोरॅडोतील ही गुहा  खनिजयुक्त झरे आणि नद्यांत तयार झालेल्या ट्रॅव्हर्टइन (Travertine) या खडकांत तयार झाली आहे. गुहेत सल्फर डाय ऑक्‍साईड आणि कार्बन डाय ऑक्‍साईड यांचे प्रमाण मोठे असूनही इथे असलेले अनेक जिवांचे अस्तित्व ही मोठीच आश्‍चर्याची गोष्ट आहे. 

रक्तवर्णाचे लिम्नोड्रिलस सल्फरेन्सिस (Limnodrilus salphurensis) किडे गुहेच्या तळभागावर गटागटाने चिकटून असलेले आढळले. सामान्यपणे इतर किडे असे गटागटाने एकत्रितपणे आढळून येत नाहीत. या किड्यांच्या शरीरात असलेल्या हिमोग्लोबिनमुळेच त्यांना भडक रक्तवर्ण मिळाला असून, घातक सल्फर वायूपासून या किड्यांचे यामुळेच संरक्षण होत असावे असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. २००७ मध्ये डेव्हिड स्टीनमन या संशोधकांना त्यांचा प्रथम शोध लागला. हे किडे दोन ते अडीच सेंमी लांबीचे, पेन्सिलच्या टोकाला असलेले शिसे जितके जाड तितक्‍या जाडीचे आणि पारदर्शी त्वचेचे असतात. गुहेतल्या अतिशय कमी प्राणवायू असलेल्या वातावरणांतले त्यांचे अस्तित्व हे अजूनही एक मोठे गूढच आहे. 

मंगळ ग्रहावर जीवसृष्टी असली तर ती या रक्तवर्णी किड्यांसारखीच असावी असा एक कयास बांधण्यात आला आहे. या किड्यांचा काहीच जीवशास्त्रीय पूर्वेतिहास सापडत नसल्यामुळे हे किडे परग्रहीय (Aliens) असावेत असेही काहींनी सुचविले आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या